शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

शिवरायांच्या महाराष्ट्रातील शिवराळ मराठीचे खापर फोडायचे तरी कुणाच्या माथी?

शिवराळ भाषेची जबाबदारी राजकारण्यांवर ढकलल्याने पत्रकार, वाचक, प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. उच्चारणात कायम ‘शिवराय’ ठेवणार्‍या नेत्यांच्या तोंडातल्या ‘शिवराळ’ भाषेसाठी जेवढे ते जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा त्याचे वारंवार प्रक्षेपण करणारे आपण पत्रकार व टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रोत्साहन देणारे प्रेक्षक जास्त जबाबदार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेतल्याशिवाय ज्यांचे पुरोगामित्व शब्दांतूनही सिद्ध होत नाही, अशा महाराष्ट्रातील नेत्यांच्या शिवराळ बोलण्याला दोष द्यावा, त्याला प्रसिद्धी देणार्‍या वार्ताहर, संपादक यांना दोषी धरावे की, हे दोषारोपण भाषेवरच करून मोकळे व्हावे, हा चिंतनाचा विषय आहे.

तसे पाहू जाता नेत्यांची शिवराळ भाषा ग्रामीण आणि नागरी महाराष्ट्राला नवीन नाही. आपण मांडत असलेल्या मुद्द्याची तीव्रता पटवण्यासाठी, अनवधानाने, रागाच्या भरात चुकून एखादा अपशब्द तोंडावाटे निघाला तर बोलणार्‍या माणसालाही त्याचा पश्चात्ताप होतो. त्याबद्दल तो प्रामाणिकपणे कबूलही करतो. पण, संजय राऊत जेव्हा ‘आय रिपीट’ असे म्हणून एखादी शिवी पुन्हा पुन्हा उच्चारतात तेव्हा त्याचे कुठल्याही पद्धतीने समर्थन करता येत नाही. कुणी करूही नये. मुद्दा शिल्लक राहतो तो माध्यमांनी त्याला प्रसिद्धी द्यावी की, देऊ नये? त्यांचे म्हणणे जसेच्या तसे दाखवावे की, त्याचे सभ्य व वृत्तपत्रीय भाषेत संपादन करून सांगावे? संपादकांचे बोलणे, लिहिणे संस्कार केल्याशिवाय प्रकाशित करू नये हा वृत्तविश्वातला संकेत आणि संस्कार आहे.

सध्या जिथे तिथे सोशल मीडियाचा जमाना झाल्यामुळे एखाद्या घटनेचे कोण, कुठे, किती व कसे चित्रण करून लगेच ते व्हायरल करेल याचा नेम नाही. पण, त्याच घटनेची बातमी होताना ती संस्कार न होता जशीच्या तशी प्रक्षेपित करणे अजिबात समर्थनीय नाही. नवाब मलीक दररोज जे काही बोलत, बरळत होते त्याचे प्रक्षेपण करणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना त्यातला फोलपणा दिसत नव्हता का? पण, आपल्याकडे काहीतरी वेगळी, धमाकेदार बातमी आहे, हे सिद्ध करण्याची चढाओढ वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती. आपल्या वाहिनीची प्रेक्षक संख्या वाढवणे, आर्थिक स्रोत वाढवणे या नावाखाली या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे, बातमीमूल्य नसलेल्या घटना बातमीतुल्य करून दाखवल्या जात होत्या. पडताळणी करून मग त्याची सविस्तर बातमी करण्याचे औचित्य पाळणे वृत्तपत्रीय मूर्खपणा मानला जातो. घटनेची बातमी ताबडतोब देणे इतके महत्त्वाचे झाले आहे की, त्याचे प्रेक्षकांवर परिणाम काय होतील याचा विचार करण्याची आवश्यकताच राहिली नाही. 

