बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

बॉलमॅक्स यांचे बोल नेमका कुणाचा अनादर करणारे?


फादर बॉलमॅक्स परेरा यांनी केलेल्या विधानावरून उठलेली राळ, अस्मितेच्या प्रश्‍नाचा धुरळा एव्हाना खाली बसू लागला आहे. पण, खरोखरच फादर बॉलमॅक्स यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह, अनादर करणारे विधान केले होते का? अजिबात नाही. उलट त्यांनी समस्त गोमंतकीयांचा अपमान केला, ज्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही.

‘शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करू नका, त्यांची आरती करू नका, पूजा करू नका’, हा विचार महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनीही मांडला आहे. ज्यांना शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करायचे आहे, ते करतीलच. फादर बॉलमॅक्स यांनी सांगितले म्हणून गोमंतकीय ख्रिश्‍चन हिंदू शेजार्‍याला जाऊन ‘शिवाजी महाराज देव नाहीत, त्यांना देव मानू नका’, असे सांगणार नाही. सांगितले तरी कुणी ऐकणार, मानणार नाही. शिवजयंती, शिवराज्याभिषेक, शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल लिहिणे, बोलणे व अभिमान बाळगणे या पलीकडे जाऊन जाळपोळ, ख्रिश्‍चनांना मारणे, चर्च पाडणे असले उद्योग कदापि करणार नाही. कट्टरातल्या कट्टर शिवप्रेमीचा तसा इतिहास नाही. गोवेकराची ती मूळ प्रवृत्तीच नाही. म्हणूनच फादर बॉलमॅक्स यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, तर समस्त गोमंतकीयांचा अपमान केला आहे. 

फादर बॉलमॅक्स यांचे पूर्ण ‘शेरमांव’ ऐकल्यास, पाहिल्यास याची खात्री पटेल. त्यांच्या प्रवचनाचा रोख ख्रिस्तावर विश्‍वास कसा ठेवावा, संकटकाळात आपला धीर न सोडता ख्रिस्तपंथावर कसे चालावे, याविषयी होते. अगदी प्रारंभापासून त्यांनी दिलेली उदाहरणे त्यांची भूमिका स्पष्ट करत जातात. जसा ख्रिस्तावर, ख्रिस्तपंथीयांवर सुरुवातीपासून हल्ले होत आहेत, तसेच ते आताही होत आहेत, भविष्यातही होत राहतील. त्याला ख्रिश्‍चनांनी धैर्याने तोंड कसे द्यावे, याविषयी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मग, ते गोव्यातील शिवप्रेमींवर बोलले, कळंगुटमध्ये झालेल्या घटनेविषयी बोलले. गोव्यातील परिस्थितीविषयी व शिवप्रेमींविषयी बोलण्याचा संदर्भ मणिपूरमधील ख्रिश्‍चनांवर झालेल्या हल्ल्यावरून आला. इथेच फादर बॉलमॅक्स यांनी ख्रिस्ती, हिंदू, मुस्लीम असलेल्या समस्त गोमंतकीयांचा अपमान केला.

जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी घडलेल्या घटना इथेही घडू शकतील असा तर्क मांडतो, तेव्हा दोन्ही ठिकाणची परिस्थिती, प्रवृत्ती व प्रकृती समान असावी लागते. तरच तशा घटनांची पुनरावृत्ती इतर ठिकाणी घडू शकेल, असे गृहीतक आपण मांडू शकतो. मणिपूरमधील परिस्थिती व गोव्यातील परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. स्वातंत्र्यानंतर मणिपूर अनेकदा पेटले आहे, जसे ते आज पेटले आहे.  ‘राज्यात भाजपचे हिंदुत्ववादी सरकार असल्याने, शिवप्रेमी आक्रमक झाल्याने मणिपूरसारखी परिस्थिती इथे उद्भवू शकते’, असे विधान त्यांनी करणे हा समस्त गोमंतकीयांचा अपमान आहे. गोवा मुक्त होण्याच्या आधीपासून शिवप्रेमी गोव्यात आहेत. एकवेळ देवाला न मानतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे इतके कट्टर शिवप्रेमी गोव्यात फार पूर्वीपासून आहेत. चिथावणी देण्यासाठी नव्हे तर, माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक विधान करतो; इतकी देवळे पाडली, पाडून चर्च उभ्या आहेत, तसेच करायचे असते तर पोर्तुगीज गेल्यानंतर एकतरी चर्च गोव्यात शिल्लक राहिली असती का? भारतात एक तरी मशीद शिल्लक राहिली असती का? थोडा विचार करून पाहा.

आता अनेक विचारवंत असेही म्हणतील, ’अरे विविधतेत एकता हीच तर आमची संस्कृती आहे.’ मान्य आहे; पण यातील एकही विचारवंत, ‘त्या संस्कृतीचे नाव काय हो?’ या प्रश्‍नाचे उत्तर देत नाही. एकत्र जगणे, समावेशक असणे, ही हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. भारतातला प्रत्येक खिश्‍चन, मुस्लीम मूलत: हिंदू संस्कृतीचाच भाग आहे. मग, समस्या कुठे आहे? आपण हिंदू संस्कृतीचा भाग नाही, आपण वेगळे आहोत हे दाखवण्यात समस्या आहे. आपली हिंदू संस्कृती आहे, हे म्हणणे प्रत्येक विचारधारेच्या विचारवंतांच्या जिवावर येते. मग तो ख्रिस्ती, इस्लामी, साम्यवादी, सेक्युलर, पुरोगामी कुठल्याही विचारधारेचा  कुणीही विचारवंत असो.  

