सोमवार, २७ जून, २०२२

रामरक्षा की, ‘ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट’?


एरव्ही अजिबात ढुंकूनही न पाहिलेल्या टीव्हीकडे लक्ष गेलं, तेव्हा एक मराठी वेबसिरीज लागली होती. प्रसंगाकडे लक्ष वेधलं ते त्यात डोक्याचा चमनगोटा करून भोवरा ठेवलेल्या धष्टपुष्ट मुलाने. त्याचे वडील त्याला आलेल्या पाहुण्यांसमोर अथर्वशीर्ष म्हणायला सांगतात, तो नाही म्हणतो. मग, ते रामरक्षा म्हणायला सांगतात, तो नकारच देतो. आलेला पाहुणा विचारतो, ‘अरे काय काय पाठ करायला लावताय त्याला, तुला तरी येतं का हे सगळं?’ त्या मुलाचे वडील उत्तर देतात, ‘आई आली होती, तिने शिकवलंय सगळं, ए म्हण चल.’ तो मुलगा मानेनेच नकार देतो. तेव्हा तो पाहुणा म्हणतो, ‘ते सोड. तुला आत्ता या क्षणी काय करावसं वाटतं?’ या प्रश्नानंतर त्या मुलाचा चेहरा खुलतो, चुटकी वाजवतो आणि ‘ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट’ असे काहीतरी शब्द असलेल्या गाण्यावर नाच नाचतो. 

पुढचं पाहिलं नाही. टीव्ही बंद केला. मुलगी म्हणाली, ‘बाबा! बघायचं आहे ना.’ मी मानेनेच नाही म्हणालो आणि आत आलो. डोक्यात विचार आला, हे काय दाखवलं जात आहे आणि आपण काय पाहत आहोत? हे बरोबर आहे की, चूक आहे? जे दाखवलं जात आहे, त्याचा राग आला की, ज्या पद्धतीने ते दाखवलं जात आहे, त्याचा राग आला? त्यांनी काहीही दाखवलं तरी रिमोट आपल्या हातात आहे, म्हणून जबाबदारीही आपलीच आहे, या विचाराचा राग आला? नक्की ठरवता येईना. 

कुठल्या तरी एका कार्यक्रमात तुषार दामगुडे यांनी राजदीप सरदेसाई यांना बातम्यांच्या स्फोटाबद्दल विचारलेला प्रश्न आठवला. पूर्वी दिवसातून एकदा आढावा घेणार्‍या बातम्या लागायच्या.आता चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू असतो. यातील काय योग्य? अशा स्वरूपाचा प्रश्न इतर तीन प्रश्नांसह विचारला होता. त्याला उत्तर देताना राजदीप सरदेसाई यांनी, चोवीस तास बातम्या दाखवणारे चारशे चॅनल्स आहेत, सर्व बंद करावेत का, असा प्रश्न विचारला. एका चॅनलवर तब्लिगी जमात व दुसर्‍या चॅनलवर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील दुरवस्था यावर बातमी सुरू आहे. तुम्ही काय पाहणार, हे तुम्हाला ठरवायचे आहे, असा तर्क मांडला. त्यावर तुषार दामगुडे यांनी मलाइकाने कुठली अंतर्वस्त्रे घातली आहेत, किंवा राज ठाकरे कुठून व कसे निघाले, औरंगाबादला पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेटची आम्हाला काहीही गरज नाहीये. आम्ही ते मागितलेलं नाही. तुम्ही ते थोपवत आहात आमच्यावर. वर आम्हालाच प्रश्न विचारताय. आम्हाला हे अजिबात नकोय. त्यावर राजदीप सरदेसाई तुम्ही पाहू नका ना, तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे. 

कोणाचे म्हणणे बरोबर किंवा कुणाचे चूक हे ठरवण्यासाठी मी हा प्रसंग नाही सांगितला. पाहणार्‍यावर पर्याय निवडण्याची जबाबदारी ढकलल्याने मालिका, वेबसिरीज, बातम्या दाखवणार्‍यांची होणार्‍या परिणामांपासून किंवा त्यांच्या हेतूपासून सुटका होते का, याचा विचार व्हावा ही इच्छा आहे. 

मुलांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून शिकवली जाणारी स्तोत्रे म्हणायला सांगितल्यावर न म्हणताना दाखवणे आणि आवडेल ते करायला सांगितल्यावर मुलाने त्याच्या वयाला न शोभणार्‍या गीतावर नाचताना दाखवणे संयुक्तिक आहे का? स्तोत्रांचा विषय न घेताच केवळ त्या गीतावर नृत्य करताना किंवा दोन्ही करताना दाखवता आले नसते का? गाण्यावर नाचणे यात वावगे काही नाही, पण त्यासाठी रामरक्षेला नाके मुरडताना का दाखवावे? परिणामी स्तोत्र म्हणणे ‘कूल’ नाही आणि ‘ओ शेठ’ या (बाल?)गीतावर नृत्य करणे ‘ट्रेंडिंग’ आहे, हे ठसते. 

पाहण्याच्या निवडीचा पर्याय देण्यासोबतच, दोष पाहणार्‍याच्या नजरेत असतो हेसुद्धा ठसवले जाते. स्तनपान करवणार्‍या स्त्रीचा फोटो अश्लील आहे की, नाही यावरून मागे बरीच चर्चा रंगली होती. स्त्री आपल्या अर्भकाला स्तनपान करवते तेव्हा फक्त दूधच नव्हे तर वात्सल्यही पाजत असते. त्यात चुकीचे काहीच नाही, तसा फोटो छापणेही चुकीचे नाही. पण, त्या फोटोत ती स्त्री दूध पिणार्‍या अर्भकाकडे वात्सल्याने पाहते की तो फोटो पाहणार्‍याकडे पाहते, यावर फोटो देणार्‍याला काय दाखवयाचे आहे, हे ठरते. वासनेला वात्सल्याच्या पदराखालून विकणेही उघड होते.

