शुक्रवार, २२ जुलै, २०२२

आदिवासी, दलित आणि अल्पसंख्य असणे एवढे महत्त्वाचे आहे का?


राष्ट्रपती पदासाठी नावाचा उद्घोष करताना आणि प्रचार करताना भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या नावाआधी ‘आदिवासी’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख केला. आपण ‘दलित’ असल्याने अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री दिनेश खटीक यांनी केला आहे. स्मृती इराणी यांना अल्पसंख्याक प्रभारी मंत्री करण्यात आले तेव्हा, काँग्रेस,  इतर विरोधी पक्ष व विचारवंत यांनी, ‘भाजपला एकही मुस्लीम व्यक्ती सापडला नाही का?’, अशी विचारणा केली. आपण ज्या मानसिकतेचा आत्यंतिक तिरस्कार करतो, त्याच मानसिकतेत अधिकाधिक गुंतत चाललो आहोत.

द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्या उत्तम शिक्षिका, उत्कृष्ट प्रशासक आणि स्वतंत्र प्रज्ञेच्या सहृदय व्यक्ती म्हणून राष्ट्रपती होण्यास अगदी योग्य आहेत. काही अपवाद वगळता मोदी यांनी निवड केलेल्या व्यक्ती उत्तम प्रशासक असतात. किंबहुना या गोष्टीला ते प्राधान्य देतात. यासाठी प्रसंगी प्रचलित विचारधारेच्या ते विरुद्ध जातात. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, आसाममध्ये हेमंत विश्वशर्मा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. योगींनी पक्षाविरुद्धच बंड पुकारले होते, विश्वशर्मा हे काँग्रेसमधून आलेले आणि फडणवीस हे मराठा नसून ब्राह्मण आहेत. बंडखोर प्रवृत्ती असलेले, मूळ भाजप संस्कार नसलेले आणि बहुसंख्य, बहुजन नसलेले अशा व्यक्तींची निवड ही ‘हमखास निवडून येण्याचे प्रचलित निकष’ नसतानाही केवळ क्षमता आणि प्रशासकीय कौशल्य यावरून करणे धाडसाचे आहे. भाजपच्या पुढच्या फळीसाठी उत्तम व कुशल प्रशासक असलेल्या व्यक्तींची जाणीवपूर्वक केलेली ही निवड अन्य राजकीय पक्षांत आढळत नाही. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून निवडतानाही त्यांचे कुशल प्रशासक असणे खूप महत्त्वपूर्ण ठरले. पण, जेव्हा प्रचार केला गेला तेव्हा मात्र त्यांचे आदिवासी असणे प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आले. आदिवासी व महिला असणे हा मुद्दा माध्यमांनी अधिक ठळकपणे मांडला. त्यांचे आदिवासी असणे याचा आणि सामर्थ्य, पद, प्रगती यांच्याशी संबंध लावून आपण त्यांच्या गुणकौशल्याला कमीपणा आणतो. त्याहीपुढे जाऊन आपण त्याच सामाजिक विषमतेला खतपाणी घालतो, जिचा विरोध करण्याचा दावा आपण करत आहोत. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.

आपण ‘दलित’ असल्याने अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री दिनेश खटीक यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या, व्हायरल झालेल्या पत्रात केला आहे. दुसरा आरोप त्यांनी आपली काही कामे होत नसल्याचा केला आहे. तिसरा आरोप त्यांनी आपल्या खात्यातील अधिकार्‍यांच्या बदल्यांत भ्रष्टाचार झाल्याचा केला आहे. या तीन आरोपांपैकी दुसरा व तिसरा यात तथ्य असण्याचा संभव आहे. ‘माफिया राज’विरुद्ध कारवाईनंतर योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली आहे. हे थोडे कठीण आणि वेळकाढू काम आहे. प्रशासकीय अधिकारी आणि आमदार व मंत्री यांच्या खवय्येगिरीने उत्तर प्रदेशमध्ये उच्छाद मांडला होता. ‘वर’पर्यंत पैसे पोहोचवणे हे अधिकार्‍यांचे नित्यकर्म झाले होते. या भ्रष्टाचाराच्या वाहत्या गटारगंगेत सगळेच आपले हात धुऊन घेत असत. आता चाप बसायला लागल्यानंतर हे अधिकारी कामे या ना त्या कारणाने अडवून धरू लागले आहेत. खटीक यांनी त्याचा संबंध आपल्या जातीशी लावला आहे. जेवढी भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम तीव्र होत जाईल तेवढे योगी आदित्यनाथ आपल्याच मंत्रिगणांमध्ये आणि प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये अप्रिय होत जातील. भ्रष्टाचारात लिप्त असलेले अधिकारी व मंत्री यांच्यामध्ये सर्व जातीचे, पंथाचे लोक आहेत. आदिवासी, दलित या सदराआड लपलेले व मंत्रिपद भूषविलेले अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या समाजाकरता काहीही न करता केवळ स्वत:साठी संपत्ती गोळा केली. मधू कोडासारखी अनेक माणसे या ‘मागास समाजा’च्या बुरख्याआड स्वत:चाच विकास करतात. आदिवासी, दलित, अल्पसंख्य या ढाली ते स्वत:च्या बचावासाठी पुढे करतात. त्यांच्यावर कारवाई (त्यांच्या म्हणण्यानुसार अन्याय) म्हणजे समाजाविरुद्ध उचललेले पाऊल असे त्यांचे म्हणणे असते. अनेकवेळा संख्यबळाच्या राजकीय समीकरणांसाठी अशी माणसे वाचतातही. पण, हे समाजव्यवस्थेसाठी घातक आहे.

मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर  त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक कल्याण खात्याची प्रभारी जबाबदारी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना देण्यात आली. त्यावर विरोधी पक्ष आणि विचारवंतांनी त्यावर टीका केली. तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी, ‘कट्टर हिंदू असलेल्या व पारश्याशी लग्न झालेल्या स्मृती इराणींना ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्या कल्याणासाठी असलेल्या खात्याचा कारभार सोपवण्यात आला. हे भाजपचे सेक्युलरिजम आहे का?’, असे ट्वीट केले. गंमत अशी की, पारशी समाज अल्पसंख्य या सदरात मोडतो, हे या लोकांच्या गावी नाही किंवा अल्पसंख्याक म्हणजे केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चन असा समज काँग्रेससकट सर्वांचा आहे. मुळात, ‘मुस्लीम व ख्रिश्चन हे अल्पसंख्य कसे?’ हाच खरा प्रश्न आहे. अल्पसंख्य ही संकल्पना संख्येशी संबंधित आहे. एकूण संख्येच्या किती टक्क्यांपर्यंत अल्पसंख्य गणले जावे, हेच मुळात ठरले नाही. खरे तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा, एवढा मोठा व गंभीर विषय आहे. पण, पारशी असलेल्या स्मृती इराणी अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाचा प्रभारी ताबा घेण्यास योग्य आहेत की, नाही हे ठरवण्याचा निकष ‘त्या मुस्लीम किंवा ख्रिश्चन आहेत की नाही?’, हा कसा असू शकतो? एखाद्या समाजाचे प्रश्न त्याच समाजातील व्यक्ती मंत्री किंवा मुख्यमंत्री झाल्यास सोडवू शकतो, हा विचारही त्याच सामाजिक विषमतेचा विरोध करण्याला छेद देणारा आहे. तसेच, ‘अल्पसंख्याकांतील बहुसंख्य असलेल्यानाच अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व दिले जावे’ हा घातक विचार रुजवणारेही आहे.

