शनिवार, ४ मार्च, २०२३

सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो?

लहानपणी पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांपैकी, ‘सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो?’ हा प्रश्‍न बराच काळ अनुत्तरित राहिला. ‘असत्याने कितीही प्रयत्न केले तरी आणि सुरुवातीला वाटले की, असत्य जिंकते, तरी शेवटी विजय सत्याचाच होतो.’, असे उत्तर मिळायचे. ‘मग सुरुवातीलाच का नाही?’ या निरागस बुद्धीने बालपणी विचारलेल्या प्रश्‍नाला पाठीवर धपाट्याशिवाय काही उत्तर मिळत नसे. वडिलांनी जवळ बसवून सांगितलेले उत्तर डोक्यात शिरले, पण समजले नाही. ते उत्तर समजायला, पटायला अनेक वर्षे जावी लागली.

मध्यंतरी सिनेमांचे वेड फार लागले होते. त्यातही अगदी या प्रश्‍नाला ‘गाजर का हलवा’ इतकेच महत्त्वाचे स्थान होते. चित्रपटांतील अभिनेत्री व सत्य यांची तुलना करण्याचा मोह, अभिनेत्रींच्या मोहाइतकाच अनावर होत आहे. त्या कशा चित्रपटभर जमेल तितकेच कपडे घालून यथेच्छ धुडगूस घालतात व शेवटी सर्वांग कपड्यांनी झाकून घेत सर्वांबरोबर ग्रुप फोटो देत ‘द एन्ड’ करतात, तसेच काहीसे सत्याच्या विजयाचे होत असावे. 

संस्कृतातले ‘सत्य’ आणि मराठीतले ‘सत्य’ यात फरक आहे. संस्कृतात सत्य शाश्‍वत, कालातीत या अर्थाने येते. म्हणजे; ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा अर्थ ब्रह्म हे शाश्‍वत, अपरिवर्तनीय व कालातीत आहे. तर जग हे न टिकणारे, सतत बदलणारे व ‘होते, आहे, असेल’ या काळाच्या बंधनात असलेले. इथे मिथ्या म्हणजे खोटे नव्हे आणि सत्य म्हणजे खरे नव्हे. मराठीत सत्य म्हणजे ‘खरे’. ‘नेहमी खरे बोलावे’ हे आपण लहानपणी शिकतो, आपल्या मुलांनाही शिकवतो. पण, कळू लागताच तसे वागत मात्र नाही. कारण, एव्हाना सत्य किंवा खरे बोलण्याचे ‘दुष्परिणाम’ भोगून झालेले असतात. त्यामुळे, सत्य याचा संबंध आपण निरागसतेशी जोडून त्याला लहान मुलांपुरते मर्यादित केले आहे. मुलांनी आपल्याला नको असलेले ‘खरे’ बोलले की, आपण त्याला ‘निरागसपणा’ या सदराखाली हसत हसत सहन करतो.  

खोटे बोलणे हे आपण स्वत:पुरते आणि काही बाबतीत इतरांसाठीही क्षम्य ठरवतो. वेळ मारून नेण्यासाठी, बाक्या प्रसंगातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आपण जे खोटे बोलतो त्याला आपण ‘खोटे’ म्हणत नाही. दारावर अचानक नको असलेले पाहुणे टपकावेत, आपण मुलाला सांगावे, ‘बाबा घरी नाहीत म्हणून सांग’ आणि आपल्याच कुलदीपकाने ‘बाबा घरी नाहीत असे सांगायला बाबांनी सांगितले आहे’ असे सांगून मोकळे व्हावे, तेव्हा आपण खोटे पडलेले खरे उचलून चेहऱ्यावर निरागस हसू आणत पाहुण्यांना सामोरे जातो.

सत्य, असत्य किंवा खरे, खोटे याबद्दलचे द्वंद्व आपल्या मनामध्ये कायम सुरू असते. कशाला काय म्हणावे, याची विभागणी आपण मग सोयीप्रमाणे करतो. सोयीचे नसेल ते सत्य आपण अजिबात स्वीकारत नाही. त्याही पुढची पायरी म्हणजे सोयीचे असेल तर असत्यही बिनदिक्कत स्वीकारतो. याला ‘व्यावहारिक चातुर्य’, असे गोंडस नाव देतो. ‘मला खरे काय आहे ते कळायला हवे’, असे म्हणणाऱ्या माणसालाही त्याच्या सोयीचे किंवा त्याला जे ऐकायला हवे ते सत्य ऐकायचे असते, खरे ऐकायचेच नसते. 

