बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

पंडितांची जात आणि जातीचे पंडित

ब्राह्मणांबद्दल भलताच उफाळून आलेला माझा अभिमान क्षणार्धात नाहीसा करण्याचे काम एका पंडिताने केल्यामुळे मी धन्य जाहलो. ‘ब्राह्मणांनीच जातिव्यवस्था निर्माण केली’, असा मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचा अर्थ ऐकून आणि ऐकवून घेऊन स्वत:च्या जातीबद्दलचा माझा अभिमान भलताच उफाळून वगैरे की, काय म्हणतात तसा आला होता. नऊ दहा वर्षांपूर्वी फारुक अब्दुल्ला यांनी आपण काश्मिरी पंडित असल्याचे म्हटल्याने तो अधिकच उफाळत होता. ‘पंडित म्हणजे विद्वान’ हा नवा अर्थ समोर आल्याने माझी घोर निराशा झाली. अरे देवा! म्हणजे फारुक अब्दुल्ला विद्वान आहेत आणि त्यांनी काश्मिरी विद्वानांचा नरसंहार होताना पाहिलाही नाही. सिनेमात खोटेच दाखवतात हे माझ्या बालबुद्धीच्या पुन्हा एकदा लक्षात आले.

युरेशियातून का कुठून तरी आलेल्या आर्य ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या आणि त्या हजारो वर्षे सुरूच राहिल्या. याचा अर्थ हा लेकाचा ब्राह्मण समाज भलताच पॉवरफुल असला पाहिजे. प्रत्येक जातीच्या स्वत:च्या पंचायती, स्वत:चे जगण्याचे नियम वगैरे ब्राह्मणांच्या सांगण्यावरून इतरांनी बनवले, एवढेच नव्हे तर ते हजारो वर्षांपासून आजपर्यंत चालत आहेत, म्हणजेच हजारो वर्षांपासून आजपर्यंत ब्राह्मण फारच बलशाली असले पाहिजेत. कधी होते? वगैरे प्रश्न पडूच द्यायचे नाहीत स्वत:ला. समाजातील सगळ्या वाईट गोष्टींना ब्राह्मणच जबाबदार आहेत, हे गृहीतक एकदा ठरले की, ठरले. मागे हटायचे नाही. 

आता ख्रिस्तीकरण जबरदस्तीने झाले, कायदे करून, नृशंस हत्या करून झाले, असे गोव्यात शिकवले तर ‘सामाजिक शांतता’ बिघडते. भारतात इस्लामीकरण तलवारीच्या जोरावर झाले म्हटले तरीही ती बिघडते. पण, ब्राह्मणांनी जातिव्यवस्था निर्माण केली असे म्हटल्याने कुठेही सामाजिक शांतता वगैरे काहीही भंगत नाही. काहीही फरक पडत नाही. 

मराठीत ‘पंडित’ हा शब्द विद्वत्तेशी जोडला गेला आहे. हिंदीत हाच शब्द अपवादाने विद्वान शब्दाकडे जोडला गेला आहे. पंडित या शब्दाचा अर्थ केवळ विद्वान असा असेल तर, ‘काश्मिरी पंडित’ याचा अर्थ ‘काश्मिरी विद्वान’ असा होईल. मग उगाच तो हिंदू नरसंहार किंवा काश्मिरी ब्राह्मणांचा नरसंहार असे कोकलण्यात काय अर्थ आहे? 

पंडित म्हणजे विद्वान असे म्हणण्याची काही आवश्यकताच नव्हती. चक्क ‘ब्राह्मणांनी जाती सुरू केल्या’ असे स्पष्ट म्हटले असते म्हणून कुठेही कुणाचेही ‘सर तन से जुदा’ झाले नसते. उलट ‘सुरू केल्या’ आणि ‘सुरू केल्या नाही’, असे दोन गट पडून ब्राह्मणांनी एकमेकांच्या नसलेल्या शेंड्या आणि खुंटीवर टांगलेली जानवी ओढून भांडणे केली असती. त्यापलीकडे काहीही झाले नसते. त्यामुळे, हजारो वर्षे सर्व हिंदू समाज या ब्राह्मणांचेच ऐकण्याइतपत ब्राह्मण ताकदवान असल्याच्या माझ्या अभिमानाला तडा गेला.  

नाही म्हणायला, ‘त्याकाळी विद्वान फक्त ब्राह्मणच होते आणि त्यांनी सगळ्यांना ज्ञानापासून वंचित ठेवले’, हा एक सर्वमान्य विचार आधाराला होता. पण, तो बादरायण संबंध ठरण्याची शक्यता आहे. हजारो वर्षांपासून जे जे काही विद्वत्तापूर्ण झाले ते ते ब्राह्मणांनीच केले, असा याचा अर्थ होईल. त्यामुळे, काय शिकवले आणि काय लपवले याचा भेद केल्याशिवाय त्याचा आधार घेणे उपयोगाचे नाही. बहुतेक सर्व जातींनी आपल्या जवळील ज्ञान इतर सर्व जातींना दिले पण, कपटी ब्राह्मणांनी ते लपवून ठेवले, असा त्याचा अर्थ होत असावा. 

एकूण काय तर मागास असण्याचा संबंध जसा ब्राह्मण नसण्याशी आहे, तसा ब्राह्मण असण्याचा संबंध पंडित असण्याशी नाही.