शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

संत, ‘गोंयचो सायब’ आणि फ्रान्सिस झेविअर

फ्रान्सिस झेविअर यांना संत म्हणून गौरवावे का आणि ते खरोखरच गोंयचो सायब आहेत का, हे दोन प्रश्न जुन्या गोव्याचे फेस्त जवळ येताच ऐरणीवर येतात. या वादात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो, ज्यावर विचार होणे आवश्यक आहे. 

ख्रिश्चन पंथामध्ये ‘संत’ कुणाला म्हणावे, याबाबत काही ठरावीक नियम व प्रक्रिया आहे. चर्चने घोषित केल्याशिवाय कुठल्याही ख्रिश्चन पंथीयाला कुणालाही संत म्हणता येत नाही. भले त्या माणसावर त्यांची श्रद्धा असली तरीही. हिंदू धर्मात लोक ठरवतात. कुठलीही संस्था, उपासना पंथ, राजा किंवा आताच्या भाषेत सरकार ते ठरवू शकत नाही. 

त्यामुळे, ख्रिश्चन संत आणि इतर भारतीय संत यांत मूलभूत फरक आहे. ख्रिश्चन पंथाचा किती प्रचार-प्रसार केला, किती लोकांना ख्रिश्चन बनवले, काय चमत्कार केले या सर्व गोष्टींचा एका प्रक्रियेमार्फत अभ्यास केला जातो. त्यानंतर ती व्यक्ती संत असल्याची औपचारिक घोषणा होते. त्या पद्धतीनुसार फ्रान्सिस झेविअर हे ख्रिश्चन पंथाचे संत आहेत. हिंदूंनी त्यांना संत म्हणावे की, ‘ख्रिश्चन संत’ म्हणून उल्लेख करावा याचा विचार व्हावा. पण, काहीही झाले तरी भारतीय किंवा हिंदू परंपरेतील संत आणि ख्रिश्चन परंपरेतील संत यांच्यात फरक आहेच आणि तो विचारसरणीवर आधारित आहे. 

ख्रिश्चन पंथानुसार संत असलेले फ्रान्सिस झेविअर हे मूळ गोमंतकीय नाहीत. गोव्यातही त्यांची नेमणूक ख्रिश्चन पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच झाली होती. त्यांनी गोव्याच्या भल्यासाठी काही केले नाही. जे काही केले ते ख्रिश्चन पंथाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून केले. संभाजी महाराजांपासून वाचवण्यसाठी पोर्तुगीज व्हाइसरॉय यांनी त्यांना साकडे घातले व त्यांच्या कर्मधर्म संयोगाने संभाजी महाराजांना परतावे लागले. त्यामुळे, पोर्तुगिजांसाठी फ्रान्सिस झेविअर तारणहार ठरले. दुसरा उल्लेख सत्याग्रहींनी केलेल्या उठावाच्या वेळेलाही पोर्तुगीजांच्या हाकेला ते पावले व त्यांची झेविअर यांच्यावर श्रद्धा बसली. 

पोर्तुगिजांना पावलेल्या ख्रिश्चन संत झेव्हिअर यांचा उल्लेख गोव्याचा साहेब म्हणून करणे अजिबात उचित नाही. वास्तविक ज्यांनी गोव्यातील लोकांची सेवा केली ते ख्रिस्ती पंथगुरू मूळ गोमंतकीय होते व तेच खरे गोव्याचे साहेब होते, अशी माहिती असलेला एक लेख इंग्रजीत वाचल्याचे स्मरते. आता पोर्तुगीज गेल्यानंतर येथील ख्रिश्चनांची श्रद्धा फ्रान्सिस झेविअरवर असणे अजिबात गैर नाही. त्यांना तसे अनुभव आले असतील, त्यांची श्रद्धा बसली असेल तर त्या श्रद्धेला नाकारणे सर्वथा अयोग्य होईल. पण, त्यासाठी झेविअर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणावे का, याचे उत्तर गोव्यातील ख्रिश्चन समाजानेच शोधणे आवश्यक आहे. 

यात एक महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक मांडला जातो आणि इतिहासकारांकडून दुर्लक्षिला जातो, तो म्हणजे संभाजी महाराजांच्या गोव्यावरील आक्रमणाचा. संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले नाही. तो त्यांचाच प्रदेश होता. त्यामुळे, ‘संभाजी महाराजांच्या गोव्यावरील आक्रमणापासून संत झेविअर यांनी बचाव केला.’, अशी वाक्यरचना करताना गोवा हा प्रदेश किंवा गोव्यातील काही प्रदेश मराठ्यांच्या आधिपत्याखाली नव्हता, असा इतिहास जाणीवपूर्वक मांडला जात आहे. ही सर्वांत जास्त चिंताजनक बाब आहे. 

संभाजी महाराजांनी अकबराला (औरंगजेबाचा मुलगा) डिचोलीत आश्रय देऊन ठेवला होता. त्यामुळे, त्याला मारण्यासाठी सैन्य गोव्याच्या सीमेवर रवाना झाले होते. संभाजी महाराज त्यात गुंतून राहतील व अंत्रुज महाल ताब्यात घेता येईल, असा बेत आखून व्हॉइसरॉयने आक्रमण केले होते व त्यामुळे पुढील रामायण घडले. संभाजी महाराज अचानक पोर्तुगीजांवर आक्रमण करण्यासाठी गोव्यात टपकले आणि त्यांच्या आक्रमणापासून पोर्तुगीजांना ख्रिश्चन संत झेविअर यांच्या कृपेने वाचवले, असे जे ध्वनित करण्याचा प्रयत्न होत आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. इतिहास संशोधकांनी गोव्याला केंद्रबिंदू ठेवून विस्तृत लिखाण करण्याची गरज आहे. 

‘कुणीतरी नेहरू नावाचा माणूस आहे, तो पोर्तुगालवर  आक्रमण करत आहे. त्याच्याविरुद्ध युद्ध लढण्यासाठी आम्ही निघालो आहोत.’, असे पोर्तुगीज सैनिक उजगावात सांगत, अशी आठवण जुन्या जाणत्यांच्या तोंडून ऐकली आहे. संभाजी महाराज आणि ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेविअर यांच्या पोर्तुगीजांवरील कृपाशीर्वादाचा उल्लेख येतो तेव्हा हीच गफलत केली जाते. जुन्या गोव्याच्या फेस्तादरम्यान ‘गोंयच्या सायबा’वरील वादात, ‘हा प्रदेश मराठ्यांचाच होता आणि पोर्तुगिजांनी त्यावर आक्रमण केले होते’, हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो, ज्यावर विचार होणे आवश्यक आहे. 


सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

शिवाजी महाराजांचा अपमान कशात आहे?

-----------------

-कोश्यारींचे हिंदी भाषण-

पहले भी इन्हे डिलिट दे चुका हूं। अब दो और युनिव्हर्सिटी के पेंडिंग पडे हैं। वह कहते हैं इन्हीको देना चाहते हैं। मैने कहा कोई और नही है क्या? हमारे दो लोगोंकोही क्यों देते हो। कुछ तो खास बात हैही है। अब इतना इनके बारे मे क्यों बोल रहां हूं क्यों के यह हमारे सामने हैं। हमारे लिए एक्जांपूल हैं, उदाहरण हैं। हम जब पढते थे, मिडल मे हायस्कूल मे, तो हमारे टीचर हमको वो देते थे, हू इज युवर फेवरेट हीरो? ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है? तो हम उस समय जिनको सुभाषचंद्र बोस अच्छे लगे, जिनको नेहरू अच्छे लगे, जिनको गांधीजी अच्छे लगे । तो मुझे ऐसा लगता है के हू इज युवर आयकॉन? हू इज युवर फेवरेट हीरो? तो बाहर जाने की कोई जरूरत  नही है। यहीं महाराष्ट्रमेही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बातहैं, मै नये युग की बात बोल रहां हूं। डॉक्टर आंबेडकर से लेकर डॉ. गडकरी तक, नितीन गडकरी तक सब आपको यंही मिल जाएंगे।

--------------

- मराठी अनुवाद -

जेव्हा आम्ही लहान होतो आणि शाळेत जायचो तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचे आवडते नेते कोण आहे, तेव्हा कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी,  तर कुणी नेहरू असे सांगायचे. मला असे वाटते जर कुणी तुम्हाला विचारले तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहे, तर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. पूर्वीच्या काळातील आदर्श शिवाजी महाराज आहेत. परंतु, जर नव्या काळातील आदर्श शोधायचे झाल्यास डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरी तुम्हाला इथेच मिळतील.

----------------

यात शिवाजी महाराजांचा अपमान कुठे झाला? उलट नव्या पिढीला शिवाजी महाराजांनंतर कुणी आदर्श नेताच नाही मिळाला, असे म्हणणे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांच्या उंचीचे आणि कर्तृत्वाचे नेतृत्व नसूनही औरंगजेबाला एकही किल्ला घेता आला नाही, हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे यश आहे. जुन्या काळचे आदर्श म्हटले म्हणून शिवाजी महाराज कालबाह्य होत नाहीत. आदर्श वाटावेत असे नवीन नेते निर्माण होणे यातच त्या पूर्वीच्या नेत्यांचे यश आहे. 

आता शिवाजी महाराजांच्या आदर्शाची तुलना शरद पवार व नितीन गडगरी यांच्या आदर्शाशी करावी का, हा खरा वादाचा मुद्दा आहे. ‘शिवाजी कोण होता?’ असा एकेरी उल्लेख पुस्तकाच्या नावात असणे, पवारांना जाणता राजा म्हणणे, पवारांनी शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नये, असे म्हणणे यात शिवाजी महाराजांचा अपमान कुठेच, कुणालाच दिसत नाही का? 

अभिमानाचे आणि अपमानाचे वर्गीकरण ‘टोकाची अस्मिता’ या निकषावर करणे, वक्ता किंवा लेखक कोण आहे, कोणत्या विचारधारेचा आहे, यावर करणे अयोग्य आहे. कोश्यारींचे पूर्ण भाषण ऐकले असते, तर कदाचित त्यावर दिवसभर चर्चा पेटवणे, अग्रलेख खरडणे किती अप्रस्तुत आहे, हे लक्षात आले असते. पत्रकार हा शेवटी कुठल्या तरी बाजूचा असावा लागतो, तरच जयजयकार होतो. सत्य, योग्य भूमिका, खर्‍याला खरे म्हणणे व खोट्याला खोटे म्हणणे यापेक्षाही सोयीचे तेवढेच पाहणे म्हणजे पत्रकारिता...


गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

श्रद्धाची हत्या आणि विचार करावे असे काही...

श्रद्धा हत्येनंतर अनेक प्रश्न, अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत.  त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकलकोंडेपणा व कमालीचा अलिप्तपणा. आपण आपल्याच माणसांपासून दूर जाणे, कुणाच्याही संपर्कात न राहणे खूपच चिंताजनक आहे. आपण खरोखरच ‘सोशल’ आहोत का?

वेळग्यात आमच्या शेजारी राहणारे स्व. बाबा सहस्रबुद्धे फोंड्यात फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. काही काळानंतर ते पुन्हा वेळग्यातला त्यांच्या घरी राहायला आले. त्यांनी व्यक्त केलेली एक खंत येथे सांगावीशी वाटते. फोंड्यात गेल्यापासून आठ दहा दिवस झाले तरी शेजारीपाजारी कोण आहेत याची कल्पना नाही, सगळ्यांचे दरवाजे कायम बंद, येणेजाणे नाही, बोलणे नाही. याची त्यांना अजिबात सवय नव्हती. वेळग्यात सहस्रबुद्ध्यांच्या घराचा दरवाजा सकाळी उघडला की, रात्रीच बंद होई. दिवसभर कुणाचा ना कुणाचा तरी कायम येत जात असे. अर्थात बाबा सहस्रबुद्धे ही व्यक्तीही तशीच होती. पण, ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती आठ दिवस कुणाला दिसली नाही तर चौकशी, विचारपूस झाली नाही, असे होत नाही. एवढेच कशाला संध्याकाळची दिवेलागणी आठ वाजेपर्यंत न झाल्यास लगेच शेजारी विचारपूस करतात, ‘काय बरं आहे ना?’

हीच बाब शहरात घडतेच असे नाही. उलट अशा विचारपूस करण्याला नाक खुपसणे, बॅड मॅनर्स म्हटले जाते. त्याहीपुढे जाऊन व्यक्तिगत स्पेसवरचे ते अतिक्रमण समजले जाते. नवरा-बायकोंचे एकमेकांना जाब विचारणेही व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचा घाला समजू लागलो आहोत, ‘प्रायव्हेट स्पेसवरील अतिक्रमण’ समजू लागलो आहोत. 

श्रद्धा नामक परिचयातील व्यक्ती सहा महिने दिसलीच नाही तर निदान व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज, फोन वगैरे कुणी तिच्या मैत्रिणींनी, मित्रांनी केलाच नाही? केलेले तुकडे सहा महिने आफताब नेऊन जंगलात टाकत होता, ते कुणालाच दिसलं नाही? कुटुंबीयांनी विचारलंच नाही? त्याच्या ‘कॉमन’ मित्रांनाही विचारावसं वाटलं नाही? आपण खरोखरच समाज म्हणून जगतोय की, प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्याच कोशात वावरतोय?

अजित, अंतू, धीरज, अमर, निगम यांसारख्या असंख्य मित्रांचा फोन वेळेत उचलला नाही तर ही महाबिलंदर माणसे किती खेचतात त्याला तोड नाही. सकाळी फोन केला आणि त्यांना दुपारपर्यंत प्रतिसाद दिला नाही दिला तर यातला एकटा तरी संध्याकाळपर्यंत घरी टपकतो. दार उघडल्याबरोबर प्रेमाने विचारलेला पहिला प्रश्न असतो, ‘आहेस ना जिवंत?’ 

श्रद्धा आणि आफताब हे दोघे आपल्या मित्रांपासून इतके फटकून वागत होते की, कुणीही त्यांची कसलीच चौकशी केली नाही? बरे हे घडत होते ते दूर जंगलात कुठे तरी घडत होते का? तर नाही. ते शहरी भागात, भर वस्तीत होते. तरीही असे का घडले, हा खरा चिंतेचा विषय आहे. 

आजकाल आपण इंटरनेट, मोबाइलच्या जंजाळात अडकून इतके ‘सोशल’ झालो आहोत की, प्रत्यक्ष भेट होतच नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्यातरी अजब, विचित्र दुनियेत स्वत:ला गुरफटवत आहोत. मित्र, सहकारी, नातलग यांचा अधिकारच आहे आपली काळजी करण्याचा. कुणाला कितपत आत येऊ द्यायचे, हे निवडण्याचा आपला अधिकार निश्चितच आहे आणि तसे केलेही पाहिजे. पण, त्याचबरोबर अजिबात कुणी दखल देऊ नये, हे योग्य नाही, याचाही विचार केला पाहिजे. खास करून मुलींनी, कायम आपल्या पालकांच्या, मैत्रिणींच्या, मित्रांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आईवडिलांशी कितीही भांडण झाले तरी त्यांना आपली काळजी असते, हे अजिबात विसरू नये. अगदी त्यांच्याशी बोलतच नाही, असे असले तरीही त्यांची व आपली ख्यालीखुशाली एकमेकांना समजेल अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. कुठलाही बाप मुलीशी भांडेल, बोलल्याशिवाय राहील, पण तिचे तुकडे तुकडे करून केलेली विल्हेवाट सहन नाही करू शकणार. 

