गुरुवार, ७ जुलै, २०२२

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी...

प्रश्न तुम्ही काय दाखवता यापेक्षाही काय दाखवूच शकत नाही याचा आहे.

लीना मणिमेकलाई यांनी लघुपटाचे पोस्टर जाहीर केले. ज्यात कालीमातेला सिगारेट ओढताना व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेला दाखवण्यात आले आहे. यावर अनेक ठिकाणी चर्चा व डिबेट सुरू आहे. याला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ म्हणावे का?, शाक्तपंथीयांच्या भावना दुखावल्या म्हणून प्रदर्शने केली जावीत का? काही मुस्लीम संघटनांनी गळा कापण्याच्या धमक्या दिल्या व काहींनी प्रत्यक्ष कृतीही केली, तसे काही करावे का? चित्रपट, लघुपट यात केवळ हिंदू देवदेवतांवरच सातत्याने टीका का केली जाते? तृणमूलच्या महुआ मोइत्रा यांचे वक्तव्य आणि त्यावर पक्षाची अधिकृत भूमिका, हे व असे अनेक मुद्दे यावर अनेकांनी आपली भूमिका मांडली. यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत, तेवढ्यावरच विचार मांडावेसे वाटले.

काली किंवा महाकाली या देवतेला मद्य आणि मांस वर्ज्य नाही, असा मुद्दा जो महुआ मोइत्रा यांनी मांडला त्याविषयी खुलासा करणे आवश्यक आहे. शाक्त पंथामध्ये घुसलेले पंच ‘म’कार याची निर्भर्त्सना भारतभरातल्या संतांनी केलेली आहे. जवळपास प्रत्येक हिंदू संप्रदाय, मत व पंथांत तंत्रमार्ग आहे. बौद्धमतामध्येही मंत्रयान, वज्रयान, सहजयान, कालचक्रयान असे तंत्रमार्गी प्रकार आहेत. कुठल्याही पंथातील तंत्रमार्ग आणि आध्यात्मिक मार्ग यात मूलभूत फरक नीतिमत्तेचा असतो. तंत्रमार्गी व्यक्तीला नीतिमत्तेशी काही देणंघेणं नसतं. त्याचं आचरण इतर समाजाने अनुसरण करण्यासाठी योग्य नसतं. उदाहरणच द्यायचं झाल्यास जैन पंथातील श्वेतांबर व दिगंबर यांपैकी दिगंबरांचे देता येईल. प्रचंड उकाड्यात आपल्यालाही या दिगंबरांचा हेवा वाटेल. पण, कडाक्याच्या थंडीतही ते त्याच दिगंबर अवस्थेत राहतात याकडे आपण दुर्लक्ष करतो. तेवढा मनाचा निग्रह झाल्यानंतरच जैन दिगंबर व्हावे हे योग्य. केवळ वाट्टेल तिथे नागडे फिरायला मिळते हा उद्देश असेल तर, आध्यात्मिक उंची गाठण्याचा मूळ उद्देश बाजूलाच पडेल. नेमके तेच प्रामुख्याने शाक्त पंथाचे झाले. 

मद्य, मत्स्य, मांस, मैथुन या गोष्टी पंथाच्या नावाखाली खुलेआम करायला मिळतात म्हणून अनेक लोक शाक्त पंथीय व कालीमातेचे भक्त होऊ लागले. शाक्त पंथ स्वीकारणार्‍यांची संख्या वाढू लागली व पंथाची मूळ आध्यात्मिक मार्गाची रचनाच ढासळू लागली. म्हणूनच त्याला वाममार्ग किंवा वाईट मार्ग म्हणून संबोधण्यात आले आहे. या तंत्रमार्गाला अपवाद म्हणून गणण्यात आले आहे, शाक्तपंथातील तो सर्वमान्य किंवा सर्वांसाठी असलेला मार्ग नाही. अशा अपवादात्मक गोष्टीला नियम म्हणून समोर करून कालीमाता दारू पिते, मांस खाते असे म्हणणे चुकीचेच आहे. महुआ मोइत्रा यांनी सिगारेट ओढण्याचा उल्लेख केला नव्हता ही गोष्ट खरी असली, तरी त्याज्य ठरवलेला अपवादात्मक वाममार्ग त्या पोस्टरच्या समर्थनार्थ  मोठा करून मांडणे चूकच होतं. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत बोलताना एक मुद्दा कायम मांडला जातो, तो यापेक्षाही जास्त भयानक आहे. ‘आम्ही वाट्टेल ते दाखवू, बघावे की बघू नये हे तुम्ही ठरवा’ किंवा ‘दाखवणे हे आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पाहणे व न पाहणे हे लोकांचे स्वातंत्र्य आहे’ असा घातक विचार मांडला जातो. हा मुद्दा मांडून अशा गोष्टींचे समर्थन करणार्‍या व्यक्ती एका प्रश्नाचे उत्तर अजिबात देत नाहीत. नेहमी  व सातत्याने यात हिंदू देवदेवतांचेच विचित्र चित्रण का केले जाते? एक तरी उदाहरण इस्लाम पंथाबद्दल, अल्लाहबद्दल, पैगंबरांबद्दल आहे का? भारतात सोडून द्या, जगभरात सापडणार नाही. याच लीना मणिमेकलाई  पोस्टरवर कालीमातेप्रमाणेच प्रेषितांच्या मातेचे, एका हातात सिगारेट व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेले चित्र दाखवतील का? त्याच्या समर्थनासाठी ‘चित्र काढणे आमचे स्वातंत्र्य आहे, पाहावे की पाहू नये हे मुस्लिमांनी  किंवा ख्रिश्चनांंनी ठरवावे.’, असा तर्क लीना यांचे समर्थन करणारे विचारवंत मांडतील का? 