ज्याचा आत्यंतिक विरोध करतो, कालांतराने आपणही तसेच होत जातो. हा सिद्धांत जसा वैयक्तिक पातळीवर लागू होतो, तसाच तो सामाजिक पातळीवरही लागू होतो. सामाजिक विषमतेच्या विरुद्ध लढता लढता आपण तिलाच पोसत आहोत. ‘संख्याबळ’ ही राजकीय अपरिहार्यता असते. पण, त्यासाठी सामाजिक विषमता वाढत असेल तर त्याचा विचार आपण समाज म्हणून केला पाहिजे. ‘आदिवासी’, ‘दलित’, ‘अल्पसंख्य’ ही व अशी तत्सम विशेषणे वापरणे बंद केले पाहिजे. ‘दलित असूनही त्याने पहिला क्रमांक पटकावला’ असे वाक्य जेव्हा आपण वापरतो तेव्हा ‘दलित (मुळात हा शब्द वापरणेच चुकीचे आहे, पण केवळ माझा मुद्दा पटवण्यासाठी वापरला आहे.) हुशार किंवा समर्थ नसतात’, असा अर्थ त्यातून निघतो. आपण संपूर्ण समाजालाच नकारात्मक बनवत आहोत. शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे हातात घेऊन स्वत:ला मागास म्हणवून घेण्यासाठी आंदोलने करणारा मराठा समाज, हे या नकारात्मक मानसिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

नकारात्मक मानसिकतेसोबतच ‘कायम (बाय डिफॉल्ट) अन्यायग्रस्त, वंचित व पीडित’ असल्याची पराभूत मानसिकताही जाणीवपूर्वक जोपासली जात आहे. एका वेगळ्या अर्थाने सांगायचे झाल्यास, सत्ता, संपत्ती, स्वार्थ आणि सोय या चार ‘स’वर्णियांचेच राज्य पूर्ण समाजावर सुरू आहे. त्यामुळे, आपल्यामध्ये काय चांगले आहे, आपल्या समाजात पूर्वी कुणी काय चांगले कार्य केले आहे हे ठसवण्याऐवजी आपण आपल्यावर अन्याय कसा झाला व होत आहे हेच ठसवत राहतो. पुढारलेपणापेक्षाही मागासलेपणाला उपयुक्त ठरवत राहतो.

वैयक्तिक आणि सामूहिक उत्कर्षासाठी आपण दलित, आदिवासी आणि अल्पसंख्य असल्याचा आधार घ्यावा लागणे व अपराध लपवण्यासाठी ढाल म्हणून पुढे केले जाणे यातच संपूर्ण समाजाचे अपयश सामावलेले आहे. आपण, आपला समाज यापासून कधी स्वतंत्र होणार हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे!

मंगळवार, १९ जुलै, २०२२

अकस्मात तोही पुढे जात आहे...

‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा’ असं गदिमा गीतरामायणात लिहून गेले, आपण मरणाचा उच्चार करणेही टाळतो. परंतु, आपल्याकडे याचा सखोल विचार झाला आहे. अगदी ‘क्लिनिकल डेथ’पासून ते आध्यात्मिक मृत्यूपर्यंत. मरण त्यालाच येते जो जगत असतो. बाकी, जिवंत असलेल्या व्यक्तीची ‘क्लिनिकल डेथ’ होते. जिवंत असणे आणि जगणे यातला फरक समजावून देणारी सीमारेषा म्हणजे मृत्यू. 

सामान्यत: एकमेकांशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. केवळ देह नव्हे, तर सुख, दु:ख, विचार, घटना, स्मृती, नाती या सगळ्यांचा गोतावळा असतो. आपल्यासाठी ती फक्त एक व्यक्ती नसते, म्हणूनच कुणी गेल्याचे आपल्याला दु:ख होते. आपण तो विषयच टाळतो. आयुष्यात एखाद्या व्यक्तीसोबत आपण किती क्षण घालवले, यापेक्षाही घालवलेले क्षण आयुष्य किती समृद्ध करून गेले हे फार महत्त्वाचे असते. नावाप्रमाणेच सदानंद असलेली व्यक्ती नात्यापेक्षाही वेगळं नामाभिधान घेऊन भेटली, निघूनही गेली. 

काल, सोमवारी दुपारी एक दु:खद बातमी समजली. माझ्या चुलत बहिणीच्या यजमानांना देवाज्ञा झाली. उमाताईने कॉल केला. भावोजी यांच्यासोबत मीही वास्कोला गेलो. सर्व अंत्यसंस्कार त्यांची मुलगी आकांक्षाने केले. वयाच्या मानाने तिचा धीर, प्रसंगाला सामोरे जाणे, अंत्यविधीची तयारी करणे, सर्व विधी पूर्ण करणे प्रत्यक्ष पाहताना खूप समाधान वाटले. सदानंद आता पुन्हा भेटणार नाहीत, पण त्यांच्या मुलींमध्ये ते कायम राहतील. आंकाक्षामध्ये असलेला धीरोदात्तपणा, कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, कुठलाही प्रसंग निभावून नेण्याची व हॅन्डल करण्याची क्षमता हा तिला लाभलेला वारसा आहे. तिची ही तिसरी पिढी आहे. माझ्या काकूने तिच्या सर्व मुलींमध्ये हे गुण रुजवले आहेत. तिच्या मुलींनी तेच गुण आपल्या मुलांमध्येही रुजवले आहेत. 

आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार ज्येष्ठ पुत्राला आपल्याकडील शास्त्राने दिला आहे. मुलींच्यासाठी तो निषिद्ध (करू नये असे) नाही. मग, मुलींनी अंत्यसंस्कार करू नये असा संकेत का रूढ झाला असावा? सामान्यत: स्त्री पुरुषापेक्षा अधिक हळवी, भावनाप्रधान, नात्याला महत्त्व देणारी असते. कुटुंबातील व्यक्ती जाण्याचा जेवढा परिणाम पुरुषावर होतो त्यापेक्षा कैक पटीने अधिक आघात स्त्रीवर होतो. आपल्याही परिचयाच्या घरात एखादी व्यक्ती गेल्यास, अनेकदा घरातील महिलेसाठी डॉक्टरांना पाचारण करावे लागते. आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, पुत्र, कन्या या रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांतील व्यक्तीत स्त्री गुरफटलेली असते. एखाद्या व्यक्तीत आपण जेवढे जास्त गुंतलेलो असतो, तेवढीच जास्त आपली सालपटं त्या व्यक्तीपासून दुरावताना निघतात. मला माझ्या आईला अग्नी देताना आणि तिच्या अस्थी गोळा करताना, जे काही झालं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. स्त्रीला अंत्यसंस्कार करायला न देण्यामागे तिला हा त्रास होऊ नये हा विचार आहे. एखाद्या घरात मुलगा व मुलगी यामध्ये मुलगा हळवा असेल आणि गेलेल्या व्यक्तीत जास्त गुंतलेला असेल, तर मुलाऐवजी मुलीने अंत्यसंस्कार करणेच अधिक योग्य होईल. प्रश्न मुलगा की, मुलगी असा नाहीच, उलट गेलेली व्यक्ती जिवंत असताना तिच्यासाठी सर्व काही करून ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे अंत्यसंस्कारही त्याच आत्मीयतेने करण्याचा धीरोदात्तपणा असलेल्या व्यक्तीने ते करावेत. 