कौटुंबिक मतभेद इतकेही ताणू नयेत की, आपण एकदमच अलिप्त, असुरक्षित होऊन जाऊ. आठवड्यातून किमान एकदा तरी ग्रुपवर, फेसबुकवर, ब्लॉगवर काही ना काहीतरी लिहा, शेअर करा. आपल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून का असेना, पण ठेवा. किमान महिन्यातून एकदा तरी एका मित्राला, मैत्रिणीला, नातलगांना प्रत्यक्ष भेटा. तेवढा वेळ निश्चितच असतो आपल्याकडे. कुणी बर्‍याच दिवसांत दिसले नाही तर, किमान फोन तरी करा. चौकशी करा. यात गैर काहीच नाही. फार तर ती व्यक्ती रागावेल. रागावू दे. पण, ख्यालीखुशाली घ्या. आपण माणूस म्हणून वागलो नाही, तर असे अमानुष कृत्य पाहण्याची, सहन करण्याची पाळी आपल्यावरही येऊ शकते.


चित्रस्रोत : आंतरजाल

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

माध्यमांनी हा गाढवपणा आधी बंद करावा...

एका वृत्तवाहिनीवर बाइट घेणार्‍या मुलीने संभाजी भिडेंना मंत्रालयात येण्यावरून प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी आधी ‘आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. प्रत्येक स्त्री ही आम्हाला भारतमातेसमान आहे आणि भारतमाता विधवा नाही.’ या घटनेचे टीव्हीवर झळकणारे मथळे फार मनोरंजक होते. ‘संभाजी भिडेंकडून महिला पत्रकाराचा अपमान’, ‘म्हणे टिकली लावा तरच बोलतो’, ‘संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान’, ‘लावली नाही टिकली, तुमची का सटकली?’ त्याही पुढची गंमत म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘समाजात अशा काही विकृत मनोवृत्तीची लोकं आहेत जी सातत्याने महिलांचा आत्मविश्वास ढासळावा, त्यांना दुय्यम लेखावं, अशा पद्धतीची विधानं करताहेत आणि निश्चितपणानं राज्य महिला आयोगाच्या वतीने त्यांना आजच नोटीस जाईल. ज्याचा त्यांनी खुलासा करावा.’

‘प्रत्येक महिला ही भारतमातेसमान आहे’, यात महिलांचा अपमान कसा आहे आणि हे वादग्रस्त विधान कसे आहे, हे एकदा या माध्यमांतील बहाद्दरांनी सांगावेच. प्रश्न विचारणार्‍या महिलेने कुंकू लावण्याची अपेक्षा ठेवणे, हे स्त्रीला दुय्यम लेखण्याच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण कसे ठरते, हेही सांगावे. 

भिडेंनी प्रतिक्रिया नाकारण्यासाठी दिलेले कारण व नकार रास्त आहे का, असा प्रश्न विचारला असता, तर एकवेळ समजून घेता आले असते. पण, काहीही करून ओढून ताणून त्याचा संबंध महिलांच्या अपमानाशी व दुय्यम लेखण्याशी लावणे, कितपत योग्य आहे, याचा विचारही झालाच पाहिजे.

जसा पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तसाच कुणाला उत्तर द्यावे, कोणत्या कारणासाठी द्यावे, हे निवडण्याचा अधिकार भिडेंना नसावा का? महिला पत्रकाराला जसा कुंकू न लावण्याचा अधिकार आहे, तसाच कुंकू न लावणार्‍या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न देण्याचा अधिकार भिडेंना असू नये का?

महाराष्ट्र सरकार व राज्य महिला आयोगाने आपली शब्दयोजना सुधारणेही अत्यंत गरजेचे आहे. ‘विधवा प्रथा बंदी’ म्हणजे नेमके काय? विधवा ही प्रथा आहे का? दुर्दैवाने एखाद्या महिलेला वैधव्य प्राप्त होते की, प्रथेमुळे होते? वास्तविक ‘विधवा महिलांना दिल्या जाणार्‍या हीन वागणुकीविरुद्ध जनजागृती करा’ असा आदेश हवा. सती जाणे हा अपवादात्मक प्रकार असतानाही त्याला हिंदू धर्मातील ‘प्रथा’ ठरवून व क्रमिक पुस्तकातून शिकवून आपण मोकळे झाले आहोत. प्रथा म्हणजे अनिवार्य रीत जी पिढ्यानपिढ्या पाळलीच जाते. पाळणे हा नियम आणि न पाळणे हा अपवाद. सती या अपवादाला आपण नियम कसे ठरवले?  तेच तर्कट विधवांच्या बाबतीत लावले जात आहे. 

ज्या ज्या गोष्टींविषयी आस्था, श्रद्धा आणि आदर आहे, त्या त्या गोष्टींना चुकीचे, वाईट, घातक ठरवणे हा उद्देश आहे. एखाद्या गोष्टीला वाईट ठरवता आले नाही की, समाजात असलेले त्या गोष्टीचे स्थान, आदर यांना हळूहळू धक्का पोहोचवला जातो. त्यांच्याविषयी नकारात्मक भावना रुजवली जाते. अशा प्रकारच्या बातम्या व घटनांचे वृत्त करणे हे त्याचेच एक रूप आहे. जाणूनबुजून केला जाणारा हा गाढवपणा आहे. 


शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

चुका, मुद्राराक्षस आणि राक्षसाची मुद्रा

घटनेचे वृत्त होताना तिला अनेक प्रक्रियेतून जावे लागते. पत्रकार, वार्ताहर, उपसंपादक, प्रूफरीडर वगैरे अनेकांचे संस्कार त्यावर होत असतात. त्यातूनही वृत्तपत्राची भूमिका, व्याप्ती, मर्यादा, उपलब्ध वेळ यासकट अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. तपासून पाहणे प्रत्येकवेळी शक्य असतेच असे नाही. त्यामुळे छापील मजकुरात चुका राहून जाणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. तरीही ही सबब आहे का आणि बाजू घेणे आहे का, हे दोन महत्त्वाचे प्रश्न शिल्लक राहतात. ज्याची उत्तरे प्रत्येक संबंधिताने शोधणे आवश्यक आहे.

शब्द बदलताना वाक्य रचनेकडे लक्ष न दिल्यामुळे होणारा अनर्थ, चुकीचे शब्द वापरल्यामुळे घटनेचा अर्थच बातमीतून चुकीचा सांगितला जातो, तेव्हा ते एका टप्प्यापर्यंत क्षम्य आहे. फोटोला चुकीचे कॅप्शन देणे, एका बातमीचा फोटो दुसर्‍या बातमीला लावणे, मेलेल्या म्हातारीचा फोटो अनेक वर्षे छापणे हे उद्योग होतात. चुकीचे शब्द वापरणे, चुकीची भाषा, भाषांतराच्या चुका वगैरे गोष्टी घडतच असतात. यात संबंधित उपसंपादक मुद्राराक्षसाच्या भूमिकेत गेल्यामुळे चुका घडतात आणि त्यातून विनोदनिर्मिती होते. 

मुद्दाम जाणूनबुजून केल्या जाणार्‍या चुका क्षम्य कशा म्हणता येतील? उदाहरणच द्यायचे झाल्यास; ‘दिवाळीचा प्रदूषणकारी सण’ हा मथळा आणि ‘हर्षोल्हास साजरा करणारी बकरी-ईद’ हा मथळा, असे दोन्ही मथळे एकाच वर्तमानपत्रात छापून येत असतील तर? थोडं आणखी स्पष्ट करून सांगतो. काही अलिखित नियम मथळा देताना अनेक वर्तमानपत्रांत पाळले जातात. 

१. अत्याचार करणारा हिंदू असेल आणि पीडित मुलगी दलित असेल तरच ‘दलित मुलीवर बलात्कार’ असा ठळक उल्लेख मथळ्यात करायचा. तेच अत्याचार करणारा मुस्लीम असेल आणि पीडित मुलगी दलित असेल तर पीडितेच्या जातीचा, समाजाचा उल्लेख करायचा नाही आणि अत्याचार करणार्‍याच्या समाजाचाही उल्लेख करायचा नाही.

२. ज्याच्यावर अत्याचार झाले आहेत, तो मुस्लीम असेल तर त्याचा उल्लेख ‘मुस्लीम युवक/युवतीवर अत्याचार’, असा मथळ्यात ठळकपणे करायचा. 

३.अत्याचार करणारा मुस्लीम असल्यास तो गरीब आहे, अशिक्षित आहे, तो ड्रग अ‍ॅडिक्ट आहे असे मथळ्यात ठळकपणे नमूद करायचे, पण मुस्लीम आहे, हे अजिबात नमूद करायचे नाही. इस्लामी तंत्रविद्या वापरणारा असेल तरीही त्याचा उल्लेख ‘तांत्रिक’, ‘बाबा’ असा करायचा. रेखाचित्रही जटाजूट, रुद्राक्षांच्या माळा घातलेल्याचे रेखाटायचे.  चुकूनही इस्लामिक, ख्रिस्ती प्रतीक द्यायचे नाही.

४. दहशतवादाला कधीच इस्लामिक दहशतवाद म्हणायचे नाही. कट्टरपंथी, अलगाववादी, फुटीरतावादी असे शब्द वापरायचे आणि अगदीच नाइलाज झाल्यास दहशतवादी म्हणायचे. 

५. यातले काहीच देण्यासारखे नसल्यास, मोर्चा राज्यात सरकार कुणाचे आहे, तिकडे वळवायचा. ‘सुरक्षा व्यवस्था ढासळली.’ किंवा ‘राज्यात महिला असुरक्षित’ असा मथळा करायचा. 

या कुठल्याही प्रकारात चूक सहज झालेली नसते. उलट मुद्दाम तसे केले जाते. यामागे अनेक नॅरेटिव्ह कार्यरत असतात. पहिला म्हणजे ‘बहुसंख्य अल्पसंख्याकांवर नेहमीच अत्याचार करतात.’ दुसरा म्हणजे ‘बहुजनांवर कायमच अत्याचार होतो.’ ‘दलित महिलेवर अत्याचार’, असा मथळा देण्यामागे महिलेवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणे हा हेतू अजिबात नसतो. उलट, ‘ती दलित आहे, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला.’ हा नॅरेटिव्ह चालवायचा असतो. याशिवाय पक्षीय भूमिका, आर्थिक गणिते वगैरे अनेक मुद्दे आहेत, जे अशा प्रकारच्या बातम्यांना प्रवृत्त करतात. 

‘वार्ताहरांनी, उपसंपादकांनी, संपादकांनी एखादी बाजू घ्यावी की, घेऊ नये?’ हा एक यक्षप्रश्न वृत्तपत्र क्षेत्रात विचारला जातो. त्याचे उत्तरही सोयीनुसार दिले जाते. बाजू घ्यायची म्हटली तर कुठली, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ‘सत्याची’, ‘घटनेतील कोणतीही एक’ आणि ‘कुठलीच नाही’, यापैकी कोणती बाजू घ्यावी, याची निवड करणे कर्मकठीण असते. आपल्याला जे माहीत आहे, तेच सत्य आहे, याबद्दल खात्री नसते. कोणतीही एक बाजू घ्यावी, तर बातमी एकांगी होण्याची भीती असते. कुठलीच बाजू न घेतल्याने घटना आणि बातमी दोन्हींवर अन्याय होण्याची शक्यता असते. त्यामुळे, करावे काय, हा यक्षप्रश्न उभा ठाकतो. या सर्व गदारोळातून वाट काढण्यासाठी ‘सोयी’ची बाजू घेतली जाते. म्हणूनच घटनेची बातमी झाल्यावर ती घटनेशी अजिबात प्रामाणिक राहत नाही. 

‘घटना जशी आहे, तशी तिची बातमी करावी. आपली मते त्यात घुसडू नयेत.’ हे पत्रकारितेत सांगितले जाते. फक्त सांगितले जाते, पाळले जात नाही. यामुळे, पत्रकारिता एक प्रकारच्या झुंडशाहीची बळी ठरत आहे. ‘आपल्या बाजूचा आहे ना, मग तो चूक असला तरी त्याला बरोबर म्हण.’ आणि ‘आपल्या बाजूचा नाही ना, मग बरोबर असला तरी चूक ठरव.’, अशी आग्रही मागणी केली जाते. झुंडशाहीत टिकून राहायचे असेल तर ही मागणी निमूटपणे मान्य करावी लागते. ही झुंडशाही राजकीय, वैचारिक किंवा अन्य कुठलीही असू शकते. 

‘प्रस्थापित सत्तेच्या विरुद्ध वृत्तांकन केले तरच ती निर्भीड व खरी पत्रकारिता’, असा एक विचित्र निकष लावला जातो. ‘प्रत्येक घटनेला, ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशा दृष्टिकोनातून पाहावे.’ हा दुसरा एक दंडक आहे. त्यामुळे, जे ‘जसे आहे’, तसे ते कधीच सांगितले जात नाही; ‘जसे हवे’, तसे सांगितले जाते. अशावेळी सबब आणि बाजू घेणे यापेक्षाही काही तरी वेगळे घडत असते. घटनेची बातमी होताना उमटलेली चूक हा मुद्राराक्षसाचा विनोद नसतो, तर ती राक्षसाने उमटवलेली मुद्रा असते!


बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

कांतारा आणि आपण

मुलीच्या व पत्नीच्या आग्रहाखातर ‘कांतारा’ चित्रपट त्यांच्यासोबत पाहिला. हळूहळू अधू होत चाललेल्या दृष्टीला, ती असेपर्यंत जे काही पाहिलेच पाहिजे, त्यांपैकी एक म्हणजे हा चित्रपट! हा चित्रपट पाहून आमच्या ‘वीरभद्रा’ची आठवण पदोपदी झाली. चित्रपट सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहे. त्यात विषयाला हात घालताना ज्या बाबी घेतल्या पाहिजेत, त्यापेक्षाही काही बाबी न घेतल्यामुळेच तो चित्रपट अत्यंत प्रभावशाली झाला आहे. त्यातली एक बाब म्हणजे ‘गेल्या सत्तर वर्षांत’ आणि ‘२०१४पासून’ या दोन विभागांत विभागलेलं पक्षीय राजकारण. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय भूलभुलय्यात हरवलेले पर्यावरणप्रेमी. या दोन गोष्टी मूळ विषयाशी संलग्न असल्या तरी चित्रपटाला भरकटवणार्‍या होत्या. या दोन्हींशी संबंधित असलेल्या व्यक्ती आणि ‘जाऊ द्या! मला काय त्याचं?’, असं म्हणत आपलं घर पेटेपर्यंत कोडगेपणाने शांत बसणारे आपण, यांना मारलेली ही सणसणीत चपराक आहे.

हा लेख चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी नाही. कुठलेही परीक्षण न वाचता केवळ चित्रपटगृहातच जाऊन पाहावा, असा हा चित्रपट आहे.  कारण, ध्वनिसंयोजन आणि ‘चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे’, ही बाब ठसवणारे दिग्दर्शन. 

आपण एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक विरोध करतो, तिचे निर्मूलन व्हावे म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा त्या जागी तेवढाच व तसाच परिणाम करणारी गोष्ट उभी करत नाही. विज्ञानाला धरून नाही, म्हणून तिचे अस्तित्व नाही अशी भूमिका आपण घेतो. त्याहीपुढे जाऊन तसा आग्रह धरतो. ‘अंगात येणे’ याला अंधश्रद्धा (मुळात श्रद्धा ही अंधच असल्यामुळे अंधश्रद्धा हा प्रकार संभवत नाही.), मानसिक विकृती या सदराखाली घालून आपण सश्रद्ध असलेल्या समाजमनावर आघात करतो. वटपौर्णिमा, निसर्गपूजा करणारी असंख्य व्रते, देवाला वाहिली जाणारी पत्री यांना आपण ‘कर्मकांड’ या सदराखाली ढकलून मोकळे होतो. यातून होणारे पर्यावरणाचे व निसर्गचक्राचे संरक्षण आपण लक्षात घेत नाही. 

फार वर्षांपूर्वी ‘मर्णकटो’ (नाव कदाचित चुकत असेल. चू.भू.द्या.घ्या.) नावाची श्रुतिका/नाटक रेडिओवर ऐकले होते. यामध्ये तहानेमुळे जीव जात असलेले एक पात्र गढूळ पाणी पीत असते. त्याच्या ओंजळीत ते अंतिम उपलब्ध असलेले पाणी दुसरी एक व्यक्ती जमिनीवर फेकून देते. तेव्हा तो विचारतो, ‘पाणी का टाकलेस?’ त्यावर ओंजळ रिती करणारा उत्तरतो, ‘हे पाणी प्यायला असतास तर तू मेला असतास?’ त्यावर तो एक प्रश्न विचारतो, तो फार महत्त्वाचा आहे. ‘तू आणखी कुठे पाणी पाहिले आहेस? मी ओंजळीत उचललेले हे शेवटचे पाणी होते. त्या जागी दुसरे निर्माण न करता, होते त्याचे नव्हते करण्याचा तुला काय अधिकार आहे?’ 

अनेक गोंडस लेबले धारण करून आपण नष्ट करत असलेल्या संस्कृतीच्या जागी आपण दुसरी सक्षम, पर्यायी व तसा परिणाम साधणारी व्यवस्था निर्माण करत आहोत का? मग, आपल्याला कोणताही अधिकार नाही संस्कृतीला नावे ठेवण्याचा. भले मग, आपण पर्यावरणवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे काहीही असलात तरीही. संस्कृतीला विकृती ठरवून नकारात्मक जनमानस तयार करताना, पर्यावरणाचे रक्षण करणारी तेवढीच सक्षम व्यवस्था आपण निर्माण केली नाही, हे सत्य आहे. उपमेतील पाणी गढूळ आहे, आपली संस्कृती नाही. ती नित्यनूतन व जीवनदायिनी आहे. जिथे जिथे ती जपली जाते, तिथे तिथे निसर्ग मूळ स्वरूपात शिल्लक आहे.

संस्कृती व त्यातून निर्माण झालेली आदरयुक्त भीती घालवल्यानंतर त्याची जागा विकृतीच घेते. देव, देवचार, खेत्री यांची आदरयुक्त भीती आहे, म्हणून अद्याप देवराई व अन्य वनसंपदा टिकून आहे. देवाला घालायला हवी म्हणून पत्रीत सांगितलेल्या वनस्पती जिवंत आहेत. अनेक सामान्य आजारांवर औषध म्हणून वनस्पती लावणारे व जगवणारे किती सुज्ञ लोक आहेत आणि ‘देवाला हवी’ म्हणून जगवणारे किती आहेत, याचाही विचार व्हावा. आपण श्रद्धेवर आघात करतो आणि ती जागा मागचे पुढचे न पाहणारा क्रूर व्यापार घेतो. 

‘तुम्हाला नमस्कार का करायचा? तुमच्या मनोरंजनाचे आम्ही बायप्रॉडक्ट आहोत. आम्हाला जन्माला घालून तुम्ही आमच्यावर उपकार नाही केले.’, अशी वाक्ये इतरत्र ऐकली की, प्रचंड त्रास होतो. आई वडिलांना वाकून नमस्कार करणे ‘आउटडेटेड’ ठरवतो, तेव्हा त्यामागे असलेला कृतज्ञताभाव व आदरही घालवतो. कृतज्ञता गेली की, फक्त उपयुक्तता शिल्लक राहते आणि आदर गेला की, फक्त दर शिल्लक राहतो!

‘रिटायर्ड’ केलेल्या देवाचे अस्तित्वच अमान्य केले की त्याची जागा निसर्गाला ओरबाडणारी व्यापारी वृत्ती घेते. भारताच्या प्रत्येक भागातील ग्रामीण, वनवासी क्षेत्रात या ना त्या स्वरूपात जत्रेच्या प्रसंगी भार येणारे वीरभद्र आहेत. संपूर्ण भारतभर आपली संस्कृती एकच आहे व हे एकसंध सांस्कृतिक राष्ट्र आहे, याची साक्ष पटवणार्‍या या गोष्टींना आपण तिरस्कृत, त्याज्य ठरवले आहे. वास्तविक त्याविषयीचा आदरभाव जागृत ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करणे किती सोपे होते! सोपे होते पण, सोयीचे नव्हते. 

चित्रपटात मांडलेला जमिनीचा प्रश्न आपल्या गोव्यातही आहे. पिढ्यानपिढ्या वनप्रदेशात वास्तव्य करून असणार्‍यांना आम्ही कायद्याचा बडगा उगारून हाकलवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या वास्तव्याने निसर्गाची हानी नाही झाली. उलटपक्षी रक्षणच झाले आहे. नैसर्गिक अधिवास आणि मानवी निवास ही क्षेत्रे एकमेकांवर अतिक्रमण करत असतील तेव्हा त्यातून सामंजस्याने तोडगा काढणे आवश्यक ठरते. अनेक पिढ्यांपासून वनांत राहणार्‍यांनाच ‘वनरक्षक’ बनवून व त्यांच्या हातात हात घालून प्रशासकीय यंत्रणा राबल्यास, निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित सापडू शकतील. वनसंपदेचा र्‍हास करणारे, त्याला आश्रय देणारे दोन्हीकडून शोधले पाहिजेत. ‘यह दैव(देव) बोल रहा है या नर्तक बोल रहा है?’ हा चित्रपटात एका पात्राने विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे. चित्रपट पाहावाच, त्यातून बोधही अवश्य घ्यावा. पर्यावरणावर, निसर्गावर प्रेम व्यक्त करताना आपण आपल्याच संस्कृतीला विनाकारण बदनाम तर करत नाही ना, याचाही अवश्य विचार व्हावा! 


शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

प्रत्येक विवाहित पुरुषाने लक्षांत घ्यावे, असे काही...

..............................
नमुना  संमतिपत्र 

मी, सौ. (लावावे की लावू नये हा जिचा तिचा प्रश्न) _____________________, राहणार______________________श्री./मिस्टर _________________ यांची कायदेशीर पत्नी पूर्ण शुद्धीत व कोणत्याही आणि कुणाच्याही दबावाखाली न येता लिहून देत आहे की, मी आज ____वार दि. ________ रोजी सकाळी/दिवसा/संध्याकाळी/रात्री अगर कुठल्याही वेळी घरी/घराच्या बाहेर कुठल्याही स्थानी माझा कायदेशीर पती श्री./मिस्टर________________________याच्यासोबत शारीरिक संबंध (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) प्रस्थापित करण्यास स्वखुशीने तयार आहे व तशी संमती देत आहे. त्यामुळे, उपरोल्लेखीत समय आणि स्थान यांना अनुसरून होणारा शारीरिक संबंध (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) याला ‘वैवाहिक बलात्कार (साध्या मराठीत मेरिटल रेप) धरू नये. या शारीरिक संबंधांतून (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) माझे ठिकाणी गर्भधारणा झाल्यास ती मला मान्य आहे व पुढेही असेल. कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय वैवाहिक बलात्कार व इतर कारणांमुळे गर्भपातास माझी मनाई आहे व असेल. हे संमतिपत्र पुढील _______महिन्या/महिन्यांसाठी वैध असेल. 

वेळ : 
स्थान : 
पूर्ण नाव : 
स्वाक्षरी : 

 (आधार कार्ड, विवाह नोंदणीची प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच या संमतिपत्राचे नोटरायझेशन होणे आवश्यक आहे.) 
-------------------------------------------- 

हा संमतिपत्राचा नमुना पाहून आपणास आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पण, विवाह झालेल्या व करू इच्छिणार्‍या होतकरूंसाठी या नमुन्याची व त्याचे नोटरायझेशन करण्याची नितांत आवश्यकता भासणार आहे. स्त्रीला पायदळी तुडवण्याची व तिच्याकडे केवळ भोगदासी म्हणून पाहण्याची हिंदू परंपरा असलेल्या भारतात आता अनेक ‘हारवर्डी’ सुधारणा येऊ घातल्या आहेत. गर्भपातासाठी विवाहित आणि अविवाहित असा भेदभाव करता येणार नाही, असे विधान (हे निकालपत्रात का करत नाहीत देव जाणे!) सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल देताना केले आहे. 

अविवाहित स्त्रीवर बलात्कार झाल्यास गर्भपाताचा अधिकार तिला असणे पूर्णपणे न्याय्य व मानवी मूल्यांना धरून आहे. पण, विवाहित स्त्रीला तिच्या कायदेशीर नवर्‍याचे मत अजिबात विचारांत न घेता गर्भपात करू देणे कितपत न्याय्य व मानवी मूल्यांना धरून आहे? घटनात्मक अधिकार फक्त स्त्री असलेल्या नागरिकालाच कसे असतात? त्यातही ‘वैवाहिक बलात्कार’ ठरवायचा कसा हा वेगळाच मुद्दा आहे. त्यातही तिची संमती (साध्या मराठीत कन्सेन्सस) किंवा संमती नसणे (साध्या मराठीत नॉन-कन्सेन्सस) हा अधिकारही तिलाच बहाल केला जातो. पुरुषाने सिद्ध करावे की, तिची संमती होती की, नव्हती. 

यामागे एक मूळ विचार रुजवला जात आहे, जो घातक आहे. ‘पुरुष हा कायम स्त्रीवर अत्याचारच करतो.’ हा तो विचार. एका बाजूने स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष उच्चरवाने करायचा आणि दुसर्‍या बाजूने स्त्री ही दुबळी म्हणून पीडित आहे, असेही म्हणायचे. मुळात स्त्री व पुरुष हे समान नाहीत. त्यांना समान करायलाही जायचे नसते. तो एक वेगळा विषय आहे, पण या सगळ्या विचारांच्या मांडणीमागे हॉर्वर्ड विश्वविद्यालयातील ‘जागृत संस्कृती’ (साध्या मराठीत व्होक कल्चर) जबाबदार आहे. अनेक भारतीय विद्वान, समाजशास्त्रज्ञ हे तिथूनच विद्या ग्रहण करून येत असल्यामुळे ते विचार येथेही तसेच्या तसे बिंबवले जातात. हे म्हणजे नऊवारी नेसलेल्या संस्कृतीवर जीन्स चढवण्यासारखे आहे!

विवाह आपल्याकडे संस्कार आहे, करार नव्हे. प्रजननाचा निसर्गधर्म म्हणून विवाहात परस्पर शारीरिक संबंध अनुस्यूत (साध्या मराठीत इन्क्लुझिव्ह) आहे, हे दोघांनाही माहीत असते. त्यामुळे, शारीरिक संबंधांसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नसते. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकामुळे व व्होक संस्कृतीच्या प्रभावामुळे स्त्रीला एकांगी, झुकते माप देणे चुकीचे आहे. विवाह व कुटुंबसंस्थेचा मूळ हेतूच यामुळे बिघडून जाईल. उत्तम प्रजा (पोरे जन्माला घालणे नव्हे) निर्माण करण्यासाठी नारायणरूपी पुरुष व लक्ष्मीरूपी स्त्री एक संस्कार आपल्यावर करून घेतात ज्याला विवाह म्हटले जाते. ग्रामीण भागांत ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’, असे दांपत्याला म्हटले जाते, त्यामागेही हीच संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विवाह ही शारीरिक संबंधांसाठी निर्माण केलेली सोय आहे. म्हणूनच तिथे कुटुंबसंस्था नावाची संकल्पना नाही. संत व्हेलेंटाइनपासून आत्ताच्या हॉलिवूड चित्रपटांपर्यंत कौटुंबिक मूल्यांचा (साध्या मराठीत फॅमिली व्हॅल्यू) गजर केला जातो. त्यांची ती जागृत (?) कौटुंबिक मूल्य आम्ही का स्वीकारावीत, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तिथे स्त्रियांना अधिकार नव्हते म्हणून चळवळी, आंदोलने झाली. जिथे घटनेने समान अधिकार दिलेले असतानाही केवळ स्त्रियांचीच बाजू घेतील असे कायदे कशासाठी? शरियात सांगितले आहे म्हणून, ‘मुलीला न्हाणं येणं किंवा पंधरा वर्षे होणे (दोन्हीपैकी एक)’ हे लग्नाचे वय म्हणून कायदा व राज्यघटना कशी मान्य करते? तेव्हा हे स्त्रीवादी व व्होक संस्कृतीवाले कुठे लपून बसतात?


जगभर असलेल्या निसर्गपूजक संस्कृतींना या व्होक संस्कृतीने संपवल्यानंतर त्या संस्कृतीची जागा स्वभावत:च कट्टर असलेल्या अब्रह्मिक संस्कृतींनी घेतली आहे. आता युरोपात इस्लामिक संस्था आणि व्होक संस्कृती हातात हात घालून ख्रिश्चन संस्कृतीला ग्रासत आहेत. या भयापोटीच इटलीमध्ये ‘देव, देश आणि कुटुंब’, अशी घोषणा व विचार मांडणारे जॉर्जिया मेलोनी यांचे सरकार येऊ घातले आहे. त्याचा मुसोलिनीच्या फॅसिझम व पर्यायाने मोदींशी संबंध आपल्याकडच्या विचारवंतांनी लावणे स्वाभाविक आहे. आपल्याकडची उरलीसुरली कुटुंबव्यवस्था संपवण्यासाठीच ही हॉर्वर्डी पिल्ले सोडली जात आहेत. आपल्याकडे स्त्री विरुद्ध पुरुष किंवा स्त्री-पुरुष समानता नाही. आपल्याकडे स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आहेत. स्त्री व पुरुष दोघेही निसर्गचक्राच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यातही सांगायचेच झाले तर स्त्री पुरुषापेक्षाही काकणभर सरसच आहे!

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

भारतीय व इराणी हिजाबवरील ‘साम्यवादी बुर्का’

व्यवस्थेवरील विश्वास उडणे, आपल्याच संस्कृतीची लाज वाटणे, कुटुंब व्यवस्था मोडकळणे, समाज म्हणून एकत्र येण्याऐवजी व्यक्ती महत्त्वाची ठरणे या गोष्टींकडे बारकाईने पाहिल्यास अनेक गोष्टींवर असलेला ‘साम्यवादी बुर्का’ दूर होईल यात शंका नाही.

हिजाब  परिधान करण्यावरून दोन परस्पर विरोधी घटना भारतात व इराणमध्ये घडल्याने, निर्णयस्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ चॉइस/राइट टू चूज) हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात दोन गोष्टी प्रामुख्याने घडत आहेत, एक म्हणजे याचे सार्वत्रीकरण (जनरलायझेशन) करणे आणि त्यातून हेतुत: विमर्श किंवा पूर्वग्रह (नॅरेटिव्ह) ओढूनताणून चिकटवणे. ज्यावर विचार होणे आवश्यक आहे. 

कर्नाटकात विद्यालयामध्ये गणवेषात हिजाब घालण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन आणि इराणमध्ये हिजाब, बुर्का न घालण्याच्या स्वातंत्र्याचे भारतात समर्थन, अशा परस्परविरोधी गोष्टी उदारमतवादी विचारवंत मांडताना दिसतात. इस्लामी देश आणि लोकशाही असलेला देश असे भिन्नत्व असल्याने हे परस्परविरोधी समर्थन भारतात केले जात आहे की, त्यामागे आणखीही काही भूमिका आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. 

आपण एखादी गोष्ट निवडतो तेव्हा फक्त ‘आपले निवड करण्याचे स्वातंत्र्य’ ही एकच बाब त्यामागे असते का? कपडे कोणते घालावेत, याची निवड करताना आपल्याला वाटेल तसे निवडण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच इतर अनेक बंधने आपण पाळतो. प्रसंग, काळ, वेळ, हेतू, सामाजिक संकेत या सर्व बाबी विचारात घेत त्यातून जे योग्य वाटेल ते आपण निवडतो. खास करून घराबाहेर पडताना. घरात, चार भिंतीच्या आत आपण काय घालावे, काय घालू नये याची निवड करताना आपण आपले निवडस्वातंत्र्य पूर्णत: वापरतो. चारचौघांत जायचे असते तेव्हा, जिथे जायचे आहे ते स्थान कोणते आहे, तो प्रसंग काय आहे, वेळकाळ काय आहे यासह इतर अनेक गोष्टींचा विचार करतो. लग्नाला जाताना जसे कपडे आपण घालतो, तसे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटायला जाताना घालत नाही. पोहायला जातानाचे कपडे पाहायला जाताना घालत नाही. पाय मोकळे करायला जातानाचे कपडे ऑफिसमध्ये घालून जात नाही. आपले निवड करण्याचे स्वातंत्र्य अमर्याद नाही, याचे भान आपल्याला असते व ते आपण ठेवतो.

प्रत्येक सापेक्ष गोष्टीचे अस्तित्व, तिच्या विरुद्ध गोष्टीमुळे असते. बंधनाशिवाय स्वातंत्र्य असूच शकत नाही. म्हणून कुठल्याही स्वातंत्र्याचा अमर्याद वापर अयोग्य आहे. मग ते व्यक्तिस्वातंत्र्य असो किंवा निर्णयस्वातंत्र्य. मुळात स्वातंत्र्य हा अधिकार, हक्क नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. ‘मला वाट्टेल तसं वागेन’ हे स्वातंत्र्य नव्हे. ‘मला जसं वागणं योग्य आहे, तसं वागेन’ म्हणजे स्वातंत्र्य. 

मुस्लीम स्त्रीने मशिदीत जाताना जसा वेष कुराणला अपेक्षित आहे, तसाच तो घालणे योग्य आहे. मशिदीत बिकिनी घालून जाणे, हे स्त्रीचे निर्णयस्वातंत्र्य म्हणून योग्य नव्हे. जिथे ईश्वराची उपासना, प्रार्थना करायची त्याजागी जाताना वेषही त्या पंथानुरूप असावा. स्विमिंगपूलमध्ये बुर्का घालून पोहणे योग्य नाही. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. बुर्का घालणे इस्लामी प्रथेप्रमाणे अनिवार्य आहे व तो सोडून पोहताना स्विमिंग ड्रेस घालावा लागतो यासाठी पोहणेच सोडून दे असे जलतरणपटू मुस्लीम महिलेला सांगणे अयोग्य व चुकीचे आहे. 

मंदिर, चर्च, मशीद ही प्रार्थनास्थळे आहेत, पर्यटनस्थळे नाहीत. त्यामुळे तिथे जाताना उचित पेहराव असावा. मशीद वगळता इतर दोन्ही ठिकाणी या अपेक्षेचे, व्यक्तिस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य या नावाखाली सर्रास उल्लंघन केले जाते. या सांस्कृतिक संकेतांचे उल्लंघन करणे, वरवर पटणार्‍या गोष्टींसाठी संस्कृतीविषयी नकारात्मक भावना भारतीयांमध्ये निर्माण करणे हे साम्यवादी हेतू स्पष्ट दिसतात. ‘प्रॅक्टिसिंग ख्रिश्चन’ यांची संख्या जगभरात कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. साम्यवादी व इस्लामपंथीय यासाठी हातात हात घालून कार्य करतात. ‘अंगभूत फुटीरतावाद’ या व अशा अनेक समान धाग्यांमुळे हे  जाळे जगभर विणले जात आहे. विचारधारा म्हणून असलेला साम्यवाद आता एक पंथ (कल्ट) बनला आहे. सातत्याने अविचारी कृत्ये करणार्‍या इस्लामला विचारांची बैठक देण्याचे काम साम्यवाद जगभर आणि भारतातही करत आला आहे. त्यामुळे, कृतीत अंतर्विरोध दिसत असला तरीही हेतूमध्ये तो नाही हे लक्षांत घेणे आवश्यक आहे. कारण, दोन्ही गोष्टींचे समर्थन भारतीय विचारवंतांकडूनच भारतात केले जात आहे. ‘झुंडशाहीने नियमांना नाकारणे’ हे कर्नाटकातील हिजाबसमर्थनाचे कारण आहे. तर, ’निर्णयस्वातंत्र्याचा हट्टाग्रह’ इराणी हिजाबविरोधाचे समर्थन भारतात करण्यामागचे कारण आहे. बहुतांश इस्लामी स्त्रिया हिजाब व बुर्का पांथिक बंधन म्हणून घालतात. या पांथिक बंधनालाच इस्लामी महिलांचे निर्णयस्वातंत्र्य’ म्हणून प्रस्थापित केले जात आहे.  असे करण्याचा प्रशस्त राजमार्ग म्हणजे इराणमधील हिजाब न घालण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन. वरवर या परस्पर विरोधी गोष्टी वाटतात, पण त्या  साम्यवादी हेतूने प्रेरित आहेत.

व्यवस्थेवरील विश्वास उडणे, आपल्याच संस्कृतीची लाज वाटणे, कुटुंब व्यवस्था मोडकळणे, समाज म्हणून एकत्र येण्याऐवजी व्यक्ती महत्त्वाची ठरणे या गोष्टींकडे बारकाईने पाहिल्यास अनेक गोष्टींवर असलेला ‘साम्यवादी बुर्का’ दूर होईल यात शंका नाही.

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

भूलभुलय्यामे खोये हुए पाटकर...

अनेकदा विचारवंतांचे, चळवळीतील कार्यकर्त्यांचे विचार, मुद्दे चुकीचे नसतात, फक्त ते नको इतके ताणले जातात. ते ताणले जाण्यामागे आंतरराष्ट्रीय मदारी कायम कार्यरत असतात. त्यांच्या भूलभुलय्यात देशी ‘पाटकर’ नको इतके वाहवत जातात.

आपल्याकडे घडलेल्या कुठल्या घटनांना लगेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळते, हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे. मग ते मेधा पाटकरांसारखे पर्यावरणवादी असोत किंवा राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांसारखे आंदोलनजीवी असोत, वंचितांचे प्रश्न उपस्थित करणारे असोत किंवा अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असोत, आपल्या तात्कालिक लाभापलीकडे विचार करत नाहीत. कारण संपल्यानंतरही त्यांचे कार्य सुरूच राहते, जे मूळ हेतूलाच नष्ट करते.

आदिवासी, वनवासी किंवा धरणामुळे ज्यांची जमीन गेल्याने विस्थापित होणार्‍या लोकांचे पुनर्वसन करणे, अपेक्षित विकासामुळे जे आहे त्याची हानी होत नाही याची काळजी घेणे इथपर्यंत मेधा पाटकरांचे आंदोलन पूर्णपणे समर्थनीय होते. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व बाजू समजावून घेतल्यानंतर दिलेल्या निर्णयाचा स्वीकार न करता, विरोध सुरूच ठेवणे कितपत योग्य होते? आपण किंवा आपल्यावर देशी वर्तमानपत्रात लिहिले जाणारे लिखाण त्याच वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर लगेच कसे उचलले जाते, याचा विचारही त्यावेळेस कुणाला सुचला नाही. प्रकल्प रद्द करायला, रखडवायला भाग पाडणे हे हेतू त्यामागे असतात, याचा साधा संशयही चळवळीतील कार्यकर्त्यांना येत नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून असे अनेक रखडलेले, रद्द झालेले प्रकल्प, त्यावेळेस झालेला विरोध, त्याला मिळालेली आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी यावर संशोधन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आरे येथील मेट्रो कार शेडला झालेल्या विरोधामागे पर्यावरणाची काळजी किती आणि त्यावर होणारा भारताचा खर्च वाढवण्याचे कारस्थान किती यावर विचार होणे आवश्यक आहे. केवळ पर्यावरणच नव्हे तर अनेक अशी आंदोलने अभ्यासण्याची गरज आहे.

सीएएविरोधी आंदोलन व शाहीनबाग येथील रस्ता अडवणे, त्याच पद्धतीने तथाकथित किसान आंदोलन, अडवणूक व कायदे मागे घेणे या घटनांकडेही त्याच दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. सीएएचा भारतीय मुसलमानांशी काहीही संबंध नव्हता. अल्पसंख्याकांवर कशा प्रकारे अन्याय केला जात आहे, या विषयावर अनेक लेख व प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात आली. प्रत्येक क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती तिथे पोहोचतील व त्याला प्रसिद्धी दिली जाईल याकडे पाहिले गेले. मोदी सरकारसकट सर्वोच्च न्यायालयाची बोटचेपी भूमिकाही लक्षवेधी ठरली. तीच गत तथाकथित कृषी आंदोलनाची. राकेश टिकैत व योगेंद्र यादव यांनी आंदोलन ताणताना राजकीय हित पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संमत झालेले कृषी कायदे मागे घेतानाही तत्कालीन राजकीय हितच पाहिले.  वास्तविक हे कायदे मागे घेण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. पण, त्याला मिळणारी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी, भारतीय लोकशाहीच्या न्यायपालिका व प्रशासनव्यवस्थेचे कचखाऊ धोरण आणि त्यावर वरताण करणारा कायदे मागे घेण्याचा मोदींचा निर्णय. या गोष्टींकडे देशाचे आर्थिक नुकसान व समाजमनावर होणारा घातक परिणाम या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नामकरण तर ‘हिंदू श्रद्धा निर्मूलन समिती’ असेच केले पाहिजे.  बुवाबाजी, थोतांड, अनावश्यक कर्मकांड या विरोधात संतांनीही आवाज उठवला आहे. पण, हे करताना त्यांनी श्रद्धेवर आघात नाही केला. तुकाराम महाराजांनी शाक्त पंथात घुसलेल्या पंच ‘म’कारांच्या विरोधात आवाज उठवताना वैष्णवांनाही सैल सोडले नाही. देवळात दरवर्षी बोकडाचा बळी देण्याची प्रथा न्यायालयात जाऊन बंद पाडणार्‍यांना मुस्लीम पंथातील बोकडाचा बळी दिसत नव्हता का? हमीद दाभोळकर यांना मजारीला भेट देणार्‍यांची श्रद्धा समजते. त्याचा वापर ते अपुर्‍या आरोग्य यंत्रणेवर तोंडसुख घेण्यासाठी करतात. वास्तविक मानसोपचार क्षेत्रात पुरेशी व्यवस्था नसणे हा स्वतंत्र विषय आहे, त्याचा मजारीवर जाणार्‍यांची भलामण करण्याशी काहीही संबंध नाही. तीच गत प्राणिप्रेमाची. पर्यावरणप्रेम, प्राणीप्रेम हे जेव्हा सातत्याने केवळ एकाच श्रद्धेवर आघात करते व त्याची भलामण आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिश्चन मिशनरि व मुस्लीम विचारवंत करतात, तेव्हा यामागील हेतूची शंका घेणे रास्त ठरते. 

अर्शदीपने झेल सोडल्यामुळे हरण्यावर तसा फारसा परिणाम न झालेल्या मॅचचा संदर्भ देत काही पाकिस्तानी व कॅनडास्थित ट्विटर हँडलना प्रसिद्धी मुहम्मद झुबेर चातुर्याने देतो व भारतात अल्पसंख्य शीखांवर अन्याय होत असल्याची ओरड आंतरराष्ट्रीय स्तरावर होते. भारतीय माध्यमांतील विचारवंत त्याची ‘री’ ओढतात व पाकिस्तानची भलामण करतात. पालमूमध्ये बेघर करण्यात आलेल्यांच्याबाबतीत आपण काँग्रेस व भाजप अशी राजकीय लढाई करत राहतो व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात दलितांवर (हा शब्द वापरणे पटत नाही तरीही केवळ संदर्भ समजावा म्हणून वापरला आहे) कसा अन्याय होत आहे, याच्या बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळते. आसाममध्ये अनधिकृत मदरसे बुलडोझरने पाडल्यावर, भारतात अल्पसंख्य मुस्लीम समाजावर कसा अन्याय होतो, याचे लेख आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात व पोर्टलवर लगेच झळकतात. ‘मानवाधिकारांचे हनन’ या सदराखाली याला प्रचंड प्रसिद्धी दिली जाते.  भारतातील वृत्तपत्रस्वातंत्र्याचे साम्यवादी पुरस्कर्ते त्याच वेळेस चीनमधील मुस्लिमांवर होणार्‍या अन्यायाबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत. कृष्णवर्णीयांवर युरोपात होणारे अन्याय, पाकिस्तानसारख्या मुस्लीम राष्ट्रांमध्ये अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दुर्लक्षिले जातात. 

या अशा गोष्टी आपल्या समाजकारणापासून राजकारणापर्यंत, इतिहासापासून संस्कृतीपर्यंत, पर्यावरणापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत वारंवार होत राहतात तेव्हा त्याच्या दिसणार्‍या गोष्टीपेक्षा न दिसणार्‍या, चार ते पाच पदर आड असलेल्या गोष्टी जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. भारतीय समाजमनावर होणारा नकारात्मक परिणाम प्रचंड त्रास देतो. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याला अजिबात आक्षेप नाही, पण तशाच प्रकारच्या गोष्टी इतरत्र होत असताना सोयीस्कर दुर्लक्ष करणे कितपत योग्य? असे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यास भाग पाडणारी व्यवस्था, भारतीय पर्यावरणवादी, प्राणीप्रेमी व इतर आंदोलन करणार्‍यांच्या लक्षांत येत नाही. भारतात आंदोलन करणार्‍या एखाद्या संस्थेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यामागे सोरोसच्या निधीवर चालणारी संस्था असते, हे आपल्या लक्षातच येत नाही. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या पटावरील पासष्टाव्या घरात खेळला जाणारा हा ‘केतकरी कट’ बहुतांश भारतीय विचारवंतांच्या, आंदोलकांच्या लक्षात येत नाही. अनेकदा विचारवंतांचे, चळवळीतील कार्यकर्त्यांचे विचार, मुद्दे चुकीचे नसतात, फक्त ते नको इतके ताणले जातात. ते ताणले जाण्यामागे आंतरराष्ट्रीय मदारी कायम कार्यरत असतात. त्यांच्या भूलभुलय्यात देशी ‘पाटकर’ नको इतके वाहवत जातात.


बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

सत्ता ते सत्तार व्हाया संजय...

होय नाही, होय नाही असे करता करता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकनाथ शिंदेंना संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना घेणे इतके आवश्यक होते का? एका संजयने उद्धव ठाकरेंची शिवसेना बुडवली आणि आता दुसरा संजय एकनाथांच्या शिवसेनेचा बिहार केल्याशिवाय राहणार नाही.

या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे की, भारतीय जनता पक्षाच्या अगतिकतेचा विस्तार आहे, हेच कळत नाही. अब्दुल सत्तार यांच्यावर टोकाची टीका करणारे भाजपचे कार्यकर्ते अक्षरश: तोंडावर आपटले. चित्रा वाघ यांच्यासह अनेकांनी संजय राठोड यांच्याविरुद्ध रान पेटवले आणि उद्धव ठाकरेंनी ज्यांना काढून टाकले, त्यांनाच मंत्रिपद मिळावे हा भाजपच्याच अगतिकतेचा विस्तार आहे. भाजपला खाली खेचणारे पहिल्या पाचात कसे? पाच टक्के कमिशनसाठी निधीच कंत्राटदारांना दान देणारे मंत्रिमंडळात कसे?

केवळ, आलेले पुन्हा उद्धव गटात जातील या भीतीपोटी वाट्टेल ते समीकरण स्वीकारणे हे राजकारण नव्हे. मग, उद्धव ठाकरे काय वाईट होते? युती टिकवण्यासाठी ज्या नाकदुर्‍या नितिश कुमार यांच्या बिहारात काढल्या त्याच सध्या महाराष्ट्रात काढल्या जात आहेत. भाजप आणि शिंदे गटासाठी हे अत्यंत घातक राजकारण आहे. राठोड आपल्यासह आणखी चार पाच जणांना घेऊन गेले असते, तर एवढं काय नुकसान झालं असतं? जे नुकसान झालं असतं त्या पेक्षाही अधिक नुकसान राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याने होणार आहे.
 
या पहिल्या फळीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप बाद झाला आहे. सर्वांत जास्त घातक गोष्ट म्हणजे ‘जे आले आहेत, ते जातील’ याची भीती. ही भीती भाजपची प्रतिमा धुळीस मिळवेल. शिंदे गटासाठीही अत्यंत वाईट अवस्था आहे. भाजपवाले ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांनाच पद देऊन भूषवणे हे भाजपच्या पुढील वाटचालीसाठी योग्य होत नाही. सत्ता टिकवण्यासाठी सत्तार, राठोड यांना स्थान देण्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. ज्यांच्याविरुद्ध रान पेटवले त्यांचीच ओवाळणी करणे याचे समर्थन भाजप कुठल्या तोंडाने करणार आहे?

विस्तारापेक्षाही पुढचा कारभार करणे फारच कठीण आहे. यापुढे ज्याच्यावर भाजप आरोप करत आहे, तो पुढे जाऊन भाजपमध्ये आल्यावर पवित्र होईल, याची खात्रीच पटत चालली आहे. अक्षरश: संजय राऊत व अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले तरी त्यात काही नवल वाटणार नाही. संख्याबळ हेच सर्व ठरवत असेल तर भाजपने तत्त्वांच्या बाता मारणे बंद करावे. पदरी पाडून घेऊन पवित्र करण्याचे धंदे बंद करावेत.

चित्रस्रोत : आंतरजाल

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

या ईड्येच्या नादात....

सीबीआय, ईडी यासारख्या व्यवस्थांचा वापर, गैरवापर होत नाही किंवा यापुढे होणार नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण, या सबबीआड भ्रष्टाचारी व्यक्तींना लपू द्यायचं का? हा खरा प्रश्न आहे, ज्याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने करणे आवश्यक आहे.
२०१४पासून ईडी (अंमलबजावणी/सक्तवसुली संचालनालय)च्या वाढत्या कारवाया पाहता हे पाऊल भ्रष्टाचाराविरुद्ध आहे की, विरोधकांविरुद्ध आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे पत्राचाळीतल्या लोकांना बेघर व्हावे लागणे आणि अर्पिता मुखर्जीच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडणे या बाबीही दुर्लक्षून चालणार नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आपण सरकारी जमीन लुटणार्‍यांना आणि भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण तर देत नाही, याचा विचार होणे आवश्यक आहे. 

दहशतवाद आणि भ्रष्टाचार याविरुद्ध केंद्र सरकारने उचललेली पावले खरोखरच कौतुकास्पद आहेत. पण, त्यामागचा हेतू शेवटपर्यंत शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. भाजपने ईडीचा वापर ‘विरोधकांविरुद्धचे संहारक हत्यार’ असा केल्यास तो भाजपचा राजकीय पराभव ठरेल. 

तृणमूल काँग्रेसचे पार्थ चटर्जी आणि त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या फ्लॅटमधून ईडीने कोट्यवधींची रोकड जप्त केल्यानंतर, त्यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ममतांनी त्यासाठी सहा दिवस घेतले. हा एवढा मोठा घोटाळा ममतादीदींना माहीत नसेल, असे होणे शक्यच नाही. वेळीच कारवाई करण्याची हिंमत त्यांना झाली नाही. आताही भाच्याला अभय देण्याच्या बदल्यात पार्थ यांचा ‘अभिमन्यू’ तर केला नसेल? इथेच एक महत्त्वाची गोम आहे, जी भाजपसाठी खूप घातक आहे. ‘राजकीय सेटलमेंट’ करण्यासाठी ईडीच्या कारवाईचा वापर केल्यास, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा दावा खोटा ठरेल व विश्वासार्हता कमी होईल.  ‘मनी लॉन्ड्रींग’ विरोधातील कायद्याचा वापर, भ्रष्ट नेत्यांना स्वच्छ करून पक्षात सामील करून घेण्याची ‘लॉन्ड्री’ करणेही असेच घातक ठरेल. हे ‘पदरी पाडून घेऊन पवित्र करणे’ विरोधी पक्षांप्रमाणेच भ्रष्ट नेत्यांना अभय व संरक्षण देणारे ठरेल. 

भाजपनेच पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते, आज भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत आहेत. भ्रष्टाचारी व्यक्ती राजकीय पक्षाचा वापर करून घेत असतो. विरोधी असलेला कुठलाही पक्ष काय किंवा सत्तेत असलेला पक्ष काय, त्याच्यासाठी फक्त भ्रष्टाचार लपवण्यासाठी कवच असतो. पक्ष बळकट होण्यासाठी असल्यांना जवळ करणे पक्षासाठीच धोक्याचे ठरते. त्याही पुढे जाऊन स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांवरही कारवाई करण्याचे धाडस सत्ताधारी भाजपने दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी, सत्ताधारी पक्षातील भ्रष्ट नेत्यांविरोधात न्यायालयीन खटले दाखल करणे, त्याचा पाठपुरावा करणेही तितकेच आवश्यक आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची चौकशी, पत्रा चाळप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी व अटक, पार्थ चटर्जी व अर्पिता मुखर्जी यांना अटक या कारवाईविरोधात त्या त्या पक्षांची प्रतिक्रियाही विचित्र होती. सोनिया गांधी, राहुल गांधी, पार्थ चटर्जी व अर्पिता मुखर्जी यांच्यावरील कारवाई ‘राजकीय सूड’ या सदरात घालून काँग्रेस व तृणमूल काँग्रेस मोकळी झाली. संजय राऊत यांच्या अटकेला ‘महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान’ या सदराखाली ढकलून उद्धव ठाकरे मोकळे झाले. 

काँग्रेसने व तृणमूल काँग्रेसने राजकीय सूड उगवला नाही? राज्ये बरखास्त करताना कायद्याचाच आधार काँग्रेसने घेतला होता. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांप्रमाणेच राजकीय हत्या केल्या. ही सूडबुद्धीच तर आहे. वाधवान या अमराठी व्यापार्‍याला लाभ मिळवून देण्यासाठी ६७२ मराठी कुटुंबे बेघर करणे हा ‘महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा’ अपमानच तर आहे. त्यामुळे, सूड व अस्मितेच्या अपमानाचे बोथट मुद्दे उपस्थित करणे गैरलागू होते. याचे आणखी एक मासलेवाईक उदाहरण म्हणजे स्मृती इराणी यांच्या मुलीचा उल्लेख आपणच मागवलेल्या आरटीआय अहवालात नसताना करणे. त्याऐवजी ‘इराणी कुटुंबीय यात गुंतले आहेत’, असा उल्लेख करणे जास्त उपयुक्त ठरले असते. आयरिश रॉड्रिग्ज यांनी तयार करून दिलेल्या भाजपविरोधी भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी मातीमोल करून टाकले. मेलेल्या व्यक्तीच्या नावे परवान्याचे नूतनीकरण कुणी केले, हा प्रश्न महत्त्वाचा होता. पण, त्याऐवजी  हातात, बगलेत दारूच्या बाटल्या घेतलेल्या स्मृती इराणींचे व्यंगचित्र शेअर करण्यापलीकडे काहीही रेखाटले गेले नाही. ‘तुम्ही आमच्या नेत्यांचे नाव खराब करत असाल तर आम्हीही तुमच्या नेत्यांचे नाव खराब करू’ या नेतृत्वप्रेमाच्या बाळबोध अट्टहासापायी हे राजकीयदृष्ट्या चुकीचे पाऊल विरोधी पक्ष उचलत आहेत. 

ही चुकीची पावले उचलण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, काँग्रेससकट सर्व विरोधी पक्षांकडे फक्त नेतेच उरले आहेत, संघटना कधीचीच संपली आहे. अन्यथा, केवळ प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई या एकाच मुद्द्यावर देशभरात हलकल्लोळ माजवणे सहज शक्य होते. उलट, महागाईच्या झळा सोसूनही सरकारचे जनसमर्थन कमी झाले नाही. विरोधकांनी सगळा प्रकाशझोत केवळ आपल्या नेत्यांवरच ठेवला आहे, महागाईच्या मुद्द्यावर नाही. तो ठेवला असता तर नेत्यांवरील कारवाईला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. संजय राऊत यांची ओवाळणी माध्यमांनी, जणू काही ते राष्ट्रकार्य करण्यासाठी युद्धभूमीवरच चालले आहेत अशा थाटात चोवीस तास दाखवली नसती. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी लोकांच्या प्रश्नांना हात घालणे, ते प्रश्न देशव्यापी बनवणे आवश्यक असते, आपल्याच नेत्यांच्या आरत्या ओवाळणे नव्हे.

‘सीबीआयला कारवाई करण्यासाठी राज्यांनी परवानगी न दिल्यामुळे ते शस्त्र निकामी ठरले आणि त्यामुळे केंद्राने ईडी हे नवे हत्यार पाजळले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्याला धार चढवली.’ यातही फारसे तथ्य नाही. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी गोव्यात सीबीआयचे कार्यालय उघडायला विरोध केला होता. तेच काम इतर राज्यांनीही केले. पण, म्हणून ईडी सक्रिय झाली असे म्हणणे चुकीचे आहे. आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार याची प्रकरणे स्वतंत्रपणे हाताळणे खूपच गरजेचे होते. याआधी अनेक आर्थिक गुन्हेगार केवळ राज्य व केंद्र यांच्यातील असहकारामुळेच वाचले आहेत. आपली स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी राजकीय पक्ष स्वीकारणे, सोडणे व त्या त्या पक्षांनी त्यांना सत्ता व संख्यबळासाठी आश्रय देणे सुरूच आहे. आपण या ‘भ्रष्टाचार’ या मूळ मुद्द्याकडे लक्ष न देता भलतीकडेच भरकटत आहोत. 

वस्त्रहरण या मालवणी नाटकात विदुराची भूमिका साकारणारा बारक्या चकणे विडी ओढत उभा राहतो. युधिष्ठिराचे पात्र साकारणारा भाग्या भागावणे त्याचे पाय धरून कंटाळतो. प्रॉम्प्टरच्या सांगण्यावरून बारक्या भानावर येतो आणि म्हणतो, ‘माफ कर राजा. या इड्येच्या नादात तुला उठ म्हणायचंच विसरून गेलो.’ नाटक, त्यात आपली भूमिका याला अजिबात महत्त्व न देता तोंडातील ‘इडी’ला महत्त्व देणार्‍या बारक्या चकणेपेक्षा आपले राजकीय नेते, माध्यमे वेगळी नाहीत. 

राजकीय पक्षांना कात्रीत पकडण्यासाठी ईडी नसून ती आर्थिक गैरव्यवहार करणार्‍यांविरोधात आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. अन्यथा, राजकीय वस्त्रहरण करण्यापलीकडे या ईडीचा काडीइतकाही उपयोग होणार नाही! 

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

माणूस असेल मोठा, पण...


‘टिळक पुण्यतिथीनिमित्त हेडगेवारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून याल का?’ या कौस्तुभ कारखानीस यांनी विचारलेल्या प्रश्नाला लगेच हो म्हणून टाकलं. हवी तिथे (बहुतांश वेळा नको तिथे) माहिती पाजळायची जुनाट सवय काही केल्या जात नाही. कुणासमोर बोलायचं आहे, या प्रश्नाला ‘इयत्ता पहिली ते चौथी’ हे उत्तर ऐकल्यानंतर पायाखालून बरंच काही सरकून गेलं. चतुर माणसांनी कारखानिसांना नकार का दिला, याचा लख्ख प्रकाश टाळक्यात पडला. स्वत:चाच उजेड हवा तेव्हा न पडण्याची इतकी सवय झाली आहे की, टाळक्यात पडलेला प्रकाश सहन होईना. 

सोपं करून सांगण्याइतकं कठीण जगात दुसरं काहीच नसतं. याचा परवा अंदाज आणि आज अनुभव आला. हेडगेवारमधील टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्तम झाला. गावडेबाईंनी पुढाकार घेऊन मुलांच्यातील मूर्तिकला जोपासण्याचा केलेला प्रयत्न खूप आवडला. मुलांनी केलेला चिकणमातीचा गणपती खूप आवडला. केवळ हेडगेवार विद्यालयापुरते असे उपक्रम मर्यादित न राहता ते प्रत्येक शाळेने राबवणे आवश्यक आहे. अंगद गाडगीळ, सान्वी फोवकर आणि ऋत्विक गावकर या मुलांनी खूप चांगली भाषणे केली. इयत्ता दुसरीत असलेली सान्वी महाडेश्वर या मुलीचे पाठांतर आणि सभाधीटपणा प्रचंड आवडला. 

लोकमान्य टिळक यांचे कार्य, कर्तृत्व, विचार, वाद याबद्दल वाट्टेल तेवढे बोलण्याची क्षमता असली, तरीही ज्यांनी ते ऐकायचे आहे, ते त्यासाठी तयार आहेत का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. लोकमान्य व इतर सर्व मोठे लोक आपल्याला खरंच समजले आहेत की, ते जयंती आणि पुण्यतिथीपुरते मर्यादित आहेत, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. मोठ्या माणसांचं जाऊ द्या, स्वातंत्र्यदिन शुक्रवारी येणं आपल्याला आनंद देऊन जातं आणि रविवारी येणं नाही. राष्ट्रीय सण, राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक यांचं महत्त्व आपल्या उरलं नाही की, आपल्याला ते समजतच नाही? लहान मुलांना ते समजणं कठीण आहे, पण शिकल्या सवरल्या माणसांनाही ते समजू नये याचं आश्चर्य वाटतं. त्याहीपेक्षा आपल्या आयुष्यात त्यांना स्थान नसणं, खूप विचित्र वाटतं. 

आपण या महापुरुषांची विभागणी करून घेतली आहे. टिळक पुण्यतिथीला त्यांच्याविषयी आंबेडकरांच्या मतांचा पुनरुच्चार करायचा, गांधी, नेहरू, फुले, शाहू महाराज यांचा उल्लेख करायचा. एकाच देव्हार्‍यातील आपल्याच दैवतांना एकमेकांविरुद्ध लढवून आपण नेमकं काय साध्य करत आहोत. दैवतांना फरक पडत नसेल कदाचित, पण आपला देव्हारा भंग होत चालला आहे. अभिमान आणि अस्मिता यांच्या झुंडशाहीत आपण गुंतत चाललो आहोत. ज्यांच्या नावे आपण भांडत आहोत, त्यांना प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात किती उतरवलं आहे, याचा विचार प्रत्येकाने करावा.