‘चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे’ हे म्हणताना पहिले तीन शब्द झाल्यावर बोलणारा थांबला, तर दोष ऐकणार्‍यावर ढकलता येणार नाही. त्यातून उत्पन्न होत असलेल्या बीभत्स अर्थाची जबाबदारी बोलणार्‍यालाच घ्यावी लागते. एवढेच नव्हे तर बोलणार्‍याला एका प्रासादिक अभंग तोडून मोडून बीभत्स अर्थच दाखवायचा असतो, हे अधोरेखित होते. हे उघडे पडणे विनोदाच्या नावाखाली झाकणेही चुकीचेच ठरते.

आपण कुणाकडेतरी जेवायला गेलो असता, यजमानाने संडासात पान वाढले किंवा पानाजवळ विष्ठा ठेवली तर, अन्नाची वासना नाहीशी होते. संस्कृतीसोबत विकृती ठेवल्याने किंवा संस्कृतीच नाकारल्याने हानी संस्कृतीचीच होते. 

रामरक्षा म्हणणारे, नमाज पठण करणारे, बायबल वाचणारे वाईट वागत नाहीत का, या प्रश्नाचे उत्तर म्हणून संस्कारच नाकारणे योग्य ठरणार नाही. चांगले काय, वाईट काय याची जाण नसलेल्या वयात निवडीचा पर्याय देणे घातक आहे. स्वातंत्र्य हे जबाबदारीचे बंधन आहे, याची जाणीव व्यक्तीला होत नाही, तोवर संस्कारांना पर्याय नाही. 


मंगळवार, २१ जून, २०२२

अग्निवीर, अग्निपथ, अग्नितांडव आणि त्यावर भाजलेल्या लष्कराच्या भाकर्‍या

सरकारच्या योजनांना विरोध करणे हा लोकशाहीमध्ये विरोधकांचा अधिकारच आहे. विरोध करणे म्हणजे अडवणूक करणे, हिंसा करणे नव्हे. विरोध कशा पद्धतीने व्यक्त होतो यावर त्याचा हेतू ताडता येतो. अग्निपथ योजना अधिक चांगली व्हावी हा विरोधाचा हेतू नाहीच मुळी. अराजकता निर्माण करणे हाच हेतू आहे. त्यांचा नि:पात सरकार, प्रशासन आणि न्यायपालिका या तीन घोषित व पत्रकारिता या स्वयंघोषित स्तंभाने एकत्र येऊन कठोरपणे केला पाहिजे. त्याची जबाबदारी स्वीकारावीच लागेल, ती एकमेकांवर ढकलून चालणार नाही.

आता ‘अग्निपथ’च्या विरोधात जे रस्त्यावर उतरले आहेत व जे सार्वजनिक संपत्तीला आग लावत आहेत, ते खरोखरच सैन्यात जाण्यायोग्य आहेत का, हा खरा प्रश्न आहे. ज्या युवकांवर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला गेल्यास नोकरी मिळणार नाही हे माहीत असूनही जाळपोळ करत आहेत का? नसेल, तर मग हे त्यांना पुढे करून कोण करत आहे? सरकार, विरोधी पक्ष, बाहेरील शक्ती, दहशतवाद्यांचे स्लिपर सेल, कोचिंग क्लासेसवाले, अर्बन नक्षलवादी की, आंदोलनावर जगणारे आणखी कोण हे शोधणे गरजेचे आहे. यात फायदा कुणाचा होतोय, यापेक्षाही नुकसान आपल्या सर्वांचे होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

वारंवार होणार्‍या आंदोलनातील साम्यस्थळे पाहणे फार रोचक ठरेल. विरोधासाठी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे समान  आहे. कायदे, योजना यात बदल स्वीकारण्याऐवजी ते मुळापासून रद्दच करा याचा आग्रह प्रत्येक आंदोलनात समान आहे. भविष्यातील संभाव्य  हानीची भीती प्रत्यक्ष परिणाम न पाहताच केवळ गृहीतकांवरून घालणे समान आहे. ‘आम्ही काहीच ऐकणार नाही, काय ते तुम्ही ऐका व त्याप्रमाणेच वागा’ ही मानसिकता समान आहे. रस्ते अडवणे, जाळपोळ, पोलीस व पोलीसस्थानकांंवरील हल्ले समान आहेत. प्रत्येक आंदोलनातील ही साम्यस्थळे ‘विरोध’ याऐवजी ‘अराजकता’ सूचित करतात, हे खूपच गंभीर व भयावह आहे!

कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत, सीएएमुळे भारतीय मुस्लीम समाजावर अन्याय होत नाही हे माहीत असूनही प्रशासन, न्यायपालिका व माध्यमे सरकारच्या बाजूने ठामपणे उभी राहिली नाहीत. ‘सरकारची बाजू घेणे’ हे पत्रकारितेतील एक मोठे पाप आहे, असा दृढ समज आहे. आदेश देणारे न्यायाधीश शाहीनबागेत विनवण्या करण्यासाठी गेले होते. असे करण्याने आपण वाईट पोसत आहोत, हे या सर्वांना हे माहीत नव्हते का? लोकनियुक्त सरकारच्या घटनात्मक सिस्टमपेक्षाही समांतर सत्ता केंद्र असलेली ‘अपनी सिस्टम’ अधिक बलशाली असणे लोकशाहीसाठी घातक आहे.

कुठलाच कायदा, योजना कधीच परिपूर्ण नसते. त्याप्रमाणे ‘अग्निपथ’ या योजनेतही त्रुटी आहेत. आणखीही त्रुटी समोर येतील. उदाहरणच द्यायचे झाले तर, २०१९साली जे वीस वर्षीय युवक शारीरिक आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची लेखी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे, त्यांनी आताच्या ‘अग्निपथ’ योजनेसाठी आवश्यक २१ वर्षांची कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे. साहजिकच ते अपात्र ठरले आहेत. पण, ही तात्कालिक समस्या आहे. योजनेतील त्रुटी नाही. त्यामुळे, ही कमाल वयोमर्यादा तात्पुरती वाढवण्यात आली आहे. पूर्वीच्या सैन्य भरती प्रक्रियेत जिथे थोडाफार भ्रष्टाचार व्हायला संधी होती, ती लिखित परीक्षेत होती. लिखित परीक्षेत उत्तीर्ण करून घ्यायची हमी देत ज्या कोचिंग क्लासेसनी भरमसाठ फी उकळली, त्यांचे धंदे बंद होणार आहेत. निवड प्रक्रिया बदलण्याला विरोध होतोय तो या मुद्द्यावर होतोय. नोकरीची हमी व पेन्शन मिळण्याची सोय या आधारभूत गोष्टी दूर झाल्यामुळे इच्छुकांना गंडवण्याची भामटेगिरी करता येणार नाही. कोचिंग क्लासेस बंद पडतील. विद्यार्थ्यांनाही आपल्या गुणवत्तेवर भर द्यावा लागेल. 

कबुतरे उडवणे, भाई-भाई, बससेवा ते घरात घुसून मारणे इथपर्यंतच्या प्रवासात भारताने आपल्या सैन्य-धोरणांत बरेच बदल केले आहेत. हे बदल स्वीकारण्याऐवजी, योग्य बदल सुचवण्याऐवजी निरनिराळे भ्रम पसरवले जात आहेत. चार पाच वर्षांनंतर सैन्यसेवेत कायम न केलेल्यांचे भविष्य खराब होईल हा असाच एक भ्रम आहे. त्याआधी पूर्वीच्या सैन्य भरती प्रक्रियेत निवड न झालेल्यांनी पुढे काय केले, याचा शोध घेतला गेला पाहिजे. अशांच्या गाठी काहीही शिल्लक नसायची. या योजनेमुळे निदान दहा अकरा लाख रुपये वयाच्या पंचविसाव्या वर्षी असतील. पुन्हा पोलीस व निमलष्करी दलात प्राधान्य देण्याची हमी देण्यात आल्याने तीही संधी आहे. कायमस्वरूपी नोकरीची हमी व निवृत्तिवेतनाचा लाभ मिळवणे, या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. देशसेवा हाच सैन्यात प्रधान हेतू असला पाहिजे. 

रशिया व चीनमध्ये लष्कराच्या योजनांबद्दल चर्चा करता येते का, हा प्रश्न अग्निपथ योजनेवर बोलणार्‍या प्रत्येक विचारवंताने, राजकारण्याने आणि आंदोलनकर्त्याने स्वत:लाच विचारायला हवा. ‘अग्निपथा’वर अराजकतेच्या भाकर्‍या भाजू देणे बंद करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या तीनही घोषित स्तंभांनी व एका स्वयंघोषित स्तंभाने याची एकत्रित जबाबदारी घेणे आणि लष्कराच्या भाकर्‍या लष्करालाच भाजू देणे जास्त हितावह आहे! 

मंगळवार, १४ जून, २०२२

नुपूर शर्माने दिलेली प्रतिक्रिया ईशनिंदा आहे का?

इतक्या दिवसांच्या गदारोळानंतरही एका प्रश्नाचे उत्तर ना भाजपवाल्यांकडे, ना इस्लामच्या विचारवंतांकडे, ना मीडियाकडे ना कुणाकडे उपलब्ध आहे, तो प्रश्न म्हणजे ‘नुपूर शर्माने दिलेली प्रतिक्रिया ईशनिंदा आहे का?’
नुपूर शर्माने त्या डिबेटमध्ये उच्चारलेले नेमके प्रश्न काय होते, या कडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. प्रश्न विचारणे चुकीचे होते की, ज्या पद्धतीने ते विचारले गेले पाहिजे होते ती पद्धत चुकीची होती याविषयी एकही विचारवंत पुढे येऊन स्पष्टीकरण द्यायला तयार होत नाही. तसे पाहू जाता या विषयावर चर्चा, मतप्रदर्शन झालेच नाही, अशातला भाग अजिबात नाही. मुळात कुराण, मुहम्मद पैगंबर यांची बाजू तार्किक पद्धतीने मांडायला कुणी धजावत नाही, ही खरी समस्या आहे.

मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात १३ विवाह केले. काही इस्लामी विचारवंत ११ विवाह मान्य करतात. तो महत्त्वाचा मुद्दा नाही. त्या काळी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या एका विधवा महिलेशी विवाह केला होता. विधवाविवाहाचा विचारही करणे समाजमान्य नव्हते अशा काळी उचललेले हे क्रांतिकारी पाऊल होते. अनेक विवाह करणे हे ज्या काळात सर्वमान्य होते, त्या काळातील व्यक्तींना आताच्या सामाजिक संकेतांप्रमाणे दोषी ठरवणे गैर आहे. विशेषत: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे विवाह हे राजकीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून उचलण्यात येणारे सर्वमान्य पाऊल होते. आपल्याकडे हल्ली हल्लीपर्यंतसुद्धा बालविवाह होत असत. आताही, कायदेशीर बंदी असूनही काही हिंदू जमातींमध्ये बालविवाह होतात. त्या काळी मुलीला न्हाणं आलं की, आपल्याकडे गावात साखर वाटली जायची. मुलीची त्यानंतर सासरी पाठवणी केली जायची. त्याआधी अगदी पाळण्यातही विवाह झालेले असायचे. आज आपण आधुनिक सामाजिक संकेत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे मुलीचे व मुलाचे लग्नाचे किमान वय सोळा ते एकवीस हे ग्राह्य धरतो. कदाचित आणखी हजारो वर्षांनंतर आज ज्याला आपण बरोबर म्हणतोय ते चुकीचे ठरवले जाऊ शकते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, सभ्य-असभ्य हे कालसापेक्ष संकेत आहेत. त्यामुळे, आपल्या आधीच्या पिढ्या तसे करत होत्या यासाठी त्यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही. ते त्यांच्या काळी त्यांना योग्य वाटत होते म्हणून ते चूक, असे आज म्हणणे पूर्णत: योग्य ठरणार नाही. 

आपण आजच्या फूटपट्या घेऊन पूर्वीच्या लोकांची मोजमापे काढतो. स्वत:ला पुढारलेले ठरवण्याच्या नादात प्रत्येक जुनी गोष्ट चुकीची ठरवतो, नाकारतो. त्याचे योग्य मूल्यमापन करीत नाही. जिज्ञासू वृत्तीने तौलनिक चिकित्सा, अभ्यास करून संकल्पना स्वच्छ व स्पष्ट करीत नाही. 

जिज्ञासू वृत्तीने चिकित्सक दृष्टिकोनातून इस्लामची मांडणी करण्याचे साहस सहसा कुणी दाखवत नाही. पृथ्वी सपाट आहे, असे एके ठिकाणी म्हटले आहे. पण, त्याचबरोबर दुसर्‍या ठिकाणी दिवस आणि रात्र पृथ्वीभोवती गुंडाळलेले आहेत, असेही म्हटले आहे. पृथ्वी सपाट आहे, असे म्हणण्याचा संदर्भ पडताळून समोर ठेवणे, त्याची तार्किक चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे. कुराणमध्ये म्हटले आहे, म्हणजे ते जसेच्या तसे, त्याचा साकल्याने विचार न करता इस्लाम पंथ मानणार्‍यांनी व संपूर्ण जगाने स्वीकारावे हा हट्टाग्रह का? त्याचे संदर्भ, त्याचे शास्त्रीय विवेचन करण्यास एवढी आडकाठी का केली जाते? कुराणचा शास्त्रीय अभ्यास केवळ मुस्लिमांनीच नव्हे तर प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक आहे. त्यामुळे, जे पंथग्रंथांबद्दल विनाकारण व केवळ अज्ञानापोटी पसरलेले गैरसमज आहेत, ते निश्चितच दूर होतील.

आपल्या भारतीयांमध्ये असा अभ्यास करण्याची शास्त्रीय बैठक आहे. पूर्वपक्ष, खंडन, मंडन इथपासून ते उत्तरमिमांसेपर्यंत पोहोचल्यानंतर एखाद्या ग्रंथाविषयी मत बनवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. वास्तविक ‘टीका’ या शब्दाचा अर्थ निंदा असा नसून अभ्यासपूर्ण विवेचन असा आहे. 

आजकाल आपण टीका आणि निंदा यातला फरकच विसरून गेलो आहोत. त्यामुळे, नुपूर शर्मा नेमके काय म्हणाली, त्यात निंदा होती की, टीका होती की आणखी काही होते याचा आपण विचारच करत नाही. अगदी निर्भीड, निर्भीड असण्याचा ढोल पिटणारे पत्रकारही त्याचे विश्लेषण करू इच्छित नाहीत. शिवलिंगावर टिप्पणी करणार्‍याला उत्तर देताना ती म्हणाली, ‘तुम्हारे कुराणमे लिख्खे हुए उडते घोडे और अर्थ इज फ्लॅट इसका मजाक उडाना शुरू कर दूं?’ त्यानंतर मुहम्मद पैगंबर यांच्या विवाहाचा उल्लेख करत तिने आपणही त्यावर बोलू का?’, असा प्रश्न विचारला. तिच्या उल्लेखातील ‘सेक्स’ हा शब्द मला व्यक्तिश: खटकला. सुनन अन-नसाई (३३७८) - (संदर्भ १) व सहीह अल-बुखारी (५१३४)  - (संदर्भ २) यात असलेल्या मूळ वाक्याचं भाषांतर करताना इंग्रजीत ‘कॉन्स्युमेटेड’ असा शब्द आहे. त्याचा अर्थ विवाह करून शारीरिक संबंध ठेवणे, सेक्स करणे, स्त्रीला पूर्णत्व आणणे असा होतो. तरीही जाहीर मंचावर बोलताना ‘सहाव्या वर्षी विवाह केला आणि नवव्या वर्षी तिची पाठवणी झाली.’, असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरले असते. दुसरा मुद्दा असा की, प्रश्नार्थक वाक्यात पैगंबरांचे नाव आल्याने ईशनिंदा झाली असे म्हणत त्याची प्रतिक्रिया म्हणून आंदोलने झाली, तशीच आंदोलने पैगंबरांचे नाव ‘जैश-ए-मुहम्मद’ या दहशतवादी संघटनेने वापरल्यावरून भारतात झाली नाहीत.

‘समोरच्याने निंदा केली तर आपणही तुमच्यातील या या गोष्टीवर निंदा करू का, बोलू का, असे विचारणे योग्य आहे का?’, ‘तिने आपला संयम सोडायला नको होता’, ‘त्याने उचकटावले तरी तिने अशी प्रतिक्रिया देणे किंवा विचारणे समर्थनीय ठरत नाही’, अशी मते अनेक विचारवंतांनी मांडली आहेत. पण, हेच विचारवंत नुपूर शर्माच्या बोलण्यावर उमटलेल्या इस्लामपंथीयांच्या हिंसक किंवा अहिंसक प्रतिक्रियेविषयी चकार शब्दही बोलत नाहीत. जर उचकटवल्यामुळे नुपूरचे प्रतिक्रिया देणे समर्थनीय ठरत नाही, तर नुपूरच्या प्रतिक्रियेवर उमटलेली कुठलीही प्रतिक्रिया समर्थनीय ठरत नाही. पण, त्याचा निषेध सोडा, तसा साधा उल्लेखही करण्याचे धाडस दिसले नाही. उलट अहिंसक मार्गाने अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून विरोध प्रकट करणे हा घटनात्मक अधिकारच आहे, असे विचार मात्र न चुकता मांडले गेले. या ऐवजी नुपूर शर्माचे बोलणे कसे चुकले, कुठे चुकले याविषयी सविस्तर विश्लेषण इस्लामच्य अभ्यासकांनी करणे आवश्यक होते. रस्त्यावर उतरणे हा त्यावरचा योग्य मार्ग नव्हे.

‘विचारू, बोलू?’ असे म्हणत तिने उच्चारलेल्या वाक्यांना ईशनिंदा म्हणणार्‍यांनी ईशनिंदा काय असते, याचे नमुने पाहणे आवश्यक आहे. ‘कंगना राणावत आल्यामुळे शिवलिंगाचा आकार वाढला.’ यासारखी टिप्पणी किंवा काही हिंदूंनी शिवलिंगावर कंडोम चढवलेली चित्रे प्रसारित करणे, अगदीच सौम्य म्हणजे शिवलिंगाची तुलना भाभा अणुभट्टीशी करून त्याचे ‘मेमे’ छापणे ही इश्वराची निंदा नाही का? त्याविरुद्ध कुठल्या शिवभक्तांनी, हिंदूंंनी रस्त्यावर उतरून हिंसक व अहिंसक प्रतिक्रिया दिली? वास्तविक ‘लिंग’ या शब्दाचा अर्थ खूण असा आहे. त्याचा मानवीय प्रजोत्पादक अवयवाशी काहीही संबंध नाही. एवढेच नव्हे तर जसे ते शिवशक्ती मीलन किंवा प्रजोत्पादक अवयवांचे मीलन असे सांगितले जाते तेही चुकीचेच आहे. ‘मीलन’ असेल तर ते असे कसे आहे, एवढा मोघम प्रश्न विचारून त्याचे निराकरण करतो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.

हिंदू-मुस्लिमांनी अशा प्रतिक्रिया रस्त्यावर उतरून देत राहणे व त्याचा शेवट महाभयानक गृहयुद्धात होणे, आपल्याला परवडणार आहे का? युरोपमध्ये निग्रो-गोरे यांचा संघर्ष, फ्रान्स-आल्जेरिया संघर्ष, क्यूबा यांसह अनेक देशांमध्ये घडून गेलेला पॅटर्न व आपल्याकडे होत असलेल्या घटनांचा पॅटर्न यातला पद्धतशीर सारखेपणा, त्यावेळी तिथल्या व आता इथल्या विचारवंतांच्या, पत्रकारांच्या भूमिका यात असलेले विलक्षण ‘साम्य’, खूप घातक भविष्याकडे भारत चालल्याचा संकेत आहे, यात ‘वाद’ नाही!

या संकेताकडे लक्ष देणे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजांना अत्यंत आवश्यक आहे. या सुरू असलेल्या गदारोळात अनेक गोष्टींकडे आपले लक्ष गेलेच नाही. ही डीबेट घडली २६ मे रोजी आणि प्रतिक्रिया उमटली ६ जून रोजी. या दरम्यान व त्या आधी घडलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांकडे आपले लक्ष गेले नाही. भारताने गव्हाची निर्यातबंदी केल्यामुळे, एप्रिल महिन्यात पाकिस्तानने केलेली उर्वरित बेलआउट देण्याची मागणी आयएमएफने लटकवणे, युरोपच्या मदतीशिवाय दूतावास उघडण्यासाठी तालिबानने भारताला मान्यता देणे, एका सत्यशोधक(?) चॅनलने नुपूरच्या वक्तव्याचे वारंवार प्रसारण करणे, त्यासाठी अनेक पाकिस्तानी ट्विटर हँडल सक्रिय होणे, कानपुरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये तेच मेसेज फिरवणे, या सर्वांचा विचार होणे आवश्यक आहे. त्या आधी काही काळ सातत्याने जयशंकर यांचे अमेरिकेला रोखठोक उत्तरे देणे, रशियाकडून भारताने अधिक इंधन खरेदी करणे, इंधनाच्या अन्य पर्यायांवर भारताचे भर देणे या सर्व घडामोडी घडल्या. कतार  अमेरिकेच्या मर्जीतील देश आहे व इस्लामचे राजकीय सर्वेसर्वा बनण्याची स्पर्धा इस्लामी देशांमध्ये आहे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ‘ओआयसी’ दरवर्षी अहवाल सादर करून भारतातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायाचा जगभर उदोउदो करते. पण, चीनमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तेवढे बोलत नाही. त्यामुळे, या देशांनी भारताविरुद्ध प्रतिक्रिया देणे स्वाभाविक आहे. मुळात भारतीय राजदूताने किंवा प्रवक्त्याने नुपूरसारखे प्रश्न विचारले असते, तर कदाचित ‘ओआयसी’ देशांनी प्रतिक्रिया देणे संयुक्तिक ठरले असते. वास्तविक एका देशाच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य हे त्या देशाचे अधिकृत वक्तव्य धरता येत नाही. पण, तरीही तसे करून भारतीय राजदूतांना बोलावले गेले आणि ‘भारताची जगभरात(?) मान खाली गेली’, असे म्हणत माध्यमांनी भारताची शान वाढवली. 

२०१०साली पाकिस्तानात आशिया नोरीन या ख्रिश्चन शिक्षिकेवर ईशनिंदेचा आरोप झाला होता आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांचे याप्रसंगी स्मरण होते. पाकिस्तानात मदरशांमध्ये शिकवणार्‍या अनेक मुस्लीम शिक्षकांनाही ईशनिंदेच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली आहे. त्यांना कुराण कळत नव्हते, परमेश्वरावर, मुहम्मद पैगंबर आणि कुराणवर त्यांची श्रद्धा नव्हती व त्यांना त्यांची निंदाच करायची होती, हे पचवणे थोडे जड जाते. कुराणची, मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनमूल्यांची चिकित्सा, अभ्यासच करू नये असा त्यामागचा हट्टाग्रह स्पष्ट दिसतो. इतरांनी तो केल्यास, मत किंवा प्रतिक्रिया व्यक्त केल्यास सामाजिक शांतता बिघडेल, दंगे होतील, अशी भीती मुद्दाम विचारवंतांकडून पसरवली जाते. आपल्यावर दंगल भडकवल्याचे पाप येईल किंवा ईशनिंदेचे पाप घडेल या भीतीपोटी तो विषयच टाळला जातो. नुपुरच्या प्रतिक्रियेला चिकित्सा न करता सपशेल चूक ठरवण्यात आले, त्यामागेही माध्यमातील विचारवंतांची हीच अगतिकता होती. इस्लामचा चिकित्स अभ्यास मुस्लिमांनी करू नयेच, त्याशिवाय इतरांनीही त्याविषयी बोलू नये याचा हट्टाग्रह धरणे हा कट्टरपणा आहे, असे आपल्याकडच्या विचारवंतांना मुळीच वाटत नाही. 

कुराण किंवा इस्लामशी संबंधित या मूळ अरबी भाषेतील ग्रंथांचे ससंदर्भ यथार्थ विवरण, विश्लेषण सामान्य मुस्लीम, ख्रिश्चन व हिंदूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या अभ्यासाला ईशनिंदेचे लेबल लावणे चुकीचे ठरेल. अभ्यास करताना जिज्ञासू वृत्ती आहे की, केवळ ज्याचा अभ्यास करतोय त्या ग्रंथाला, संस्कृतीला हीन दाखवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, याचा विचार होणेही आवश्यक आहे. केवळ प्रश्न, शंका उपस्थित करून दिलेल्या उत्तरांचा स्वीकार न करता नवीन प्रश्न उपस्थित करत राहणेही योग्य नव्हे.

जे जे चांगले आहे त्याचा स्वीकार करत आणि जे जे अयोग्य आहे, त्याला बाजूला सारत आपण हजारो वर्षांपासून मार्गक्रमण करत आहोत. हीच आपली संस्कृती आहे!


संदर्भ १ : https://sunnah.com/nasai:3378

संदर्भ २ : https://sunnah.com/bukhari:5134

चित्रस्रोत : आंतरजाल (इंटरनेट)


गुरुवार, २ जून, २०२२

आपल्याला ‘पुरोगामी’ व्हायचे आहे का?

सामान्यत: माणूस म्हणून माणुसकीने जगण्यासाठी जी मूल्ये आवश्यक आहेत ती स्वीकारून कालानुरूप अनावश्यक व मूल्यांना बाधक असलेल्या गोष्टींना विरोध करणे आणि मूल्यवर्धक नव्या गोष्टी स्वीकारत पुढे जाणे म्हणजे पुरोगामी असणे ही व्याख्या आहे. पण, ही पुरोगामित्वाची प्रतिगामी व्याख्या आहे, हे ध्यानात ठेवावे. ‘जिथून आपल्याला हानी होण्याची शक्यता नाही, अशा कुठल्याही जुन्या गोष्टीला विरोध करत राहणे म्हणजे पुरोगामी होणे’, ही पुरोगामित्वाची आधुनिक व्याख्या आहे.

करिअर करण्यासाठी तशी अनेक रूढीवादी क्षेत्रे आहेत. पण, कुठल्याही क्षेत्रात भरपूर वाव असलेले क्षेत्र म्हणजे ‘पुरोगामित्व’. ‘पुरोगामी’ असणे किंवा ‘पुरोगामित्व’ म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ‘पुर:’ म्हणजे पुढे आणि ‘गामी’ म्हणजे जाणारा. सामान्यत: माणूस म्हणून माणुसकीने जगण्यासाठी जी मूल्ये आवश्यक आहेत ती स्वीकारून कालानुरूप अनावश्यक व मूल्यांना बाधक असलेल्या गोष्टींना विरोध करणे आणि मूल्यवर्धक नव्या गोष्टी स्वीकारत पुढे जाणे म्हणजे पुरोगामी असणे ही व्याख्या आहे. पण, ही पुरोगामित्वाची प्रतिगामी व्याख्या आहे, हे ध्यानात ठेवावे. ‘जिथून आपल्याला हानी होण्याची शक्यता नाही, अशा कुठल्याही जुन्या गोष्टीला विरोध करत राहणे म्हणजे पुरोगामी होणे’, ही पुरोगामित्वाची आधुनिक व्याख्या आहे. 

आता नुसते पुरोगामी असणे हे असून नसण्यासारखे आहे. खरे जातिवंत पुरोगामी होण्यासाठी कुठून ना कुठून तरी ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांच्या पुरोगामित्वाशी नाते आपल्याला सिद्ध करता आले पाहिजे. त्यासाठी त्यांचे विचार वाचलेच पाहिजेत, असे बंधन अजिबात नाही. या त्रयीशिवाय इतर सर्व त्रयस्थ, हे प्रतिगामी व रूढी परंपरा मानणारे आहेत, हे कायम लक्षात ठेवावे. पुरोगामित्व हे कालसापेक्ष असते. कालचा पुरोगामी हा आजचा प्रतिगामी आणि आजचा पुरोगामी उद्याचा प्रतिगामी असतो. त्यामुळे, कायम वर्तमानात असणारा पुरोगामी असतो. फार जड झाले का? नका, फार विचार, अभ्यास करू नका.

सखोल अभ्यास करणे व चांगले मार्क पडलेले असणे याला खूप महत्त्व असते, ते इतर क्षेत्रांत. पण, अभ्यास करण्याची तयारी, तौलनिक विचार करण्याची क्षमता वगैरे कसलीही अपेक्षा  नसलेले सर्वव्यापी क्षेत्र म्हणजे पुरोगामित्व. इथे कसलाही अभ्यास नसणे यालाच जास्त महत्त्व आहे. कोडगेपणा व कशाचा तरी प्रचंड, आत्यंतिक द्वेष हे दोन गुण असणे अत्यावश्यक आहे. बाकी, अभ्यास अभ्यास म्हणून जे काही लागते, ते सर्व व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक यावर सहज उपलब्ध होते व असते. 

पुरोगामी होण्यासाठीचे ज्ञान सहज उपलब्ध असले, तरीही ते इतके सोपे नाही. पुरोगामी होण्यासाठी सतत टीका करून व्यक्त होत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला आपण कुठल्या क्षेत्रात आहोत, आपली योग्यता काय आहे, याचे बंधन नाही. अगदी पान खाऊन पिचकार्‍या मारणार्‍यापासून ते कॉलेजमध्ये शिकवणार्‍या  प्राध्यापकापर्यंत आणि कष्टकरी अशिक्षितापासून ते नाक्यावर गुटखा खात टवाळक्या करणार्‍या सुशिक्षितापर्यंत कुणीही म्हणजे अगदी कुणीही पुरोगामी होऊ शकतो. त्यासाठी कुठलाही न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. 

‘कसलाच न्यूनगंड नसणे’ हे बेसिक कॉलिफिकेशन आहे. विज्ञानाचा आणि आपला छत्तिसाचा आकडा असला, तरीही ‘वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे’ या विषयावर अतिशय श्रद्धापूर्वक बोलावे. आपण घरासमोर आणि गळ्यात क्रॉस घालत असलो तरीही इतर सर्वांना नास्तिक बनवता आले पाहिजे. आपण स्वत: कायदा विषयाचे प्राध्यापक असलो तरीही ‘मंगळसूत्र म्हणजे नवर्‍याने बायकोच्या गळ्यात घातलेला कुत्र्याचा पट्टा आहे’, असे विद्यार्थ्यांच्या गळी उतरवता आले पाहिजे. वकील झाल्यानंतरही हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानाचा संबंध अकबराच्या आंघोळीशी स्वच्छपणे जोडता आला पाहिजे. पर्यावरणवादी असाल तर प्रत्येक हिंदू सण पर्यावरणाचा नाश करणारा आहे, हे ठसवता आले पाहिजे. प्राणिमित्र असाल तर रक्षाबंधनाला ‘गायीच्या चामड्याची राखी बांधू नका’ असे वात्सल्यपूर्ण आवाहन करता आले पाहिजे. जाहिरात क्षेत्रात असाल तर दिवाळीत दागिन्यांची जाहिरात करणार्‍या स्त्रिया उघड्या कपाळाच्या व सुतकी चेहर्‍याच्याच असतील अशी खात्री करून घ्या. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी क्षेत्रात असाल तर संध्याकाळी, ‘ज्योतिष हे कसे थोतांड आहे’ यावर चर्चा घडवून आणतानाच सकाळच्या वेळी आजचे भविष्य सांगणारा एखादा दाढी वाढवलेला, टिळा लावलेला इसम वृत्तवाहिनीवर दाखवता आला पाहिजे आणि वृत्तपत्रात आठवड्याचे भविष्य न चुकता छापता आले पाहिजे. 

विज्ञानवादी असाल तर भिंत चालवणार्‍या ज्ञानेश्वर माउलीवर टीका करताना, चमत्काराने कॅन्सर बरा करणार्‍या मदर तेरेसांचे संतपद मान्य करता आले पाहिजे. इतिहास या क्षेत्रात असाल तर शिवाजी महाराज, संत अफजलखान, संत औरंगजेब यांना सेक्युलर ठरवता आले पाहिजे. ब्राह्मण इतिहासकारांनी हिंदू-मुस्लीम करत सामाजिक तेढ कसे पसरवले, हे ठामपणे सांगता आले पाहिजे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कोणत्या इतिहासकार नसलेल्या लेखकाने केलेला चालेल व इतिहासतज्ज्ञाने केलेला चालणार नाही, हे निश्चित करता आले पाहिजे. त्यानुसार भावना व अस्मिता दुखावण्याची सोय करता आली पाहिजे. 

राजकीय क्षेत्रात असाल तर श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला जाण्याआधी मटण खाल्ले पाहिजे व ते मंदिरात जाण्यापूर्वीच आठवलेही पाहिजे. त्याचवेळी इफ्तारमध्ये मात्र सामाजिक सौहार्द जपण्यासाठी न विसरता गेले पाहिजे. केवळ हिंदूंच्याच देवाचे बाप होता आले पाहिजे. गोव्यात आक्रमकांनी पाडलेली देवळे उभारू असे म्हणत, ओडिशातील जगन्नाथ मंदिर परिसरातील चारशे ते बाराशे वर्षांपूर्वीचे जुने मठ उद्ध्वस्त करून, तिथे पर्यटकांसाठी टॉयलेट व लाउंज बांधता आले पाहिजे. 

सामाजिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता, समता वगैरे चळवळीत कार्यरत असणार्‍यांना शबरीमला येथील अय्यप्पाच्या देवळात मासिक स्रावाने भिजलेले सॅनिटरी पॅड नाचवत घेऊन जाणे जमले पाहिजे. स्त्रियांना असलेला पूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी शनिशिंगणापूरला चौथर्‍यावर चढताना, मशिदीत घालून दिलेल्या मर्यादेपलीकडे न जाता भूमाता होणे जमले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन करताना केवळ हिंदूंच्याच श्रद्धांचे निर्मूलन कसे करता येईल याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. हिंदूंच्या काही मंदिरात आणि ईदच्या दिवशी दरवर्षी बकरी किंवा इतर प्राणी बळी देण्याच्या प्रथा जरी समान असल्या, तरी केवळ हिंदूंच्याच प्रथा कोर्टात जाऊन बंद पाडता आल्या पाहिजेत. अपवाद म्हणून असलेल्या सतीसारख्या चालीरीतींना प्रथा म्हणता आले पाहिजे. ‘विधवा होणे’ ही अवस्था, परिस्थिती असली तरीही तिला ‘विधवा प्रथा’ म्हणता आले पाहिजे. बालविवाहाचा विरोध करताना, कोवळ्या मातीचे घडे फोडणे कसे मानवताविरोधी आहे, याचे प्रबोधन फक्त हिंदूंनाच करणे व इतरांच्याबाबतीत बालविवाह हा घटनेने दिलेला पांथिक अधिकार असल्याचा उद्घोष करणे गरजेचे आहे. 

