रविवार, १७ जुलै, २०२२

इतिहास नाकारणार्‍यांचे वर्तमान भयावह, भविष्य भयाण...

उपलब्ध पुरावे, त्यातून काढलेला इतिहासाचा निष्कर्ष वर्तमानात स्वीकारताना आपण कच खातो, त्यामागे श्रद्धा आणि भीती ही दोन कारणे आहेत. त्यामुळे एक तर आपण निष्कर्ष नाकारतो किंवा तो इतिहासच नाकारतो. इतकेच कशाला, त्याचे वाचन, तौलनिक अभ्यास करून त्यावर विचार, मत मांडणेही नाकारतो. इतिहासच नाकारल्याने वर्तमान भयावह आणि भविष्य भयाण होते, याचे प्रत्यंतर हा देवभूमीचा इतिहास वाचून आल्यशिवाय राहत नाही.

भारतातील प्रत्येक राज्य ही देवभूमी आहे, याचा आम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे, कुणी गोव्याचा उल्लेख ‘देवभूमी’ असा केला की, आश्चर्य वाटतं. ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘इतिहास देवभूमिचा’ या पुस्तकाने नावापासूनच कुतूहल जागृत केले. 

या पुस्तकाच्या पूर्वार्धात बारा व उत्तरार्धात सव्वीस प्रकरणे आहेत. अथक परिश्रमाने केलेले संशोधन आहे, एकेका संदर्भासाठी पालथी घातलेली असंख्य पुस्तके आहेत. त्या पुस्तकांची सूची वाचूनच धडकी भरते. एवढी पुस्तके वाचून काढायला आपल्याला एक जन्मही पुरणार नाही. मांद्रेकर यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांतून त्यांनी नेमके संदर्भ आपल्यासमोर ठेवले आहेत. एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल. उत्तम दर्जाचा कागद, छपाई, हार्डबाइंडिंग, भरपूर चित्रे, एकूणच पुस्तकाचा दर्जा पाहता प्रकाशक विलासराव परशुराम मांजरेकर यांनी कुठेही हात आखडता घेतला नाही, याची प्रचिती येते. थोडा वेगळा व आकर्षक फॉन्ट वापरला असता तर अजून रंगत आली असती. जे जे ऐतिहासिक संदर्भ जिथे जिथे आले आहेत, तिथेच परिशिष्टांत नमूद केलेल्या संदर्भ-पुस्तकाचा क्रमांक द्यायला हवा होता. पानाच्या खालच्या बाजूस संदर्भ देणे शक्य होते. अनेक ठिकाणी झालेली वाक्यांची पुनरावृत्ती टाळणेही तितकेच आवश्यक होते. पण, या मला वाटलेल्या नगण्य बाबी आहेत. मांद्रेकर यांनी जे संशोधन केले आहे, जो अभ्यास केला आहे आणि त्यासाठी जे परिश्रम घेतले आहेत, त्यासमोर या बाबी फारच नगण्य आहेत.

विलासराव आणि ज्ञानेश्वर मांद्रेकर या उभयतांच्या जैतापूर प्रवासात समोर आलेली ही कल्पना मूर्तरूपात जेव्हा आपल्या हाती येते, तेव्हा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचा प्रवास कधी संपतो, हे लक्षातच येत नाही. नाही म्हणायला काही पाने वाचताना प्रचंड त्रास झाला. प्रत्येक गोमंतकीयाने या पुस्तकातील पान क्र. ९ ते पान क्र. २२ एवढी तरी पाने अवश्य वाचावीत. पान क्र. १४वर छळाचे जे अकरा प्रकार एकेका वाक्यात वर्णन केले आहेत, ते खरोखर वाचवत नाहीत.  इन्क्विझिशनमध्ये कशा प्रकारे छळ केला जात असे, याची काही चित्रेही आहेत. आपल्या पूर्वजांनी हे अमानुष अत्याचार कसे व कशासाठी सहन केले आणि त्यामुळेच आपण आज आहोत, याचे भान, याची जाणीव प्रत्येक गोमंतकीयाने अवश्य ठेवावी. 

मला व्यक्तिश: आवडलेला भाग म्हणजे कुंकळ्ळीकरांनी स्वधर्मासाठी दिलेला लढा. हाच भाग किंवा यातील काही वेचीव भाग शालेय अभ्यासक्रमात आवर्जून घेतला जावा. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या आणि तहाची कलमे नव्हेत. भविष्य घडवण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे स्फुल्लिंग वर्तमानात जागृत ठेवणे म्हणजे इतिहास. आपले अस्तित्व, आपला धर्माभिमान टिकवून ठेवण्यासाठी त्वेषाने पुढे सरसावलेला ९५वर्षांचा यशवंत नाईक असो किंवा आऊतु-दे-फॅ या समारंभात आपल्याच आईवडिलांच्या डोळ्यादेखत जिवंत जाळलेला लहान पोर असो, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात स्थान नसलेले हेच आबालवृद्ध भविष्य घडवण्यास समर्थ असतात.

