शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

संत, ‘गोंयचो सायब’ आणि फ्रान्सिस झेविअर

फ्रान्सिस झेविअर यांना संत म्हणून गौरवावे का आणि ते खरोखरच गोंयचो सायब आहेत का, हे दोन प्रश्न जुन्या गोव्याचे फेस्त जवळ येताच ऐरणीवर येतात. या वादात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो, ज्यावर विचार होणे आवश्यक आहे. 

ख्रिश्चन पंथामध्ये ‘संत’ कुणाला म्हणावे, याबाबत काही ठरावीक नियम व प्रक्रिया आहे. चर्चने घोषित केल्याशिवाय कुठल्याही ख्रिश्चन पंथीयाला कुणालाही संत म्हणता येत नाही. भले त्या माणसावर त्यांची श्रद्धा असली तरीही. हिंदू धर्मात लोक ठरवतात. कुठलीही संस्था, उपासना पंथ, राजा किंवा आताच्या भाषेत सरकार ते ठरवू शकत नाही. 

त्यामुळे, ख्रिश्चन संत आणि इतर भारतीय संत यांत मूलभूत फरक आहे. ख्रिश्चन पंथाचा किती प्रचार-प्रसार केला, किती लोकांना ख्रिश्चन बनवले, काय चमत्कार केले या सर्व गोष्टींचा एका प्रक्रियेमार्फत अभ्यास केला जातो. त्यानंतर ती व्यक्ती संत असल्याची औपचारिक घोषणा होते. त्या पद्धतीनुसार फ्रान्सिस झेविअर हे ख्रिश्चन पंथाचे संत आहेत. हिंदूंनी त्यांना संत म्हणावे की, ‘ख्रिश्चन संत’ म्हणून उल्लेख करावा याचा विचार व्हावा. पण, काहीही झाले तरी भारतीय किंवा हिंदू परंपरेतील संत आणि ख्रिश्चन परंपरेतील संत यांच्यात फरक आहेच आणि तो विचारसरणीवर आधारित आहे. 

ख्रिश्चन पंथानुसार संत असलेले फ्रान्सिस झेविअर हे मूळ गोमंतकीय नाहीत. गोव्यातही त्यांची नेमणूक ख्रिश्चन पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच झाली होती. त्यांनी गोव्याच्या भल्यासाठी काही केले नाही. जे काही केले ते ख्रिश्चन पंथाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून केले. संभाजी महाराजांपासून वाचवण्यसाठी पोर्तुगीज व्हाइसरॉय यांनी त्यांना साकडे घातले व त्यांच्या कर्मधर्म संयोगाने संभाजी महाराजांना परतावे लागले. त्यामुळे, पोर्तुगिजांसाठी फ्रान्सिस झेविअर तारणहार ठरले. दुसरा उल्लेख सत्याग्रहींनी केलेल्या उठावाच्या वेळेलाही पोर्तुगीजांच्या हाकेला ते पावले व त्यांची झेविअर यांच्यावर श्रद्धा बसली. 

पोर्तुगिजांना पावलेल्या ख्रिश्चन संत झेव्हिअर यांचा उल्लेख गोव्याचा साहेब म्हणून करणे अजिबात उचित नाही. वास्तविक ज्यांनी गोव्यातील लोकांची सेवा केली ते ख्रिस्ती पंथगुरू मूळ गोमंतकीय होते व तेच खरे गोव्याचे साहेब होते, अशी माहिती असलेला एक लेख इंग्रजीत वाचल्याचे स्मरते. आता पोर्तुगीज गेल्यानंतर येथील ख्रिश्चनांची श्रद्धा फ्रान्सिस झेविअरवर असणे अजिबात गैर नाही. त्यांना तसे अनुभव आले असतील, त्यांची श्रद्धा बसली असेल तर त्या श्रद्धेला नाकारणे सर्वथा अयोग्य होईल. पण, त्यासाठी झेविअर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणावे का, याचे उत्तर गोव्यातील ख्रिश्चन समाजानेच शोधणे आवश्यक आहे. 

यात एक महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक मांडला जातो आणि इतिहासकारांकडून दुर्लक्षिला जातो, तो म्हणजे संभाजी महाराजांच्या गोव्यावरील आक्रमणाचा. संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले नाही. तो त्यांचाच प्रदेश होता. त्यामुळे, ‘संभाजी महाराजांच्या गोव्यावरील आक्रमणापासून संत झेविअर यांनी बचाव केला.’, अशी वाक्यरचना करताना गोवा हा प्रदेश किंवा गोव्यातील काही प्रदेश मराठ्यांच्या आधिपत्याखाली नव्हता, असा इतिहास जाणीवपूर्वक मांडला जात आहे. ही सर्वांत जास्त चिंताजनक बाब आहे. 

संभाजी महाराजांनी अकबराला (औरंगजेबाचा मुलगा) डिचोलीत आश्रय देऊन ठेवला होता. त्यामुळे, त्याला मारण्यासाठी सैन्य गोव्याच्या सीमेवर रवाना झाले होते. संभाजी महाराज त्यात गुंतून राहतील व अंत्रुज महाल ताब्यात घेता येईल, असा बेत आखून व्हॉइसरॉयने आक्रमण केले होते व त्यामुळे पुढील रामायण घडले. संभाजी महाराज अचानक पोर्तुगीजांवर आक्रमण करण्यासाठी गोव्यात टपकले आणि त्यांच्या आक्रमणापासून पोर्तुगीजांना ख्रिश्चन संत झेविअर यांच्या कृपेने वाचवले, असे जे ध्वनित करण्याचा प्रयत्न होत आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. इतिहास संशोधकांनी गोव्याला केंद्रबिंदू ठेवून विस्तृत लिखाण करण्याची गरज आहे. 

‘कुणीतरी नेहरू नावाचा माणूस आहे, तो पोर्तुगालवर  आक्रमण करत आहे. त्याच्याविरुद्ध युद्ध लढण्यासाठी आम्ही निघालो आहोत.’, असे पोर्तुगीज सैनिक उजगावात सांगत, अशी आठवण जुन्या जाणत्यांच्या तोंडून ऐकली आहे. संभाजी महाराज आणि ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेविअर यांच्या पोर्तुगीजांवरील कृपाशीर्वादाचा उल्लेख येतो तेव्हा हीच गफलत केली जाते. जुन्या गोव्याच्या फेस्तादरम्यान ‘गोंयच्या सायबा’वरील वादात, ‘हा प्रदेश मराठ्यांचाच होता आणि पोर्तुगिजांनी त्यावर आक्रमण केले होते’, हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो, ज्यावर विचार होणे आवश्यक आहे.