झटपट बातमी एकसारखी देत राहण्याचे तंत्र अवलंबल्यामुळे कुठल्याही घटनेचे आपणास हवे तसे अन्वयार्थ देणे सुलभ झाले आहे. त्याही पुढे जाऊन आपल्याला हवा तसा नॅरेटिव्ह स्थापित करणे सर्वमान्य झाले आहे. बहुतांश वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या ठरावीक नॅरेटिव्ह चालवतात. मग, ते नॅरेटिव्ह विचारधारेवर चालणारे असते किंवा आर्थिक गणितांवर चालणारे असते. त्यामुळे, काय दाखवावं, कसं दाखवावं हे सगळं त्या नॅरेटिव्हप्रमाणे ठरतं. ते बरोबर आहे की, चूक आहे हा प्रश्नच राहत नाही. नॅरेटिव्हला साजेल अशा पद्धतीने घटनेची बातमी करणे यातही फारसे चुकत नाही. पण, आक्षेप तेव्हा घ्यावा लागतो जेव्हा ते नॅरेटिव्ह सिद्ध करण्यासाठी घटनेचा एकच पैलू समोर आणला जातो. त्याही पुढे जाऊन घटना आणि बातमी यात प्रचंड तफावत केली जाते. घटना न घडताच त्याची बातमी ही तर याची परमावधी असते. त्यात सत्य, शुचिता यांना थाराच नसतो.

सार्वजनिक आयुष्यामध्ये या सत्य आणि शुचितेला फार महत्त्व असते. आपल्या विरोधी मताचा आदर आपण कशा पद्धतीने करतो यावर आपला सुसंस्कृतपणा ठरत असतो. आपण वैयक्तिक चाकोरीत कसे बोलावे आणि सार्वजनिक आयुष्यात कसे बोलावे याचे काही संकेत आहेत. सार्वजनिक आयुष्यात वावरणार्‍या प्रत्येक व्यक्तीने ते संकेत पाळणे अनिवार्य आणि बंधनकारक आहे. ग्रामीण भागांत किंवा बोलीभाषेत काही शब्द वापरणे अनुचित व चुकीचे मानले जात नाहीत. कोकणी, मराठी बोलीभाषा, मालवणी या भाषेत अनेक शिवराळ शब्द सर्रास वापरले जातात. पण, म्हणून ही बाब सार्वजनिक ठिकाणी, मंचावर वापरण्याचा परवाना ठरत नाही. रंगमंचावर ‘वस्त्रहरण’ यासारख्या नाटकांमधूनही शिव्यांचा वापर अपवाद म्हणून चालतो. ‘तांडव’सारख्या वेब सिरीजमध्ये वापरल्या जाणार्‍या  भाषेला शिवराळ म्हणणेही फारच क्षुल्लक वाटते. पंतप्रधान म्हणून दाखवलेल्या पात्राच्या तोंडी असलेली भाषा आणि शिव्यांचा मुक्त वापर, त्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे आहे की, स्वातंत्र्याची अभिव्यक्ती आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. 

ग्रामीण भाग आणि शिव्या यांचा अन्योन्य संबंध आपण नागर जोडतो. पण, हा भेदाभेद शिवीइतकाच अमंगळ आहे, हे वृत्तपत्रीय कार्यालयात पहिल्यांदाच रुजू झाल्यावर लक्षांत आले. आमच्या कार्यालयात इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला वार्ताहर गप्पा झोडताना जो काही ‘फकफकाट’ प्रत्येक वाक्यागणिक करायच्या, तो ऐकल्यावर लाजेने आमचीच मान खाली गेली. प्रजोत्पादन प्रक्रियेअंतर्गत आवश्यक क्रिया सूचित करणारी ग्राम्य शिवी, इंग्रजीतून घातली की, भलतीच नागर, उच्चशिक्षित आणि अभिमानाचा विषय होते याची जाणीव फार त्रास देऊन गेली. एखादा नेता, वक्ता शिवराळ भाषा हजारो लोकांसमोर बोलतो, यापेक्षाही प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद लाभतो, हे अधिक चिंताजनक आहे. 

राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत वक्ता असलेल्या एका तरुणीने पंतप्रधान मोदींना ग्रामीण भाषेतील अर्वाच्य शिव्यांनी संबोधित केले. त्याचा निषेध तिथल्यातिथे फक्त अजितदादांनी केला. त्या तरुणीचे मंचावरून बोलणे जसे चुकीचे होते तसेच सोशल मीडियावरून मते व्यक्त  करण्याची पद्धतही चुकीचीच आहे. पूर्वी सार्वजनिक संडासाच्या अर्धवट तुटलेल्या दारावर आतील बाजूने जो मजकूर लिहिला जायचा तोच मजकूर आजकाल फेसबुकवर लिहिला जातो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, भाजप या पक्षांचे अनुयायी जेव्हा एकमेकांविरुद्ध सोशल मिडियावर भिडतात तेव्हा नेत्यांच्या संदर्भात जे लिहिले जाते, ते वाचवत नाही. 

संजय राउतांनी किरीट सोमय्या यांच्याबद्दल खासगीत शिवी घालणे आणि पत्रकारांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी तसा उल्लेख करणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. मराठी भाषेत शिवीचा वापर निषिद्ध नाही. पण, प्रसंग व स्थान पाहून त्याचे उच्चारण करावे असा संकेतही आहे, हे विसरून चालणार नाही. वास्तविक ‘शिवी’ प्रत्यक्षात खोटीच असते हे घालणार्‍याला आणि ऐकणार्‍यालाही माहीत असते. शिवी हासडताना त्यात खरेपणा नाही हे आपण गृहीत धरलेले असते. एखाद्या सख्ख्या भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले तर त्या भावाला बहिणीवरून शिवी घालणे अप्रस्तुत ठरेल. शिवीत उल्लेखलेली कृती प्रत्यक्षात घडलेली नसते, ते असत्य असते म्हणूनच तर राग येतो. राग आलेला असतानाही हासडलेली शिवी, त्या रागाची तीव्रता अधोरेखित करण्यापुरतीच असते. हे घालणार्‍यालाही माहीत असते आणि ज्याला घातली आहे त्यालाही माहीत असते. 

जे दोघांनाही माहीत आहे, ते तिसर्‍याने सर्वांना दाखवावे का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. जे जे सार्वजनिक मंचावरून दाखवले जाते ते कसे दाखवले जाते यावर त्याचे चांगले, वाईट परिणाम ठरतात. म्हणूनच त्याचे संपादन होणे अत्यावश्यक ठरते. महाभारतातील शकुंतला आणि कालिदासाच्या नाटकातील शकुंतला यात खूप मोठा फरक आहे. महाभारतात जे जसं आहे, तसंच मांडलं आहे, कारण तो जय नावाचा इतिहास आहे. पण, शाकुंतल हे नाटक आहे, त्याचा समाजमनावर खोल परिणाम होतो हे लक्षांत घेऊन कालिदासाने त्यात बदल केले आहेत. आपण नेमकी हीच गोष्ट विसरत आहोत. ‘सनसनाटी’पणाच्या हव्यासापोटी आपण समाजात काय वाढतोय याचे भान आपल्याला मुळीच राहिले नाही. आज संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरून चर्चेची गुर्‍हाळे घालणार्‍यांनी ठाकरेंनी सार्वजनिक ठिकाणी घातलेल्या शिव्यांना ‘ठाकरी भाषा’ म्हणून गौरवले आहे. 

‘शिवरायांचे कैसे बोलणें’ असा गौरव असलेले ‘शिवराय’ आपल्या उच्चारणात कायम ठेवणार्‍या शिवसेनेच्या नेत्यांना स्वत:च्या सार्वजनिक आचरणात आपल्याच तोंडातली ‘शिवराळ’ भाषा अयोग्य वाटत नाही.  त्याचप्रमाणे आम्हा पत्रकारांनाही तीच शिवराळ भाषा बीप वाजवून किंवा न वाजवता वारंवार प्रक्षेपित करणे अयोग्य वाटत नाही.  राजकारण्यांना दोष देऊन आपली जबाबदारी सुटत नाही. ते शिव्या घालून मोकळे होतात. आपण त्याचे वारंवार प्रक्षेपण करून वर पुन्हा ‘राजकारणातील मराठी भाषेचा घसरणारा दर्जा‘ यावर चर्चासत्र घ्यायला मोकळे!  