इतिहासात घडून गेलेल्या घटना आपण बदलू शकत नाही. पण, त्यातून काढलेले निष्कर्ष आपले आजचे जीवन व आपल्या पुढील पिढीची दिशा व दशा बदलू शकतात. मांद्रेकर यांनी या पुस्तकात अनेक निष्कर्ष निर्भीडपणे मांडले आहेत. अर्थात, ती त्यांची मते व विचार आहेत. ती कुणाला पटो किंवा न पटोत, पण त्यावर वाचन आणि विचार होणे आवश्यक आहे. गोव्यातील मंदिरांचा विद्ध्वंस, केवळ ख्रिश्चन पंथ स्वीकारावा यासाठी केलेले अमानुष अत्याचार, या छळाविरुद्ध झालेला प्रतिकार, गोव्यातील महत्त्वाचे भाग, महाल पोर्तुगीज आधिपत्याखाली येणे, त्याचे राजकीय सामाजिक परिणाम, स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळात गोवामुक्तीसाठी झालेले प्रयत्न, त्यात सर्व विचारधारेच्या लोकांचा सहभाग, नेहरू यांना गोव्यातील लोकांनीच पुढाकार घेऊन गोवा मुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे वाटणे व १९५५ ते १९६१ या काळात त्यासाठी त्यांनी पुकारलेला असहकार आणि मुक्त झालेला गोवा हा प्रवास अधोरेखित करताना मांद्रेकर यांनी मांडलेले निष्कर्ष पटतात. त्यातील त्यांचा निर्भीडपणा अधिक भावतो. 

देवी म्हाळसा, म्हामल याविषयी त्यांनी दिलेली व्युत्पत्ती आणि त्याविषयी असलेली मतभिन्नताही त्यांनी संदर्भासह मोकळेपणाने मांडली आहे. आपल्या ज्ञातीविषयी आणि देवतेविषयी असलेले ममत्व आणि सार्थ अभिमान पानापानांत जाणवतो. कुलदेवतेच्या प्राचीन मूर्तीला मध्यभागी न ठेवता बाजूला ठेवले जाण्यात त्यांना वाटणारे दु:खही जाणवते. इतर मंदिरात जुनी, प्राचीन मूर्ती मध्यभागी ठेवून तिच्याच मागे नवीन मोठी मूर्ती स्थापन झाल्याची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. कुळाचा इतिहास, कुलदेवतेचा इतिहास यावरून काढलेला निष्कर्ष म्हणूनच वाद उत्पन्न करण्यासाठीच काढला आहे, असे वाटत नाही. पाच हजार वर्षांपूर्वी गावर्‍हाटी स्थापन करणार्‍या सोमवंशी व नागवंशी महागणांना यथोचित स्थान दिल्याचा अभिमान व आपल्या कुलदेवतेच्या मूळ मूर्तीला मध्यभागी स्थान न देण्याची खंत म्हणूनच प्रामाणिक आहे.

तसेच ‘आळया पूत’ संदर्भात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या स्मरणार्थ आजही नारळी पौर्णिमेला मंदिर काळोखात व कडीकुलूप लावून भक्तांकरिता बंद ठेवले जाते या प्रथेस त्यांनी विरोध केला आहे, त्या दिवशी बंद असणारे मंदिराचे दरवाजे उघडावेत व भाविकांना दर्शन घेऊ द्यावे, हे मत त्यांनी मांडले आहे. अर्थात हा विषय समस्त ज्ञातीच्या श्रद्धेशी व आजवर पाळत आलेल्या प्रथेशी निगडीत आहे. त्यामुळे, त्या वरचा सारासार विचारही सर्वानुमते होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुठलाही पूर्वग्रह न बाळगता मांद्रेकर यांचे हे पुस्तक वाचणे नितांत गरजेचे आहे. आपण मांडलेले मत,  निष्कर्ष हेच खरे व योग्य आहेत, असा त्यांचा आग्रह अजिबात नाही, उलट काही चूक असल्यास ती अभ्यासपूर्वक, संदर्भासह दाखवून द्यावी, आपण त्यात बदल करू, असे आवाहन ते करतात.  हीच गोष्ट मला एक वाचक म्हणून खूप भावली. 

