रविवार, १० जुलै, २०२२

मागणे न काही, सांगण्यास आलो...


लोक वारीला का जातात?’, ‘यातून मिळतं काय?’ असे प्रश्न अनेकांना पडतात. काय मिळतं हे शब्दात सांगणं कठीण आहे. पण, शेकडो वर्षे वारी अखंड सुरू आहे, याचाच अर्थ वारकर्‍याला काही ना काही तरी निश्चितच मिळत असले पाहिजे. कदाचित वर्षभर काबाड कष्ट करण्याची ऊर्जा, आत्मिक समाधान आणि त्या सावळ्या विठू माउलीचे वात्सल्य. 

आपल्या उपास्यदैवताच्या भेटीला वर्षातून एकदा किंवा दोनदा जाणे याला वारी म्हणतात. वारीसाठी जातो तो ’वारकरी’. वारी म्हणजे यात्रा नव्हे. त्रिस्थळी असो किंवा इतर कुठलीही यात्रा असो, आपण सहसा आयुष्यातून एकदाच करतो. वारी ही नियमाने दरवर्षी केली जाते. विठ्ठलाची भेट घेण्याशिवाय अन्य कुठलाही हेतू मनात नसताना पंढरपुरी येण्याला वारी म्हणतात आणि अशी वारी करणार्‍याला वारकरी. केवळ चंदनाचा टिळा लावल्याने, तुळशीची माळ घातल्याने, टाळ कुटल्याने, तोंडाने विठ्ठलाचे नाव घेतल्याने आणि दरवर्षी पंढरपूरला जाण्याने वारकरी होत नाही. 

माळ, टाळ आणि टिळा ही प्रतीके आहेत. गळ्यात माळ घालणार्‍याने दुसर्‍यावर ओरडायचं नसतं. टाळ कुटणार्‍याने कुटाळक्या करायच्या नसतात. केवळ भजनाला टाळ दिल्याने भक्त होत नाही.  भक्त होण्यासाठी भक्ती आणि भाव हे दोन टाळ हाती धरावे लागतात. गळ्यात माळ, हाती टाळ आणि कपाळी टिळा ही आत्मरूप शांती, भाव-भक्ती आणि वैराग्याची प्रतीके आहेत. बाह्यांगाने दिसणार्‍या प्रतीकांवरून आपण वारकरी, भक्त असल्याची परीक्षा करतो. वास्तविक अंतरंगामध्ये प्रतीकामागची अवस्था असेल तर माळ, टाळ आणि टिळा लावण्याला अर्थ असतो, वारकरी, भक्त होण्याला अर्थ असतो. 

आपण आपल्या गरजा अनाठायी वाढवून ठेवल्या आहेत. या गरजा सीमित केल्या की माया, मोह आटोक्यात येतात. भुकेपुरती भाकरी, निवार्‍याला झोपडी आणि ऊब मिळेपुरती गोधडी एवढ्या गरजा मर्यादित ठेवल्या तर माया आणि मोह यांना उगाळून पिता येते. भाकरी, गोधडी आणि झोपडी ही प्रतीके आहेत अन्न, वस्त्र आणि निवार्‍याची. यापलीकडे संग्रहाची आसक्ती माया आणि मोह यात गुरफटवून टाकते. याचा अर्थ श्रीमंती वाईट, गरिबी चांगली असा अजिबात नाही. वारकरी, भक्त म्हटला की, तो गबाळा, बावळट, गरीब असला पाहिजे हा गैरसमज आहे. उन्नतीसाठी प्रयत्न करणे वर्ज्य नाही. उलट, प्रयत्न करीत राहणेच अपेक्षित आहे. 

देह, बुद्धी ही परमेश्वराने आपल्याला दिलेली भेट आहे. त्याच्या माध्यमातून आपण काय करतो, ती आपण परमेश्वराला दिलेली भेट आहे. देह आणि बुद्धी दिल्यानंतरही आपण परमेश्वराकडे केवळ मागणं आणि तक्रारी करत असू तर त्याच्या देण्याला काय अर्थ राहिला? कुठेतरी सुंदर ओळी वाचल्या होत्या,

केलीस प्रत्येक वसनाची झोळी भीक मागण्या 
लावणे कफनास खिसा जमणार नाही तुला

मागितलेलं ठेवण्यासाठी प्रत्येक वस्त्राला आपण खिसा लावतो, पण प्रेतावर घालायच्या वस्त्राला मात्र खिसा नसतो. आपलं मागणं आणि तक्रारी कधी संपतच नाहीत. मुळात देव,  संत आणि संन्यासी यांच्याकडे देण्याघेण्यासारखं काही नसतच. निसर्ग म्हणा, व्यवस्था म्हणा किंवा देव म्हणा यांनी जिवाला आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता आधी केलेली असते. गर्भात असताना नाळेतून, दात नसताना आईच्या स्तनातून  जीव जगवण्याची व्यवस्था आहे. तशीच त्यानंतरही आहेच.  ऐहिक, भौतिक गरजा भागवण्यासाठी आवश्यक साधने जीव जन्म घेताना बरोबर घेऊन येतो. त्यामुळे त्यासाठी देवाला हात जोडण्याची काहीच आवश्यकता नाही. 

आता एक प्रश्न साहजिकच मनात येतो, ‘मग, देव हवाच कशाला आणि ही वारी तरी कशाला करायची?’ देव ही गरज नाही, तर अपरिहार्यता आहे. देव म्हणजे ऊर्जेचा स्रोत. आपण देवाकडे देवासाठी जायचं असतं, आपल्यासाठी नाही. म्हणूनच, आपण कधी देवाला भेटण्यासाठी गेलो आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करावा. आपण देवळात देवासाठी नाही, तर आपल्यासाठीच जात असतो. जे मिळवण्याचं सामर्थ्य त्याने दिलं आहे, ते न वापरता त्याच्याकडे सगळं मागायला जातो. जे प्रश्न, समस्या सोडवण्याचं सामर्थ्य त्याने दिले आहे, ते न वापरता आपण फक्त तक्रारी करण्यासाठी त्याच्याकडे जातो. तक्रार आणि मागणं थांबलं की भक्तीला सुरुवात होते. मागणं घेऊन कितीही वेळा विठ्ठलाकडे गेलो तरी ती येरझारच ठरते ’वारी’ नाही. तक्रारी, मागणं थांबल्यानंतरही वार्‍या करणारा ‘वारकरी’ होतो.

आपण नास्तिक, आस्तिक, रंक, राव असण्याने देवाला काहीच फरक पडत नाही. देव आस्तिकत्वाची शालही पांघरत नाही आणि नास्तिकत्वाची झूलही पाठीवर घेत नाही. खर्‍याखुर्‍या नास्तिकासाठी तो विठ्ठल देऊळ सोडून बाहेर येतो की नाही, माहीत नाही. पण, केवळ देवाला भेटायला येणार्‍यासाठी तो कायम तिथेच असतो एवढं नक्की. देवाला पाहायची ओढ फक्त वारकर्‍यालाच असते, असे नव्हे तर या वारकर्‍याला भेटण्याची ओढ देवालाही असते. वारकरी आल्या आल्या देव विचारतो,

काय रे बाबा! कसा आहेस? कशासाठी येणं केलंस?’ 

वारकरी आपल्याच मस्तीत, नम्रपणाने आणि भक्तिभावाने देवाच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, 

मागणे न काही, सांगण्यास आलो...’.


चित्रस्रोत : आंतरजाल

३ टिप्पण्या:

  1. खरा वारकरी याचं यथार्थ वर्णन खूप छान लेख.

    उत्तर द्याहटवा
  2. लेखाचे नाव खुपच छान आहे. नावात काय आहे असे विचारले जाते, इथे नावातच सर्व काही आलंय. वारकर्यांच्या बाबतीत ते यथार्थ आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. प्रसन्न,
    पंढरपूर वारी, वारकरी व वारकऱ्यांची मानसिकता यांविषयीं आपण केलेले विश्लेषण व निरिक्षण वास्तव आहे.
    आपला विविध विषयांचा अभ्यास थक्क करणारा आहे व आपलें अष्टपैलुत्व कौतुकास्पद आहे..
    संत तुकारामांनी हजारों अभंगातून विठोबा व विठुभक्तांमधील हे अलौकिक नाते उलगडून ठेवले आहे. वारकऱ्यांची ही मानसिकता व भक्तीभाव त्यांनी त्यांच्या 'जाऊं देवाचिया गांवा' या अभंगात मांडली आहे...

    " जाऊ देवाचिया गांवा I. देव देईल विसावा II
    देवा सांगो सूखदु:ख I देव निवारील भूक II

    आपण म्हणतां त्याप्रमाणे, वारकरी विठोबाकडे कांहीही मागत नाहीत; किंबहून त्यांची प्राथमिक गरज जी भूक ती विठोबाच निवारील अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे..
    असो..
    आपला हा लेख खूप खूप आवडला..शेवटी नाही म्हटल्या, श्रद्धाळू वारकरी एकच मागणे मागतो, ते तुकोबांच्याच शब्दात...

    पंढरीचा वारकरी I वारी चुकों नेदि हरी II

    ......ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर, मुंबई

    उत्तर द्याहटवा