ख्रिस्तपंथाच्या, इस्लामच्या उदयापासून हे अब्रह्मिक पंथ कधीच सर्वसमावेशक नव्हते आणि नाहीत. एकत्र राहणे, इतरांच्या विचारधारेचा आदर करणे, सहअस्तित्व या बाबी त्यांच्या संहितेतच नाहीत. दुर्दैवाने, राज्यघटनेमध्ये हा सांस्कृतिक विस्तारवाद रोखण्यासाठी काहीही तरतूद नाही; उलट तो कसा विस्तारेल याचीच काळजी घेतली गेली आहे. म्हणूनच काश्मीरमध्ये हिंदूंची कत्तल, नरसंहार केवळ ते हिंदू आहेत, या एकाच कारणासाठी होऊनही सर्वोच्च न्यायालयाला त्याची चौकशीही करावीशी वाटत नाही. चौर्‍याऐंशीच्या दंगलीची चौकशी कालबाह्य होत नाही, एकोणनव्वदीतला नरसंहार मात्र कालबाह्य होतो. ख्रिस्तपंथ सेवेचा व इस्लाम शांततेचा मुलामा ओढून वावरत असला तरीही, इतर संस्कृतींना संपवून आपला सांस्कृतिक विस्तार करणे, हा दोन्ही पंथांचा स्थायिभाव आहे. जागतिक इतिहास काढून पाहा, जागोजाग याची साक्ष मिळेल. तरीही पटतच नसेल तर एक प्रश्‍न स्वत:लाच विचारा. जर सहअस्तित्व, एकत्र जगणे, इतर संस्कृतींचा आदर ठेवून आपले अस्तित्व निर्माण करणे हा ख्रिश्‍चनिटी व इस्लामचा स्थायिभाव असता, तर सबंध भारतात देवळे का पाडली गेली? मूर्ती फोडून मशिदीच्या पायर्‍या का बनवल्या गेल्या? गोव्यात देऊळ ठेवून चर्च बांधण्यासाठी जमीनच नव्हती का? राज्यकर्ते असलेल्या पोर्तुगिजांना चर्च बांधण्यास कुणी जमीन दिली नसती का? तरीही देवळे पाडली गेली, खानपानापासून सगळे निर्बंध लादले गेले. प्रसंगी आईवडिलांसमोर मुलांना जिवंत जाळले गेले. या सगळ्या जखमा माहीत असलेल्या समाजाची प्रतिक्रिया जराशी हिंसक झाली असती तर? 

ख्रिश्‍चनिटी व इस्लाम जगाची दोन भागांत सरळ सरळ विभागणी करतो. त्यामुळे, जे ख्रिश्‍चन नाहीत किंवा मुस्लीम नाहीत, त्यांना योग्य मार्गावर आणून स्वर्गी पोहोचवणे हे त्यांचे आद्य व परम कर्तव्य आहे. म्हणूनच ख्रिस्ताशिवाय किंवा अल्लाहशिवाय इतर कुणाचेही प्रस्थ वाढणे हा आपल्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका आहे, अशी त्यांची प्रामाणिक समजूत आहे. शिवाजी महाराजांना देव मानल्याने ख्रिस्तपंथाच्या अस्तित्वास धोका कसा येईल? पण, ही भीती त्यांना आहे, कारण त्यांनी तेच करून आपला सांस्कृतिक विस्तार केला आहे. म्हणूनच फादर बॉलमॅक्स आपल्या प्रवचनात ख्रिस्तींना आवाहन करतात की, ‘हिंदूंना सांगा, शिवाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत, आदर्श राजा आहेत, पण देव नाहीत व त्यांना देव म्हणू नका.’ 

‘असंतांचे संत’ नावाचा अग्रलेख लोकसत्तेत छापून आला होता. कुणीही अटक करण्याची मागणी केली नाही, कुणीही रस्त्यावर येऊन मोर्चे काढले नाहीत, साधा निषेधही व्यक्त केला नाही. तरीही गिरीश कुबेर यांनी दुसर्‍याच दिवशी संपूर्णच्या संपूर्ण अग्रलेख पहिल्या पानावर थेट क्षमा मागत मागे घेतला. वृत्तपत्राच्या इतिहासात हे असे बहुधा पहिल्यांदाच घडले असावे. यामागे कुठला संघटनात्मक अंत:प्रवाह (अंडर करंट) कार्यरत होता, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. 

फादर बॉलमॅक्स यांनी केलेल्या समस्त गोमंतकीयांच्या अपमानाचा खरे तर निषेध व्हायला हवा होता. अस्मितेच्या ठिणग्या नको तिथेच पेटू लागल्या की, अशी फसगत होते.  सांस्कृतिक विस्तारवादाला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे, त्यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काश्मीरप्रमाणेच ही समस्या कधीच सुटणार नाही; कारणे, संदर्भ बदलत राहतील. बॉलमॅक्ससारख्या ठिणग्या पडत राहतील. कुठे पेटायचे, कुठे पेटून उठायचे याचा व त्याविरुद्ध काय करावे, याचा संघटनात्मक अंत:प्रवाही विवेक प्रत्येक शिवप्रेमीने ठेवलाच पाहिजे.