मंगळवार, १९ जुलै, २०२२

अकस्मात तोही पुढे जात आहे...

‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा’ असं गदिमा गीतरामायणात लिहून गेले, आपण मरणाचा उच्चार करणेही टाळतो. परंतु, आपल्याकडे याचा सखोल विचार झाला आहे. अगदी ‘क्लिनिकल डेथ’पासून ते आध्यात्मिक मृत्यूपर्यंत. मरण त्यालाच येते जो जगत असतो. बाकी, जिवंत असलेल्या व्यक्तीची ‘क्लिनिकल डेथ’ होते. जिवंत असणे आणि जगणे यातला फरक समजावून देणारी सीमारेषा म्हणजे मृत्यू. 

सामान्यत: एकमेकांशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. केवळ देह नव्हे, तर सुख, दु:ख, विचार, घटना, स्मृती, नाती या सगळ्यांचा गोतावळा असतो. आपल्यासाठी ती फक्त एक व्यक्ती नसते, म्हणूनच कुणी गेल्याचे आपल्याला दु:ख होते. आपण तो विषयच टाळतो. आयुष्यात एखाद्या व्यक्तीसोबत आपण किती क्षण घालवले, यापेक्षाही घालवलेले क्षण आयुष्य किती समृद्ध करून गेले हे फार महत्त्वाचे असते. नावाप्रमाणेच सदानंद असलेली व्यक्ती नात्यापेक्षाही वेगळं नामाभिधान घेऊन भेटली, निघूनही गेली. 

काल, सोमवारी दुपारी एक दु:खद बातमी समजली. माझ्या चुलत बहिणीच्या यजमानांना देवाज्ञा झाली. उमाताईने कॉल केला. भावोजी यांच्यासोबत मीही वास्कोला गेलो. सर्व अंत्यसंस्कार त्यांची मुलगी आकांक्षाने केले. वयाच्या मानाने तिचा धीर, प्रसंगाला सामोरे जाणे, अंत्यविधीची तयारी करणे, सर्व विधी पूर्ण करणे प्रत्यक्ष पाहताना खूप समाधान वाटले. सदानंद आता पुन्हा भेटणार नाहीत, पण त्यांच्या मुलींमध्ये ते कायम राहतील. आंकाक्षामध्ये असलेला धीरोदात्तपणा, कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, कुठलाही प्रसंग निभावून नेण्याची व हॅन्डल करण्याची क्षमता हा तिला लाभलेला वारसा आहे. तिची ही तिसरी पिढी आहे. माझ्या काकूने तिच्या सर्व मुलींमध्ये हे गुण रुजवले आहेत. तिच्या मुलींनी तेच गुण आपल्या मुलांमध्येही रुजवले आहेत. 

आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार ज्येष्ठ पुत्राला आपल्याकडील शास्त्राने दिला आहे. मुलींच्यासाठी तो निषिद्ध (करू नये असे) नाही. मग, मुलींनी अंत्यसंस्कार करू नये असा संकेत का रूढ झाला असावा? सामान्यत: स्त्री पुरुषापेक्षा अधिक हळवी, भावनाप्रधान, नात्याला महत्त्व देणारी असते. कुटुंबातील व्यक्ती जाण्याचा जेवढा परिणाम पुरुषावर होतो त्यापेक्षा कैक पटीने अधिक आघात स्त्रीवर होतो. आपल्याही परिचयाच्या घरात एखादी व्यक्ती गेल्यास, अनेकदा घरातील महिलेसाठी डॉक्टरांना पाचारण करावे लागते. आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, पुत्र, कन्या या रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांतील व्यक्तीत स्त्री गुरफटलेली असते. एखाद्या व्यक्तीत आपण जेवढे जास्त गुंतलेलो असतो, तेवढीच जास्त आपली सालपटं त्या व्यक्तीपासून दुरावताना निघतात. मला माझ्या आईला अग्नी देताना आणि तिच्या अस्थी गोळा करताना, जे काही झालं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. स्त्रीला अंत्यसंस्कार करायला न देण्यामागे तिला हा त्रास होऊ नये हा विचार आहे. एखाद्या घरात मुलगा व मुलगी यामध्ये मुलगा हळवा असेल आणि गेलेल्या व्यक्तीत जास्त गुंतलेला असेल, तर मुलाऐवजी मुलीने अंत्यसंस्कार करणेच अधिक योग्य होईल. प्रश्न मुलगा की, मुलगी असा नाहीच, उलट गेलेली व्यक्ती जिवंत असताना तिच्यासाठी सर्व काही करून ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे अंत्यसंस्कारही त्याच आत्मीयतेने करण्याचा धीरोदात्तपणा असलेल्या व्यक्तीने ते करावेत. 