आपल्याला हे माहीत असतं की, आपणही कधीतरी जाणारच आहोत. पण, गमतीचा भाग म्हणजे आता जाणार नाही याचा ठाम विश्वासही असतो. आपण कधी मरणार हे माहीत नसल्यामुळे आलेला तो विश्वास असतो. ‘आपल्यामागे कसं होईल?’ हा विचार आपण आहोत म्हणून सगळं व्यवस्थित आहे, या अहंकारापोटी जन्म घेतो. एखादी वृद्ध व्यक्ती घरामध्ये दिवसातून शंभर वेळा, ‘मी आहे म्हणून चाललं आहे. मी गेल्यावर कळेल.’ असे म्हणत असेल तर कुटुंबीयांच्या मनात एकदा तरी ‘जाऊन पाहा’ असा विचार येतोच. 

आपण मरावं कसं हे आपल्या हातात नसतं, पण जगावं कसं हे मात्र आपल्या हातात असतं. आलेला क्षण शेवटचा आहे, या जाणिवेने येणारा प्रत्येक क्षण जगावा. 

आलेला क्षण शेवटचा आहे, अशा जाणिवेने जेव्हा आपण प्रत्येक क्षण जगतो, तेव्हा मरणाची भीती, दु:ख राहत नाही. आपल्या जाण्याने आर्थिक, व्यावहारिक हानी कमीत कमी व्हावी याची तजवीज आपण केली पाहिजे. होणारी भावनिक हानी, अटळ असते. तिला कुणीही टाळू शकत नाही. पण, प्रत्येक क्षण जगल्याने येणारी निर्भय कृतार्थता आपला मृत्यू आपल्यासाठी सुखद करत असते. आपल्यानंतर कुणाचेही अडून उरणार नाही एवढे आपल्या कुटुंबाला आपण सक्षम केले आहे, याचे समाधान सतत आपल्यासोबत राहते. उलट, आपण जेव्हा ‘माझ्यानंतर कसं व्हायचं?’ याचा विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मुलांना संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम केले नाही याची ती कबुली असते. 

सदानंदांचे चितेवरील पार्थिव पाहून त्यांच्या जागी मी मला पाहिले. विचार टाळण्यासाठी आकांक्षाकडे पाहिले तेव्हा तिच्यात मला माझी मुलगी श्रिया दिसली. तिलाही कधीतरी हे सर्व करावे लागेल, तेव्हा ती कशी या प्रसंगाला सामोरी जाईल, हा विचारही आला. आपलं मन फार विचित्र असतं. प्रत्येक क्षण जाणिवेने जगत असलो तरीही कुणाचे खांदेकरी होताना, स्मशानात चिता जळताना पाहून कुठले विचार मनात येतील हे काही सांगता येत नाही. ते जसे येतात तसे स्मशानातून बाहेर पडल्या पडल्या निघूनही जातात. म्हणूनच त्याला ‘स्मशानवैराग्य’ म्हणत असावेत.  अशावेळी थांबावं. थोडं मागे वळून पाहावं. 

समर्थांनी, ‘एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ या ओळी आपल्या मनाला सांगण्यासाठीच लिहिल्या आहेत. संसारासाठी धावपळ करताना, दररोज काही क्षण आपल्यासाठी बाजूला ठेवावेत. स्वत:चं सेल्फ ऑडिट करावं. आपण प्रत्येक क्षण शेवटचा आहे, या जाणिवेने जगत आहोत का, याचा विचार करावा. आपण जिवंत आहोत की, जगत आहोत याचाही विचार करावा. असा विचार दररोज माझ्या मनात येतो. मरणाआधी मरायचं नाही, हे ठामपणे सांगून जातो.


रविवार, १७ जुलै, २०२२

इतिहास नाकारणार्‍यांचे वर्तमान भयावह, भविष्य भयाण...

उपलब्ध पुरावे, त्यातून काढलेला इतिहासाचा निष्कर्ष वर्तमानात स्वीकारताना आपण कच खातो, त्यामागे श्रद्धा आणि भीती ही दोन कारणे आहेत. त्यामुळे एक तर आपण निष्कर्ष नाकारतो किंवा तो इतिहासच नाकारतो. इतकेच कशाला, त्याचे वाचन, तौलनिक अभ्यास करून त्यावर विचार, मत मांडणेही नाकारतो. इतिहासच नाकारल्याने वर्तमान भयावह आणि भविष्य भयाण होते, याचे प्रत्यंतर हा देवभूमीचा इतिहास वाचून आल्यशिवाय राहत नाही.

भारतातील प्रत्येक राज्य ही देवभूमी आहे, याचा आम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे, कुणी गोव्याचा उल्लेख ‘देवभूमी’ असा केला की, आश्चर्य वाटतं. ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘इतिहास देवभूमिचा’ या पुस्तकाने नावापासूनच कुतूहल जागृत केले. 

या पुस्तकाच्या पूर्वार्धात बारा व उत्तरार्धात सव्वीस प्रकरणे आहेत. अथक परिश्रमाने केलेले संशोधन आहे, एकेका संदर्भासाठी पालथी घातलेली असंख्य पुस्तके आहेत. त्या पुस्तकांची सूची वाचूनच धडकी भरते. एवढी पुस्तके वाचून काढायला आपल्याला एक जन्मही पुरणार नाही. मांद्रेकर यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांतून त्यांनी नेमके संदर्भ आपल्यासमोर ठेवले आहेत. एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल. उत्तम दर्जाचा कागद, छपाई, हार्डबाइंडिंग, भरपूर चित्रे, एकूणच पुस्तकाचा दर्जा पाहता प्रकाशक विलासराव परशुराम मांजरेकर यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही, याची प्रचिती येते. थोडा वेगळा व आकर्षक फॉन्ट वापरला असता तर अजून रंगत आली असती. जे जे ऐतिहासिक संदर्भ जिथे जिथे आले आहेत, तिथेच परिशिष्टांत नमूद केलेल्या संदर्भ-पुस्तकाचा क्रमांक द्यायला हवा होता. पानाच्या खालच्या बाजूस संदर्भ देणे शक्य होते. अनेक ठिकाणी झालेली वाक्यांची पुनरावृत्ती टाळणेही तितकेच आवश्यक होते. पण, या मला वाटलेल्या नगण्य बाबी आहेत. मांद्रेकर यांनी जे संशोधन केले आहे, जो अभ्यास केला आहे आणि त्यासाठी जे परिश्रम घेतले आहेत, त्यासमोर या बाबी फारच नगण्य आहेत.