आधीपासूनचे म्हणजे अगदी १९४७पासूनचे सगळे राजकीय घोटाळे काढून पाहा, पुढे त्यांचे काय झाले हे कुणालाच समजत नाही. सत्तेच्या सोयीचे सत्य उजेडात येते आणि स्वत: तोच उजेड सत्तेसाठी सोयीचे नसलेल्या असत्याला आपल्यामागे लपवतो. म्हादईची लढाई आपण न्यायालयात लढतो, कर्मधर्म संयोगाने ही न्यायालयीन लढाई जिंकलोच, तर ‘शेवटी विजय सत्याचाच होतो’ हे पेटंट वाक्य उच्चारले जाईल. पण, तोपर्यंत कर्नाटक सरकार स्वत:ला हवे तेवढे म्हादईचे पाणी वळवून मोकळा झालेले असेल, त्याला या ‘सत्यविजया’च्या फूटपट्टीत कुठे आणि कसे बसवायचे? 

मुळात न्यायालयांत ‘न्याय’ मिळतच नाही, हाती पडतो तो निकाल किंवा निर्णय. तिथे सत्याचा विजयही होत नाही आणि असत्याचा पराजयही होत नाही. ज्याच्या बाजूने निर्णय झाला तो म्हणतो सत्याचा विजय झाला, ज्याच्या विरुद्ध निर्णय लागतो तो वरच्या कोर्टात जातो. सत्तेप्रमाणे संपत्ती असेल तर सत्य काय आणि असत्य काय याचा निर्णय होणेही कठीण जाते. सामान्यपणे खूप लवकर म्हणजे दुसऱ्या दिवशी मिळणारे निकालपत्र संपत्ती असेल तर त्याच दिवशी मिळते आणि त्याविरुद्ध अपीलही त्याच दिवशी अटक होण्याआधीच सुनावणीस येते. दोन वर्षांपूर्वी एका पत्रकाराने ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य बदलून सर्वोच्च न्यायालयाने ‘यतो धर्मस्ततो जय:’ हे ब्रीदवाक्य घेतल्याचा जावईशोध लावला होता. पण, पूर्वीपासून सत्यमेव जयते हे न्यायालयाचे ब्रीदवाक्य कधीच नव्हते याचा खुलासा नंतर झाला. 

सत्य कमी किंवा जास्त झाले तर ते सत्य राहत नाही. असत्याला अशा काही मर्यादा नसतात. कमी किंवा जास्त असले तरी असत्य हे असत्यच असते. असत्याची व्याप्ती अमर्याद असल्याने त्याचे प्राबल्य सत्यापेक्षा अधिक जाणवते. म्हणूनच सत्य आणि असत्य यांची लढाई होऊ शकत नाही. लढाईच नाही म्हणून जय नाही आणि पराजयही नाही. आपली बाजू सत्याची आहे, म्हणजे विजय आपलाच होईल या भ्रमात त्यासाठीच कुणी राहू नये. ‘शेवटी विजय सत्याचा होतो’ हे एक प्रकारे  आपल्या पराजयाचे आपणच केलेले समाधान आहे. 

जय किंवा पराजय होण्यासाठी दोन गोष्टीत युद्ध, संघर्ष असावा लागतो. त्यात न्याय-अन्याय, सत्य-असत्य, उजेड-अंधार, ज्ञान-अज्ञान, चांगले-वाईट या गोष्टी येत नाहीत. त्या एकमेकांना व्यापतात, संपवत नाहीत. यातल्या एकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले की, दुसऱ्याचेही संपते. म्हणूनच एकमेकांविरुद्ध भासत असली तरीही यातील प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे. यातील एकही गोष्ट स्वतंत्रपणे स्वत:ला सिद्ध करू शकत नाही. सत्ता, संपत्ती, सोय आणि संधी या चार ‘स’वर्णीयांच्या प्रभावाने त्यांचे प्राबल्य जाणवते. लढाई किंवा संघर्ष हा कायम धर्म आणि अधर्म यात असतो. यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत विजय धर्माचाच होतो. आपण अधर्माने वागायला सुरुवात करतो त्या क्षणापासूनच आपण पराभूत होत जातो. पराभव कुणी करावा लागत नाही. 

लढाई किंवा संघर्षच नसल्यामुळे सत्य-असत्य यांचा विजय होण्याचा प्रश्‍नच नसेल, तर अधर्माविरुद्ध धर्मासाठी अंधार, अज्ञान, असत्य, अन्याय करावा का, प्रश्‍न खरोखरच चिंतनीय आहे. त्याविषयी पुढे कधीतरी पाहू.