आपल्याला हे माहीत असतं की, आपणही कधीतरी जाणारच आहोत. पण, गमतीचा भाग म्हणजे आता जाणार नाही याचा ठाम विश्वासही असतो. आपण कधी मरणार हे माहीत नसल्यामुळे आलेला तो विश्वास असतो. ‘आपल्यामागे कसं होईल?’ हा विचार आपण आहोत म्हणून सगळं व्यवस्थित आहे, या अहंकारापोटी जन्म घेतो. एखादी वृद्ध व्यक्ती घरामध्ये दिवसातून शंभर वेळा, ‘मी आहे म्हणून चाललं आहे. मी गेल्यावर कळेल.’ असे म्हणत असेल तर कुटुंबीयांच्या मनात एकदा तरी ‘जाऊन पाहा’ असा विचार येतोच. 

आपण मरावं कसं हे आपल्या हातात नसतं, पण जगावं कसं हे मात्र आपल्या हातात असतं. आलेला क्षण शेवटचा आहे, या जाणिवेने येणारा प्रत्येक क्षण जगावा. 

आलेला क्षण शेवटचा आहे, अशा जाणिवेने जेव्हा आपण प्रत्येक क्षण जगतो, तेव्हा मरणाची भीती, दु:ख राहत नाही. आपल्या जाण्याने आर्थिक, व्यावहारिक हानी कमीत कमी व्हावी याची तजवीज आपण केली पाहिजे. होणारी भावनिक हानी, अटळ असते. तिला कुणीही टाळू शकत नाही. पण, प्रत्येक क्षण जगल्याने येणारी निर्भय कृतार्थता आपला मृत्यू आपल्यासाठी सुखद करत असते. आपल्यानंतर कुणाचेही अडून उरणार नाही एवढे आपल्या कुटुंबाला आपण सक्षम केले आहे, याचे समाधान सतत आपल्यासोबत राहते. उलट, आपण जेव्हा ‘माझ्यानंतर कसं व्हायचं?’ याचा विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मुलांना संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम केले नाही याची ती कबुली असते. 

सदानंदांचे चितेवरील पार्थिव पाहून त्यांच्या जागी मी मला पाहिले. विचार टाळण्यासाठी आकांक्षाकडे पाहिले तेव्हा तिच्यात मला माझी मुलगी श्रिया दिसली. तिलाही कधीतरी हे सर्व करावे लागेल, तेव्हा ती कशी या प्रसंगाला सामोरी जाईल, हा विचारही आला. आपलं मन फार विचित्र असतं. प्रत्येक क्षण जाणिवेने जगत असलो तरीही कुणाचे खांदेकरी होताना, स्मशानात चिता जळताना पाहून कुठले विचार मनात येतील हे काही सांगता येत नाही. ते जसे येतात तसे स्मशानातून बाहेर पडल्या पडल्या निघूनही जातात. म्हणूनच त्याला ‘स्मशानवैराग्य’ म्हणत असावेत.  अशावेळी थांबावं. थोडं मागे वळून पाहावं. 

समर्थांनी, ‘एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ या ओळी आपल्या मनाला सांगण्यासाठीच लिहिल्या आहेत. संसारासाठी धावपळ करताना, दररोज काही क्षण आपल्यासाठी बाजूला ठेवावेत. स्वत:चं सेल्फ ऑडिट करावं. आपण प्रत्येक क्षण शेवटचा आहे, या जाणिवेने जगत आहोत का, याचा विचार करावा. आपण जिवंत आहोत की, जगत आहोत याचाही विचार करावा. असा विचार दररोज माझ्या मनात येतो. मरणाआधी मरायचं नाही, हे ठामपणे सांगून जातो.


४ टिप्पण्या:

  1. खूप छान...अगदी योग्य शब्दांत विचार व्यक्त झाले आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रसन्न,
    लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. शेवटच्या परिच्छेदात आपण समर्थांच्या श्लोकाचा हवाला देत, आयुष्य सार्थकी कसे लावावे याविषयी यथोचित उपदेश केला आहे..
    "जिवंत असणे आणि जगणे यातला फरक समजावून देणारी सीमारेषा म्हणजे मृत्यू" हे आपले वाक्य मौलिक आहे..
    समर्थांनी दासबोधातील दशक ३ मधील 'मृत्यूनिरूपण' या समास ९ मध्ये आपल्याप्रमाणे, हेच विचार मांडले आहेत; त्यातले १/२ श्लोक पुढील प्रमाणे...

    सरतां संचिताचे शेष I नाहीं क्षणाचा अवकाश I
    भरतां न भरतां निमिष I जाणें लागे II
    ऐसें जाणोनियां जीवें I याचें सार्थकचि करावें I
    जनीं मरोन उरवावें I कीर्तिरूपें II

    पुन्हा एकदा, लेखाचे कौतुक...

    ....ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर, मुंबई.

    उत्तर द्याहटवा
  3. आपले विचार Inner engineering चे प्रणेते सद्गुरू जग्गी वासुदेव लिखित The death या पुस्तकात व्यक्त झालेले आहेत.

    उत्तर द्याहटवा