विलासराव आणि ज्ञानेश्वर मांद्रेकर या उभयतांच्या जैतापूर प्रवासात समोर आलेली ही कल्पना मूर्तरूपात जेव्हा आपल्या हाती येते, तेव्हा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचा प्रवास कधी संपतो, हे लक्षातच येत नाही. नाही म्हणायला काही पाने वाचताना प्रचंड त्रास झाला. प्रत्येक गोमंतकीयाने या पुस्तकातील पान क्र. ९ ते पान क्र. २२ एवढी तरी पाने अवश्य वाचावीत. पान क्र. १४वर छळाचे जे अकरा प्रकार एकेका वाक्यात वर्णन केले आहेत, ते खरोखर वाचवत नाहीत.  इन्क्विझिशनमध्ये कशा प्रकारे छळ केला जात असे, याची काही चित्रेही आहेत. आपल्या पूर्वजांनी हे अमानुष अत्याचार कसे व कशासाठी सहन केले आणि त्यामुळेच आपण आज आहोत, याचे भान, याची जाणीव प्रत्येक गोमंतकीयाने अवश्य ठेवावी. 

मला व्यक्तिश: आवडलेला भाग म्हणजे कुंकळ्ळीकरांनी स्वधर्मासाठी दिलेला लढा. हाच भाग किंवा यातील काही वेचीव भाग शालेय अभ्यासक्रमात आवर्जून घेतला जावा. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या आणि तहाची कलमे नव्हेत. भविष्य घडवण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे स्फुल्लिंग वर्तमानात जागृत ठेवणे म्हणजे इतिहास. आपले अस्तित्व, आपला धर्माभिमान टिकवून ठेवण्यासाठी त्वेषाने पुढे सरसावलेला ९५वर्षांचा यशवंत नाईक असो किंवा आऊतु-दे-फॅ या समारंभात आपल्याच आईवडिलांच्या डोळ्यादेखत जिवंत जाळलेला लहान पोर असो, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात स्थान नसलेले हेच आबालवृद्ध भविष्य घडवण्यास समर्थ असतात.

इतिहासात घडून गेलेल्या घटना आपण बदलू शकत नाही. पण, त्यातून काढलेले निष्कर्ष आपले आजचे जीवन व आपल्या पुढील पिढीची दिशा व दशा बदलू शकतात. मांद्रेकर यांनी या पुस्तकात अनेक निष्कर्ष निर्भीडपणे मांडले आहेत. अर्थात, ती त्यांची मते व विचार आहेत. ती कुणाला पटो किंवा न पटोत, पण त्यावर वाचन आणि विचार होणे आवश्यक आहे. गोव्यातील मंदिरांचा विद्ध्वंस, केवळ ख्रिश्चन पंथ स्वीकारावा यासाठी केलेले अमानुष अत्याचार, या छळाविरुद्ध झालेला प्रतिकार, गोव्यातील महत्त्वाचे भाग, महाल पोर्तुगीज आधिपत्याखाली येणे, त्याचे राजकीय सामाजिक परिणाम, स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात गोवामुक्तीसाठी झालेले प्रयत्न, त्यात सर्व विचारधारेच्या लोकांचा सहभाग, नेहरू यांना गोव्यातील लोकांनीच पुढाकार घेऊन गोवा मुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे वाटणे व १९५५ ते १९६१ या काळात त्यासाठी त्यांनी पुकारलेला असहकार आणि मुक्त झालेला गोवा हा प्रवास अधोरेखित करताना मांद्रेकर यांनी मांडलेले निष्कर्ष पटतात. त्यातील त्यांचा निर्भीडपणा अधिक भावतो. 

देवी म्हाळसा, म्हामल याविषयी त्यांनी दिलेली व्युत्पत्ती आणि त्याविषयी असलेली मतभिन्नताही त्यांनी संदर्भासह मोकळेपणाने मांडली आहे. आपल्या ज्ञातीविषयी आणि देवतेविषयी असलेले ममत्व आणि सार्थ अभिमान पानापानांत जाणवतो. कुलदेवतेच्या प्राचीन मूर्तीला मध्यभागी न ठेवता बाजूला ठेवले जाण्यात त्यांना वाटणारे दु:खही जाणवते. इतर मंदिरात जुनी, प्राचीन मूर्ती मध्यभागी ठेवून तिच्याच मागे नवीन मोठी मूर्ती स्थापन झाल्याची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. कुळाचा इतिहास, कुलदेवतेचा इतिहास यावरून काढलेला निष्कर्ष म्हणूनच वाद उत्पन्न करण्यासाठीच काढला आहे, असे वाटत नाही. पाच हजार वर्षांपूर्वी गावर्‍हाटी स्थापन करणार्‍या सोमवंशी व नागवंशी महागणांना यथोचित स्थान दिल्याचा अभिमान व आपल्या कुलदेवतेच्या मूळ मूर्तीला मध्यभागी स्थान न देण्याची खंत म्हणूनच प्रामाणिक आहे.

तसेच ‘आळया पूत’ संदर्भात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या स्मरणार्थ आजही नारळी पौर्णिमेला मंदिर काळोखात व कडीकुलूप लावून भक्तांकरिता बंद ठेवले जाते या प्रथेस त्यांनी विरोध केला आहे, त्या दिवशी बंद असणारे मंदिराचे दरवाजे उघडावेत व भाविकांना दर्शन घेऊ द्यावे, हे मत त्यांनी मांडले आहे. अर्थात हा विषय समस्त ज्ञातीच्या श्रद्धेशी व आजवर पाळत आलेल्या प्रथेशी निगडीत आहे. त्यामुळे, त्या वरचा सारासार विचारही सर्वानुमते होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुठलाही पूर्वग्रह न बाळगता मांद्रेकर यांचे हे पुस्तक वाचणे नितांत गरजेचे आहे. आपण मांडलेले मत,  निष्कर्ष हेच खरे व योग्य आहेत, असा त्यांचा आग्रह अजिबात नाही, उलट काही चूक असल्यास ती अभ्यासपूर्वक, संदर्भासह दाखवून द्यावी, आपण त्यात बदल करू, असे आवाहन ते करतात.  हीच गोष्ट मला एक वाचक म्हणून खूप भावली. 

सारस्वतांनी केवळ स्वत:कडेच ठेवलेली महाजनकी असो किंवा ख्रिश्चनांनी केलेले इन्क्विझिशन असो, त्यासाठी आता असलेल्या त्यांच्या वंशजांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याप्रमाणेच त्या घटनांचा उल्लेखच अभ्यासक्रमातून वगळणेही तितकेच चुकीचे आहे. पोर्तुगालमधील ख्रिश्चनांनी हिंदूंवर गतकाळात केलेले अमानुष अत्याचार वाचून कुणीही हिंदू आज ख्रिश्चनांचे गळे कापणार नाही, हजारो मंदिरे पाडली म्हणून चर्चही कुणी पाडणार नाही आणि दोन्ही समाजांमधील सामंजस्यही बिघडणार नाही. गोवामुक्तीसाठी या पोर्तुगिजांविरुद्ध उठाव करणारे जसे हिंदू होते, तसे ख्रिश्चनही होते याची जाण प्रत्येक गोमंतकीयाला आहे. 

