बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

कांतारा आणि आपण

मुलीच्या व पत्नीच्या आग्रहाखातर ‘कांतारा’ चित्रपट त्यांच्यासोबत पाहिला. हळूहळू अधू होत चाललेल्या दृष्टीला, ती असेपर्यंत जे काही पाहिलेच पाहिजे, त्यांपैकी एक म्हणजे हा चित्रपट! हा चित्रपट पाहून आमच्या ‘वीरभद्रा’ची आठवण पदोपदी झाली. चित्रपट सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहे. त्यात विषयाला हात घालताना ज्या बाबी घेतल्या पाहिजेत, त्यापेक्षाही काही बाबी न घेतल्यामुळेच तो चित्रपट अत्यंत प्रभावशाली झाला आहे. त्यातली एक बाब म्हणजे ‘गेल्या सत्तर वर्षांत’ आणि ‘२०१४पासून’ या दोन विभागांत विभागलेलं पक्षीय राजकारण. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय भूलभुलय्यात हरवलेले पर्यावरणप्रेमी. या दोन गोष्टी मूळ विषयाशी संलग्न असल्या तरी चित्रपटाला भरकटवणार्‍या होत्या. या दोन्हींशी संबंधित असलेल्या व्यक्ती आणि ‘जाऊ द्या! मला काय त्याचं?’, असं म्हणत आपलं घर पेटेपर्यंत कोडगेपणाने शांत बसणारे आपण, यांना मारलेली ही सणसणीत चपराक आहे.

हा लेख चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी नाही. कुठलेही परीक्षण न वाचता केवळ चित्रपटगृहातच जाऊन पाहावा, असा हा चित्रपट आहे.  कारण, ध्वनिसंयोजन आणि ‘चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे’, ही बाब ठसवणारे दिग्दर्शन. 

आपण एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक विरोध करतो, तिचे निर्मूलन व्हावे म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा त्या जागी तेवढाच व तसाच परिणाम करणारी गोष्ट उभी करत नाही. विज्ञानाला धरून नाही, म्हणून तिचे अस्तित्व नाही अशी भूमिका आपण घेतो. त्याहीपुढे जाऊन तसा आग्रह धरतो. ‘अंगात येणे’ याला अंधश्रद्धा (मुळात श्रद्धा ही अंधच असल्यामुळे अंधश्रद्धा हा प्रकार संभवत नाही.), मानसिक विकृती या सदराखाली घालून आपण सश्रद्ध असलेल्या समाजमनावर आघात करतो. वटपौर्णिमा, निसर्गपूजा करणारी असंख्य व्रते, देवाला वाहिली जाणारी पत्री यांना आपण ‘कर्मकांड’ या सदराखाली ढकलून मोकळे होतो. यातून होणारे पर्यावरणाचे व निसर्गचक्राचे संरक्षण आपण लक्षात घेत नाही. 

फार वर्षांपूर्वी ‘मर्णकटो’ (नाव कदाचित चुकत असेल. चू.भू.द्या.घ्या.) नावाची श्रुतिका/नाटक रेडिओवर ऐकले होते. यामध्ये तहानेमुळे जीव जात असलेले एक पात्र गढूळ पाणी पीत असते. त्याच्या ओंजळीत ते अंतिम उपलब्ध असलेले पाणी दुसरी एक व्यक्ती जमिनीवर फेकून देते. तेव्हा तो विचारतो, ‘पाणी का टाकलेस?’ त्यावर ओंजळ रिती करणारा उत्तरतो, ‘हे पाणी प्यायला असतास तर तू मेला असतास?’ त्यावर तो एक प्रश्न विचारतो, तो फार महत्त्वाचा आहे. ‘तू आणखी कुठे पाणी पाहिले आहेस? मी ओंजळीत उचललेले हे शेवटचे पाणी होते. त्या जागी दुसरे निर्माण न करता, होते त्याचे नव्हते करण्याचा तुला काय अधिकार आहे?’ 

