शुक्रवार, २७ मे, २०२२

‘स्वातंत्र्यसैनिक यासिन मलिक’ असेच म्हणा ना सरळ, का घाबरता?


लोकशाहीचे तीन घोषित स्तंभ आणि एक स्वयंघोषित स्तंभ या सर्वांनी आता एक करावे, यासिन मलिक याला ‘स्वतंत्र काश्मीरसाठी लढणारा स्वातंत्र्यसैनिक’ घोषित करावे, फुटीरतावादी म्हणून एका दहशतवाद्याचा अपमान करू नये. निदान तेवढे तरी प्रामाणिक राहावे, हीच अपेक्षा!

माध्यमे लावत असलेली विशेषणे आणि संबोधने हा खरोखरच एक संशोधनाचा विषय आहे. दहशतवादी कारवायांत गुंतल्याचा आरोप न्यायालयात मान्य करणारा यासिन मलिक याला ‘दहशतवादी’ हे संबोधन न वापरता, ‘काश्मीर फुटीरतावादी नेता’ हे संबोधन माध्यमांनी वापरले आहे. त्यापेक्षा सरळ सरळ स्वातंत्र्यसैनिक म्हणणे अधिक योग्य ठरेल.

‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक  याच्यासंदर्भातील टेरर फंडिंग प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दिल्लीच्या एनआयए कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. एनआयए कोर्टाने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती. पतियाळा कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासिन मलिकला १० लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एनआयए कोर्टाने गुरुवारी यासिन मलिकला दोषी ठरवले आहे. यासिन मलिकने कोर्टातील सुनावणीदरम्यान काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचे मान्य केले होते. यासिन मलिकला दिल्लीतील पतियाळा कोर्टात शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. एनआयएने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.’ असा एकूण सर्व वर्तमानपत्रांतील, वृत्तवाहिन्यांतील बातम्यांचा सूर आहे. 

बीबीसीने ‘हार्ड टॉक’ अंतर्गत यासिन मलिकची मुलाखत घेतली होती. त्यात त्याचे म्हणणे स्पष्ट होते. आपण काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. आपला लढा भारतीय सैनिकांविरुद्ध आहे. दि. २५ जानेवारी १९९० रोजी स्क्वॉड्रन लीडर रवि खन्ना यांच्यासह इतर तीन हवाई दलाच्या जवानांना संत नगर येथे बसमध्ये चढताना यासिन मलिक व त्याच्या दहशतवादी साथीदारांनी गोळ्या घालून ठार मारले. ही मुलाखत घेतली तेव्हा त्याच्यावर आरोप होता पण, अकरा वर्षे झाली तरी खटला सुरूच झाला नव्हता. त्याने सरळसरळ मान्य केले नाही की, आपण त्यांना मारले. पण, हिंसक कारवाया व सशस्त्र क्रांती आपण केल्याचे त्याने हसत हसत मान्य केले होते. याच मुलाखतीत त्याने नीळकंठ गंजू यांची हत्या केल्याचेही मान्य केले व नंतर लगेच संघटनेने ती केल्याचे म्हटले होते. पुन्हा वरून त्या हत्येचे समर्थनही केले होते. २००७साली आदित्य राज कौल यांनी माहिती हक्क कायद्याखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीबीआयने सांगितले की, वायुसेनेच्या अधिकार्‍यांना मारूनही अद्याप यासिन मलिक मोकळा का आहे, हे आम्हाला माहीत नाही. 

२०००च्या सुरुवातीपासून यासिन मलिक हा माध्यमांचा लाडका झाला होता. महात्मा गांधी, भगवान गौतम बुद्ध आणि नेल्सन मंडेला यांनी दाखवलेल्या शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गावरून चालणारा यासिन मलिक सशस्त्र, हिंसक कसा झाला, याच्या सुरस कहाण्या प्रक्षेपित करण्यात आल्या होत्या. महात्मा गांधी यांना ब्रिटिशांनी अनेक वेळा अटक केली पण, कधीच त्यांचे इंटरोगेशन झाले नाही. आपल्याला मात्र भारत सरकारने अहिंसक आंदोलन केल्याप्रकरणी थर्ड डिग्री दिली. त्यामुळे, आपण हिंसेच्या, सशस्त्र क्रांतीच्या मार्गाकडे वळलो, असे तो प्रत्येक मुलाखतीत सांगायचा. २००६साली भारताच्या पंतप्रधानांनी त्याला संरक्षण मंत्री, सचिव यांच्यासह उच्चस्तरीय बैठकीसाठी निमंत्रित केले होते. २००८साली इंडिया टुडेने दहशतवादी यासिन मलिक याला ‘युथ आयकॉन’ म्हणून सादर केले होते. त्याला भारतविरोधी विचार मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला होता. एनडीटीव्हीच्या रविश कुमार यांनी त्याला साहेब आणि सर असेही आदरार्थी संबोधले होते. २०१४साली ‘आप की अदालत’मध्येही रजत शर्माने त्याची मुलाखत घेतली होती. मोदींची व भाजपची बाजू कायम मांडणार्‍या मधू पूर्णिमा कीश्वर यांनीही यासिन मलिकची बाजू घेतली होती. आता जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर लोकमतने तर, ‘फोन केला.. आय लव्ह यू म्हणाला’ या मथळ्यासह त्याची प्रेमकहाणी छापली. 

आपली माध्यमे देशापुरता विचार करतच नाहीत, ती वैश्विक आहेत. ‘हे विश्वचि माझे घर’ असा त्यांचा विशाल दृष्टिकोन आहे. त्या मानाने अमेरिकेतील माध्यमे अमेरिकेन म्हणून वृत्तांकन करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, बिन लादेनला जेव्हा मारले तेव्हा त्यू यॉर्क पोस्टच्या बातमीचा मथळा होता, ‘गॉट हिम; व्हेन्जिन्स अ‍ॅट लास्ट! यूएस नेल्स द बास्टर्ड’ आणि डेली न्यूजचा मथळा होता, ‘वी गॉट द बास्टर्ड!’ याकुब मेमनला फाशी देण्यात आली तेव्हा आपल्याकडच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावरचा मथळा होता, ‘अँड दे हँग्ड याकुब’. पाश्चिमात्य माध्यमांचे ‘वी’ म्हणणे त्यांचा राष्ट्रवादी कोतेपणा सिद्ध करते आणि आपल्या माध्यमांनी ‘दे’ वापरणे आपल्या माध्यमांचा वैश्विक उदारमतदवाद सिद्ध करते.  त्यामुळे, काश्मीरच्या ‘आझादी’साठी लढणारे भारतीय माध्यमांसाठी कायम पिडलेले, अन्यायग्रस्त, बिचारे, शिक्षकाचा मुलगा, गुणी वगैरे खूप काही वाटतात. अगदीच नाकारता आले नाही तर मग, फुटीरतावादी वाटतात. पण, दहशतवादी कधीच वाटत नाहीत. 

वायुसेनेचे चार जवान मारूनही सैन्य काही कारवाई करू शकत नाही. देशाचे एक पंतप्रधान त्याला पासपोर्ट देतात, तर दुसरे पंतप्रधान उच्चस्तरीय बैठकीसाठी निमंत्रित करतात. न्यायालयाच्या न्यायाधीशांना मारूनही न्यायालय त्याला फाशीची शिक्षा सुनावत नाही. जन्मठेप देऊन त्याला आजन्म पोसण्याची सोय करते. माध्यमे त्याचा गौरव करतात. मग, दहशतवादी कृत्यांची कबुली दिली तरी यासिन मलिक लोकशाहीच्या सर्व स्तंभांच्या लेखी यासिन मलिक दहशतवादी कसा असेल? असे असले तरीही, त्याला ‘फुटीरतावादी’ हे बिरुद लावणे हा तर त्याच्यावर माध्यमांनी केलेला मोठा अन्यायच म्हणायचा!  वास्तविक सर्व माध्यमांनी यासिन मलिक याला ‘काश्मीरच्या मुक्तीसाठी लढणारा स्वातंत्र्यसैनिक’च म्हटले पाहिजे. क्रांती म्हटले की, थोडेफार रक्त हे सांडायचेच. त्यासाठी गांधीवादी यासिन मलिकला ‘दहशतवादी’ म्हणणे हा अहिंसेचा घोर अपमान आहे.

राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज रद्द केल्यानंतरही दहशतवादी याकुब मेमनसाठी रात्रीच्यावेळी आपले दरवाजे उघडणार्‍या न्यायालयाला, काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार झाला त्याची याचिका दाखल करून घ्यायलाही सवड नाही. इतका काळ लोटला आता काय साक्षीपुरावे काढायचे? उगाच आपले हिंदू मुस्लीम करून देशातील शांतता बिघडवणे न्यायसंस्था, प्रशासन आणि सरकार यांनाही परवडणारे नाही. झालेला अन्याय अमान्य नाही पण, त्याबद्दल न्याय मागणे चुकीचे आहे!

लोकशाहीचे तीन घोषित स्तंभ आणि एक स्वयंघोषित स्तंभ या सर्वांनी आता एक करावे, यासिन मलिक याला ‘स्वतंत्र काश्मीरसाठी लढणारा स्वातंत्र्यसैनिक’ घोषित करावे, फुटीरतावादी म्हणून एका दहशतवाद्याचा अपमान करू नये. निदान तेवढे तरी प्रामाणिक राहावे, हीच अपेक्षा!


गुरुवार, १९ मे, २०२२

वैधव्यात सौभाग्यालंकारांचा हट्टाग्रह का?

एका बाजूला मंगळसूत्राला विवाहितेच्या गुलामगिरीचे चिन्ह मानायचे, तर दुसर्‍या बाजूने विधवा स्त्रीसाठी सुरक्षेचे, भावनेचे चिन्ह मानायचे. मांगल्याच्या, सौभाग्याच्या या प्रतीकाला उच्च शिक्षित, शहरी महिलांमध्ये हीनभाव आणि ग्रामीण महिलांमध्ये असलेले स्थिती वैशिष्ट्य घालवून आपण नेमके काय साधतोय?

कै. प्रसन्न बर्वे आणि श्री. शिवराम बर्वे, असा उल्लेख केल्यास काय होईल? मेणबत्तीची दोन्ही टोके पेटवल्यामुळे जास्त उजेड होईल की, मेणबत्तीचा नाश होईल? हे दोन्ही प्रश्न ‘कायच्या काय’ किंवा वेडगळ वाटतील. पण, ते तसे नाहीत. पहिल्या प्रश्नाचा संबंध संकेतांशी आहे आणि दुसरा प्रश्न अशा अनेक संकेतांचा समुच्चय असलेल्या संस्कृतीशी आहे.

संकेत, शब्द, प्रतीक यांचा संबंध अनेकदा विशिष्ट संकल्पनेशी असतो. दोन शब्दांचा अर्थ एकच असला तरी त्यांचा वापर करण्याची रूढ पद्धत, संकेत वेगवेगळे आहेत. त्यांच्या ‘वेगळे’ असण्याचा असमानता, उच्च-नीचता, सन्मान-अपमान याच्याशी काही संबंध येत नाही. त्यांचा संबंध अर्थबोध होण्याशी असतो. ‘आलय’ आणि ‘घर’ या दोन शब्दांचा अर्थ ‘राहण्यासाठी बांधलेली जागा’ असा होतो. पण, म्हणून देवालयात गेलेल्या माणसाविषयी, ‘ते कुठे गेले आहेत’ हे सांगताना कुणी ‘देवाघरी गेले’ असे म्हणत नाही. रूढ संकेतांनुसार ‘देवालयात जाणे’ याचा आणि ‘देवाघरी जाणे’ याचा अर्थ वेगळा आहे. 

शिवराम बर्वे हे माझे वडील, काही वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्यांच्याविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी मला कितीही आदर असला व ते कायम माझ्या सोबतच आहेत, अशी भावना असली तरीही त्यांच्या नावाआधी श्री. लावणे चुकीचेच ठरते. त्याचप्रमाणे मला, ‘पुरे झाले हे जगणे’ किंवा ‘हा संसार असार आहे’ वगैरे असले वैराग्याचे कितीही झटके आले तरीही, हयात असताना माझ्या नावाआधी कै. लावणे चुकीचेच ठरेल. शब्द हे फक्त शब्द नसतात, त्यांना अर्थ असतो, त्यांना संकेत असतात. 

संकेत आणि प्रतीक चिन्हे कुठेही व कशीही वापरणे अनादर करणारे व चुकीचे ठरते. कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी या सर्वांचे स्थान व महत्त्व आयुष्यातील एक विशिष्ट टप्पा सूचित करतात. विवाहित स्त्रीचे हे सौभाग्यालंकार आहेत. स्त्री विवाहित असल्याची ती खूण आहे. विवाहाआधी व वैधव्य प्राप्त झाल्यानंतर अलंकारांचे कुठलेच औचित्य नसते. कुमारिका व विधवा स्त्रीने ते परिधान न करणेच योग्य. 

हे जरी खरे असले, तरीही या रूढ धारणेला आधुनिक समाजात आणखीही काही कंगोरे आहेत. सौभाग्यालंकारांचे महत्त्व जसे ग्रामीण महिलांमध्ये आहे, तसे ते निम-शहरी, शहरी व उच्चशिक्षित महिलांमध्ये नाही. शहरी भागांत नोकरी व व्यवसाय करणार्‍या महिला मंगळसूत्राऐवजी तत्सम हार, अलंकार घालतात. काकणे घालणे, न घालणे त्या करत असलेल्या कामाच्या स्वरूपानुसार ठरते. त्यात काही चुकीचेही नाही. नेहमीच्या वापरात सौभाग्यालंकार पूर्णत: घालत नसल्या तरी व्रतवैकल्ये, मंगलकार्य या ठिकाणी आवर्जून घालतात. ग्रामीण भागांतील विवाहित महिला सौभाग्यालंकार दैनंदिन व्यवहारातही घालतात. ग्रामीण महिलांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही उपयुक्तता यापेक्षाही सौभाग्य, सांस्कृतिक प्रतीक म्हणून अधिक असतो. विवाहित स्त्री, सुवासिनी म्हणून अन्य स्त्रियांकडून मिळणारा मानही मोठा असतो. सामान्यत: विवाहित स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोनही आदराचा असतो. 

दुर्दैवाने हेच आदराचे स्थान विधवा स्त्रीच्या वाट्याला येत नाही. त्यातही पुन्हा तिच्या वयोमानाप्रमाणे त्यात फरक पडत जातो. कोवळ्या वयातील विधवा स्त्रीचे जीवन फारच कष्टप्रद व वखवखलेल्या पुरुषी नजरांनी भरलेले असते. स्मृतींनी यावर तत्कालीन परिस्थितीमध्ये उपाय म्हणून सांगितलेले केशवपन, नेमस्त व्रताचरण वगैरे नियम आपण रूढ केले. पण, त्याचबरोबर विधवा स्त्रीला कुटुंबात, समाजात यतीचा दर्जा देण्यात यावा, हे स्मृतिवचन सोयीनुसार टाकून दिले. त्याऐवजी तिला अपशकुनी ठरवण्यात आले. तिचे दर्शनही अमंगळ ठरवण्यात आले. आजच्या ग्रामीण भागांतही ही परिस्थिती अद्याप बदलली नाही. पतीच्यामागे मुलांची, संसाराची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना मार्गी लावणार्‍या स्त्रीचा आदर वास्तविक विवाहित स्त्रीपेक्षाही कैक पटीने अधिक झाला पाहिजे. पण, बहुतांशी हा आदर मिळालाच तर वृद्धापकाली मिळतो. तरुण विधवा स्त्रीच्या चारित्र्यावर सहज शिंतोडे उडवले जातात. हे कटू असले तरी सत्यच आहे. शहरी भागांत विधवा स्त्रीचे एकेरी पालकत्व किंवा लिव्ह-इन-रिलेशनमध्ये असणे समाजमान्य होत चालले आहे. निमशहरी व ग्रामीण भागांमध्ये पुनर्विवाहाला आणि पुन्हा लग्न केलेल्या स्त्रीलाही तोच मान मिळणे सर्वमान्य होत आहे.  

विधवा स्त्रीला सुवासिनी स्त्रीप्रमाणे ‘हळदी कुंकू’ या समारंभांमध्ये सहभागी करून घेणे, तिने सौभाग्यालंकार घालणे हा तिच्याप्रति असलेला दृष्टिकोन बदलण्याचा उपाय नव्हे. हे जिवंत माणसाच्या नावामागे कै. व मृत व्यक्तीच्या नावाआधी श्री. संबोधन लावण्याइतकेच औचित्यभंग करणारे ठरेल. उलट, एखाद्या स्त्रीला तिच्यावर झालेल्या संस्कारांमुळे किंवा ते अलंकार घातल्याने पतीची आठवण वारंवार आल्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. एखादी विधवा स्त्री पतीपेक्षाही अलंकारांत आणि सुवासिनी म्हणून मिळणार्‍या सन्मानात अडकलेली असल्यामुळे ती सौभाग्यालंकारांचा, हळदीकुंकवाचा हट्टाग्रह धरत असल्यास तेही चुकीचेच ठरेल. विधवा स्त्रीला कुंकू लावताना, परिचयातील विवाहित स्त्रीला खरी परिस्थिती माहिती असतेच. ती नजरेतून व्यक्तही होते. कधी कधी अपमानापेक्षाही, सन्मान जास्त वेदना देऊन जातो!

अत्याचारापासून सुरक्षेसाठी विधवांनी सौभाग्यालंकार घालावेत, हा विचार मांडणारे विचारवंत, स्त्रीने कमीत कमी वस्त्रे घालण्याचे समर्थन करताना ‘पूर्ण झाकलेल्या स्त्रीवरही अत्याचार होतो’ असा तर्क मांडतात. गोव्यातील कायदा महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेने विद्यार्थ्यांना शिकवताना मंगळसूत्राला ‘कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा’ संबोधले होते. एकच मंगळसूत्र विवाहितेला दुय्यम व असुरक्षित करते आणि विधवेला भक्कम व सुरक्षित ठेवते. पांढरी कपाळं घेऊन फिरणार्‍या कुमारिका व  विवाहित महिला, विधवा स्त्रीने कुंकू लावण्याविषयी आग्रही असतात. हा वैचारिक विरोधाभास, विधवा स्त्रीला आदर व सन्मान मिळवून देण्यापेक्षाही सांस्कृतिक प्रतीकांना हीन व स्थानभ्रष्ट करण्यासाठी केला जातो. मेणबत्ती दोन्ही बाजूंनी जाळली की, उजेड होण्याऐवजी, ती मेणबत्ती लवकर संपून पुन्हा अंधार होतो. 

मंगळसूत्रासकट इतर अनेक प्रतीकांचा संबंध हीन गोष्टींशी व विकृतींशी जोडल्याने त्या नकोशा वाटू लागल्या. ती प्रतीके, त्या वस्तू वापरायला लाज वाटू लागली. पुरुषांनी टिळा न लावणे, कुमारिकांनी कुंकू  न लावणे, विवाहित स्त्रीने कमीत कमी टिकली लावणे व  मंगळसूत्र लपवणे हे आधुनिक असल्याचे लक्षण झाले. ‘स्त्रियांनीच का घालायचे मंगळसूत्र, पुरुषांनी का नाही?’, ‘मंगळसूत्र हा माझ्यासाठी सौभाग्यालंकार वगैरे काही नसून तो फक्त एक अलंकार/दागिना आहे.’, हे विचार रूढ झाले. आता त्याची पुढची पायरी आली आहे. या नको असलेल्या ‘सौभाग्य-लोढण्यांचं’ हवं असणं विधवा झाल्यानंतर जाणवू लागलं आहे. ते काढले जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील हेरवाड गावात ‘विधवा प्रथा बंद करणे संदर्भात चर्चा करणे’ असा विषय ठेवून ठरावही मंजूर करण्यात आला आहे. 