आपले आधीच तयार असलेले निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आपण महापुरुषांचा वापर करत आहोत. त्यांच्या विचारांशी, कार्याशी आपल्याला काहीच देणंघेणं नसतं. म्हणूनच त्यांची व्याप्ती जयंती आणि पुण्यतिथीपुरती आपण करून टाकली आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क/अधिकार आहे..’ हे केवळ दोनच दिवस आपल्याला आठवतं. बाकी जयंती आणि पुण्यतिथी यांचा संबंध तिथीशी तोडून टाकत, आपण तो तारखेशी जोडला आहे. यातून शिवाजी महाराजही सुटले नाहीत. 

‘नाही, माणूस असेल हो मोठा. पण, आमच्या हिशेबी त्यांच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर?’ हा पुलंच्या अंतू बर्व्याला पडलेला प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो.  मग, त्याचे उत्तर म्हणून प्रसंगोपात्त आठवण, हे सोपे उत्तर आपण शोधतो. त्यांचे फोटो, सुविचार व्हॉट्सअ‍ॅप वगैरेंवर शेअर करतो. प्रत्यक्षात त्यांच्या विचारांवर चालून पाहण्याचे धाडस करू इच्छित नाही. त्यांच्या प्रतिमेला हार घालणे, त्यांच्या चरणांशी बसणे एवढेच करतो. स्वत:ला त्यांच्या चरणात आणतो, त्यांना आपल्या आचरणात आणत नाही. त्यांचा एखादा विचार, एखादे कार्य आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वत: तो तपासून पाहिला पाहिजे. तेव्हा कुठे त्यांचे मोठेपणा किती मोठा व कठीण आहे, हे आपल्याला समजेल.

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

आदिवासी, दलित आणि अल्पसंख्य असणे एवढे महत्त्वाचे आहे का?


राष्ट्रपती पदासाठी नावाचा उद्घोष करताना आणि प्रचार करताना भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या नावाआधी ‘आदिवासी’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख केला. आपण ‘दलित’ असल्याने अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री दिनेश खटीक यांनी केला आहे. स्मृती इराणी यांना अल्पसंख्याक प्रभारी मंत्री करण्यात आले तेव्हा, काँग्रेस,  इतर विरोधी पक्ष व विचारवंत यांनी, ‘भाजपला एकही मुस्लीम व्यक्ती सापडला नाही का?’, अशी विचारणा केली. आपण ज्या मानसिकतेचा आत्यंतिक तिरस्कार करतो, त्याच मानसिकतेत अधिकाधिक गुंतत चाललो आहोत.

द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्या उत्तम शिक्षिका, उत्कृष्ट प्रशासक आणि स्वतंत्र प्रज्ञेच्या सहृदय व्यक्ती म्हणून राष्ट्रपती होण्यास अगदी योग्य आहेत. काही अपवाद वगळता मोदी यांनी निवड केलेल्या व्यक्ती उत्तम प्रशासक असतात. किंबहुना या गोष्टीला ते प्राधान्य देतात. यासाठी प्रसंगी प्रचलित विचारधारेच्या ते विरुद्ध जातात. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, आसाममध्ये हेमंत विश्वशर्मा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. योगींनी पक्षाविरुद्धच बंड पुकारले होते, विश्वशर्मा हे काँग्रेसमधून आलेले आणि फडणवीस हे मराठा नसून ब्राह्मण आहेत. बंडखोर प्रवृत्ती असलेले, मूळ भाजप संस्कार नसलेले आणि बहुसंख्य, बहुजन नसलेले अशा व्यक्तींची निवड ही ‘हमखास निवडून येण्याचे प्रचलित निकष’ नसतानाही केवळ क्षमता आणि प्रशासकीय कौशल्य यावरून करणे धाडसाचे आहे. भाजपच्या पुढच्या फळीसाठी उत्तम व कुशल प्रशासक असलेल्या व्यक्तींची जाणीवपूर्वक केलेली ही निवड अन्य राजकीय पक्षांत आढळत नाही. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवडतानाही त्यांचे कुशल प्रशासक असणे खूप महत्त्वपूर्ण ठरले. पण, जेव्हा प्रचार केला गेला तेव्हा मात्र त्यांचे आदिवासी असणे प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आले. आदिवासी व महिला असणे हा मुद्दा माध्यमांनी अधिक ठळकपणे मांडला. त्यांचे आदिवासी असणे याचा आणि सामर्थ्य, पद, प्रगती यांच्याशी संबंध लावून आपण त्यांच्या गुणकौशल्याला कमीपणा आणतो. त्याहीपुढे जाऊन आपण त्याच सामाजिक विषमतेला खतपाणी घालतो, जिचा विरोध करण्याचा दावा आपण करत आहोत. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.

आपण ‘दलित’ असल्याने अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री दिनेश खटीक यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या, व्हायरल झालेल्या पत्रात केला आहे. दुसरा आरोप त्यांनी आपली काही कामे होत नसल्याचा केला आहे. तिसरा आरोप त्यांनी आपल्या खात्यातील अधिकार्‍यांच्या बदल्यांत भ्रष्टाचार झाल्याचा केला आहे. या तीन आरोपांपैकी दुसरा व तिसरा यात तथ्य असण्याचा संभव आहे. ‘माफिया राज’विरुद्ध कारवाईनंतर योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली आहे. हे थोडे कठीण आणि वेळकाढू काम आहे. प्रशासकीय अधिकारी आणि आमदार व मंत्री यांच्या खवय्येगिरीने उत्तर प्रदेशमध्ये उच्छाद मांडला होता. ‘वर’पर्यंत पैसे पोहोचवणे हे अधिकार्‍यांचे नित्यकर्म झाले होते. या भ्रष्टाचाराच्या वाहत्या गटारगंगेत सगळेच आपले हात धुऊन घेत असत. आता चाप बसायला लागल्यानंतर हे अधिकारी कामे या ना त्या कारणाने अडवून धरू लागले आहेत. खटीक यांनी त्याचा संबंध आपल्या जातीशी लावला आहे. जेवढी भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम तीव्र होत जाईल तेवढे योगी आदित्यनाथ आपल्याच मंत्रिगणांमध्ये आणि प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये अप्रिय होत जातील. भ्रष्टाचारात लिप्त असलेले अधिकारी व मंत्री यांच्यामध्ये सर्व जातीचे, पंथाचे लोक आहेत. आदिवासी, दलित या सदराआड लपलेले व मंत्रिपद भूषविलेले अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या समाजाकरता काहीही न करता केवळ स्वत:साठी संपत्ती गोळा केली. मधू कोडासारखी अनेक माणसे या ‘मागास समाजा’च्या बुरख्याआड स्वत:चाच विकास करतात. आदिवासी, दलित, अल्पसंख्य या ढाली ते स्वत:च्या बचावासाठी पुढे करतात. त्यांच्यावर कारवाई (त्यांच्या म्हणण्यानुसार अन्याय) म्हणजे समाजाविरुद्ध उचललेले पाऊल असे त्यांचे म्हणणे असते. अनेकवेळा संख्यबळाच्या राजकीय समीकरणांसाठी अशी माणसे वाचतातही. पण, हे समाजव्यवस्थेसाठी घातक आहे.

मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर  त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक कल्याण खात्याची प्रभारी जबाबदारी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना देण्यात आली. त्यावर विरोधी पक्ष आणि विचारवंतांनी त्यावर टीका केली. तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी, ‘कट्टर हिंदू असलेल्या व पारश्याशी लग्न झालेल्या स्मृती इराणींना ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्या कल्याणासाठी असलेल्या खात्याचा कारभार सोपवण्यात आला. हे भाजपचे सेक्युलरिजम आहे का?’, असे ट्वीट केले. गंमत अशी की, पारशी समाज अल्पसंख्य या सदरात मोडतो, हे या लोकांच्या गावी नाही किंवा अल्पसंख्याक म्हणजे केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चन असा समज काँग्रेससकट सर्वांचा आहे. मुळात, ‘मुस्लीम व ख्रिश्चन हे अल्पसंख्य कसे?’ हाच खरा प्रश्न आहे. अल्पसंख्य ही संकल्पना संख्येशी संबंधित आहे. एकूण संख्येच्या किती टक्क्यांपर्यंत अल्पसंख्य गणले जावे, हेच मुळात ठरले नाही. खरे तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा, एवढा मोठा व गंभीर विषय आहे. पण, पारशी असलेल्या स्मृती इराणी अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाचा प्रभारी ताबा घेण्यास योग्य आहेत की, नाही हे ठरवण्याचा निकष ‘त्या मुस्लीम किंवा ख्रिश्चन आहेत की नाही?’, हा कसा असू शकतो? एखाद्या समाजाचे प्रश्न त्याच समाजातील व्यक्ती मंत्री किंवा मुख्यमंत्री झाल्यास सोडवू शकतो, हा विचारही त्याच सामाजिक विषमतेचा विरोध करण्याला छेद देणारा आहे. तसेच, ‘अल्पसंख्याकांतील बहुसंख्य असलेल्यानाच अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व दिले जावे’ हा घातक विचार रुजवणारेही आहे.

ज्याचा आत्यंतिक विरोध करतो, कालांतराने आपणही तसेच होत जातो. हा सिद्धांत जसा वैयक्तिक पातळीवर लागू होतो, तसाच तो सामाजिक पातळीवरही लागू होतो. सामाजिक विषमतेच्या विरुद्ध लढता लढता आपण तिलाच पोसत आहोत. ‘संख्याबळ’ ही राजकीय अपरिहार्यता असते. पण, त्यासाठी सामाजिक विषमता वाढत असेल तर त्याचा विचार आपण समाज म्हणून केला पाहिजे. ‘आदिवासी’, ‘दलित’, ‘अल्पसंख्य’ ही व अशी तत्सम विशेषणे वापरणे बंद केले पाहिजे. ‘दलित असूनही त्याने पहिला क्रमांक पटकावला’ असे वाक्य जेव्हा आपण वापरतो तेव्हा ‘दलित (मुळात हा शब्द वापरणेच चुकीचे आहे, पण केवळ माझा मुद्दा पटवण्यासाठी वापरला आहे.) हुशार किंवा समर्थ नसतात’, असा अर्थ त्यातून निघतो. आपण संपूर्ण समाजालाच नकारात्मक बनवत आहोत. शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे हातात घेऊन स्वत:ला मागास म्हणवून घेण्यासाठी आंदोलने करणारा मराठा समाज, हे या नकारात्मक मानसिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

नकारात्मक मानसिकतेसोबतच ‘कायम (बाय डिफॉल्ट) अन्यायग्रस्त, वंचित व पीडित’ असल्याची पराभूत मानसिकताही जाणीवपूर्वक जोपासली जात आहे. एका वेगळ्या अर्थाने सांगायचे झाल्यास, सत्ता, संपत्ती, स्वार्थ आणि सोय या चार ‘स’वर्णियांचेच राज्य पूर्ण समाजावर सुरू आहे. त्यामुळे, आपल्यामध्ये काय चांगले आहे, आपल्या समाजात पूर्वी कुणी काय चांगले कार्य केले आहे हे ठसवण्याऐवजी आपण आपल्यावर अन्याय कसा झाला व होत आहे हेच ठसवत राहतो. पुढारलेपणापेक्षाही मागासलेपणाला उपयुक्त ठरवत राहतो.

वैयक्तिक आणि सामूहिक उत्कर्षासाठी आपण दलित, आदिवासी आणि अल्पसंख्य असल्याचा आधार घ्यावा लागणे व अपराध लपवण्यासाठी ढाल म्हणून पुढे केले जाणे यातच संपूर्ण समाजाचे अपयश सामावलेले आहे. आपण, आपला समाज यापासून कधी स्वतंत्र होणार हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे!

मंगळवार, १९ जुलै, २०२२

अकस्मात तोही पुढे जात आहे...

‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा’ असं गदिमा गीतरामायणात लिहून गेले, आपण मरणाचा उच्चार करणेही टाळतो. परंतु, आपल्याकडे याचा सखोल विचार झाला आहे. अगदी ‘क्लिनिकल डेथ’पासून ते आध्यात्मिक मृत्यूपर्यंत. मरण त्यालाच येते जो जगत असतो. बाकी, जिवंत असलेल्या व्यक्तीची ‘क्लिनिकल डेथ’ होते. जिवंत असणे आणि जगणे यातला फरक समजावून देणारी सीमारेषा म्हणजे मृत्यू. 

सामान्यत: एकमेकांशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. केवळ देह नव्हे, तर सुख, दु:ख, विचार, घटना, स्मृती, नाती या सगळ्यांचा गोतावळा असतो. आपल्यासाठी ती फक्त एक व्यक्ती नसते, म्हणूनच कुणी गेल्याचे आपल्याला दु:ख होते. आपण तो विषयच टाळतो. आयुष्यात एखाद्या व्यक्तीसोबत आपण किती क्षण घालवले, यापेक्षाही घालवलेले क्षण आयुष्य किती समृद्ध करून गेले हे फार महत्त्वाचे असते. नावाप्रमाणेच सदानंद असलेली व्यक्ती नात्यापेक्षाही वेगळं नामाभिधान घेऊन भेटली, निघूनही गेली. 

काल, सोमवारी दुपारी एक दु:खद बातमी समजली. माझ्या चुलत बहिणीच्या यजमानांना देवाज्ञा झाली. उमाताईने कॉल केला. भावोजी यांच्यासोबत मीही वास्कोला गेलो. सर्व अंत्यसंस्कार त्यांची मुलगी आकांक्षाने केले. वयाच्या मानाने तिचा धीर, प्रसंगाला सामोरे जाणे, अंत्यविधीची तयारी करणे, सर्व विधी पूर्ण करणे प्रत्यक्ष पाहताना खूप समाधान वाटले. सदानंद आता पुन्हा भेटणार नाहीत, पण त्यांच्या मुलींमध्ये ते कायम राहतील. आंकाक्षामध्ये असलेला धीरोदात्तपणा, कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, कुठलाही प्रसंग निभावून नेण्याची व हॅन्डल करण्याची क्षमता हा तिला लाभलेला वारसा आहे. तिची ही तिसरी पिढी आहे. माझ्या काकूने तिच्या सर्व मुलींमध्ये हे गुण रुजवले आहेत. तिच्या मुलींनी तेच गुण आपल्या मुलांमध्येही रुजवले आहेत. 

आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार ज्येष्ठ पुत्राला आपल्याकडील शास्त्राने दिला आहे. मुलींच्यासाठी तो निषिद्ध (करू नये असे) नाही. मग, मुलींनी अंत्यसंस्कार करू नये असा संकेत का रूढ झाला असावा? सामान्यत: स्त्री पुरुषापेक्षा अधिक हळवी, भावनाप्रधान, नात्याला महत्त्व देणारी असते. कुटुंबातील व्यक्ती जाण्याचा जेवढा परिणाम पुरुषावर होतो त्यापेक्षा कैक पटीने अधिक आघात स्त्रीवर होतो. आपल्याही परिचयाच्या घरात एखादी व्यक्ती गेल्यास, अनेकदा घरातील महिलेसाठी डॉक्टरांना पाचारण करावे लागते. आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, पुत्र, कन्या या रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांतील व्यक्तीत स्त्री गुरफटलेली असते. एखाद्या व्यक्तीत आपण जेवढे जास्त गुंतलेलो असतो, तेवढीच जास्त आपली सालपटं त्या व्यक्तीपासून दुरावताना निघतात. मला माझ्या आईला अग्नी देताना आणि तिच्या अस्थी गोळा करताना, जे काही झालं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. स्त्रीला अंत्यसंस्कार करायला न देण्यामागे तिला हा त्रास होऊ नये हा विचार आहे. एखाद्या घरात मुलगा व मुलगी यामध्ये मुलगा हळवा असेल आणि गेलेल्या व्यक्तीत जास्त गुंतलेला असेल, तर मुलाऐवजी मुलीने अंत्यसंस्कार करणेच अधिक योग्य होईल. प्रश्न मुलगा की, मुलगी असा नाहीच, उलट गेलेली व्यक्ती जिवंत असताना तिच्यासाठी सर्व काही करून ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे अंत्यसंस्कारही त्याच आत्मीयतेने करण्याचा धीरोदात्तपणा असलेल्या व्यक्तीने ते करावेत. 

आपल्याला हे माहीत असतं की, आपणही कधीतरी जाणारच आहोत. पण, गमतीचा भाग म्हणजे आता जाणार नाही याचा ठाम विश्वासही असतो. आपण कधी मरणार हे माहीत नसल्यामुळे आलेला तो विश्वास असतो. ‘आपल्यामागे कसं होईल?’ हा विचार आपण आहोत म्हणून सगळं व्यवस्थित आहे, या अहंकारापोटी जन्म घेतो. एखादी वृद्ध व्यक्ती घरामध्ये दिवसातून शंभर वेळा, ‘मी आहे म्हणून चाललं आहे. मी गेल्यावर कळेल.’ असे म्हणत असेल तर कुटुंबीयांच्या मनात एकदा तरी ‘जाऊन पाहा’ असा विचार येतोच. 

आपण मरावं कसं हे आपल्या हातात नसतं, पण जगावं कसं हे मात्र आपल्या हातात असतं. आलेला क्षण शेवटचा आहे, या जाणिवेने येणारा प्रत्येक क्षण जगावा. 

आलेला क्षण शेवटचा आहे, अशा जाणिवेने जेव्हा आपण प्रत्येक क्षण जगतो, तेव्हा मरणाची भीती, दु:ख राहत नाही. आपल्या जाण्याने आर्थिक, व्यावहारिक हानी कमीत कमी व्हावी याची तजवीज आपण केली पाहिजे. होणारी भावनिक हानी, अटळ असते. तिला कुणीही टाळू शकत नाही. पण, प्रत्येक क्षण जगल्याने येणारी निर्भय कृतार्थता आपला मृत्यू आपल्यासाठी सुखद करत असते. आपल्यानंतर कुणाचेही अडून उरणार नाही एवढे आपल्या कुटुंबाला आपण सक्षम केले आहे, याचे समाधान सतत आपल्यासोबत राहते. उलट, आपण जेव्हा ‘माझ्यानंतर कसं व्हायचं?’ याचा विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मुलांना संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम केले नाही याची ती कबुली असते. 

सदानंदांचे चितेवरील पार्थिव पाहून त्यांच्या जागी मी मला पाहिले. विचार टाळण्यासाठी आकांक्षाकडे पाहिले तेव्हा तिच्यात मला माझी मुलगी श्रिया दिसली. तिलाही कधीतरी हे सर्व करावे लागेल, तेव्हा ती कशी या प्रसंगाला सामोरी जाईल, हा विचारही आला. आपलं मन फार विचित्र असतं. प्रत्येक क्षण जाणिवेने जगत असलो तरीही कुणाचे खांदेकरी होताना, स्मशानात चिता जळताना पाहून कुठले विचार मनात येतील हे काही सांगता येत नाही. ते जसे येतात तसे स्मशानातून बाहेर पडल्या पडल्या निघूनही जातात. म्हणूनच त्याला ‘स्मशानवैराग्य’ म्हणत असावेत.  अशावेळी थांबावं. थोडं मागे वळून पाहावं. 

समर्थांनी, ‘एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ या ओळी आपल्या मनाला सांगण्यासाठीच लिहिल्या आहेत. संसारासाठी धावपळ करताना, दररोज काही क्षण आपल्यासाठी बाजूला ठेवावेत. स्वत:चं सेल्फ ऑडिट करावं. आपण प्रत्येक क्षण शेवटचा आहे, या जाणिवेने जगत आहोत का, याचा विचार करावा. आपण जिवंत आहोत की, जगत आहोत याचाही विचार करावा. असा विचार दररोज माझ्या मनात येतो. मरणाआधी मरायचं नाही, हे ठामपणे सांगून जातो.


रविवार, १७ जुलै, २०२२

इतिहास नाकारणार्‍यांचे वर्तमान भयावह, भविष्य भयाण...

उपलब्ध पुरावे, त्यातून काढलेला इतिहासाचा निष्कर्ष वर्तमानात स्वीकारताना आपण कच खातो, त्यामागे श्रद्धा आणि भीती ही दोन कारणे आहेत. त्यामुळे एक तर आपण निष्कर्ष नाकारतो किंवा तो इतिहासच नाकारतो. इतकेच कशाला, त्याचे वाचन, तौलनिक अभ्यास करून त्यावर विचार, मत मांडणेही नाकारतो. इतिहासच नाकारल्याने वर्तमान भयावह आणि भविष्य भयाण होते, याचे प्रत्यंतर हा देवभूमीचा इतिहास वाचून आल्यशिवाय राहत नाही.

भारतातील प्रत्येक राज्य ही देवभूमी आहे, याचा आम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे, कुणी गोव्याचा उल्लेख ‘देवभूमी’ असा केला की, आश्चर्य वाटतं. ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘इतिहास देवभूमिचा’ या पुस्तकाने नावापासूनच कुतूहल जागृत केले. 

या पुस्तकाच्या पूर्वार्धात बारा व उत्तरार्धात सव्वीस प्रकरणे आहेत. अथक परिश्रमाने केलेले संशोधन आहे, एकेका संदर्भासाठी पालथी घातलेली असंख्य पुस्तके आहेत. त्या पुस्तकांची सूची वाचूनच धडकी भरते. एवढी पुस्तके वाचून काढायला आपल्याला एक जन्मही पुरणार नाही. मांद्रेकर यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांतून त्यांनी नेमके संदर्भ आपल्यासमोर ठेवले आहेत. एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल. उत्तम दर्जाचा कागद, छपाई, हार्डबाइंडिंग, भरपूर चित्रे, एकूणच पुस्तकाचा दर्जा पाहता प्रकाशक विलासराव परशुराम मांजरेकर यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही, याची प्रचिती येते. थोडा वेगळा व आकर्षक फॉन्ट वापरला असता तर अजून रंगत आली असती. जे जे ऐतिहासिक संदर्भ जिथे जिथे आले आहेत, तिथेच परिशिष्टांत नमूद केलेल्या संदर्भ-पुस्तकाचा क्रमांक द्यायला हवा होता. पानाच्या खालच्या बाजूस संदर्भ देणे शक्य होते. अनेक ठिकाणी झालेली वाक्यांची पुनरावृत्ती टाळणेही तितकेच आवश्यक होते. पण, या मला वाटलेल्या नगण्य बाबी आहेत. मांद्रेकर यांनी जे संशोधन केले आहे, जो अभ्यास केला आहे आणि त्यासाठी जे परिश्रम घेतले आहेत, त्यासमोर या बाबी फारच नगण्य आहेत.

विलासराव आणि ज्ञानेश्वर मांद्रेकर या उभयतांच्या जैतापूर प्रवासात समोर आलेली ही कल्पना मूर्तरूपात जेव्हा आपल्या हाती येते, तेव्हा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचा प्रवास कधी संपतो, हे लक्षातच येत नाही. नाही म्हणायला काही पाने वाचताना प्रचंड त्रास झाला. प्रत्येक गोमंतकीयाने या पुस्तकातील पान क्र. ९ ते पान क्र. २२ एवढी तरी पाने अवश्य वाचावीत. पान क्र. १४वर छळाचे जे अकरा प्रकार एकेका वाक्यात वर्णन केले आहेत, ते खरोखर वाचवत नाहीत.  इन्क्विझिशनमध्ये कशा प्रकारे छळ केला जात असे, याची काही चित्रेही आहेत. आपल्या पूर्वजांनी हे अमानुष अत्याचार कसे व कशासाठी सहन केले आणि त्यामुळेच आपण आज आहोत, याचे भान, याची जाणीव प्रत्येक गोमंतकीयाने अवश्य ठेवावी. 

मला व्यक्तिश: आवडलेला भाग म्हणजे कुंकळ्ळीकरांनी स्वधर्मासाठी दिलेला लढा. हाच भाग किंवा यातील काही वेचीव भाग शालेय अभ्यासक्रमात आवर्जून घेतला जावा. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या आणि तहाची कलमे नव्हेत. भविष्य घडवण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे स्फुल्लिंग वर्तमानात जागृत ठेवणे म्हणजे इतिहास. आपले अस्तित्व, आपला धर्माभिमान टिकवून ठेवण्यासाठी त्वेषाने पुढे सरसावलेला ९५वर्षांचा यशवंत नाईक असो किंवा आऊतु-दे-फॅ या समारंभात आपल्याच आईवडिलांच्या डोळ्यादेखत जिवंत जाळलेला लहान पोर असो, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात स्थान नसलेले हेच आबालवृद्ध भविष्य घडवण्यास समर्थ असतात.

इतिहासात घडून गेलेल्या घटना आपण बदलू शकत नाही. पण, त्यातून काढलेले निष्कर्ष आपले आजचे जीवन व आपल्या पुढील पिढीची दिशा व दशा बदलू शकतात. मांद्रेकर यांनी या पुस्तकात अनेक निष्कर्ष निर्भीडपणे मांडले आहेत. अर्थात, ती त्यांची मते व विचार आहेत. ती कुणाला पटो किंवा न पटोत, पण त्यावर वाचन आणि विचार होणे आवश्यक आहे. गोव्यातील मंदिरांचा विद्ध्वंस, केवळ ख्रिश्चन पंथ स्वीकारावा यासाठी केलेले अमानुष अत्याचार, या छळाविरुद्ध झालेला प्रतिकार, गोव्यातील महत्त्वाचे भाग, महाल पोर्तुगीज आधिपत्याखाली येणे, त्याचे राजकीय सामाजिक परिणाम, स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात गोवामुक्तीसाठी झालेले प्रयत्न, त्यात सर्व विचारधारेच्या लोकांचा सहभाग, नेहरू यांना गोव्यातील लोकांनीच पुढाकार घेऊन गोवा मुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे वाटणे व १९५५ ते १९६१ या काळात त्यासाठी त्यांनी पुकारलेला असहकार आणि मुक्त झालेला गोवा हा प्रवास अधोरेखित करताना मांद्रेकर यांनी मांडलेले निष्कर्ष पटतात. त्यातील त्यांचा निर्भीडपणा अधिक भावतो. 

देवी म्हाळसा, म्हामल याविषयी त्यांनी दिलेली व्युत्पत्ती आणि त्याविषयी असलेली मतभिन्नताही त्यांनी संदर्भासह मोकळेपणाने मांडली आहे. आपल्या ज्ञातीविषयी आणि देवतेविषयी असलेले ममत्व आणि सार्थ अभिमान पानापानांत जाणवतो. कुलदेवतेच्या प्राचीन मूर्तीला मध्यभागी न ठेवता बाजूला ठेवले जाण्यात त्यांना वाटणारे दु:खही जाणवते. इतर मंदिरात जुनी, प्राचीन मूर्ती मध्यभागी ठेवून तिच्याच मागे नवीन मोठी मूर्ती स्थापन झाल्याची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. कुळाचा इतिहास, कुलदेवतेचा इतिहास यावरून काढलेला निष्कर्ष म्हणूनच वाद उत्पन्न करण्यासाठीच काढला आहे, असे वाटत नाही. पाच हजार वर्षांपूर्वी गावर्‍हाटी स्थापन करणार्‍या सोमवंशी व नागवंशी महागणांना यथोचित स्थान दिल्याचा अभिमान व आपल्या कुलदेवतेच्या मूळ मूर्तीला मध्यभागी स्थान न देण्याची खंत म्हणूनच प्रामाणिक आहे.

तसेच ‘आळया पूत’ संदर्भात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या स्मरणार्थ आजही नारळी पौर्णिमेला मंदिर काळोखात व कडीकुलूप लावून भक्तांकरिता बंद ठेवले जाते या प्रथेस त्यांनी विरोध केला आहे, त्या दिवशी बंद असणारे मंदिराचे दरवाजे उघडावेत व भाविकांना दर्शन घेऊ द्यावे, हे मत त्यांनी मांडले आहे. अर्थात हा विषय समस्त ज्ञातीच्या श्रद्धेशी व आजवर पाळत आलेल्या प्रथेशी निगडीत आहे. त्यामुळे, त्या वरचा सारासार विचारही सर्वानुमते होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुठलाही पूर्वग्रह न बाळगता मांद्रेकर यांचे हे पुस्तक वाचणे नितांत गरजेचे आहे. आपण मांडलेले मत,  निष्कर्ष हेच खरे व योग्य आहेत, असा त्यांचा आग्रह अजिबात नाही, उलट काही चूक असल्यास ती अभ्यासपूर्वक, संदर्भासह दाखवून द्यावी, आपण त्यात बदल करू, असे आवाहन ते करतात.  हीच गोष्ट मला एक वाचक म्हणून खूप भावली. 

सारस्वतांनी केवळ स्वत:कडेच ठेवलेली महाजनकी असो किंवा ख्रिश्चनांनी केलेले इन्क्विझिशन असो, त्यासाठी आता असलेल्या त्यांच्या वंशजांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याप्रमाणेच त्या घटनांचा उल्लेखच अभ्यासक्रमातून वगळणेही तितकेच चुकीचे आहे. पोर्तुगालमधील ख्रिश्चनांनी हिंदूंवर गतकाळात केलेले अमानुष अत्याचार वाचून कुणीही हिंदू आज ख्रिश्चनांचे गळे कापणार नाही, हजारो मंदिरे पाडली म्हणून चर्चही कुणी पाडणार नाही आणि दोन्ही समाजांमधील सामंजस्यही बिघडणार नाही. गोवामुक्तीसाठी या पोर्तुगिजांविरुद्ध उठाव करणारे जसे हिंदू होते, तसे ख्रिश्चनही होते याची जाण प्रत्येक गोमंतकीयाला आहे. 

उपलब्ध पुरावे, त्यातून काढलेला इतिहासाचा निष्कर्ष वर्तमानात स्वीकारताना आपण कच खातो, त्यामागे श्रद्धा आणि भीती ही दोन कारणे आहेत. त्यामुळे एक तर आपण निष्कर्ष नाकारतो किंवा तो इतिहासच नाकारतो. इतकेच कशाला, त्याचे वाचन, तौलनिक अभ्यास करून त्यावर विचार, मत मांडणेही नाकारतो. इतिहासच नाकारल्याने वर्तमान भयावह आणि भविष्य भयाण होते, याचे प्रत्यंतर हा देवभूमीचा इतिहास वाचून आल्यशिवाय राहत नाही.

------------------------------

पुस्तक : इतिहास देवभूमिचा

लेखक : ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर  - ९८२०३२२५५८/८७८८१८२४८६

प्रकाशक : विलासराव परशुराम मांजरेकर - ९८२०२९६११६

------------------------

गोवन वार्ताच्या तरंग पुरवणीत दि. १७ जुलै २०२२ रोजी छापून आलेल्या लेखाची लिंक.

https://goanvarta.net/story.php?id=36564


रविवार, १० जुलै, २०२२

मागणे न काही, सांगण्यास आलो...


लोक वारीला का जातात?’, ‘यातून मिळतं काय?’ असे प्रश्न अनेकांना पडतात. काय मिळतं हे शब्दात सांगणं कठीण आहे. पण, शेकडो वर्षे वारी अखंड सुरू आहे, याचाच अर्थ वारकर्‍याला काही ना काही तरी निश्चितच मिळत असले पाहिजे. कदाचित वर्षभर काबाड कष्ट करण्याची ऊर्जा, आत्मिक समाधान आणि त्या सावळ्या विठू माउलीचे वात्सल्य. 

