बुधवार, १२ जानेवारी, २०२२

भंडारी समाजाचा मुख्यमंत्री झाल्याने प्रश्न सुटतील?

इतर कुठल्याही समाजाचा मुख्यमंत्री झाला तर तो भंडारी समाजाचे हित पाहणार नाही, हा विचारच घातक आहे.






जिथे ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे, त्या भागात त्याच समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिल्याने त्या जागेवरील उमेदवार निवडून येण्याची खात्री राजकीय पक्षांना असते. राजकीयदृष्ट्या हे गणित योग्य असले, तरीही यातून खरोखरच त्या समाजाचा लाभ कितपत होतो? समाजातील समस्यांची उत्तरे राजकारणात शोधायची की त्या त्या समाजातील धुरीणांनी, विचारवंतांनी पुढाकार घेऊन शोधायची, याचा विचार होणे आवश्यक आहे.

आम आदमी पक्षाने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री आणि ख्रिस्ती समाजाचा उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. याला अनुकूल प्रतिक्रिया ख्रिस्ती समाजातून उमटली नाही. पण, मोठ्या प्रमाणावर अनुकूल प्रतिक्रिया भंडारी समाजामधून उमटली. अनेक नेत्यांना, विचारवंतांना भंडारी समाजावरील अन्यायाची नव्याने जाणीवही होऊ लागली. अनेकांना दबलेल्या, छुप्या जातीय, ‘समाज’वादी राजकारणाला उघडपणे वाचा फोडल्याचा साक्षात्कारही झाला. पण, मुळात मुख्यमंत्र्यांची निवड कशी होते? थेट मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून वेगळे मतदान होते की, आपण निवडून दिलेले आमदार त्यांच्यामधून मुख्यमंत्री निवडतात, या प्रश्नाच्या उत्तरातच खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे. 

भंडारी समाजाचा मुख्यमंत्री आणि ख्रिस्ती समाजाचा उपमुख्यमंत्री करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला संपूर्ण बहुमत मिळणे आवश्यक आहे. अनेक राजकीय पक्षांमधून भंडारी  व ख्रिस्ती समाजाचे उमेदवार निवडून आले तरीही हे गणित सुटत नाही. त्यामुळे, संपूर्ण भंडारी समाजाला कोणत्या तरी एकाच राजकीय पक्षाला संपूर्ण पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे. एखाद्या समाजाची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी खेळलेली ही खेळी ख्रिस्ती समाजाने बरोब्बर ओळखली. कुठलाही ख्रिस्ती नेता आपल्या समाजाला उपमुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी मतदान करा, असे आवाहन करत सहसा पुढे सरसावलेला नाही. पण, भंडारी समाजातील अनेक नेते, विचारवंत पुढे सरसावले आहेत. जाहीर सभा घेऊन तशी वाच्यताही करू लागले. रवि नाईक वगळता इतक्या वर्षांत भंडारी समाजाचा एकही मुख्यमंत्री झाला नाही, हा समाजावर अन्याय आहे, समाजाला वंचित ठेवण्याचा प्रकार आहे वगैरे भाषा सुरू झाली. 

आपण सामाजिक अन्यायाचं राजकीय भांडवल करत आहोत. त्यातून समाजाचे प्रश्न कधीच सुटत नाहीत. कारण, राजकारण हा सामाजिक प्रश्न सोडवण्याचा मार्गच नाही. सामाजिक प्रश्न समाजानेच सोडवायचे असतात. गोव्यातील बहुजन समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे याची नोंदणी करणे, त्यावरून त्यांना किती आरक्षण देणे आवश्यक आहे या गोष्टी आपण समाजानेच पुढे होऊन केल्या पाहिजेत. भंडारी समाजाच्या समितीचे नूतनीकरण आवश्यक शुल्क भरूनही केले गेले नाही, या अन्यायाला वाचा कायदेशीर मार्गानेच फोडली पाहिजे. त्यासाठी भंडारी समाजाचा मुख्यमंत्री झाल्याने ही समस्या सुटेल अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. आपल्या समाजात फार पूर्वीपासून ते आत्तापर्यंत किती लोक व्यवसायात, उद्योगधंद्यात स्वत:चे स्थान निर्माण करून नावारूपाला आले आहेत, किती लोक विज्ञान क्षेत्रात पुढे गेले आहेत, किती लोक लोकसंस्कृतीचे जतन करत आहेत, किती शास्त्रज्ञ, किती वैज्ञानिक आहेत, किती लोकांनी सामाजिक संस्था किंवा उपक्रम या माध्यमातून सर्व समाजासाठी कार्य केले आहे याचा शोध घेऊन त्यांचा आदर्श समाजातील युवा पिढीसमोर सातत्याने ठेवणे आवश्यक आहे. जे व्यवसायात, नोकरीत स्थिरावले आहेत त्यांनी आपल्या समाजातीलच होतकरू तरुणांना मदत करून त्यांना पुढे आणणे आवश्यक आहे. हे करण्याऐवजी आपण आरक्षणामधून किती नोकर्‍या मिळाल्या याची गणिते मांडत बसलो आहोत.

आपल्या समाजावर किती अन्याय झाला आहे, किती अन्याय होत आहे याची रडगाणी प्रत्येक समाजाचा पुढारी गात राहतो. आपल्या समाजाने किती विकास केला याचे दाखले देण्याऐवजी आपला समाज कसा मागास आहे हे सिद्ध करण्याची चढाओढ लागली आहे. इतकेच नव्हे तर ‘आपल्या समाजाला मागास म्हणा’, असे म्हणत मोठमोठी आंदोलने केली आहेत. समाजाचा विकास व्हावा यासाठी म्हणून जी सामाजिक, राजकीय धोरणे आपण ठरवतो व राबवतो त्याचा समाजासाठी काही लाभ झाला की, समाजातील काहींचा लाभ झाला याचा विचार प्रत्येक समाजाने करणे आवश्यक आहे. ‘महारवाडा’ होता तो ‘आंबेडकरवाडा’ झाला याला आपण सामाजिक विकास म्हणत असू तर मग प्रश्नच मिटला! 

‘भंडारी समाजाचा मुख्यमंत्री’ या घोषणेने अनेक नवे प्रश्न निर्माण होऊ घातले आहेत. ज्याची धग आज कदाचित जाणवणार नाही. पण, पुढील काळात ती एक उग्र समस्या बनलेली असेल एवढे नक्की. ही घोषणा केल्यानंतर भंडारी समाजातील नेत्यांच्या तोंडी ‘बहुजन समाजामध्ये भंडारीसमाज ६०% टक्के आहे’ ही वर्गवारी समोर येऊ लागली आहे. बहुजनांमध्ये बहुजन असल्याची जाणीव येत्या काळात त्याच सामाजिक विषमतेला खतपाणी घालेल, ज्या विषमतेच्या विरुद्ध लढण्याच्या बाता नेते आणि विचारवंत मारत आहेत. बहुजन समाजाचा चेहरा असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भंडारी समाजाचे हित पाहणारे नाहीत का? त्याही पुढे जाऊन इतर कुठल्याही समाजाचा मुख्यमंत्री झाला तर तो भंडारी समाजाचे हित पाहणार नाही, हा विचारच घातक आहे. मागे एकदा मायावतींनी संसदेत म्हटले होते की, ‘दलितांवरील खटले सुनावणीस घेणारा न्यायाधीशही दलितच असावा’. मायावतींचा हा विचार जितका घातक आहे तितकाच ‘भंडारी समाजाचा मुख्यमंत्रीच भंडारी समाजाचे प्रश्न सोडवू शकतो.’ हा विचारही घातकच आहे. या उलट ‘मुख्यमंत्री कोणीही असो. आम्ही आमच्या समाजातील समस्या सोडवण्यासाठी त्याला बाध्य करू.’ हा विचार भंडारी समाजाने करणे आवश्यक आहे. पण, त्यासाठी एकाच ध्येयाने संपूर्ण समाज एकत्र आणणे आवश्यक आहे.

समाजाची लोकसंख्या जेवढ्या प्रमाणात आहे, तेवढ्या प्रमाणात त्याला राजकीय प्रतिनिधित्व दिले गेले पाहिजे हा विचार भारतीय समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी पेरला गेला आहे. राजकीय विचारवंतांनी हा विचार मुद्दाम पोसला आहे. याचाच दुसरा अर्थ असा निघतो की, समाजबाहुल्य असूनही संबंधित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न दिल्यास, त्या समाजाचे प्रश्न, समस्या इतर समाजातील व्यक्ती सोडवणार नाही. 

कुठलाही थेट खुलासा करायचा नसला की, मनोहरभाई ‘मात्सो राव रे! एक काणी आयक’ असं म्हणत एक कथा ऐकवायचे. तात्पर्य किंवा त्या कथेतून जे काही समजून घ्यायचे आहे ते ज्याचे त्याने घ्यावे ही त्यांची अपेक्षा असायची. तशीच एक कथा सांगतो. एका गावातून जाता जाता एक साधू एका घरात थांबतो. त्या घरातील प्रत्येक जण कुटुंबातील इतरांनी त्याला कसे छळले आहे, वंचित ठेवले आहे, कशी समानता नाही, आपले म्हणणे कुणीच कसे ऐकत नाही हे त्या साधूला ऐकवतो. साधू काहीच बोलत नाही. रात्री दोन तीन वाजलेले असतात. सगळे झोपलेले असताना साधूच्या खोलीतून मोठमोठ्याने काठी आपटल्याचा आवाज आणि ‘अंधार, अंधार’ असे शब्द सर्वांना ऐकू जातात. सगळे धावत साधूच्या खोलीत येतात. त्यातील एकटा पट्कन बटन दाबून बल्ब पेटवतो. खोलीत सर्वत्र उजेड होतो. साधू ओरडायचा थांबतो. कुटुंबातील एकटा विचारतो, ‘अहो साधू बाबा! अंधार अंधार असे ओरडल्याने व काठीने जमीन धोपटल्याने तो दूर होईल का? दिवा लावला की अंधार जातो, त्यासाठी ओरडत बसायची गरज नाही. उगाच आम्हाला जागे केलेत.’ त्याचे म्हणणे ऐकून साधू फक्त हसतो आणि निघून जातो.

‘दलित’, ‘अन्याय’, ’वंचित’, ‘मागास’ असे शब्द सातत्याने ओरडून आपण नकारात्मक विचार आणि न्यूनगंड बिंबवत आहोत. प्रगत समाज म्हणून कसे समोर यावे, हा विचारच यात मांडला जात नाही. त्यामुळे, केवळ राजकीय व्यक्ती प्रगत होत जातात, समाज आहे तिथेच राहतो. कुठल्याही समाजाचे प्रश्न, समस्या  समाजकारणातूनच सोडवल्या पाहिजेत. त्याची उत्तरे राजकारणात शोधायला गेल्यास त्या अधिक कठीण व गुंतागुंतीच्या होत जातात. या राजकीय अट्टहासातून बहुजन समाजात फूट पडण्याव्यतिरिक्त काहीच साध्य होणार नाही. जो धोका ख्रिस्ती समाजाने ओळखला, तोच धोका भंडारी समाजाने ओळखणे आवश्यक आहे.


चित्रस्रोत : आंतरजाल