शिवराळ भाषेसाठी वक्ता, नेता यांना दोष द्यावा, ते बोल ऐकून टाळ्या पिटणार्‍या प्रेक्षकांना दोष द्यावा,  की संस्कार करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी त्यांनी जसेच्या तसे प्रक्षेपित करण्याला दोष द्यावा? सार्वजनिक ठिकाणी चालणे, बोलणे आणि वागणे यात एकूणच ‘कुठलाही संकेत न पाळणे’ हा शिष्टाचार होत चालला आहे. अशा परिस्थितीत केवळ भाषेला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे?

चित्रस्रोत : आंतरजाल


५ टिप्पण्या:

  1. सार्वजनिक ठिकाणी चालणे, बोलणे आणि वागणे यात एकूणच ‘कुठलाही संकेत न पाळणे’ हा शिष्टाचार होत चालला आहे. अशा परिस्थितीत केवळ भाषेला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे?

    हा मुद्दा पटला. जे खासगीत बोलायचे ते सर्वांसमोर बोलताना विचार करत नाहीत. कॅमेरा आणि माइक समोर दिसला की, अनेकांना ऊत येतो.

    उत्तर द्याहटवा
  2. सर कोणत्या संकेतांच्या शब्दांचे आपण अपेक्षित आहात..? आज या लहरी नेत्यांनी सगळे संकेत बाजारात किलोने विकायला काढलेत.... यांच्या अंतरवस्त्रातली ठिगळे इतकी मोठी आहेत की त्यावर या शिवराळ भाषेचामुलामा दिल्याशिवाय गत्यंतर नाही.

    शिवरायांचा महाराष्ट्र अन हा मस्तवाल ऊडाणटप्पू छापरी नेत्यांचामहाराष्ट्र यात कमालीचे अंतर आहे आता... सत्तेपुढे शहाणपण चालते कुठे सर... वृत्तपत्रीय भाषेत संपादित करण्यासारखी तरी किमान सुसंस्कृत शब्दावली हवी.. इथे त्याचा दुष्काळ आहे.

    लेख सुंदर आहे...👍 मस्तच.

    उत्तर द्याहटवा
  3. लेख सुंदरच. महाराष्ट्रातील शिवराळ भाष्यकारांच्या डोळ्यात अंजन घालणारा. प्र.के.अत्रे सुद्धा बोलत असत पण तारतम्य बाळगून. पु.ल व अत्रेनी भल्याभल्यांची बोलती बंद केली पण भाषेचा आब राखून. बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे राऊत ही मंडळी शिवराळ च्या पुढे जाऊन भाषाभिकारडी आहेत. यांची महाराष्ट्रीय म्हणून लायकी नाही. शरद पवार खुप बरे.

    उत्तर द्याहटवा
  4. संस्कार आणि शिष्टाचार हे मूळात अंगभूत असावे लागतात आडात नाही तर पोहरयात कुठून येणार ?बुद्धी फिरते तशी जीभ वळते

    उत्तर द्याहटवा
  5. आजच्या असंस्कृत आणि अडाणी नेत्याकडे चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. त्यांना केवळ सत्ता आणि पैसा दिसतो. नीतिमत्तेचा तिथे पूर्णपणे अभाव आहे. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर यापेक्षा वेगळे ते काय करणार? कुठे कसे वागावे काय बोलावे काय बोलू नये याचे तारतम्य तरी कुठून येणार ?
    या लेखातून तुला नक्की काय सांगायचे आहे हे मात्र खूप चांगल्या पद्धतीने तू मांडले आहेस.

    उत्तर द्याहटवा