प्रश्न तुम्ही काय दाखवता यापेक्षाही काय दाखवूच शकत नाही याचा आहे.

मी फक्त माझा मुद्दा स्पष्ट करतोय.त्यांनी कालीमातेला सिगारेट ओढताना दाखवून हिंदू श्रद्धेवर आघात केला आहे, तसा ख्रिश्चन किंवा मुस्लीम श्रद्धेवर आघात करावा, असे मला मुळीच म्हणायचे नाही. ख्रिश्चन, मुस्लीम पंथांतील किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही पंथाच्या श्रद्धावान व्यक्तीला असे कधीही वाटणार नाही. एक श्रद्धावंत कायम दुसर्‍यांच्या श्रद्धेचा आदरच करतो. निंदा करत नाही. जसा आदर अब्रह्मिक पंथांच्या श्रद्धेबद्दल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ठेकेदारांकडून ठेवला जातो, तसाच आदर हिंदूंच्या श्रद्धेबद्दल ठेवावा एवढीच माफक इच्छा आहे. परंतु, जेव्हा हे अनादर व्यक्त करणं  एकतर्फी आणि पुन्हा पुन्हा हिंदूंच्याच बाबतीत घडतं, तेव्हा ते मुद्दाम केलं जातं, असं म्हणण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. 

जिथे गळा कापला जाण्याची भीती असते, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले जात नाहीत, हे वास्तव आहे. बरे, हा मुद्दा उपस्थित केला की, लगेच ‘हिंदू-मुस्लीम करू नका’, असा तर्क देण्यात येतो. पण, केवळ हिंदू धर्माला कायम नकारात्मक पद्धतीने बिंबवण्यामुळे, त्यांच्या उपास्य देवतांना बीभत्स पद्धतीने दाखवण्यामुळे हिंदू-मुस्लीम यांच्यात कलेच्या माध्यमातून भेदभाव अभिव्यक्त केला जातो, त्याचे काय?

हिंदू धर्मातील पंथांमध्ये असलेल्या अपवादात्मक गोष्टींना नियम म्हणून मोठं करून दाखवणं आणि केवळ हिंदू देवदेवतांचंच बीभत्स विडंबन करणं या गोष्टी वारंवार केल्या जात आहेत. याविरुद्ध कुणाचे गळे कापण्याची काहीच गरज नाही. पण, किमान त्याविरुद्ध व्यक्त होणं तरी निश्चितच गरजेचं आहे. ‘मला काय त्याचे?’, ‘आपण भले की आपले काम भले’, ‘यातून काय निष्पन्न होणार आहे?’, ‘समाजात काय फरक पडणार आहे?’ असा विचार करून शांत राहिल्यास आपल्या हिंदू धर्मात जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणण्याचा अधिकारही आपण गमावून बसू! नमाज पठणाचे व दारात क्रॉस असल्याचे आपल्याला कौतुक वाटेल, पण नवीन बांधलेल्या आपल्याच घरासमोर तुळशीवृंदावन उभारण्याची लाज वाटेल. एवढेच नव्हे तर, हिंदू असण्याचीही लाज वाटेल!


1 टिप्पणी:

  1. हे प्रकार मुद्दाम केले जात आहेत. मुद्देसूद विचार. लेख आवडला

    उत्तर द्याहटवा