अनेक गोंडस लेबले धारण करून आपण नष्ट करत असलेल्या संस्कृतीच्या जागी आपण दुसरी सक्षम, पर्यायी व तसा परिणाम साधणारी व्यवस्था निर्माण करत आहोत का? मग, आपल्याला कोणताही अधिकार नाही संस्कृतीला नावे ठेवण्याचा. भले मग, आपण पर्यावरणवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे काहीही असलात तरीही. संस्कृतीला विकृती ठरवून नकारात्मक जनमानस तयार करताना, पर्यावरणाचे रक्षण करणारी तेवढीच सक्षम व्यवस्था आपण निर्माण केली नाही, हे सत्य आहे. उपमेतील पाणी गढूळ आहे, आपली संस्कृती नाही. ती नित्यनूतन व जीवनदायिनी आहे. जिथे जिथे ती जपली जाते, तिथे तिथे निसर्ग मूळ स्वरूपात शिल्लक आहे.

संस्कृती व त्यातून निर्माण झालेली आदरयुक्त भीती घालवल्यानंतर त्याची जागा विकृतीच घेते. देव, देवचार, खेत्री यांची आदरयुक्त भीती आहे, म्हणून अद्याप देवराई व अन्य वनसंपदा टिकून आहे. देवाला घालायला हवी म्हणून पत्रीत सांगितलेल्या वनस्पती जिवंत आहेत. अनेक सामान्य आजारांवर औषध म्हणून वनस्पती लावणारे व जगवणारे किती सुज्ञ लोक आहेत आणि ‘देवाला हवी’ म्हणून जगवणारे किती आहेत, याचाही विचार व्हावा. आपण श्रद्धेवर आघात करतो आणि ती जागा मागचे पुढचे न पाहणारा क्रूर व्यापार घेतो. 

‘तुम्हाला नमस्कार का करायचा? तुमच्या मनोरंजनाचे आम्ही बायप्रॉडक्ट आहोत. आम्हाला जन्माला घालून तुम्ही आमच्यावर उपकार नाही केले.’, अशी वाक्ये इतरत्र ऐकली की, प्रचंड त्रास होतो. आई वडिलांना वाकून नमस्कार करणे ‘आउटडेटेड’ ठरवतो, तेव्हा त्यामागे असलेला कृतज्ञताभाव व आदरही घालवतो. कृतज्ञता गेली की, फक्त उपयुक्तता शिल्लक राहते आणि आदर गेला की, फक्त दर शिल्लक राहतो!

‘रिटायर्ड’ केलेल्या देवाचे अस्तित्वच अमान्य केले की त्याची जागा निसर्गाला ओरबाडणारी व्यापारी वृत्ती घेते. भारताच्या प्रत्येक भागातील ग्रामीण, वनवासी क्षेत्रात या ना त्या स्वरूपात जत्रेच्या प्रसंगी भार येणारे वीरभद्र आहेत. संपूर्ण भारतभर आपली संस्कृती एकच आहे व हे एकसंध सांस्कृतिक राष्ट्र आहे, याची साक्ष पटवणार्‍या या गोष्टींना आपण तिरस्कृत, त्याज्य ठरवले आहे. वास्तविक त्याविषयीचा आदरभाव जागृत ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करणे किती सोपे होते! सोपे होते पण, सोयीचे नव्हते. 

चित्रपटात मांडलेला जमिनीचा प्रश्न आपल्या गोव्यातही आहे. पिढ्यानपिढ्या वनप्रदेशात वास्तव्य करून असणार्‍यांना आम्ही कायद्याचा बडगा उगारून हाकलवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या वास्तव्याने निसर्गाची हानी नाही झाली. उलटपक्षी रक्षणच झाले आहे. नैसर्गिक अधिवास आणि मानवी निवास ही क्षेत्रे एकमेकांवर अतिक्रमण करत असतील तेव्हा त्यातून सामंजस्याने तोडगा काढणे आवश्यक ठरते. अनेक पिढ्यांपासून वनांत राहणार्‍यांनाच ‘वनरक्षक’ बनवून व त्यांच्या हातात हात घालून प्रशासकीय यंत्रणा राबल्यास, निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित सापडू शकतील. वनसंपदेचा र्‍हास करणारे, त्याला आश्रय देणारे दोन्हीकडून शोधले पाहिजेत. ‘यह दैव(देव) बोल रहा है या नर्तक बोल रहा है?’ हा चित्रपटात एका पात्राने विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे. चित्रपट पाहावाच, त्यातून बोधही अवश्य घ्यावा. पर्यावरणावर, निसर्गावर प्रेम व्यक्त करताना आपण आपल्याच संस्कृतीला विनाकारण बदनाम तर करत नाही ना, याचाही अवश्य विचार व्हावा! 


४ टिप्पण्या: