बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

सत्ता ते सत्तार व्हाया संजय...

होय नाही, होय नाही असे करता करता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकनाथ शिंदेंना संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना घेणे इतके आवश्यक होते का? एका संजयने उद्धव ठाकरेंची शिवसेना बुडवली आणि आता दुसरा संजय एकनाथांच्या शिवसेनेचा बिहार केल्याशिवाय राहणार नाही.

या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे की, भारतीय जनता पक्षाच्या अगतिकतेचा विस्तार आहे, हेच कळत नाही. अब्दुल सत्तार यांच्यावर टोकाची टीका करणारे भाजपचे कार्यकर्ते अक्षरश: तोंडावर आपटले. चित्रा वाघ यांच्यासह अनेकांनी संजय राठोड यांच्याविरुद्ध रान पेटवले आणि उद्धव ठाकरेंनी ज्यांना काढून टाकले, त्यांनाच मंत्रिपद मिळावे हा भाजपच्याच अगतिकतेचा विस्तार आहे. भाजपला खाली खेचणारे पहिल्या पाचात कसे? पाच टक्के कमिशनसाठी निधीच कंत्राटदारांना दान देणारे मंत्रिमंडळात कसे?

केवळ, आलेले पुन्हा उद्धव गटात जातील या भीतीपोटी वाट्टेल ते समीकरण स्वीकारणे हे राजकारण नव्हे. मग, उद्धव ठाकरे काय वाईट होते? युती टिकवण्यासाठी ज्या नाकदुर्‍या नितिश कुमार यांच्या बिहारात काढल्या त्याच सध्या महाराष्ट्रात काढल्या जात आहेत. भाजप आणि शिंदे गटासाठी हे अत्यंत घातक राजकारण आहे. राठोड आपल्यासह आणखी चार पाच जणांना घेऊन गेले असते, तर एवढं काय नुकसान झालं असतं? जे नुकसान झालं असतं त्या पेक्षाही अधिक नुकसान राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याने होणार आहे.
 
या पहिल्या फळीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप बाद झाला आहे. सर्वांत जास्त घातक गोष्ट म्हणजे ‘जे आले आहेत, ते जातील’ याची भीती. ही भीती भाजपची प्रतिमा धुळीस मिळवेल. शिंदे गटासाठीही अत्यंत वाईट अवस्था आहे. भाजपवाले ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांनाच पद देऊन भूषवणे हे भाजपच्या पुढील वाटचालीसाठी योग्य होत नाही. सत्ता टिकवण्यासाठी सत्तार, राठोड यांना स्थान देण्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. ज्यांच्याविरुद्ध रान पेटवले त्यांचीच ओवाळणी करणे याचे समर्थन भाजप कुठल्या तोंडाने करणार आहे?

विस्तारापेक्षाही पुढचा कारभार करणे फारच कठीण आहे. यापुढे ज्याच्यावर भाजप आरोप करत आहे, तो पुढे जाऊन भाजपमध्ये आल्यावर पवित्र होईल, याची खात्रीच पटत चालली आहे. अक्षरश: संजय राऊत व अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले तरी त्यात काही नवल वाटणार नाही. संख्याबळ हेच सर्व ठरवत असेल तर भाजपने तत्त्वांच्या बाता मारणे बंद करावे. पदरी पाडून घेऊन पवित्र करण्याचे धंदे बंद करावेत.

चित्रस्रोत : आंतरजाल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा