सोमवार, २७ जून, २०२२

रामरक्षा की, ‘ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट’?


एरव्ही अजिबात ढुंकूनही न पाहिलेल्या टीव्हीकडे लक्ष गेलं, तेव्हा एक मराठी वेबसिरीज लागली होती. प्रसंगाकडे लक्ष वेधलं ते त्यात डोक्याचा चमनगोटा करून भोवरा ठेवलेल्या धष्टपुष्ट मुलाने. त्याचे वडील त्याला आलेल्या पाहुण्यांसमोर अथर्वशीर्ष म्हणायला सांगतात, तो नाही म्हणतो. मग, ते रामरक्षा म्हणायला सांगतात, तो नकारच देतो. आलेला पाहुणा विचारतो, ‘अरे काय काय पाठ करायला लावताय त्याला, तुला तरी येतं का हे सगळं?’ त्या मुलाचे वडील उत्तर देतात, ‘आई आली होती, तिने शिकवलंय सगळं, ए म्हण चल.’ तो मुलगा मानेनेच नकार देतो. तेव्हा तो पाहुणा म्हणतो, ‘ते सोड. तुला आत्ता या क्षणी काय करावसं वाटतं?’ या प्रश्नानंतर त्या मुलाचा चेहरा खुलतो, चुटकी वाजवतो आणि ‘ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट’ असे काहीतरी शब्द असलेल्या गाण्यावर नाच नाचतो. 

पुढचं पाहिलं नाही. टीव्ही बंद केला. मुलगी म्हणाली, ‘बाबा! बघायचं आहे ना.’ मी मानेनेच नाही म्हणालो आणि आत आलो. डोक्यात विचार आला, हे काय दाखवलं जात आहे आणि आपण काय पाहत आहोत? हे बरोबर आहे की, चूक आहे? जे दाखवलं जात आहे, त्याचा राग आला की, ज्या पद्धतीने ते दाखवलं जात आहे, त्याचा राग आला? त्यांनी काहीही दाखवलं तरी रिमोट आपल्या हातात आहे, म्हणून जबाबदारीही आपलीच आहे, या विचाराचा राग आला? नक्की ठरवता येईना. 

कुठल्या तरी एका कार्यक्रमात तुषार दामगुडे यांनी राजदीप सरदेसाई यांना बातम्यांच्या स्फोटाबद्दल विचारलेला प्रश्न आठवला. पूर्वी दिवसातून एकदा आढावा घेणार्‍या बातम्या लागायच्या.आता चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू असतो. यातील काय योग्य? अशा स्वरूपाचा प्रश्न इतर तीन प्रश्नांसह विचारला होता. त्याला उत्तर देताना राजदीप सरदेसाई यांनी, चोवीस तास बातम्या दाखवणारे चारशे चॅनल्स आहेत, सर्व बंद करावेत का, असा प्रश्न विचारला. एका चॅनलवर तब्लिगी जमात व दुसर्‍या चॅनलवर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील दुरवस्था यावर बातमी सुरू आहे. तुम्ही काय पाहणार, हे तुम्हाला ठरवायचे आहे, असा तर्क मांडला. त्यावर तुषार दामगुडे यांनी मलाइकाने कुठली अंतर्वस्त्रे घातली आहेत, किंवा राज ठाकरे कुठून व कसे निघाले, औरंगाबादला पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेटची आम्हाला काहीही गरज नाहीये. आम्ही ते मागितलेलं नाही. तुम्ही ते थोपवत आहात आमच्यावर. वर आम्हालाच प्रश्न विचारताय. आम्हाला हे अजिबात नकोय. त्यावर राजदीप सरदेसाई तुम्ही पाहू नका ना, तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे. 

कोणाचे म्हणणे बरोबर किंवा कुणाचे चूक हे ठरवण्यासाठी मी हा प्रसंग नाही सांगितला. पाहणार्‍यावर पर्याय निवडण्याची जबाबदारी ढकलल्याने मालिका, वेबसिरीज, बातम्या दाखवणार्‍यांची होणार्‍या परिणामांपासून किंवा त्यांच्या हेतूपासून सुटका होते का, याचा विचार व्हावा ही इच्छा आहे. 

मुलांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून शिकवली जाणारी स्तोत्रे म्हणायला सांगितल्यावर न म्हणताना दाखवणे आणि आवडेल ते करायला सांगितल्यावर मुलाने त्याच्या वयाला न शोभणार्‍या गीतावर नाचताना दाखवणे संयुक्तिक आहे का? स्तोत्रांचा विषय न घेताच केवळ त्या गीतावर नृत्य करताना किंवा दोन्ही करताना दाखवता आले नसते का? गाण्यावर नाचणे यात वावगे काही नाही, पण त्यासाठी रामरक्षेला नाके मुरडताना का दाखवावे? परिणामी स्तोत्र म्हणणे ‘कूल’ नाही आणि ‘ओ शेठ’ या (बाल?)गीतावर नृत्य करणे ‘ट्रेंडिंग’ आहे, हे ठसते. 

पाहण्याच्या निवडीचा पर्याय देण्यासोबतच, दोष पाहणार्‍याच्या नजरेत असतो हेसुद्धा ठसवले जाते. स्तनपान करवणार्‍या स्त्रीचा फोटो अश्लील आहे की, नाही यावरून मागे बरीच चर्चा रंगली होती. स्त्री आपल्या अर्भकाला स्तनपान करवते तेव्हा फक्त दूधच नव्हे तर वात्सल्यही पाजत असते. त्यात चुकीचे काहीच नाही, तसा फोटो छापणेही चुकीचे नाही. पण, त्या फोटोत ती स्त्री दूध पिणार्‍या अर्भकाकडे वात्सल्याने पाहते की तो फोटो पाहणार्‍याकडे पाहते, यावर फोटो देणार्‍याला काय दाखवयाचे आहे, हे ठरते. वासनेला वात्सल्याच्या पदराखालून विकणेही उघड होते.

‘चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे’ हे म्हणताना पहिले तीन शब्द झाल्यावर बोलणारा थांबला, तर दोष ऐकणार्‍यावर ढकलता येणार नाही. त्यातून उत्पन्न होत असलेल्या बीभत्स अर्थाची जबाबदारी बोलणार्‍यालाच घ्यावी लागते. एवढेच नव्हे तर बोलणार्‍याला एका प्रासादिक अभंग तोडून मोडून बीभत्स अर्थच दाखवायचा असतो, हे अधोरेखित होते. हे उघडे पडणे विनोदाच्या नावाखाली झाकणेही चुकीचेच ठरते.

आपण कुणाकडेतरी जेवायला गेलो असता, यजमानाने संडासात पान वाढले किंवा पानाजवळ विष्ठा ठेवली तर, अन्नाची वासना नाहीशी होते. संस्कृतीसोबत विकृती ठेवल्याने किंवा संस्कृतीच नाकारल्याने हानी संस्कृतीचीच होते. 

रामरक्षा म्हणणारे, नमाज पठण करणारे, बायबल वाचणारे वाईट वागत नाहीत का, या प्रश्नाचे उत्तर म्हणून संस्कारच नाकारणे योग्य ठरणार नाही. चांगले काय, वाईट काय याची जाण नसलेल्या वयात निवडीचा पर्याय देणे घातक आहे. स्वातंत्र्य हे जबाबदारीचे बंधन आहे, याची जाणीव व्यक्तीला होत नाही, तोवर संस्कारांना पर्याय नाही. 


३ टिप्पण्या:

  1. बर्वे शेठ तुम्ही लई ग्रेट

    उत्तर द्याहटवा
  2. नमाज पढायला नाही म्हणणारा पोरगा याच गाण्यावर मजेत नाचतो, हे दाखवतील का? हिंदू मुस्लीम करायचे नाही. पण चुकूनही असे उदाहरण कुठल्याच सिनेमात, सिरियलीत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. खर्च ग्रेट आहेत तू ,कुठल्याही विषयवार लिहाज शकतोस

    उत्तर द्याहटवा