उपलब्ध पुरावे, त्यातून काढलेला इतिहासाचा निष्कर्ष वर्तमानात स्वीकारताना आपण कच खातो, त्यामागे श्रद्धा आणि भीती ही दोन कारणे आहेत. त्यामुळे एक तर आपण निष्कर्ष नाकारतो किंवा तो इतिहासच नाकारतो. इतकेच कशाला, त्याचे वाचन, तौलनिक अभ्यास करून त्यावर विचार, मत मांडणेही नाकारतो. इतिहासच नाकारल्याने वर्तमान भयावह आणि भविष्य भयाण होते, याचे प्रत्यंतर हा देवभूमीचा इतिहास वाचून आल्यशिवाय राहत नाही.

------------------------------

पुस्तक : इतिहास देवभूमिचा

लेखक : ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर  - ९८२०३२२५५८/८७८८१८२४८६

प्रकाशक : विलासराव परशुराम मांजरेकर - ९८२०२९६११६

------------------------

गोवन वार्ताच्या तरंग पुरवणीत दि. १७ जुलै २०२२ रोजी छापून आलेल्या लेखाची लिंक.

https://goanvarta.net/story.php?id=36564


रविवार, १० जुलै, २०२२

मागणे न काही, सांगण्यास आलो...


लोक वारीला का जातात?’, ‘यातून मिळतं काय?’ असे प्रश्न अनेकांना पडतात. काय मिळतं हे शब्दात सांगणं कठीण आहे. पण, शेकडो वर्षे वारी अखंड सुरू आहे, याचाच अर्थ वारकर्‍याला काही ना काही तरी निश्चितच मिळत असले पाहिजे. कदाचित वर्षभर काबाड कष्ट करण्याची ऊर्जा, आत्मिक समाधान आणि त्या सावळ्या विठू माउलीचे वात्सल्य. 

आपल्या उपास्यदैवताच्या भेटीला वर्षातून एकदा किंवा दोनदा जाणे याला वारी म्हणतात. वारीसाठी जातो तो ’वारकरी’. वारी म्हणजे यात्रा नव्हे. त्रिस्थळी असो किंवा इतर कुठलीही यात्रा असो, आपण सहसा आयुष्यातून एकदाच करतो. वारी ही नियमाने दरवर्षी केली जाते. विठ्ठलाची भेट घेण्याशिवाय अन्य कुठलाही हेतू मनात नसताना पंढरपुरी येण्याला वारी म्हणतात आणि अशी वारी करणार्‍याला वारकरी. केवळ चंदनाचा टिळा लावल्याने, तुळशीची माळ घातल्याने, टाळ कुटल्याने, तोंडाने विठ्ठलाचे नाव घेतल्याने आणि दरवर्षी पंढरपूरला जाण्याने वारकरी होत नाही. 

माळ, टाळ आणि टिळा ही प्रतीके आहेत. गळ्यात माळ घालणार्‍याने दुसर्‍यावर ओरडायचं नसतं. टाळ कुटणार्‍याने कुटाळक्या करायच्या नसतात. केवळ भजनाला टाळ दिल्याने भक्त होत नाही.  भक्त होण्यासाठी भक्ती आणि भाव हे दोन टाळ हाती धरावे लागतात. गळ्यात माळ, हाती टाळ आणि कपाळी टिळा ही आत्मरूप शांती, भाव-भक्ती आणि वैराग्याची प्रतीके आहेत. बाह्यांगाने दिसणार्‍या प्रतीकांवरून आपण वारकरी, भक्त असल्याची परीक्षा करतो. वास्तविक अंतरंगामध्ये प्रतीकामागची अवस्था असेल तर माळ, टाळ आणि टिळा लावण्याला अर्थ असतो, वारकरी, भक्त होण्याला अर्थ असतो. 

आपण आपल्या गरजा अनाठायी वाढवून ठेवल्या आहेत. या गरजा सीमित केल्या की माया, मोह आटोक्यात येतात. भुकेपुरती भाकरी, निवार्‍याला झोपडी आणि ऊब मिळेपुरती गोधडी एवढ्या गरजा मर्यादित ठेवल्या तर माया आणि मोह यांना उगाळून पिता येते. भाकरी, गोधडी आणि झोपडी ही प्रतीके आहेत अन्न, वस्त्र आणि निवार्‍याची. यापलीकडे संग्रहाची आसक्ती माया आणि मोह यात गुरफटवून टाकते. याचा अर्थ श्रीमंती वाईट, गरिबी चांगली असा अजिबात नाही. वारकरी, भक्त म्हटला की, तो गबाळा, बावळट, गरीब असला पाहिजे हा गैरसमज आहे. उन्नतीसाठी प्रयत्न करणे वर्ज्य नाही. उलट, प्रयत्न करीत राहणेच अपेक्षित आहे. 

देह, बुद्धी ही परमेश्वराने आपल्याला दिलेली भेट आहे. त्याच्या माध्यमातून आपण काय करतो, ती आपण परमेश्वराला दिलेली भेट आहे. देह आणि बुद्धी दिल्यानंतरही आपण परमेश्वराकडे केवळ मागणं आणि तक्रारी करत असू तर त्याच्या देण्याला काय अर्थ राहिला? कुठेतरी सुंदर ओळी वाचल्या होत्या,

केलीस प्रत्येक वसनाची झोळी भीक मागण्या 
लावणे कफनास खिसा जमणार नाही तुला

मागितलेलं ठेवण्यासाठी प्रत्येक वस्त्राला आपण खिसा लावतो, पण प्रेतावर घालायच्या वस्त्राला मात्र खिसा नसतो. आपलं मागणं आणि तक्रारी कधी संपतच नाहीत. मुळात देव,  संत आणि संन्यासी यांच्याकडे देण्याघेण्यासारखं काही नसतच. निसर्ग म्हणा, व्यवस्था म्हणा किंवा देव म्हणा यांनी जिवाला आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता आधी केलेली असते. गर्भात असताना नाळेतून, दात नसताना आईच्या स्तनातून  जीव जगवण्याची व्यवस्था आहे. तशीच त्यानंतरही आहेच.  ऐहिक, भौतिक गरजा भागवण्यासाठी आवश्यक साधने जीव जन्म घेताना बरोबर घेऊन येतो. त्यामुळे त्यासाठी देवाला हात जोडण्याची काहीच आवश्यकता नाही. 

आता एक प्रश्न साहजिकच मनात येतो, ‘मग, देव हवाच कशाला आणि ही वारी तरी कशाला करायची?’ देव ही गरज नाही, तर अपरिहार्यता आहे. देव म्हणजे ऊर्जेचा स्रोत. आपण देवाकडे देवासाठी जायचं असतं, आपल्यासाठी नाही. म्हणूनच, आपण कधी देवाला भेटण्यासाठी गेलो आहोत का, याचा विचार प्रत्येकाने करावा. आपण देवळात देवासाठी नाही, तर आपल्यासाठीच जात असतो. जे मिळवण्याचं सामर्थ्य त्याने दिलं आहे, ते न वापरता त्याच्याकडे सगळं मागायला जातो. जे प्रश्न, समस्या सोडवण्याचं सामर्थ्य त्याने दिले आहे, ते न वापरता आपण फक्त तक्रारी करण्यासाठी त्याच्याकडे जातो. तक्रार आणि मागणं थांबलं की भक्तीला सुरुवात होते. मागणं घेऊन कितीही वेळा विठ्ठलाकडे गेलो तरी ती येरझारच ठरते ’वारी’ नाही. तक्रारी, मागणं थांबल्यानंतरही वार्‍या करणारा ‘वारकरी’ होतो.

आपण नास्तिक, आस्तिक, रंक, राव असण्याने देवाला काहीच फरक पडत नाही. देव आस्तिकत्वाची शालही पांघरत नाही आणि नास्तिकत्वाची झूलही पाठीवर घेत नाही. खर्‍याखुर्‍या नास्तिकासाठी तो विठ्ठल देऊळ सोडून बाहेर येतो की नाही, माहीत नाही. पण, केवळ देवाला भेटायला येणार्‍यासाठी तो कायम तिथेच असतो एवढं नक्की. देवाला पाहायची ओढ फक्त वारकर्‍यालाच असते, असे नव्हे तर या वारकर्‍याला भेटण्याची ओढ देवालाही असते. वारकरी आल्या आल्या देव विचारतो,

काय रे बाबा! कसा आहेस? कशासाठी येणं केलंस?’ 

वारकरी आपल्याच मस्तीत, नम्रपणाने आणि भक्तिभावाने देवाच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, 

मागणे न काही, सांगण्यास आलो...’.


चित्रस्रोत : आंतरजाल

गुरुवार, ७ जुलै, २०२२

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी...

प्रश्न तुम्ही काय दाखवता यापेक्षाही काय दाखवूच शकत नाही याचा आहे.

लीना मणिमेकलाई यांनी लघुपटाचे पोस्टर जाहीर केले. ज्यात कालीमातेला सिगारेट ओढताना व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेला दाखवण्यात आले आहे. यावर अनेक ठिकाणी चर्चा व डिबेट सुरू आहे. याला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ म्हणावे का?, शाक्तपंथीयांच्या भावना दुखावल्या म्हणून प्रदर्शने केली जावीत का? काही मुस्लीम संघटनांनी गळा कापण्याच्या धमक्या दिल्या व काहींनी प्रत्यक्ष कृतीही केली, तसे काही करावे का? चित्रपट, लघुपट यात केवळ हिंदू देवदेवतांवरच सातत्याने टीका का केली जाते? तृणमूलच्या महुआ मोइत्रा यांचे वक्तव्य आणि त्यावर पक्षाची अधिकृत भूमिका, हे व असे अनेक मुद्दे यावर अनेकांनी आपली भूमिका मांडली. यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत, तेवढ्यावरच विचार मांडावेसे वाटले.

काली किंवा महाकाली या देवतेला मद्य आणि मांस वर्ज्य नाही, असा मुद्दा जो महुआ मोइत्रा यांनी मांडला त्याविषयी खुलासा करणे आवश्यक आहे. शाक्त पंथामध्ये घुसलेले पंच ‘म’कार याची निर्भर्त्सना भारतभरातल्या संतांनी केलेली आहे. जवळपास प्रत्येक हिंदू संप्रदाय, मत व पंथांत तंत्रमार्ग आहे. बौद्धमतामध्येही मंत्रयान, वज्रयान, सहजयान, कालचक्रयान असे तंत्रमार्गी प्रकार आहेत. कुठल्याही पंथातील तंत्रमार्ग आणि आध्यात्मिक मार्ग यात मूलभूत फरक नीतिमत्तेचा असतो. तंत्रमार्गी व्यक्तीला नीतिमत्तेशी काही देणंघेणं नसतं. त्याचं आचरण इतर समाजाने अनुसरण करण्यासाठी योग्य नसतं. उदाहरणच द्यायचं झाल्यास जैन पंथातील श्वेतांबर व दिगंबर यांपैकी दिगंबरांचे देता येईल. प्रचंड उकाड्यात आपल्यालाही या दिगंबरांचा हेवा वाटेल. पण, कडाक्याच्या थंडीतही ते त्याच दिगंबर अवस्थेत राहतात याकडे आपण दुर्लक्ष करतो. तेवढा मनाचा निग्रह झाल्यानंतरच जैन दिगंबर व्हावे हे योग्य. केवळ वाट्टेल तिथे नागडे फिरायला मिळते हा उद्देश असेल तर, आध्यात्मिक उंची गाठण्याचा मूळ उद्देश बाजूलाच पडेल. नेमके तेच प्रामुख्याने शाक्त पंथाचे झाले. 

मद्य, मत्स्य, मांस, मैथुन या गोष्टी पंथाच्या नावाखाली खुलेआम करायला मिळतात म्हणून अनेक लोक शाक्त पंथीय व कालीमातेचे भक्त होऊ लागले. शाक्त पंथ स्वीकारणार्‍यांची संख्या वाढू लागली व पंथाची मूळ आध्यात्मिक मार्गाची रचनाच ढासळू लागली. म्हणूनच त्याला वाममार्ग किंवा वाईट मार्ग म्हणून संबोधण्यात आले आहे. या तंत्रमार्गाला अपवाद म्हणून गणण्यात आले आहे, शाक्तपंथातील तो सर्वमान्य किंवा सर्वांसाठी असलेला मार्ग नाही. अशा अपवादात्मक गोष्टीला नियम म्हणून समोर करून कालीमाता दारू पिते, मांस खाते असे म्हणणे चुकीचेच आहे. महुआ मोइत्रा यांनी सिगारेट ओढण्याचा उल्लेख केला नव्हता ही गोष्ट खरी असली, तरी त्याज्य ठरवलेला अपवादात्मक वाममार्ग त्या पोस्टरच्या समर्थनार्थ  मोठा करून मांडणे चूकच होतं. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत बोलताना एक मुद्दा कायम मांडला जातो, तो यापेक्षाही जास्त भयानक आहे. ‘आम्ही वाट्टेल ते दाखवू, बघावे की बघू नये हे तुम्ही ठरवा’ किंवा ‘दाखवणे हे आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पाहणे व न पाहणे हे लोकांचे स्वातंत्र्य आहे’ असा घातक विचार मांडला जातो. हा मुद्दा मांडून अशा गोष्टींचे समर्थन करणार्‍या व्यक्ती एका प्रश्नाचे उत्तर अजिबात देत नाहीत. नेहमी  व सातत्याने यात हिंदू देवदेवतांचेच विचित्र चित्रण का केले जाते? एक तरी उदाहरण इस्लाम पंथाबद्दल, अल्लाहबद्दल, पैगंबरांबद्दल आहे का? भारतात सोडून द्या, जगभरात सापडणार नाही. याच लीना मणिमेकलाई  पोस्टरवर कालीमातेप्रमाणेच प्रेषितांच्या मातेचे, एका हातात सिगारेट व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेले चित्र दाखवतील का? त्याच्या समर्थनासाठी ‘चित्र काढणे आमचे स्वातंत्र्य आहे, पाहावे की पाहू नये हे मुस्लिमांनी  किंवा ख्रिश्चनांंनी ठरवावे.’, असा तर्क लीना यांचे समर्थन करणारे विचारवंत मांडतील का? 

