शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

चुका, मुद्राराक्षस आणि राक्षसाची मुद्रा

घटनेचे वृत्त होताना तिला अनेक प्रक्रियेतून जावे लागते. पत्रकार, वार्ताहर, उपसंपादक, प्रूफरीडर वगैरे अनेकांचे संस्कार त्यावर होत असतात. त्यातूनही वृत्तपत्राची भूमिका, व्याप्ती, मर्यादा, उपलब्ध वेळ यासकट अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. तपासून पाहणे प्रत्येकवेळी शक्य असतेच असे नाही. त्यामुळे छापील मजकुरात चुका राहून जाणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. तरीही ही सबब आहे का आणि बाजू घेणे आहे का, हे दोन महत्त्वाचे प्रश्न शिल्लक राहतात. ज्याची उत्तरे प्रत्येक संबंधिताने शोधणे आवश्यक आहे.

शब्द बदलताना वाक्य रचनेकडे लक्ष न दिल्यामुळे होणारा अनर्थ, चुकीचे शब्द वापरल्यामुळे घटनेचा अर्थच बातमीतून चुकीचा सांगितला जातो, तेव्हा ते एका टप्प्यापर्यंत क्षम्य आहे. फोटोला चुकीचे कॅप्शन देणे, एका बातमीचा फोटो दुसर्‍या बातमीला लावणे, मेलेल्या म्हातारीचा फोटो अनेक वर्षे छापणे हे उद्योग होतात. चुकीचे शब्द वापरणे, चुकीची भाषा, भाषांतराच्या चुका वगैरे गोष्टी घडतच असतात. यात संबंधित उपसंपादक मुद्राराक्षसाच्या भूमिकेत गेल्यामुळे चुका घडतात आणि त्यातून विनोदनिर्मिती होते. 

मुद्दाम जाणूनबुजून केल्या जाणार्‍या चुका क्षम्य कशा म्हणता येतील? उदाहरणच द्यायचे झाल्यास; ‘दिवाळीचा प्रदूषणकारी सण’ हा मथळा आणि ‘हर्षोल्हास साजरा करणारी बकरी-ईद’ हा मथळा, असे दोन्ही मथळे एकाच वर्तमानपत्रात छापून येत असतील तर? थोडं आणखी स्पष्ट करून सांगतो. काही अलिखित नियम मथळा देताना अनेक वर्तमानपत्रांत पाळले जातात. 

१. अत्याचार करणारा हिंदू असेल आणि पीडित मुलगी दलित असेल तरच ‘दलित मुलीवर बलात्कार’ असा ठळक उल्लेख मथळ्यात करायचा. तेच अत्याचार करणारा मुस्लीम असेल आणि पीडित मुलगी दलित असेल तर पीडितेच्या जातीचा, समाजाचा उल्लेख करायचा नाही आणि अत्याचार करणार्‍याच्या समाजाचाही उल्लेख करायचा नाही.

२. ज्याच्यावर अत्याचार झाले आहेत, तो मुस्लीम असेल तर त्याचा उल्लेख ‘मुस्लीम युवक/युवतीवर अत्याचार’, असा मथळ्यात ठळकपणे करायचा. 

३.अत्याचार करणारा मुस्लीम असल्यास तो गरीब आहे, अशिक्षित आहे, तो ड्रग अ‍ॅडिक्ट आहे असे मथळ्यात ठळकपणे नमूद करायचे, पण मुस्लीम आहे, हे अजिबात नमूद करायचे नाही. इस्लामी तंत्रविद्या वापरणारा असेल तरीही त्याचा उल्लेख ‘तांत्रिक’, ‘बाबा’ असा करायचा. रेखाचित्रही जटाजूट, रुद्राक्षांच्या माळा घातलेल्याचे रेखाटायचे.  चुकूनही इस्लामिक, ख्रिस्ती प्रतीक द्यायचे नाही.

४. दहशतवादाला कधीच इस्लामिक दहशतवाद म्हणायचे नाही. कट्टरपंथी, अलगाववादी, फुटीरतावादी असे शब्द वापरायचे आणि अगदीच नाइलाज झाल्यास दहशतवादी म्हणायचे. 

५. यातले काहीच देण्यासारखे नसल्यास, मोर्चा राज्यात सरकार कुणाचे आहे, तिकडे वळवायचा. ‘सुरक्षा व्यवस्था ढासळली.’ किंवा ‘राज्यात महिला असुरक्षित’ असा मथळा करायचा. 

या कुठल्याही प्रकारात चूक सहज झालेली नसते. उलट मुद्दाम तसे केले जाते. यामागे अनेक नॅरेटिव्ह कार्यरत असतात. पहिला म्हणजे ‘बहुसंख्य अल्पसंख्याकांवर नेहमीच अत्याचार करतात.’ दुसरा म्हणजे ‘बहुजनांवर कायमच अत्याचार होतो.’ ‘दलित महिलेवर अत्याचार’, असा मथळा देण्यामागे महिलेवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणे हा हेतू अजिबात नसतो. उलट, ‘ती दलित आहे, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला.’ हा नॅरेटिव्ह चालवायचा असतो. याशिवाय पक्षीय भूमिका, आर्थिक गणिते वगैरे अनेक मुद्दे आहेत, जे अशा प्रकारच्या बातम्यांना प्रवृत्त करतात. 

‘वार्ताहरांनी, उपसंपादकांनी, संपादकांनी एखादी बाजू घ्यावी की, घेऊ नये?’ हा एक यक्षप्रश्न वृत्तपत्र क्षेत्रात विचारला जातो. त्याचे उत्तरही सोयीनुसार दिले जाते. बाजू घ्यायची म्हटली तर कुठली, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ‘सत्याची’, ‘घटनेतील कोणतीही एक’ आणि ‘कुठलीच नाही’, यापैकी कोणती बाजू घ्यावी, याची निवड करणे कर्मकठीण असते. आपल्याला जे माहीत आहे, तेच सत्य आहे, याबद्दल खात्री नसते. कोणतीही एक बाजू घ्यावी, तर बातमी एकांगी होण्याची भीती असते. कुठलीच बाजू न घेतल्याने घटना आणि बातमी दोन्हींवर अन्याय होण्याची शक्यता असते. त्यामुळे, करावे काय, हा यक्षप्रश्न उभा ठाकतो. या सर्व गदारोळातून वाट काढण्यासाठी ‘सोयी’ची बाजू घेतली जाते. म्हणूनच घटनेची बातमी झाल्यावर ती घटनेशी अजिबात प्रामाणिक राहत नाही. 

‘घटना जशी आहे, तशी तिची बातमी करावी. आपली मते त्यात घुसडू नयेत.’ हे पत्रकारितेत सांगितले जाते. फक्त सांगितले जाते, पाळले जात नाही. यामुळे, पत्रकारिता एक प्रकारच्या झुंडशाहीची बळी ठरत आहे. ‘आपल्या बाजूचा आहे ना, मग तो चूक असला तरी त्याला बरोबर म्हण.’ आणि ‘आपल्या बाजूचा नाही ना, मग बरोबर असला तरी चूक ठरव.’, अशी आग्रही मागणी केली जाते. झुंडशाहीत टिकून राहायचे असेल तर ही मागणी निमूटपणे मान्य करावी लागते. ही झुंडशाही राजकीय, वैचारिक किंवा अन्य कुठलीही असू शकते. 

‘प्रस्थापित सत्तेच्या विरुद्ध वृत्तांकन केले तरच ती निर्भीड व खरी पत्रकारिता’, असा एक विचित्र निकष लावला जातो. ‘प्रत्येक घटनेला, ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशा दृष्टिकोनातून पाहावे.’ हा दुसरा एक दंडक आहे. त्यामुळे, जे ‘जसे आहे’, तसे ते कधीच सांगितले जात नाही; ‘जसे हवे’, तसे सांगितले जाते. अशावेळी सबब आणि बाजू घेणे यापेक्षाही काही तरी वेगळे घडत असते. घटनेची बातमी होताना उमटलेली चूक हा मुद्राराक्षसाचा विनोद नसतो, तर ती राक्षसाने उमटवलेली मुद्रा असते!


बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

कांतारा आणि आपण

मुलीच्या व पत्नीच्या आग्रहाखातर ‘कांतारा’ चित्रपट त्यांच्यासोबत पाहिला. हळूहळू अधू होत चाललेल्या दृष्टीला, ती असेपर्यंत जे काही पाहिलेच पाहिजे, त्यांपैकी एक म्हणजे हा चित्रपट! हा चित्रपट पाहून आमच्या ‘वीरभद्रा’ची आठवण पदोपदी झाली. चित्रपट सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहे. त्यात विषयाला हात घालताना ज्या बाबी घेतल्या पाहिजेत, त्यापेक्षाही काही बाबी न घेतल्यामुळेच तो चित्रपट अत्यंत प्रभावशाली झाला आहे. त्यातली एक बाब म्हणजे ‘गेल्या सत्तर वर्षांत’ आणि ‘२०१४पासून’ या दोन विभागांत विभागलेलं पक्षीय राजकारण. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय भूलभुलय्यात हरवलेले पर्यावरणप्रेमी. या दोन गोष्टी मूळ विषयाशी संलग्न असल्या तरी चित्रपटाला भरकटवणार्‍या होत्या. या दोन्हींशी संबंधित असलेल्या व्यक्ती आणि ‘जाऊ द्या! मला काय त्याचं?’, असं म्हणत आपलं घर पेटेपर्यंत कोडगेपणाने शांत बसणारे आपण, यांना मारलेली ही सणसणीत चपराक आहे.

हा लेख चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी नाही. कुठलेही परीक्षण न वाचता केवळ चित्रपटगृहातच जाऊन पाहावा, असा हा चित्रपट आहे.  कारण, ध्वनिसंयोजन आणि ‘चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे’, ही बाब ठसवणारे दिग्दर्शन. 

आपण एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक विरोध करतो, तिचे निर्मूलन व्हावे म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा त्या जागी तेवढाच व तसाच परिणाम करणारी गोष्ट उभी करत नाही. विज्ञानाला धरून नाही, म्हणून तिचे अस्तित्व नाही अशी भूमिका आपण घेतो. त्याहीपुढे जाऊन तसा आग्रह धरतो. ‘अंगात येणे’ याला अंधश्रद्धा (मुळात श्रद्धा ही अंधच असल्यामुळे अंधश्रद्धा हा प्रकार संभवत नाही.), मानसिक विकृती या सदराखाली घालून आपण सश्रद्ध असलेल्या समाजमनावर आघात करतो. वटपौर्णिमा, निसर्गपूजा करणारी असंख्य व्रते, देवाला वाहिली जाणारी पत्री यांना आपण ‘कर्मकांड’ या सदराखाली ढकलून मोकळे होतो. यातून होणारे पर्यावरणाचे व निसर्गचक्राचे संरक्षण आपण लक्षात घेत नाही. 

फार वर्षांपूर्वी ‘मर्णकटो’ (नाव कदाचित चुकत असेल. चू.भू.द्या.घ्या.) नावाची श्रुतिका/नाटक रेडिओवर ऐकले होते. यामध्ये तहानेमुळे जीव जात असलेले एक पात्र गढूळ पाणी पीत असते. त्याच्या ओंजळीत ते अंतिम उपलब्ध असलेले पाणी दुसरी एक व्यक्ती जमिनीवर फेकून देते. तेव्हा तो विचारतो, ‘पाणी का टाकलेस?’ त्यावर ओंजळ रिती करणारा उत्तरतो, ‘हे पाणी प्यायला असतास तर तू मेला असतास?’ त्यावर तो एक प्रश्न विचारतो, तो फार महत्त्वाचा आहे. ‘तू आणखी कुठे पाणी पाहिले आहेस? मी ओंजळीत उचललेले हे शेवटचे पाणी होते. त्या जागी दुसरे निर्माण न करता, होते त्याचे नव्हते करण्याचा तुला काय अधिकार आहे?’ 

अनेक गोंडस लेबले धारण करून आपण नष्ट करत असलेल्या संस्कृतीच्या जागी आपण दुसरी सक्षम, पर्यायी व तसा परिणाम साधणारी व्यवस्था निर्माण करत आहोत का? मग, आपल्याला कोणताही अधिकार नाही संस्कृतीला नावे ठेवण्याचा. भले मग, आपण पर्यावरणवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे काहीही असलात तरीही. संस्कृतीला विकृती ठरवून नकारात्मक जनमानस तयार करताना, पर्यावरणाचे रक्षण करणारी तेवढीच सक्षम व्यवस्था आपण निर्माण केली नाही, हे सत्य आहे. उपमेतील पाणी गढूळ आहे, आपली संस्कृती नाही. ती नित्यनूतन व जीवनदायिनी आहे. जिथे जिथे ती जपली जाते, तिथे तिथे निसर्ग मूळ स्वरूपात शिल्लक आहे.

संस्कृती व त्यातून निर्माण झालेली आदरयुक्त भीती घालवल्यानंतर त्याची जागा विकृतीच घेते. देव, देवचार, खेत्री यांची आदरयुक्त भीती आहे, म्हणून अद्याप देवराई व अन्य वनसंपदा टिकून आहे. देवाला घालायला हवी म्हणून पत्रीत सांगितलेल्या वनस्पती जिवंत आहेत. अनेक सामान्य आजारांवर औषध म्हणून वनस्पती लावणारे व जगवणारे किती सुज्ञ लोक आहेत आणि ‘देवाला हवी’ म्हणून जगवणारे किती आहेत, याचाही विचार व्हावा. आपण श्रद्धेवर आघात करतो आणि ती जागा मागचे पुढचे न पाहणारा क्रूर व्यापार घेतो. 

‘तुम्हाला नमस्कार का करायचा? तुमच्या मनोरंजनाचे आम्ही बायप्रॉडक्ट आहोत. आम्हाला जन्माला घालून तुम्ही आमच्यावर उपकार नाही केले.’, अशी वाक्ये इतरत्र ऐकली की, प्रचंड त्रास होतो. आई वडिलांना वाकून नमस्कार करणे ‘आउटडेटेड’ ठरवतो, तेव्हा त्यामागे असलेला कृतज्ञताभाव व आदरही घालवतो. कृतज्ञता गेली की, फक्त उपयुक्तता शिल्लक राहते आणि आदर गेला की, फक्त दर शिल्लक राहतो!

‘रिटायर्ड’ केलेल्या देवाचे अस्तित्वच अमान्य केले की त्याची जागा निसर्गाला ओरबाडणारी व्यापारी वृत्ती घेते. भारताच्या प्रत्येक भागातील ग्रामीण, वनवासी क्षेत्रात या ना त्या स्वरूपात जत्रेच्या प्रसंगी भार येणारे वीरभद्र आहेत. संपूर्ण भारतभर आपली संस्कृती एकच आहे व हे एकसंध सांस्कृतिक राष्ट्र आहे, याची साक्ष पटवणार्‍या या गोष्टींना आपण तिरस्कृत, त्याज्य ठरवले आहे. वास्तविक त्याविषयीचा आदरभाव जागृत ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करणे किती सोपे होते! सोपे होते पण, सोयीचे नव्हते. 

चित्रपटात मांडलेला जमिनीचा प्रश्न आपल्या गोव्यातही आहे. पिढ्यानपिढ्या वनप्रदेशात वास्तव्य करून असणार्‍यांना आम्ही कायद्याचा बडगा उगारून हाकलवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या वास्तव्याने निसर्गाची हानी नाही झाली. उलटपक्षी रक्षणच झाले आहे. नैसर्गिक अधिवास आणि मानवी निवास ही क्षेत्रे एकमेकांवर अतिक्रमण करत असतील तेव्हा त्यातून सामंजस्याने तोडगा काढणे आवश्यक ठरते. अनेक पिढ्यांपासून वनांत राहणार्‍यांनाच ‘वनरक्षक’ बनवून व त्यांच्या हातात हात घालून प्रशासकीय यंत्रणा राबल्यास, निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित सापडू शकतील. वनसंपदेचा र्‍हास करणारे, त्याला आश्रय देणारे दोन्हीकडून शोधले पाहिजेत. ‘यह दैव(देव) बोल रहा है या नर्तक बोल रहा है?’ हा चित्रपटात एका पात्राने विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे. चित्रपट पाहावाच, त्यातून बोधही अवश्य घ्यावा. पर्यावरणावर, निसर्गावर प्रेम व्यक्त करताना आपण आपल्याच संस्कृतीला विनाकारण बदनाम तर करत नाही ना, याचाही अवश्य विचार व्हावा! 


शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

प्रत्येक विवाहित पुरुषाने लक्षांत घ्यावे, असे काही...

..............................
नमुना  संमतिपत्र 

मी, सौ. (लावावे की लावू नये हा जिचा तिचा प्रश्न) _____________________, राहणार______________________श्री./मिस्टर _________________ यांची कायदेशीर पत्नी पूर्ण शुद्धीत व कोणत्याही आणि कुणाच्याही दबावाखाली न येता लिहून देत आहे की, मी आज ____वार दि. ________ रोजी सकाळी/दिवसा/संध्याकाळी/रात्री अगर कुठल्याही वेळी घरी/घराच्या बाहेर कुठल्याही स्थानी माझा कायदेशीर पती श्री./मिस्टर________________________याच्यासोबत शारीरिक संबंध (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) प्रस्थापित करण्यास स्वखुशीने तयार आहे व तशी संमती देत आहे. त्यामुळे, उपरोल्लेखीत समय आणि स्थान यांना अनुसरून होणारा शारीरिक संबंध (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) याला ‘वैवाहिक बलात्कार (साध्या मराठीत मेरिटल रेप) धरू नये. या शारीरिक संबंधांतून (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) माझे ठिकाणी गर्भधारणा झाल्यास ती मला मान्य आहे व पुढेही असेल. कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय वैवाहिक बलात्कार व इतर कारणांमुळे गर्भपातास माझी मनाई आहे व असेल. हे संमतिपत्र पुढील _______महिन्या/महिन्यांसाठी वैध असेल. 

वेळ : 
स्थान : 
पूर्ण नाव : 
स्वाक्षरी : 

 (आधार कार्ड, विवाह नोंदणीची प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच या संमतिपत्राचे नोटरायझेशन होणे आवश्यक आहे.) 
-------------------------------------------- 

हा संमतिपत्राचा नमुना पाहून आपणास आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पण, विवाह झालेल्या व करू इच्छिणार्‍या होतकरूंसाठी या नमुन्याची व त्याचे नोटरायझेशन करण्याची नितांत आवश्यकता भासणार आहे. स्त्रीला पायदळी तुडवण्याची व तिच्याकडे केवळ भोगदासी म्हणून पाहण्याची हिंदू परंपरा असलेल्या भारतात आता अनेक ‘हारवर्डी’ सुधारणा येऊ घातल्या आहेत. गर्भपातासाठी विवाहित आणि अविवाहित असा भेदभाव करता येणार नाही, असे विधान (हे निकालपत्रात का करत नाहीत देव जाणे!) सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल देताना केले आहे. 

अविवाहित स्त्रीवर बलात्कार झाल्यास गर्भपाताचा अधिकार तिला असणे पूर्णपणे न्याय्य व मानवी मूल्यांना धरून आहे. पण, विवाहित स्त्रीला तिच्या कायदेशीर नवर्‍याचे मत अजिबात विचारांत न घेता गर्भपात करू देणे कितपत न्याय्य व मानवी मूल्यांना धरून आहे? घटनात्मक अधिकार फक्त स्त्री असलेल्या नागरिकालाच कसे असतात? त्यातही ‘वैवाहिक बलात्कार’ ठरवायचा कसा हा वेगळाच मुद्दा आहे. त्यातही तिची संमती (साध्या मराठीत कन्सेन्सस) किंवा संमती नसणे (साध्या मराठीत नॉन-कन्सेन्सस) हा अधिकारही तिलाच बहाल केला जातो. पुरुषाने सिद्ध करावे की, तिची संमती होती की, नव्हती. 

यामागे एक मूळ विचार रुजवला जात आहे, जो घातक आहे. ‘पुरुष हा कायम स्त्रीवर अत्याचारच करतो.’ हा तो विचार. एका बाजूने स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष उच्चरवाने करायचा आणि दुसर्‍या बाजूने स्त्री ही दुबळी म्हणून पीडित आहे, असेही म्हणायचे. मुळात स्त्री व पुरुष हे समान नाहीत. त्यांना समान करायलाही जायचे नसते. तो एक वेगळा विषय आहे, पण या सगळ्या विचारांच्या मांडणीमागे हॉर्वर्ड विश्वविद्यालयातील ‘जागृत संस्कृती’ (साध्या मराठीत व्होक कल्चर) जबाबदार आहे. अनेक भारतीय विद्वान, समाजशास्त्रज्ञ हे तिथूनच विद्या ग्रहण करून येत असल्यामुळे ते विचार येथेही तसेच्या तसे बिंबवले जातात. हे म्हणजे नऊवारी नेसलेल्या संस्कृतीवर जीन्स चढवण्यासारखे आहे!

विवाह आपल्याकडे संस्कार आहे, करार नव्हे. प्रजननाचा निसर्गधर्म म्हणून विवाहात परस्पर शारीरिक संबंध अनुस्यूत (साध्या मराठीत इन्क्लुझिव्ह) आहे, हे दोघांनाही माहीत असते. त्यामुळे, शारीरिक संबंधांसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नसते. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकामुळे व व्होक संस्कृतीच्या प्रभावामुळे स्त्रीला एकांगी, झुकते माप देणे चुकीचे आहे. विवाह व कुटुंबसंस्थेचा मूळ हेतूच यामुळे बिघडून जाईल. उत्तम प्रजा (पोरे जन्माला घालणे नव्हे) निर्माण करण्यासाठी नारायणरूपी पुरुष व लक्ष्मीरूपी स्त्री एक संस्कार आपल्यावर करून घेतात ज्याला विवाह म्हटले जाते. ग्रामीण भागांत ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’, असे दांपत्याला म्हटले जाते, त्यामागेही हीच संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विवाह ही शारीरिक संबंधांसाठी निर्माण केलेली सोय आहे. म्हणूनच तिथे कुटुंबसंस्था नावाची संकल्पना नाही. संत व्हेलेंटाइनपासून आत्ताच्या हॉलिवूड चित्रपटांपर्यंत कौटुंबिक मूल्यांचा (साध्या मराठीत फॅमिली व्हॅल्यू) गजर केला जातो. त्यांची ती जागृत (?) कौटुंबिक मूल्य आम्ही का स्वीकारावीत, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तिथे स्त्रियांना अधिकार नव्हते म्हणून चळवळी, आंदोलने झाली. जिथे घटनेने समान अधिकार दिलेले असतानाही केवळ स्त्रियांचीच बाजू घेतील असे कायदे कशासाठी? शरियात सांगितले आहे म्हणून, ‘मुलीला न्हाणं येणं किंवा पंधरा वर्षे होणे (दोन्हीपैकी एक)’ हे लग्नाचे वय म्हणून कायदा व राज्यघटना कशी मान्य करते? तेव्हा हे स्त्रीवादी व व्होक संस्कृतीवाले कुठे लपून बसतात?


जगभर असलेल्या निसर्गपूजक संस्कृतींना या व्होक संस्कृतीने संपवल्यानंतर त्या संस्कृतीची जागा स्वभावत:च कट्टर असलेल्या अब्रह्मिक संस्कृतींनी घेतली आहे. आता युरोपात इस्लामिक संस्था आणि व्होक संस्कृती हातात हात घालून ख्रिश्चन संस्कृतीला ग्रासत आहेत. या भयापोटीच इटलीमध्ये ‘देव, देश आणि कुटुंब’, अशी घोषणा व विचार मांडणारे जॉर्जिया मेलोनी यांचे सरकार येऊ घातले आहे. त्याचा मुसोलिनीच्या फॅसिझम व पर्यायाने मोदींशी संबंध आपल्याकडच्या विचारवंतांनी लावणे स्वाभाविक आहे. आपल्याकडची उरलीसुरली कुटुंबव्यवस्था संपवण्यासाठीच ही हॉर्वर्डी पिल्ले सोडली जात आहेत. आपल्याकडे स्त्री विरुद्ध पुरुष किंवा स्त्री-पुरुष समानता नाही. आपल्याकडे स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आहेत. स्त्री व पुरुष दोघेही निसर्गचक्राच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यातही सांगायचेच झाले तर स्त्री पुरुषापेक्षाही काकणभर सरसच आहे!