सारस्वतांनी केवळ स्वत:कडेच ठेवलेली महाजनकी असो किंवा ख्रिश्चनांनी केलेले इन्क्विझिशन असो, त्यासाठी आता असलेल्या त्यांच्या वंशजांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याप्रमाणेच त्या घटनांचा उल्लेखच अभ्यासक्रमातून वगळणेही तितकेच चुकीचे आहे. पोर्तुगालमधील ख्रिश्चनांनी हिंदूंवर गतकाळात केलेले अमानुष अत्याचार वाचून कुणीही हिंदू आज ख्रिश्चनांचे गळे कापणार नाही, हजारो मंदिरे पाडली म्हणून चर्चही कुणी पाडणार नाही आणि दोन्ही समाजांमधील सामंजस्यही बिघडणार नाही. गोवामुक्तीसाठी या पोर्तुगिजांविरुद्ध उठाव करणारे जसे हिंदू होते, तसे ख्रिश्चनही होते याची जाण प्रत्येक गोमंतकीयाला आहे. 

उपलब्ध पुरावे, त्यातून काढलेला इतिहासाचा निष्कर्ष वर्तमानात स्वीकारताना आपण कच खातो, त्यामागे श्रद्धा आणि भीती ही दोन कारणे आहेत. त्यामुळे एक तर आपण निष्कर्ष नाकारतो किंवा तो इतिहासच नाकारतो. इतकेच कशाला, त्याचे वाचन, तौलनिक अभ्यास करून त्यावर विचार, मत मांडणेही नाकारतो. इतिहासच नाकारल्याने वर्तमान भयावह आणि भविष्य भयाण होते, याचे प्रत्यंतर हा देवभूमीचा इतिहास वाचून आल्यशिवाय राहत नाही.

------------------------------

पुस्तक : इतिहास देवभूमिचा

लेखक : ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर  - ९८२०३२२५५८/८७८८१८२४८६

प्रकाशक : विलासराव परशुराम मांजरेकर - ९८२०२९६११६

------------------------

गोवन वार्ताच्या तरंग पुरवणीत दि. १७ जुलै २०२२ रोजी छापून आलेल्या लेखाची लिंक.

https://goanvarta.net/story.php?id=36564


४ टिप्पण्या:

  1. गोवा म्हणजे फक्त 'खाओ पियो मजा करो ' असे चित्र पर्यटन संबंधितांनी उभे केले आहे. प्रत्यक्षात किती भयानक यातनांमधून गोवेकरांना जावे लागले आहे याचेही दर्शन पर्यटकांना घडायला हवे. जर्मनीतील हिटलरचे काँसेंट्रेशन कॅम्पस, भारतात जालियनवाला बाग जशी सर्वांना दाखविली जाते तसे गोव्यात ही याचे एक स्मारक उभारून सर्वांना दाखवायला हवे.ज्ञानेश्वर मांद्रेकर आणि विलास मांजरेकर यांच्या परिश्रमांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.माझ्या संग्रही हे पुस्तक आहे. एकाचवेळी आनंद, भक्तिभाव आणि प्रचंड दु:ख देणारे आणि सावध करणारे हे पुस्तक म्हणजे खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. सुयोग्य ग्रंथपरिक्षण सर. गोमंतकीय जनतेने किती भयानक अत्याचार सहन केले आहेत याची छोटीशी झलक या ग्रंथात लेखकाने करून दिली आहे. अनन्वित अत्याचार, प्रचंड मानहानी, आपल्याच लोकांची ताटातूट हे सगळं ज्या जनतेने सहन केले त्यांचे दुःख दर्शवण्याचा सुंदर प्रयत्न या ग्रंथात केला आहे....

    द गोवा इन्क्विझिशन म्हणजे गोमंतकातील काळरात्र आहे हे प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे....

    मी दोन वेळा ग्रंथ वाचून काढला. आणखीही हवा तेव्हा संदर्भ घेत असतो. अत्यंत सुंदर संदर्भग्रंथ म्हणून हा नक्की उपयोगी येतो.... वास्तविक मीही परीक्षण लिहिणार होतो... मात्र तुम्ही केलेले परीक्षण छान झाले आहे... अत्यंत सुंदर.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान. नेहमीप्रमाणे उत्तम लेख.

    उत्तर द्याहटवा
  4. वाचून अंगावर शहारे आले.वस्तुस्थिती आजच्या पिढीला समजणे खूपच गरजेचे आहे.खूपच छान लेख.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा