गुरुवार, १९ मे, २०२२

वैधव्यात सौभाग्यालंकारांचा हट्टाग्रह का?

एका बाजूला मंगळसूत्राला विवाहितेच्या गुलामगिरीचे चिन्ह मानायचे, तर दुसर्‍या बाजूने विधवा स्त्रीसाठी सुरक्षेचे, भावनेचे चिन्ह मानायचे. मांगल्याच्या, सौभाग्याच्या या प्रतीकाला उच्च शिक्षित, शहरी महिलांमध्ये हीनभाव आणि ग्रामीण महिलांमध्ये असलेले स्थिती वैशिष्ट्य घालवून आपण नेमके काय साधतोय?

कै. प्रसन्न बर्वे आणि श्री. शिवराम बर्वे, असा उल्लेख केल्यास काय होईल? मेणबत्तीची दोन्ही टोके पेटवल्यामुळे जास्त उजेड होईल की, मेणबत्तीचा नाश होईल? हे दोन्ही प्रश्न ‘कायच्या काय’ किंवा वेडगळ वाटतील. पण, ते तसे नाहीत. पहिल्या प्रश्नाचा संबंध संकेतांशी आहे आणि दुसरा प्रश्न अशा अनेक संकेतांचा समुच्चय असलेल्या संस्कृतीशी आहे.

संकेत, शब्द, प्रतीक यांचा संबंध अनेकदा विशिष्ट संकल्पनेशी असतो. दोन शब्दांचा अर्थ एकच असला तरी त्यांचा वापर करण्याची रूढ पद्धत, संकेत वेगवेगळे आहेत. त्यांच्या ‘वेगळे’ असण्याचा असमानता, उच्च-नीचता, सन्मान-अपमान याच्याशी काही संबंध येत नाही. त्यांचा संबंध अर्थबोध होण्याशी असतो. ‘आलय’ आणि ‘घर’ या दोन शब्दांचा अर्थ ‘राहण्यासाठी बांधलेली जागा’ असा होतो. पण, म्हणून देवालयात गेलेल्या माणसाविषयी, ‘ते कुठे गेले आहेत’ हे सांगताना कुणी ‘देवाघरी गेले’ असे म्हणत नाही. रूढ संकेतांनुसार ‘देवालयात जाणे’ याचा आणि ‘देवाघरी जाणे’ याचा अर्थ वेगळा आहे. 

शिवराम बर्वे हे माझे वडील, काही वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्यांच्याविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी मला कितीही आदर असला व ते कायम माझ्या सोबतच आहेत, अशी भावना असली तरीही त्यांच्या नावाआधी श्री. लावणे चुकीचेच ठरते. त्याचप्रमाणे मला, ‘पुरे झाले हे जगणे’ किंवा ‘हा संसार असार आहे’ वगैरे असले वैराग्याचे कितीही झटके आले तरीही, हयात असताना माझ्या नावाआधी कै. लावणे चुकीचेच ठरेल. शब्द हे फक्त शब्द नसतात, त्यांना अर्थ असतो, त्यांना संकेत असतात. 

संकेत आणि प्रतीक चिन्हे कुठेही व कशीही वापरणे अनादर करणारे व चुकीचे ठरते. कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी या सर्वांचे स्थान व महत्त्व आयुष्यातील एक विशिष्ट टप्पा सूचित करतात. विवाहित स्त्रीचे हे सौभाग्यालंकार आहेत. स्त्री विवाहित असल्याची ती खूण आहे. विवाहाआधी व वैधव्य प्राप्त झाल्यानंतर अलंकारांचे कुठलेच औचित्य नसते. कुमारिका व विधवा स्त्रीने ते परिधान न करणेच योग्य. 

हे जरी खरे असले, तरीही या रूढ धारणेला आधुनिक समाजात आणखीही काही कंगोरे आहेत. सौभाग्यालंकारांचे महत्त्व जसे ग्रामीण महिलांमध्ये आहे, तसे ते निम-शहरी, शहरी व उच्चशिक्षित महिलांमध्ये नाही. शहरी भागांत नोकरी व व्यवसाय करणार्‍या महिला मंगळसूत्राऐवजी तत्सम हार, अलंकार घालतात. काकणे घालणे, न घालणे त्या करत असलेल्या कामाच्या स्वरूपानुसार ठरते. त्यात काही चुकीचेही नाही. नेहमीच्या वापरात सौभाग्यालंकार पूर्णत: घालत नसल्या तरी व्रतवैकल्ये, मंगलकार्य या ठिकाणी आवर्जून घालतात. ग्रामीण भागांतील विवाहित महिला सौभाग्यालंकार दैनंदिन व्यवहारातही घालतात. ग्रामीण महिलांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही उपयुक्तता यापेक्षाही सौभाग्य, सांस्कृतिक प्रतीक म्हणून अधिक असतो. विवाहित स्त्री, सुवासिनी म्हणून अन्य स्त्रियांकडून मिळणारा मानही मोठा असतो. सामान्यत: विवाहित स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोनही आदराचा असतो. 

दुर्दैवाने हेच आदराचे स्थान विधवा स्त्रीच्या वाट्याला येत नाही. त्यातही पुन्हा तिच्या वयोमानाप्रमाणे त्यात फरक पडत जातो. कोवळ्या वयातील विधवा स्त्रीचे जीवन फारच कष्टप्रद व वखवखलेल्या पुरुषी नजरांनी भरलेले असते. स्मृतींनी यावर तत्कालीन परिस्थितीमध्ये उपाय म्हणून सांगितलेले केशवपन, नेमस्त व्रताचरण वगैरे नियम आपण रूढ केले. पण, त्याचबरोबर विधवा स्त्रीला कुटुंबात, समाजात यतीचा दर्जा देण्यात यावा, हे स्मृतिवचन सोयीनुसार टाकून दिले. त्याऐवजी तिला अपशकुनी ठरवण्यात आले. तिचे दर्शनही अमंगळ ठरवण्यात आले. आजच्या ग्रामीण भागांतही ही परिस्थिती अद्याप बदलली नाही. पतीच्यामागे मुलांची, संसाराची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना मार्गी लावणार्‍या स्त्रीचा आदर वास्तविक विवाहित स्त्रीपेक्षाही कैक पटीने अधिक झाला पाहिजे. पण, बहुतांशी हा आदर मिळालाच तर वृद्धापकाली मिळतो. तरुण विधवा स्त्रीच्या चारित्र्यावर सहज शिंतोडे उडवले जातात. हे कटू असले तरी सत्यच आहे. शहरी भागांत विधवा स्त्रीचे एकेरी पालकत्व किंवा लिव्ह-इन-रिलेशनमध्ये असणे समाजमान्य होत चालले आहे. निमशहरी व ग्रामीण भागांमध्ये पुनर्विवाहाला आणि पुन्हा लग्न केलेल्या स्त्रीलाही तोच मान मिळणे सर्वमान्य होत आहे.  

विधवा स्त्रीला सुवासिनी स्त्रीप्रमाणे ‘हळदी कुंकू’ या समारंभांमध्ये सहभागी करून घेणे, तिने सौभाग्यालंकार घालणे हा तिच्याप्रति असलेला दृष्टिकोन बदलण्याचा उपाय नव्हे. हे जिवंत माणसाच्या नावामागे कै. व मृत व्यक्तीच्या नावाआधी श्री. संबोधन लावण्याइतकेच औचित्यभंग करणारे ठरेल. उलट, एखाद्या स्त्रीला तिच्यावर झालेल्या संस्कारांमुळे किंवा ते अलंकार घातल्याने पतीची आठवण वारंवार आल्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. एखादी विधवा स्त्री पतीपेक्षाही अलंकारांत आणि सुवासिनी म्हणून मिळणार्‍या सन्मानात अडकलेली असल्यामुळे ती सौभाग्यालंकारांचा, हळदीकुंकवाचा हट्टाग्रह धरत असल्यास तेही चुकीचेच ठरेल. विधवा स्त्रीला कुंकू लावताना, परिचयातील विवाहित स्त्रीला खरी परिस्थिती माहिती असतेच. ती नजरेतून व्यक्तही होते. कधी कधी अपमानापेक्षाही, सन्मान जास्त वेदना देऊन जातो!

अत्याचारापासून सुरक्षेसाठी विधवांनी सौभाग्यालंकार घालावेत, हा विचार मांडणारे विचारवंत, स्त्रीने कमीत कमी वस्त्रे घालण्याचे समर्थन करताना ‘पूर्ण झाकलेल्या स्त्रीवरही अत्याचार होतो’ असा तर्क मांडतात. गोव्यातील कायदा महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेने विद्यार्थ्यांना शिकवताना मंगळसूत्राला ‘कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा’ संबोधले होते. एकच मंगळसूत्र विवाहितेला दुय्यम व असुरक्षित करते आणि विधवेला भक्कम व सुरक्षित ठेवते. पांढरी कपाळं घेऊन फिरणार्‍या कुमारिका व  विवाहित महिला, विधवा स्त्रीने कुंकू लावण्याविषयी आग्रही असतात. हा वैचारिक विरोधाभास, विधवा स्त्रीला आदर व सन्मान मिळवून देण्यापेक्षाही सांस्कृतिक प्रतीकांना हीन व स्थानभ्रष्ट करण्यासाठी केला जातो. मेणबत्ती दोन्ही बाजूंनी जाळली की, उजेड होण्याऐवजी, ती मेणबत्ती लवकर संपून पुन्हा अंधार होतो. 

मंगळसूत्रासकट इतर अनेक प्रतीकांचा संबंध हीन गोष्टींशी व विकृतींशी जोडल्याने त्या नकोशा वाटू लागल्या. ती प्रतीके, त्या वस्तू वापरायला लाज वाटू लागली. पुरुषांनी टिळा न लावणे, कुमारिकांनी कुंकू  न लावणे, विवाहित स्त्रीने कमीत कमी टिकली लावणे व  मंगळसूत्र लपवणे हे आधुनिक असल्याचे लक्षण झाले. ‘स्त्रियांनीच का घालायचे मंगळसूत्र, पुरुषांनी का नाही?’, ‘मंगळसूत्र हा माझ्यासाठी सौभाग्यालंकार वगैरे काही नसून तो फक्त एक अलंकार/दागिना आहे.’, हे विचार रूढ झाले. आता त्याची पुढची पायरी आली आहे. या नको असलेल्या ‘सौभाग्य-लोढण्यांचं’ हवं असणं विधवा झाल्यानंतर जाणवू लागलं आहे. ते काढले जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील हेरवाड गावात ‘विधवा प्रथा बंद करणे संदर्भात चर्चा करणे’ असा विषय ठेवून ठरावही मंजूर करण्यात आला आहे. 

कुंकू, मंगळसूत्र आहे म्हणजे ‘ती कुणाची तरी आहे’ आणि हे नसलं म्हणजे ‘ती कुणाचीही’ अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. हे खरे असले तरी ती सामाजिक विकृती आहे. लैंगिक अत्याचार करणारा विकृत पुरुष विवाहित स्त्रीवरही बलात्कर करतो. ही विकृती घालवण्यासाठी मंगळसूत्र घालणे हा उपाय म्हणायचा झाल्यास, लैंगिक अत्याचार व बलात्कार  होतात म्हणून सुरक्षेसाठी शाळकरी मुलीनेही मंगळसूत्र घालावे का?  ‘मंगळसूत्र घालावे की, घालू नये हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्या विधवेला  असावे.’, असे म्हणणार्‍यांना मंगळसूत्र काढणार्‍या व बांगड्या फोडणार्‍या स्त्रियांचे स्वातंत्र्य मान्य आहे का? फोडणे बंधनकारक नसावे, असे म्हणताना ‘न फोडणे’ ग्रामसभेत ठराव घेऊन बंधनकारक करणे योग्य कसे वाटते? 

माझ्या मते, विधवा स्त्री स्वत: सौभाग्यालंकार उतरवून ठेवत नसेल, तर जबरदस्तीने ते उतरवून घेऊ नयेत. जबरदस्ती करून काकणे फोडू नयेत.  विधवा स्त्रीला वेगळी वागणूक देऊ नये, अपशकुनी म्हणून हिणवू नये. उलट नवर्‍याच्या पश्चात तिला सर्व कार्यात सहभागी करून घ्यावे. त्याच्या पश्चात तिने पेललेल्या जबाबदारीचा, संसारासाठी ती घेत असलेल्या कष्टांचा व तिच्या स्त्रीत्वाचा योग्य मान राखला जावा.  हळदी-कुंकू लावणे याचा संबंध मानापमानाशी न जोडता सौभाग्याशी व विवाहित स्त्रीची ओळख इतक्यापुरताच ठेवावा. हळदी कुंकू लावले म्हणजे मान आणि नाही लावले म्हणजे अपमान, दुय्यम लेखणे असे समजण्याचे काहीच कारण नाही. वैधव्य प्राप्त झालेली स्त्री पुनर्विवाह करून पुन्हा सौभाग्यालंकार प्राप्त करू शकते. त्यासाठी विधवा असताना त्यांचा हट्टाग्रह धरणे कितपत योग्य? पुनर्विवाह करायचा नसल्यास, सौभाग्यालंकार घालू नये व हळदी-कुंंकू कार्यक्रमात सहभागी होऊ नये. प्रतीकांचा आग्रह संकेतपालनासाठी व्हावा, मोडण्यासाठी नव्हे. 

विकृती घालवायची, कमी करायची असेल तर त्यांंची जागा संस्कृतीने व्यापणे आवश्यक आहे. आपण विकृती घालवण्यासाठी संस्कृती संपवत आहोत. आपण आपल्या कुटुंबात, समाजात विधवा स्त्रीला किती व कसा आदर देतो, यावरून आपल्यावर काय संस्कार झाले आहेत, हे समजू शकते. मुळात अपण संस्कार रुजवत नाही आणि संस्कृतीला दोष देतो. विकृतीसाठी संस्कृतीला जबाबदार धरतो. माणसं मारून संस्कृती संपत नाही. त्या संस्कृतीची प्रतीके, संकेत हीन ठरवा, विकृत करा. मग त्या संस्कृतीतले लोकच ती संस्कृती स्वत:हून संपवतात. विकृती नाहीशी किंवा कमी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण संस्कृतीच्या प्रतीकांना हीन व स्थानभ्रष्ट करत आहोत. यातून विकृती नष्ट होण्याऐवजी संस्कृतीच नष्ट होण्याची भीती अधिक आहे. 


१० टिप्पण्या:

  1. आजच्या गोवन वार्तावर लेख वाचला. नेहमीप्रमाणे उत्तम लेखन. पण, नोकरी करणार्‍या विधवा मंगळसूत्र हे सुरक्षेसाठीच घालतात हा माझा अनुभव आहे. त्यांचा हेतू संस्कृतीचा अपमान करण्याचा नसतो.

    उत्तर द्याहटवा
  2. We should teach our children to respect widow. First of all we should respect a widow. It is not her fault that she becomes widow. But treatment given to her is brutal.

    उत्तर द्याहटवा
  3. Uttam lekh... govyat paristhiti badlat ahe... vivahit avivahit ha bhed nahisa hot chalala ahe

    उत्तर द्याहटवा
  4. योग्य विचार आहेत.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रसन्नजी , एक पारंपरिक , सामाजिक विषय घेऊन तुम्ही वाचकांना त्यांचे विचार मांडण्याची संधी दिलीत याबद्दल धन्यवाद.
    या लेखात तुम्ही म्हणता की वैधव्य प्राप्त झाल्यानंतर अलंकाराचे कुठलेच औचित्य नसते. विधवेने ते परिधान न करणेच योग्य. तसेच विधवा असताना सौभाग्यालंकाराचा हट्टाग्रह धरणे कितपत योग्य ? असा प्रश्न करतानाच पुढे तुम्ही अशीही पुस्ती जोडता की , नवरा गेल्रहयानंतर तिचे सौभाग्यालंकार उतरवणे किंवा नाही हे तिच्या इच्छानुसार व्हायला हवे. इथे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोहोंनाही तुमचा पाठिंबा दिसतो.
    पुनर्विवाह करायचा नसल्यास सौभाग्यालंकार घालू नये व हळदीकुंकू समारंभात सहभागी होऊ नये ही तुमची मते मला पटत नाहीत.
    नवरा गेल्यानंतर त्याने बहाल केलेले सौभाग्यालंकार ही पत्नीसाठी परमप्रिय आठवण असते मंगलप्रसंगी बांधलेली. ( आजकाल पाश्चात्य संस्कृतीचे वारे वाहू लागल्यामुळे आणि स्वतःवर गावंढळपणाचा शिक्का बसू नये म्हणून महिला टिकलीला आणि मंगळसूत्राला घरात खुंटीवरची जागा दाखवतात आणि बाहेर पडतात हे खरे.पण ते तात्पुरतेच.) सौभाग्याची लेणी अंगावरून उतरवणे बाईमाणसासाठी किती क्लेशदायी असतं हे त्या विधवेलाच विचारावं.शिवाय नवरा गेल्यानंतर हे मंगळसूत्र तिच्या चारित्र - रक्षणाचं एक प्रभावी साधन आणि तिचा भावनिक भक्कम असा आधार ठरतो.( विवाहितांवरही बलात्कार केले जातात हा त्या पुरुषाच्या कामांधपणाचा कळस म्हणता येईल.)
    पती गेल्यावर पत्नीने सर्व सौभाग्यलेणी त्यागावीत आणि लंकेची पार्वती होऊन घरात बसावं.ती पांढर्या कपाळाची म्हणून तिला अपशकुनी मानावं. मग पत्नी गेल्यावर पुरुषानेही तिने घातलेली हातातली अंगठी , गळ्यातली सोनसाखळी , माश्काॅद , घड्याळाचा सोन्याचा पट्टा हे पौरुषालंकार उतरविण्याची तरतूद पुरातन धर्मात न करून स्त्रियांप्रती दूजाभाव अन्यायच केलाय असं नाही का वाटत ? विधवेकडे पाहण्याची समाजाची जी विकृत , सहानुभूतिपूर्ण , केविलवाणी, ' अरेरै ' ची नजर असते , त्यानजरेच्या तीराची तीक्ष्ण टोके विधुरालाही टोचण्याची वृत्ती समाजात का दृष्टीस पडत नाही ?हा सरासर निसर्गनिर्मित द्विजातीय मानवापैकी एकावरच , मानवनिर्मित धर्म नावाच्या कायद्याने लादलेला नियम आहे.
    स्त्री - पुरूष समानतेला छेद देणारे अनेक संतापजनक भेद समाजात प्रचलित आहेत.कात आणि कुणाशी बोलणार ?😔😔

    - मीरा प्रभू वेर्लेकर

    उत्तर द्याहटवा
  6. अगदी सहमत. पुरुषावर कशाचीही सक्ती नाही, सगळे नियम मर्यादा काय असतील त्या बाईनेच पाळायच्या हा भेदभाव का? आपली, एकंदर समाजाची मानसिकता बदलायला हवी.

    उत्तर द्याहटवा
  7. विचार पटत नाही.दुटप्पी वाटतात.विधवा स्त्री ही विधवा म्हणून समाजाने का ओळखावी? तिच्याकडे एक स्त्री म्हणून का पाहिले जाऊ नये? समाजात विधवा पुरूष असा काही भेद असतो का? मग बायकांवरच संस्कृती आणि अलंकार अशी जबरदस्ती का? स्त्री ही मुलांच्या जबाबदारीमुळे पुन्हा विवाह करू शकत नसेल तर तिने काय करावे? समाजात प्रतिष्ठा मिळण्यासाठी पुन्हा विवाह हा एकच मार्ग आहे का स्त्रीला. तिचे कर्तृत्त्व का गणले जाऊ नये?

    उत्तर द्याहटवा
  8. लेखात मांडलेले विचार बरोबर आहेत. विवाहित स्त्रीने घालायचे अलंकार म्हणजे मंगळसूत्र, हळद-पिंजर आणि हिरवा चुडा. घरी आलेल्या विवाहित स्त्रीला जाताना हळद व पिंजर लावतात. केवळ पिंजर नाही. तसेच घरी आलेल्या विधवा स्त्रीला परतताना फक्त पिंजर लावावी. महिला विवाहित असल्याची खूण म्हणून असलेले अलंकार विधवा स्त्रीने घालू नयेत. हळदीकुंकाच्या कार्यक्रमाला विधवांनी स्वताहून जाऊ नये. पुरुश आणि स्त्री यांचे मन, बुद्दी आणी शरीर वेगळे असते. त्यांचे स्वभाव आवडनिवड वेगळी असते. त्यामुळे, स्त्रीने घालायचे अलंकार पुरुश का घालत नाही, असे म्हणणे पिशेपणाचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. लेख उत्तम. सामाजिक संकेतांना पाळूनही विधवा स्त्रिया समाजिक मानसिकतेच्या हकनाक बळी ठरतात. तुम्ही विषय रचना उत्तम केली आहे, मात्र हा एकूणच सखोल चर्चेचा विषय आहे. यावर मंथन व्हावे तरच एक निश्चित मत बनू शकेल.....

    उत्तर द्याहटवा