आपल्या उपास्यदैवताच्या भेटीला वर्षातून एकदा किंवा दोनदा जाणे याला वारी म्हणतात. वारीसाठी जातो तो ’वारकरी’. वारी म्हणजे यात्रा नव्हे. त्रिस्थळी असो किंवा इतर कुठलीही यात्रा असो, आपण सहसा आयुष्यातून एकदाच करतो. वारी ही नियमाने दरवर्षी केली जाते. विठ्ठलाची भेट घेण्याशिवाय अन्य कुठलाही हेतू मनात नसताना पंढरपुरी येण्याला वारी म्हणतात आणि अशी वारी करणार्‍याला वारकरी. केवळ चंदनाचा टिळा लावल्याने, तुळशीची माळ घातल्याने, टाळ कुटल्याने, तोंडाने विठ्ठलाचे नाव घेतल्याने आणि दरवर्षी पंढरपूरला जाण्याने वारकरी होत नाही. 

माळ, टाळ आणि टिळा ही प्रतीके आहेत. गळ्यात माळ घालणार्‍याने दुसर्‍यावर ओरडायचं नसतं. टाळ कुटणार्‍याने कुटाळक्या करायच्या नसतात. केवळ भजनाला टाळ दिल्याने भक्त होत नाही.  भक्त होण्यासाठी भक्ती आणि भाव हे दोन टाळ हाती धरावे लागतात. गळ्यात माळ, हाती टाळ आणि कपाळी टिळा ही आत्मरूप शांती, भाव-भक्ती आणि वैराग्याची प्रतीके आहेत. बाह्यांगाने दिसणार्‍या प्रतीकांवरून आपण वारकरी, भक्त असल्याची परीक्षा करतो. वास्तविक अंतरंगामध्ये प्रतीकामागची अवस्था असेल तर माळ, टाळ आणि टिळा लावण्याला अर्थ असतो, वारकरी, भक्त होण्याला अर्थ असतो. 

आपण आपल्या गरजा अनाठायी वाढवून ठेवल्या आहेत. या गरजा सीमित केल्या की माया, मोह आटोक्यात येतात. भुकेपुरती भाकरी, निवार्‍याला झोपडी आणि ऊब मिळेपुरती गोधडी एवढ्या गरजा मर्यादित ठेवल्या तर माया आणि मोह यांना उगाळून पिता येते. भाकरी, गोधडी आणि झोपडी ही प्रतीके आहेत अन्न, वस्त्र आणि निवार्‍याची. यापलीकडे संग्रहाची आसक्ती माया आणि मोह यात गुरफटवून टाकते. याचा अर्थ श्रीमंती वाईट, गरिबी चांगली असा अजिबात नाही. वारकरी, भक्त म्हटला की, तो गबाळा, बावळट, गरीब असला पाहिजे हा गैरसमज आहे. उन्नतीसाठी प्रयत्न करणे वर्ज्य नाही. उलट, प्रयत्न करीत राहणेच अपेक्षित आहे. 

देह, बुद्धी ही परमेश्वराने आपल्याला दिलेली भेट आहे. त्याच्या माध्यमातून आपण काय करतो, ती आपण परमेश्वराला दिलेली भेट आहे. देह आणि बुद्धी दिल्यानंतरही आपण परमेश्वराकडे केवळ मागणं आणि तक्रारी करत असू तर त्याच्या देण्याला काय अर्थ राहिला? कुठेतरी सुंदर ओळी वाचल्या होत्या,

केलीस प्रत्येक वसनाची झोळी भीक मागण्या 
लावणे कफनास खिसा जमणार नाही तुला

मागितलेलं ठेवण्यासाठी प्रत्येक वस्त्राला आपण खिसा लावतो, पण प्रेतावर घालायच्या वस्त्राला मात्र खिसा नसतो. आपलं मागणं आणि तक्रारी कधी संपतच नाहीत. मुळात देव,  संत आणि संन्यासी यांच्याकडे देण्याघेण्यासारखं काही नसतच. निसर्ग म्हणा, व्यवस्था म्हणा किंवा देव म्हणा यांनी जिवाला आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता आधी केलेली असते. गर्भात असताना नाळेतून, दात नसताना आईच्या स्तनातून  जीव जगवण्याची व्यवस्था आहे. तशीच त्यानंतरही आहेच.  ऐहिक, भौतिक गरजा भागवण्यासाठी आवश्यक साधने जीव जन्म घेताना बरोबर घेऊन येतो. त्यामुळे त्यासाठी देवाला हात जोडण्याची काहीच आवश्यकता नाही. 

आता एक प्रश्न साहजिकच मनात येतो, ‘मग, देव हवाच कशाला आणि ही वारी तरी कशाला करायची?’ देव ही गरज नाही, तर अपरिहार्यता आहे. देव म्हणजे ऊर्जेचा स्रोत. आपण देवाकडे देवासाठी जायचं असतं, आपल्यासाठी नाही. म्हणूनच, आपण कधी देवाला भेटण्यासाठी गेलो आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करावा. आपण देवळात देवासाठी नाही, तर आपल्यासाठीच जात असतो. जे मिळवण्याचं सामर्थ्य त्याने दिलं आहे, ते न वापरता त्याच्याकडे सगळं मागायला जातो. जे प्रश्न, समस्या सोडवण्याचं सामर्थ्य त्याने दिले आहे, ते न वापरता आपण फक्त तक्रारी करण्यासाठी त्याच्याकडे जातो. तक्रार आणि मागणं थांबलं की भक्तीला सुरुवात होते. मागणं घेऊन कितीही वेळा विठ्ठलाकडे गेलो तरी ती येरझारच ठरते ’वारी’ नाही. तक्रारी, मागणं थांबल्यानंतरही वार्‍या करणारा ‘वारकरी’ होतो.

आपण नास्तिक, आस्तिक, रंक, राव असण्याने देवाला काहीच फरक पडत नाही. देव आस्तिकत्वाची शालही पांघरत नाही आणि नास्तिकत्वाची झूलही पाठीवर घेत नाही. खर्‍याखुर्‍या नास्तिकासाठी तो विठ्ठल देऊळ सोडून बाहेर येतो की नाही, माहीत नाही. पण, केवळ देवाला भेटायला येणार्‍यासाठी तो कायम तिथेच असतो एवढं नक्की. देवाला पाहायची ओढ फक्त वारकर्‍यालाच असते, असे नव्हे तर या वारकर्‍याला भेटण्याची ओढ देवालाही असते. वारकरी आल्या आल्या देव विचारतो,

काय रे बाबा! कसा आहेस? कशासाठी येणं केलंस?’ 

वारकरी आपल्याच मस्तीत, नम्रपणाने आणि भक्तिभावाने देवाच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, 

मागणे न काही, सांगण्यास आलो...’.


चित्रस्रोत : आंतरजाल

गुरुवार, ७ जुलै, २०२२

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी...

प्रश्न तुम्ही काय दाखवता यापेक्षाही काय दाखवूच शकत नाही याचा आहे.

लीना मणिमेकलाई यांनी लघुपटाचे पोस्टर जाहीर केले. ज्यात कालीमातेला सिगारेट ओढताना व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेला दाखवण्यात आले आहे. यावर अनेक ठिकाणी चर्चा व डिबेट सुरू आहे. याला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ म्हणावे का?, शाक्तपंथीयांच्या भावना दुखावल्या म्हणून प्रदर्शने केली जावीत का? काही मुस्लीम संघटनांनी गळा कापण्याच्या धमक्या दिल्या व काहींनी प्रत्यक्ष कृतीही केली, तसे काही करावे का? चित्रपट, लघुपट यात केवळ हिंदू देवदेवतांवरच सातत्याने टीका का केली जाते? तृणमूलच्या महुआ मोइत्रा यांचे वक्तव्य आणि त्यावर पक्षाची अधिकृत भूमिका, हे व असे अनेक मुद्दे यावर अनेकांनी आपली भूमिका मांडली. यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत, तेवढ्यावरच विचार मांडावेसे वाटले.

काली किंवा महाकाली या देवतेला मद्य आणि मांस वर्ज्य नाही, असा मुद्दा जो महुआ मोइत्रा यांनी मांडला त्याविषयी खुलासा करणे आवश्यक आहे. शाक्त पंथामध्ये घुसलेले पंच ‘म’कार याची निर्भर्त्सना भारतभरातल्या संतांनी केलेली आहे. जवळपास प्रत्येक हिंदू संप्रदाय, मत व पंथांत तंत्रमार्ग आहे. बौद्धमतामध्येही मंत्रयान, वज्रयान, सहजयान, कालचक्रयान असे तंत्रमार्गी प्रकार आहेत. कुठल्याही पंथातील तंत्रमार्ग आणि आध्यात्मिक मार्ग यात मूलभूत फरक नीतिमत्तेचा असतो. तंत्रमार्गी व्यक्तीला नीतिमत्तेशी काही देणंघेणं नसतं. त्याचं आचरण इतर समाजाने अनुसरण करण्यासाठी योग्य नसतं. उदाहरणच द्यायचं झाल्यास जैन पंथातील श्वेतांबर व दिगंबर यांपैकी दिगंबरांचे देता येईल. प्रचंड उकाड्यात आपल्यालाही या दिगंबरांचा हेवा वाटेल. पण, कडाक्याच्या थंडीतही ते त्याच दिगंबर अवस्थेत राहतात याकडे आपण दुर्लक्ष करतो. तेवढा मनाचा निग्रह झाल्यानंतरच जैन दिगंबर व्हावे हे योग्य. केवळ वाट्टेल तिथे नागडे फिरायला मिळते हा उद्देश असेल तर, आध्यात्मिक उंची गाठण्याचा मूळ उद्देश बाजूलाच पडेल. नेमके तेच प्रामुख्याने शाक्त पंथाचे झाले. 

मद्य, मत्स्य, मांस, मैथुन या गोष्टी पंथाच्या नावाखाली खुलेआम करायला मिळतात म्हणून अनेक लोक शाक्त पंथीय व कालीमातेचे भक्त होऊ लागले. शाक्त पंथ स्वीकारणार्‍यांची संख्या वाढू लागली व पंथाची मूळ आध्यात्मिक मार्गाची रचनाच ढासळू लागली. म्हणूनच त्याला वाममार्ग किंवा वाईट मार्ग म्हणून संबोधण्यात आले आहे. या तंत्रमार्गाला अपवाद म्हणून गणण्यात आले आहे, शाक्तपंथातील तो सर्वमान्य किंवा सर्वांसाठी असलेला मार्ग नाही. अशा अपवादात्मक गोष्टीला नियम म्हणून समोर करून कालीमाता दारू पिते, मांस खाते असे म्हणणे चुकीचेच आहे. महुआ मोइत्रा यांनी सिगारेट ओढण्याचा उल्लेख केला नव्हता ही गोष्ट खरी असली, तरी त्याज्य ठरवलेला अपवादात्मक वाममार्ग त्या पोस्टरच्या समर्थनार्थ  मोठा करून मांडणे चूकच होतं. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत बोलताना एक मुद्दा कायम मांडला जातो, तो यापेक्षाही जास्त भयानक आहे. ‘आम्ही वाट्टेल ते दाखवू, बघावे की बघू नये हे तुम्ही ठरवा’ किंवा ‘दाखवणे हे आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पाहणे व न पाहणे हे लोकांचे स्वातंत्र्य आहे’ असा घातक विचार मांडला जातो. हा मुद्दा मांडून अशा गोष्टींचे समर्थन करणार्‍या व्यक्ती एका प्रश्नाचे उत्तर अजिबात देत नाहीत. नेहमी  व सातत्याने यात हिंदू देवदेवतांचेच विचित्र चित्रण का केले जाते? एक तरी उदाहरण इस्लाम पंथाबद्दल, अल्लाहबद्दल, पैगंबरांबद्दल आहे का? भारतात सोडून द्या, जगभरात सापडणार नाही. याच लीना मणिमेकलाई  पोस्टरवर कालीमातेप्रमाणेच प्रेषितांच्या मातेचे, एका हातात सिगारेट व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेले चित्र दाखवतील का? त्याच्या समर्थनासाठी ‘चित्र काढणे आमचे स्वातंत्र्य आहे, पाहावे की पाहू नये हे मुस्लिमांनी  किंवा ख्रिश्चनांंनी ठरवावे.’, असा तर्क लीना यांचे समर्थन करणारे विचारवंत मांडतील का? 

प्रश्न तुम्ही काय दाखवता यापेक्षाही काय दाखवूच शकत नाही याचा आहे.

मी फक्त माझा मुद्दा स्पष्ट करतोय.त्यांनी कालीमातेला सिगारेट ओढताना दाखवून हिंदू श्रद्धेवर आघात केला आहे, तसा ख्रिश्चन किंवा मुस्लीम श्रद्धेवर आघात करावा, असे मला मुळीच म्हणायचे नाही. ख्रिश्चन, मुस्लीम पंथांतील किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही पंथाच्या श्रद्धावान व्यक्तीला असे कधीही वाटणार नाही. एक श्रद्धावंत कायम दुसर्‍यांच्या श्रद्धेचा आदरच करतो. निंदा करत नाही. जसा आदर अब्रह्मिक पंथांच्या श्रद्धेबद्दल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ठेकेदारांकडून ठेवला जातो, तसाच आदर हिंदूंच्या श्रद्धेबद्दल ठेवावा एवढीच माफक इच्छा आहे. परंतु, जेव्हा हे अनादर व्यक्त करणं  एकतर्फी आणि पुन्हा पुन्हा हिंदूंच्याच बाबतीत घडतं, तेव्हा ते मुद्दाम केलं जातं, असं म्हणण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. 

जिथे गळा कापला जाण्याची भीती असते, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले जात नाहीत, हे वास्तव आहे. बरे, हा मुद्दा उपस्थित केला की, लगेच ‘हिंदू-मुस्लीम करू नका’, असा तर्क देण्यात येतो. पण, केवळ हिंदू धर्माला कायम नकारात्मक पद्धतीने बिंबवण्यामुळे, त्यांच्या उपास्य देवतांना बीभत्स पद्धतीने दाखवण्यामुळे हिंदू-मुस्लीम यांच्यात कलेच्या माध्यमातून भेदभाव अभिव्यक्त केला जातो, त्याचे काय?

हिंदू धर्मातील पंथांमध्ये असलेल्या अपवादात्मक गोष्टींना नियम म्हणून मोठं करून दाखवणं आणि केवळ हिंदू देवदेवतांचंच बीभत्स विडंबन करणं या गोष्टी वारंवार केल्या जात आहेत. याविरुद्ध कुणाचे गळे कापण्याची काहीच गरज नाही. पण, किमान त्याविरुद्ध व्यक्त होणं तरी निश्चितच गरजेचं आहे. ‘मला काय त्याचे?’, ‘आपण भले की आपले काम भले’, ‘यातून काय निष्पन्न होणार आहे?’, ‘समाजात काय फरक पडणार आहे?’ असा विचार करून शांत राहिल्यास आपल्या हिंदू धर्मात जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणण्याचा अधिकारही आपण गमावून बसू! नमाज पठणाचे व दारात क्रॉस असल्याचे आपल्याला कौतुक वाटेल, पण नवीन बांधलेल्या आपल्याच घरासमोर तुळशीवृंदावन उभारण्याची लाज वाटेल. एवढेच नव्हे तर, हिंदू असण्याचीही लाज वाटेल!