हिंदूंच्या आस्थेशी, श्रद्धेशी संबंधित असलेले जे जे मागचे आहे, ते ते सगळे कसलाही विचार न करता,  टाकाऊ आहे असा दृढ विश्वास मनात बाळगला पाहिजे. असे असले तरीही ‘टाकाऊतून टिकाऊ’ बनवण्याच्या फंदात अजिबात पडू नये. ‘किती पैसे मिळतील?’, या विचाराच्या फंदातही पडू नये.  पुरोगामी होऊन पैसा प्राप्त करण्यासाठी तिस्ता सेटलवाडसारखे वेगळेच धाडस लागते किंवा न्यायालयाने ‘दहा बारा कोटींचा घोटाळा हा काही मोठा घोटाळा नाही’, अशी टिप्पणी करून परदेशी जाण्याचा परवाना देण्यासाठी राणा अय्यूबइतकी योग्यता लागते. पैसा प्रचंड आहे, पण तो पुरोगामित्वाच्या नावावर इतर मार्गांनी मिळवावा लागतो. पुरोगामित्व हे तसे परजिवी क्षेत्र आहे. त्यामुळे, या क्षेत्राकडे पोटापाण्याची सोय म्हणून पाहण्याचा क्षुद्रपणा करू नये. वास्तविक पोटापाण्याचा प्रश्न पडूच देत नाही, असे हे क्षेत्र आहे. आपण प्रश्न पडूच द्यायचे नाहीत. उलट, कायम फक्त प्रश्न उपस्थित करणे हे आपले काम आहे, उत्तरे शोधणे किंवा इतरांनी शोधून दिलेली उत्तरे स्वीकारणे हे आपले कार्यक्षेत्र नाही, हे ध्यानात ठेवावे. 

या काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असल्या तरीही अजिबात म्हणजे अजिबात विसरू नयेत अशी काही पथ्येही पुरोगामी होण्यासाठी पाळावी लागतात. टीका, विरोध करताना कुठलीही मागची गोष्ट, प्रथा, रूढी, परंपरा, श्रद्धा, देव वगैरे मुस्लीम  आणि ख्रिश्चन यांचे आराध्य असणार नाहीत याची आत्यंतिक काळजी घेणे प्रचंड आवश्यक आहे. हे पथ्य पाळलेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. हिंदूंवर टीका करतानाही ‘बहुसंख्य’ आणि ‘बहुजन’ यातला सूक्ष्म फरक ओळखण्याचे कसबही होतकरू पुरोगाम्यांनी आत्मसात करावे. म्हणजे बहुसंख्य असलेले हिंदू कायम अन्याय करतात आणि हिंदूंमधील बहुजनांवर कायम अन्याय होतो, अशी त्याची विभागणी करणे सोयीचे व सोपे होते. स्त्री-पुरुष समानता, समता, जातीयवाद याविषयी हिंदूंवर आसूड उगारताना मुस्लीम आणि ख्रिश्चन पंथांना वगळावे. आपले पुरोगामी ज्ञान पाजळताना ते कुठे पाजळू नये हे ओळखून गळा काढावा. गळा तिथेच काढावा, जिथे तो कापला जाणार नाही याची खात्री असेल!

यशस्वी पुरोगामी होण्यासाठी खात्रीशीर मार्ग अतिशय बाळबोध पद्धतीने व ढोबळमानाने अस्मादिकांनी मांडला असला तरी पुरोगामित्वाच्या स्कोपविषयी अजिबात शंका बाळगू नये. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरोगामी व्यक्तींना प्रचंड मागणी व वाव आहे. त्यामुळे, पुरोगामी होण्याची संधी अजिबात दवडू नये. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यावर पोस्ट टाकाव्यात. त्या टाकताना संदर्भ अजिबात देऊ नयेत. संदर्भ न देण्यामुळे आपण किती अभ्यासू आहोत हे वाचकांवर ठसते. वर्तमानपत्रात संदर्भ न देता लेख लिहावेत. दहशतवाद्यांविषयी ममत्व बाळगावे. त्यांच्या गरिबीविषयी, वडिलांच्या नोकरीविषयी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी अभ्यास करून लेख लिहावेत. त्यांची कायम सकारात्मक बाजूच मांडावी. असे केल्याने आपण पुरोगामी होण्यातल्या प्रथमा, द्वितीया पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी तयार व्हाल. 

आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात लेख छापून येण्यासाठी कट्टर पुरोगामी, हिंदूविरोधी, संघविरोधी असणे बंधनकारक आहे. पर्यावरणवादी, प्राणीप्रेमी यांच्या कार्याचा अभ्यास करावा. त्यांनी अडवलेल्या प्रकल्पांवर अवश्य लिहावे. भारतात अल्पसंख्याकांवर कायम होणार्‍या अन्यायाविषयी भरभरून लिहावे. असे केल्याने आपण लगेच विश्वप्रसिद्ध पुरोगामी होऊन जाल यात शंका नाही!

तरीही भविष्यात कुठेही,काहीही विपरीत घडल्यास त्याची जबाबदारी लेखकावर ढकलता येणार नाही. ती स्वत:ची स्वत:च उचलावी लागेल. आम्ही फक्त मार्ग दाखवतो, चालायचे होतकरूंनाच आहे, हे लक्षात ठेवावे. असो! होतकरू पुरोगाम्यांना त्यांच्या भविष्यातील यशासाठी आताच शुभेच्छा...