प्रश्न तुम्ही काय दाखवता यापेक्षाही काय दाखवूच शकत नाही याचा आहे.

मी फक्त माझा मुद्दा स्पष्ट करतोय.त्यांनी कालीमातेला सिगारेट ओढताना दाखवून हिंदू श्रद्धेवर आघात केला आहे, तसा ख्रिश्चन किंवा मुस्लीम श्रद्धेवर आघात करावा, असे मला मुळीच म्हणायचे नाही. ख्रिश्चन, मुस्लीम पंथांतील किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही पंथाच्या श्रद्धावान व्यक्तीला असे कधीही वाटणार नाही. एक श्रद्धावंत कायम दुसर्‍यांच्या श्रद्धेचा आदरच करतो. निंदा करत नाही. जसा आदर अब्रह्मिक पंथांच्या श्रद्धेबद्दल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ठेकेदारांकडून ठेवला जातो, तसाच आदर हिंदूंच्या श्रद्धेबद्दल ठेवावा एवढीच माफक इच्छा आहे. परंतु, जेव्हा हे अनादर व्यक्त करणं  एकतर्फी आणि पुन्हा पुन्हा हिंदूंच्याच बाबतीत घडतं, तेव्हा ते मुद्दाम केलं जातं, असं म्हणण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. 

जिथे गळा कापला जाण्याची भीती असते, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले जात नाहीत, हे वास्तव आहे. बरे, हा मुद्दा उपस्थित केला की, लगेच ‘हिंदू-मुस्लीम करू नका’, असा तर्क देण्यात येतो. पण, केवळ हिंदू धर्माला कायम नकारात्मक पद्धतीने बिंबवण्यामुळे, त्यांच्या उपास्य देवतांना बीभत्स पद्धतीने दाखवण्यामुळे हिंदू-मुस्लीम यांच्यात कलेच्या माध्यमातून भेदभाव अभिव्यक्त केला जातो, त्याचे काय?

हिंदू धर्मातील पंथांमध्ये असलेल्या अपवादात्मक गोष्टींना नियम म्हणून मोठं करून दाखवणं आणि केवळ हिंदू देवदेवतांचंच बीभत्स विडंबन करणं या गोष्टी वारंवार केल्या जात आहेत. याविरुद्ध कुणाचे गळे कापण्याची काहीच गरज नाही. पण, किमान त्याविरुद्ध व्यक्त होणं तरी निश्चितच गरजेचं आहे. ‘मला काय त्याचे?’, ‘आपण भले की आपले काम भले’, ‘यातून काय निष्पन्न होणार आहे?’, ‘समाजात काय फरक पडणार आहे?’ असा विचार करून शांत राहिल्यास आपल्या हिंदू धर्मात जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणण्याचा अधिकारही आपण गमावून बसू! नमाज पठणाचे व दारात क्रॉस असल्याचे आपल्याला कौतुक वाटेल, पण नवीन बांधलेल्या आपल्याच घरासमोर तुळशीवृंदावन उभारण्याची लाज वाटेल. एवढेच नव्हे तर, हिंदू असण्याचीही लाज वाटेल!


मंगळवार, ५ जुलै, २०२२

कन्हय्यालाल, कोल्हे, सामाजिक शांतता आणि भीती

एका टीव्ही डिबेटमध्ये यावर बोलताना, ‘आपके भगवान के विरुद्ध कोई अपशब्द बोले तो आप एफआयआर तक नही करते, आप गला क्या काटोगे?‘ असा एका मुस्लीम विचारवंताने विचारलेला प्रश्न बिघडत्या सामाजिक सौहार्दाबद्दल, शांततेबद्दल व त्याविषयी असलेल्या भीतीबद्दल खूप काही सांगून जातो.

महाराष्ट्रातील अमरावतीचे उमेश कोल्हे यांचे हत्या प्रकरण कन्हय्यालाल यांच्या हत्येआधी घडले आहे. पण, ४८ तासांत दोन आरोपींना पकडूनही कोल्हे यांच्या हत्येचा तपासाची दिशा व गती राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे प्रकरण सोपवण्यात आल्यानंतर प्राप्त झाली. मध्यंतरी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनही झाले. कोल्हे हत्या प्रकरणाचा गवगवा कन्हय्यालाल हत्येप्रमाणे न होणे, तपासाला गती न मिळणे या मागची नेमकी कारणे शोधणे आवश्यक आहे. 

राणा यांच्या मागणीवरून तपास एनआयएकडे जाणे व महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन ही दोन कारणे तपासाला गती मिळण्यासाठी देणे हे राजकारण्यांसाठी सोयीचे असले तरीही त्यातून एक वेगळाच संदेश जातो. पोलिसांची तपासाची पद्धत राजकीय पाठबळावर अवलंबून आहे आणि राजकीय दबावाने ती प्रभावित होते, असे त्यातून ध्वनित होते. प्रशासकीय व्यवस्थेसाठी ही बाब फार चिंताजनक आहे. व्यवस्था आपल्या पद्धतीने कार्यरत राहणे आवश्यक आहे. ती राजकीय दबावानुसार वागते हा समज केवळ व्यवस्थेसाठीच नव्हे तर समाजासाठीही घातक आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकमेकांवर आरोप करताना ‘तपास यंत्रणांचा गैरवापर’ हा मुद्दा उपस्थित करणे वेगळे आणि समाजात तसा संदेश जाणे वेगळे. लोकांच्या मनात पोलिसांविषयीच्या विश्वासाची जागा संशय व भीतीने घेणे योग्य नव्हे. 

हा संशय, ही भीती प्रशासकीय व्यवस्थेतून, न्यायपालिकेतून, विचारवंतांकडून आणि माध्यमांकडूनही समाजात पसरवली जात आहे. न्यायाधीशांनी नूपुर शर्माच्या याचिकेवर सुनावणी करताना जी टिप्पणी केली, ती निकालपत्रात नोंदविण्याचे धाडस दाखवले नाही. एरव्ही याचिकेशी दूरचा संबंध असलेली कोणतीही गोष्ट न्यायालय स्वीकारत नाही. निकाल लागलेला नसताना नूपुर शर्माला उदयपूरच्या घटनेसाठी जबाबदार धरणे हे होत असलेल्या घटनांचे समर्थन ठरते. आपल्या वक्तव्यामुळे समाजात नेमका कोणता विचार पुढे रेटला जात आहे किंवा आपण नेमके कशाचे समर्थन करत आहोत, हे न्यायाधीशांना माहीत नसेल का? न्यायिक प्रक्रियेतील भाष्य असते तर ते निकालपत्रात येणे आवश्यक होते, अन्यथा ते वैयक्तिक मत ठरते. त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया म्हणजे न्यायाधीशांना व्यक्तिगत हल्ला वाटणे व समाजमाध्यमांवर बंधने आणली पाहिजेत असे म्हणणे हे त्यांनी व्यक्त केलेल्या मतांहून जास्त हास्यास्पद आहे. न्यायाधीशांच्या वैयक्तिक मतावर व्यक्त होणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल हीसुद्धा एक भीतीच आहे.