कुंकू, मंगळसूत्र आहे म्हणजे ‘ती कुणाची तरी आहे’ आणि हे नसलं म्हणजे ‘ती कुणाचीही’ अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. हे खरे असले तरी ती सामाजिक विकृती आहे. लैंगिक अत्याचार करणारा विकृत पुरुष विवाहित स्त्रीवरही बलात्कर करतो. ही विकृती घालवण्यासाठी मंगळसूत्र घालणे हा उपाय म्हणायचा झाल्यास, लैंगिक अत्याचार व बलात्कार  होतात म्हणून सुरक्षेसाठी शाळकरी मुलीनेही मंगळसूत्र घालावे का?  ‘मंगळसूत्र घालावे की, घालू नये हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्या विधवेला  असावे.’, असे म्हणणार्‍यांना मंगळसूत्र काढणार्‍या व बांगड्या फोडणार्‍या स्त्रियांचे स्वातंत्र्य मान्य आहे का? फोडणे बंधनकारक नसावे, असे म्हणताना ‘न फोडणे’ ग्रामसभेत ठराव घेऊन बंधनकारक करणे योग्य कसे वाटते? 

माझ्या मते, विधवा स्त्री स्वत: सौभाग्यालंकार उतरवून ठेवत नसेल, तर जबरदस्तीने ते उतरवून घेऊ नयेत. जबरदस्ती करून काकणे फोडू नयेत.  विधवा स्त्रीला वेगळी वागणूक देऊ नये, अपशकुनी म्हणून हिणवू नये. उलट नवर्‍याच्या पश्चात तिला सर्व कार्यात सहभागी करून घ्यावे. त्याच्या पश्चात तिने पेललेल्या जबाबदारीचा, संसारासाठी ती घेत असलेल्या कष्टांचा व तिच्या स्त्रीत्वाचा योग्य मान राखला जावा.  हळदी-कुंकू लावणे याचा संबंध मानापमानाशी न जोडता सौभाग्याशी व विवाहित स्त्रीची ओळख इतक्यापुरताच ठेवावा. हळदी कुंकू लावले म्हणजे मान आणि नाही लावले म्हणजे अपमान, दुय्यम लेखणे असे समजण्याचे काहीच कारण नाही. वैधव्य प्राप्त झालेली स्त्री पुनर्विवाह करून पुन्हा सौभाग्यालंकार प्राप्त करू शकते. त्यासाठी विधवा असताना त्यांचा हट्टाग्रह धरणे कितपत योग्य? पुनर्विवाह करायचा नसल्यास, सौभाग्यालंकार घालू नये व हळदी-कुंंकू कार्यक्रमात सहभागी होऊ नये. प्रतीकांचा आग्रह संकेतपालनासाठी व्हावा, मोडण्यासाठी नव्हे. 

विकृती घालवायची, कमी करायची असेल तर त्यांंची जागा संस्कृतीने व्यापणे आवश्यक आहे. आपण विकृती घालवण्यासाठी संस्कृती संपवत आहोत. आपण आपल्या कुटुंबात, समाजात विधवा स्त्रीला किती व कसा आदर देतो, यावरून आपल्यावर काय संस्कार झाले आहेत, हे समजू शकते. मुळात अपण संस्कार रुजवत नाही आणि संस्कृतीला दोष देतो. विकृतीसाठी संस्कृतीला जबाबदार धरतो. माणसं मारून संस्कृती संपत नाही. त्या संस्कृतीची प्रतीके, संकेत हीन ठरवा, विकृत करा. मग त्या संस्कृतीतले लोकच ती संस्कृती स्वत:हून संपवतात. विकृती नाहीशी किंवा कमी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण संस्कृतीच्या प्रतीकांना हीन व स्थानभ्रष्ट करत आहोत. यातून विकृती नष्ट होण्याऐवजी संस्कृतीच नष्ट होण्याची भीती अधिक आहे.