सोमवार, १८ जून, २०१८

आंबा पिकतो, रस गळतो...

-------
बातमीमधून काय अपेक्षित असतं? सत्य की सनसनाटीपणा? हा सनसनाटीपणा आणण्यासाठी ज्या बातम्या तोडून मोडून दाखवल्या जातात, त्यांनाच बहुधा ब्रेकिंग न्यूज म्हणण्याची पद्धत रूढ झाली असावी. यात सत्य कुणालाच नको असतं. न ती बातमी देणार्‍यांना, न ती ऐकणार्‍यांना, पाहणार्‍यांना. बातमी देणार्‍यांसाठी ’बातमी’ हे आपली राजकीय, आर्थिक गणिते सोडवण्याचे माध्यम असते. पाहणार्‍यांसाठी ’बातमी’ हा खुमखुमी शमवण्यासाठी मुद्दा. कारणं वेगवेगळी असली, तरी घटनेच्या देठापर्यंत पिकलेले बातमीचे आंबे प्रत्येकालाच हवेहवेसे असतात. आंबे पिकतच राहतात, रस गळतच राहतो. त्यासाठी चाललेला झिम्मा मात्र, ’बेंदुल्ली’सारखा आंब्याच्या झाडालाच पोखरून टाकतो.
-------------

’आंबा पिकतो, रस गळतो’, हे गाणं सध्या सगळीकडे आळवलं जात आहे. त्यानंतर आजतागायत सुरू असलेला झिम्मा तर अलौकिक आणि अवर्णनीय आहे. या आंब्याचा ’शेक’ सोशल मीडिया नावाच्या मिक्सरमधून काढण्यास प्रत्येकजण गुंग आहे. आपल्याला हवा तसाच ’मँगो शेक’ करण्यात आणि दुसर्‍यांच्या गळी उतरवण्यात गुंतलेले व गळी उतरवून घेणारे दोघेही आंब्याच्या झाडाप्रमाणे सत्वहीन आणि शुष्क होत चालले आहेत.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या भाषणाची बातमी सर्व वृत्तवाहिन्यांनी दाखवली. या सर्व वाहिन्यांच्या बातमीचे व्हिडिओ आणि या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ यांचा ताळेबंद मांडला, तुलना करून पाहिली तर वृत्तवाहिन्यांचं बातमी ’तयार’ करण्याचं कसब निश्‍चित जाणवतं.

जो मूळ व्हिडिओ उपलब्ध झाला आहे, त्यातील भाषणाचा, बातमीच्या संदर्भातील उतारा पुढीलप्रमाणे;
’मोहनराव शिवाजीराव मोहिते, मांडणा नावाचं गाव आहे, तिथले. बरेच दिवसांनी माझ्याकडे आले. बत्तीस वर्षांनंतर. बोलता बोलता त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ऐकण्यासारखी आहे. त्यांना शेती फळ बागायतीची मशागत करायची भारी हौस. ते म्हणाले,
’मी धाराशिव जिल्ह्याकडे गेलतो (गेलो होतो), तिथे भूम तालुक्याजवळ वाशी तालुका आहे. मला कळलं की, तिथे एका शेतकर्‍याजवळ १०७- १०८ आंब्याच्या चांगल्या जाती आहेत. म्हटलं बघावं. तिथं गेलो. बोलता बोलता तो शेतकरी वाशी तालुक्यातला, मला म्हणाला, साहेब, सगळे आंबे चांगलेच आहेत. भगवंताची कृपा म्हणायची मला एके ठिकाणी आंब्याची एक कोय मिळाली. त्या कोयीचं रोपटं करून ते झाड वाढवलंय. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन आठ आठ दहा दहा बारा बारा वर्षं झाल्यानंतरसुद्धा पोर होत नाही अशा स्त्री पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, निश्‍चित पोरं होतं. असं झाड आहे माझ्याकडे. गुरुजी, मी त्याच्याकडनं दोन आंबे आणून, दोन रोपं करून माझ्याही बागेत, माझ्या शेतात मी लावली. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणालाच माझ्या आईशिवाय कुणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आत्तापर्यंत १८०पेक्षा जास्त जणांना, पती पत्न्यांना  जोडप्यांना खायला दिले. ती पद्धत शिकवली, ती पथ्य सांगितली आणि दीडशेपेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होई. अपत्य नसेल अपत्य होईल. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे. (शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत) हा आम्रवृक्ष असाच आहे. जे राष्ट्रियत्वाच्याबाबतीत गांडाळ, नपुंसक, क्लीब असलेला हिंदू समाज त्याच्यावरती शिवाजी, संभाजी नावाचा जो महामृत्यूंजय मंत्र, महासंजिवनीमंत्र आहे. त्याचं प्राशन करा. १०१% हिंदू समाज शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाचा बनेल. आणि सत्य आहे माझं बोलणं. ’

सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांनी या हकिकतीचे मधूनच वार्तांकन टिपायला सुरुवात केली असेल, असे संभवत नाही. एका वृत्तवाहिनीची गल्लत होणे समजू शकते. यच्चयावत सर्व मराठी वृत्तवाहिन्यांना आणि त्यांच्या पत्रकारांना, भिडे आपल्या शेतकरी मित्राने सांगितलेली हकीकत आहेत की, आपलीच हकीकत सांगत आहेत, यातला फरक समजला नाही? अशी चूक होणे कसे संभवते? तेव्हाही नाही, जेव्हा एक वृत्तवाहिनी वगळता सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी ’गुरुजी, मी त्याच्याकडनं दोन आंबे आणून, दोन रोपं करून माझ्याही बागेत, माझ्या शेतात मी लावली. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणालाच माझ्या आईशिवाय कुणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आत्तापर्यंत १८०पेक्षा जास्त जणांना, पती पत्न्यांना  जोडप्यांना खायला दिले. ती पद्धत शिकवली, ती पथ्य सांगितली आणि दीडशेपेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होई. अपत्य नसेल अपत्य होईल. असा हा आंबा आहे. ’ हे वाक्य दाखवलं, तेव्हा दुसरी व्यक्ती काय बोलली, हे भिडे सांगत असतील, असा साधा संशयही वृत्तकथन करणार्‍यांना, संकलन करणार्‍यांना आणि संपादकांना आला नाही? सरसकट सर्व वृत्तवाहिन्यांनी आपल्या शेतातील आंबे खाऊन अपत्यप्राप्ती होते, (एका वृत्तवाहिनीने मुलगेच होतात, असे म्हटल्याचेही सांगितले) असा दावा भिडेंनी केल्याचे सांगितले. ही एकवाक्यता काय सूचित करते? त्याही पुढे जाऊन, त्या घटनेचा संदर्भ देत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत म्हटलेली वाक्यं एकाही वाहिनीने दाखवली नाहीत. का?



जेव्हा एखादा वाद उद्भवतो, तेव्हा दोन्ही बाजू मांडण्याची पद्धत आहे. फक्त विरोधात असणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या. ज्या संस्थेने याचे आयोजन केले होते, त्या संस्थेच्या कुठल्याच पदाधिकार्‍यांची किंवा आयोजकांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली नाही.


प्रत्येकाने या बातमीचा फायदा आपापल्या पद्धतीने घेतला, की तो घेता यावा यासाठीच वाहिन्यांनी अशा पद्धतीने वार्तांकन केलं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ते या सर्व वृत्तवाहिन्यांनीच स्पष्ट करणे आवश्यक आहे. आपल्याला हवं तेवढंच, ज्याला साहेबाच्या भाषेत ’आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट’ असं म्हणतात, तसं बाजूला काढून वावटळी निर्माण केल्या जात आहेत. या वावटळींची वादळं होतात की, नाही यावर अनेक राजकीय आणि आर्थिक गणितं अवलंबून असतात.  या बातमीनंतर स्वत:च ’सँपल’ असणार्‍या राजकारण्यांकडून राजकीय प्रतिक्रिया आल्या, ’राज’कीय व्यंगचित्रं रेखाटली गेली, महिला राजकारण्यांना महिलांचा, मातृत्वाचा अपमान वाटला, सामाजिक संघटनांनी थेट तुकाराम महाराजांचे दाखले देत ’वारकरी’ आणि ’धारकरी’ यांच्यातला भेद दाखवून आपले कर धुवून घेतले, राष्ट्रीय वर्तमानपत्रांनी कोणतीही शहानिशा न करता बातम्या छापल्या, स्थानिक वर्तमानपत्रांनी निरतिशय आनंदाने डोळे मिटून घेत त्या तशाच छापल्या. चूक कुणाची? परिणाम काय? या सर्व प्रकरणात संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीला काही फरक पडत नसेलही. पण, जे विष पसरतंय ते राष्ट्रासाठी घातक आहे.

रोहित वेमुलाची आत्महत्या ही ’दलित रोहित वेमुलाची आत्महत्या’ असते. त्याच कारणासाठी त्याआधी, तीन तरुणींनी केलेली आत्महत्या, ’तीन तरुणींची आत्महत्या’ असते. निर्भीड, सत्यशोधक पत्रकारितेचा दावा करणारे पत्रकार, हिंदू मुस्लिम यांच्यात झालेली मारामारीची घटना ’दोन गटात झालेली मारामारी’ अशा बातमीत आटोपतात. हा दोष जसा या अपरिपक्व पत्रकारितेचा आहे, तसाच तो सोशल मीडियावर पांडित्य गाजवणार्‍या शूरवीरांचाही आहे.

मागे मनोहर पर्रीकर आजारी होते, तेव्हा ते जणू दिवंगतच झाले, असे गृहीत धरून अनेक फेसबूकवीर गतिमान झाले होते. त्यांच्या जातीवरून अत्यंत हिणकस टीका केली जात होती. गांधीजींचे चारित्र्यहनन करताना आपण एका प्रात:स्मरणीय महात्म्याचे चारित्र्यहनन करीत आहोत, नेहरूजींचे चारित्र्यहनन करत असताना आपण आपल्याच राष्ट्राच्या पंतप्रधानांचे चारित्र्यहनन करीत आहोत, याची जराही बूज राखली जात नाही. राजकीय पक्षाची मक्तेदारी घेऊन दुसर्‍या राजकीय पक्षाच्या व्यक्तींवर किती हीन पातळीवर जाऊन टीका करावी, याला काही धरबंधच उरला नाही. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना, जे अपशब्द सोशल मीडियावर वापरले जात आहेत, ते लिहिणार्‍यांच्या जर आईवडिलांनी वाचले, तर त्यांना आपल्याला अपत्यप्राप्ती झाल्याचे दु:ख होईल. तेही आंबे न खाता.


वैचारिक मतभेद, वाद असण्यास काहीच हरकत नाही. पण, त्याची हीन पातळी पाहिली की, वेदना होतात. ’आपलं ते खरं’ करण्यासाठी खोटेपणाचा आधार घेतला जातो, तेव्हा त्रास होतो.
आंबा खाऊन पोरं होतात की नाही निश्‍चित माहीत नाही. पण, असल्या वांझोट्या वावटळी दिवसागणिक उठवून आपली पुढची पिढी नि:सत्व केली जात आहे, एवढं मात्र निश्‍चित!