यापेक्षाही आणखी एक भीती सर्वांत जास्त प्रभावी ठरत आहे, ती म्हणजे ‘सामाजिक शांतता’ बिघडण्याची. नूपुर शर्माने केलेले वक्तव्य ही ईशनिंदा कशी, या प्रश्नाचे उत्तर कुणीही देत नाही. ‘तिच्या वक्तव्याने सामाजिक शांतता व सौहार्द बिघडले’, असा आरोप करणारे त्याआधी कितीतरी दिवस शिवलिंगावर अभद्र, बीभत्स आणि हीन दर्जाची वक्तव्ये, चित्रे, व्यंगचित्रे प्रसिद्ध होताना सामाजिक सौहार्द बिघडत होते की, नव्हते या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. आताही एका हातात सिगारेट व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेल्या कालीमातेच्या पोस्टरने सामाजिक सौहार्द, शांतता बिघडत नाही का? 

सातत्याने केवळ हिंदू देवदेवतांचा अपमान होण्याने सामाजिक शांतता बिघडत नाही. एवढेच नव्हे, तर त्याची भीतीही कुणी व्यक्त करत नाही. त्यापुढे जाऊन त्यावर उमटलेली हिंदूंची प्रतिक्रिया मात्र सामाजिक शांतता बिघडवते. हे अजब तर्कट लढवले जात आहे. ‘सामाजिक शांतता बिघडू नये याची जबाबदारी दोन्ही समाजांची आहे’, अशी हास्यास्पद विधाने तर शिळ्या कढीवरची फोडणी आहे. यावरून एक किस्सा आठवला. काही मुले वर्गात दंगा करत होती. शिक्षक वर्गात आल्यावर सर्व मुलांना उद्देशून म्हणाले, ‘मुलांनो वर्गात दंगा करू नका, सर्वांनी शांत बसा. वर्गात शांतता राखणे ही तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे.’ त्यावर शांत बसणार्‍या मुलांपैकी एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, ‘गुरुजी, आम्ही शांतच आहोत. शाळा सुरू झाल्यापासून ती मुलेच दंगा करत आहेत. त्यांना शांत राहायला सांगा.’ त्यावर गुरुजी म्हणाले, ‘गप्प बैस. तुझ्यामुळेच वर्गातली शांतता बिघडत आहे.’

उदयपूरचा घटनाक्रम आपण पाहिला तर, कन्हय्यालालने धमकी मिळाल्याची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी दोन्ही समाजातील संबंधित व्यक्तींना बोलावून सामाजिक शांतता राखण्याचे आवाहन केले. अमरावतीतही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जेव्हा ‘माफी मागण्याचे’ किंवा ‘गळा चिरण्याचे’ धमकीचे संदेश फिरत होते तेव्हा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. आता हाच प्रकार नागपुरातही सुरू आहे. ज्यांना धमकी मिळते त्यांच्यावरच सामाजिक शांतता बिघडवण्याचा आरोप होतोय. उलट त्यांचे अशा प्रकारे धमकी देणे नूपुर शर्माच्या वक्तव्यामुळे आणि तिच्या वक्तव्याला समर्थन दिल्यामुळे घडत असल्याचे बिंबवले जात आहे. इस्लामबद्दल बोलू नका, चिकित्सा करू नका, करणार्‍यांचे समर्थनही करू नका. साधे समर्थनही कराल तर गळा कापला जाईल, सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप माथ्यावर लागेल, याची भीती बिंबवली जात आहे. 

ही भीती बिंबवण्याचे काम आजकालचे नाही. जेव्हा अरबी टोळ्यांनी इस्लाम स्वीकारला तेव्हापासूनची आहे. अल्लाह किंवा पैगंबर यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं. एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इस्लामची, कुराणची चिकित्साच वर्ज्य ठरवली. जे कुणी मुस्लीम किंवा मुस्लिमेतर अशी चिकित्सा करतील, टीका करतील त्यांचे गळे कापणे सुरू केले. यामुळे, इस्लामची जशी भीती, दहशत मुस्लिमांमध्ये निर्माण झाली तशीच ती मुस्लिमेतरांमध्येही निर्माण झाली. कुराणची, इस्लामची जी मूळ आध्यात्मिक शिकवण होती, ती बाजूला पडली आणि राजकीय इस्लामचे वर्चस्व स्थापन झाले. निर्गुण-निराकार अल्लाहच्या प्राप्तीसाठी कलमा, रोजा, नमाज, जकात व हज यांच्या माध्यमातून व्रतस्थ आयुष्यात आध्यात्मिक उंची गाठणे याऐवजी अल्लाहसाठी गळे कापणे, मूर्ती फोडणे महत्त्वाचे ठरले. इस्लाम पंथाचा उदय झाला नव्हता तेव्हापासून आपल्याकडे निर्गुण-निराकार परमात्म्याची संकल्पना आहे. पण, म्हणून सगुण-साकार परमेश्वराच्या मूर्ती कुणी नष्ट केल्या नाहीत किंवा सगुण भक्ती करणार्‍यांचे गळे कुणी नाही कापले. पूर्वीपासून आपल्याकडे कुणी वाईट केले तर, ‘देव बघून घेईल’ असे म्हणण्याची पद्धत आहे. आपण त्याचा न्याय करायला शस्त्र हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. शिवलिंगावर किंवा कुठल्याही हिंदू देवदेवतांवर टीका होते, त्याची अशा प्रकारे प्रतिक्रिया का उमटत नाही, गळे का कापले जात नाहीत, यामागचे हे कारण आहे. एका टीव्ही डिबेटमध्ये यावर बोलताना, ‘आपके भगवान के विरुद्ध कोई अपशब्द बोले तो आप एफआयआर तक नही करते, आप गला क्या काटोगे?‘ असा एका मुस्लीम विचारवंताने विचारलेला प्रश्न बिघडत्या सामाजिक सौहार्दाबद्दल, शांततेबद्दल व त्याविषयी असलेल्या भीतीबद्दल खूप काही सांगून जातो. 

अमरावतीतील व उदयपूरमधील गळे कापण्याच्या घटनांनंतर माध्यमांनीही वक्त्यांच्या मुस्लीम पंथावरील टिप्पणीवर ‘बीप’ वाजवणे सुरू केले आहे. एवढी जबरदस्त भीती निर्भीड असल्याचा दावा करणार्‍या माध्यमांवर बसली आहे. न्यायाधीशांच्या वक्तव्यामागे व अमरावतीत झालेल्या गतिहीन पोलीस तपासामागेही हीच भीती कार्यरत आहे. हिंदू म्हणून अभिमान असणे बहुतांश विचारवंतांनी कधीच सोडून दिले आहे. अभिमान, विश्वास यांची जागा आता सामाजिक शांतता बिघडण्याच्या भीतीने घेतली आहे. प्रत्यक्ष घटना, त्याचा अन्वयार्थ आणि त्याचे पडसाद यापेक्षाही त्याची भीती सर्वांत जास्त प्रभावी ठरते, तेव्हा समजावे की आपण अराजकतेकडे जात आहोत. सामाजिक सौहार्द, शांतता आणि भीती यात भीती वरचढ ठरणे चिंतनीय व चिंताजनक आहे.