सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

माणूस असेल मोठा, पण...


‘टिळक पुण्यतिथीनिमित्त हेडगेवारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून याल का?’ या कौस्तुभ कारखानीस यांनी विचारलेल्या प्रश्नाला लगेच हो म्हणून टाकलं. हवी तिथे (बहुतांश वेळा नको तिथे) माहिती पाजळायची जुनाट सवय काही केल्या जात नाही. कुणासमोर बोलायचं आहे, या प्रश्नाला ‘इयत्ता पहिली ते चौथी’ हे उत्तर ऐकल्यानंतर पायाखालून बरंच काही सरकून गेलं. चतुर माणसांनी कारखानिसांना नकार का दिला, याचा लख्ख प्रकाश टाळक्यात पडला. स्वत:चाच उजेड हवा तेव्हा न पडण्याची इतकी सवय झाली आहे की, टाळक्यात पडलेला प्रकाश सहन होईना. 

सोपं करून सांगण्याइतकं कठीण जगात दुसरं काहीच नसतं. याचा परवा अंदाज आणि आज अनुभव आला. हेडगेवारमधील टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्तम झाला. गावडेबाईंनी पुढाकार घेऊन मुलांच्यातील मूर्तिकला जोपासण्याचा केलेला प्रयत्न खूप आवडला. मुलांनी केलेला चिकणमातीचा गणपती खूप आवडला. केवळ हेडगेवार विद्यालयापुरते असे उपक्रम मर्यादित न राहता ते प्रत्येक शाळेने राबवणे आवश्यक आहे. अंगद गाडगीळ, सान्वी फोवकर आणि ऋत्विक गावकर या मुलांनी खूप चांगली भाषणे केली. इयत्ता दुसरीत असलेली सान्वी महाडेश्वर या मुलीचे पाठांतर आणि सभाधीटपणा प्रचंड आवडला. 

लोकमान्य टिळक यांचे कार्य, कर्तृत्व, विचार, वाद याबद्दल वाट्टेल तेवढे बोलण्याची क्षमता असली, तरीही ज्यांनी ते ऐकायचे आहे, ते त्यासाठी तयार आहेत का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. लोकमान्य व इतर सर्व मोठे लोक आपल्याला खरंच समजले आहेत की, ते जयंती आणि पुण्यतिथीपुरते मर्यादित आहेत, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. मोठ्या माणसांचं जाऊ द्या, स्वातंत्र्यदिन शुक्रवारी येणं आपल्याला आनंद देऊन जातं आणि रविवारी येणं नाही. राष्ट्रीय सण, राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक यांचं महत्त्व आपल्या उरलं नाही की, आपल्याला ते समजतच नाही? लहान मुलांना ते समजणं कठीण आहे, पण शिकल्या सवरल्या माणसांनाही ते समजू नये याचं आश्चर्य वाटतं. त्याहीपेक्षा आपल्या आयुष्यात त्यांना स्थान नसणं, खूप विचित्र वाटतं. 

आपण या महापुरुषांची विभागणी करून घेतली आहे. टिळक पुण्यतिथीला त्यांच्याविषयी आंबेडकरांच्या मतांचा पुनरुच्चार करायचा, गांधी, नेहरू, फुले, शाहू महाराज यांचा उल्लेख करायचा. एकाच देव्हार्‍यातील आपल्याच दैवतांना एकमेकांविरुद्ध लढवून आपण नेमकं काय साध्य करत आहोत. दैवतांना फरक पडत नसेल कदाचित, पण आपला देव्हारा भंग होत चालला आहे. अभिमान आणि अस्मिता यांच्या झुंडशाहीत आपण गुंतत चाललो आहोत. ज्यांच्या नावे आपण भांडत आहोत, त्यांना प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात किती उतरवलं आहे, याचा विचार प्रत्येकाने करावा.

आपले आधीच तयार असलेले निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आपण महापुरुषांचा वापर करत आहोत. त्यांच्या विचारांशी, कार्याशी आपल्याला काहीच देणंघेणं नसतं. म्हणूनच त्यांची व्याप्ती जयंती आणि पुण्यतिथीपुरती आपण करून टाकली आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क/अधिकार आहे..’ हे केवळ दोनच दिवस आपल्याला आठवतं. बाकी जयंती आणि पुण्यतिथी यांचा संबंध तिथीशी तोडून टाकत, आपण तो तारखेशी जोडला आहे. यातून शिवाजी महाराजही सुटले नाहीत. 

‘नाही, माणूस असेल हो मोठा. पण, आमच्या हिशेबी त्यांच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर?’ हा पुलंच्या अंतू बर्व्याला पडलेला प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो.  मग, त्याचे उत्तर म्हणून प्रसंगोपात्त आठवण, हे सोपे उत्तर आपण शोधतो. त्यांचे फोटो, सुविचार व्हॉट्सअ‍ॅप वगैरेंवर शेअर करतो. प्रत्यक्षात त्यांच्या विचारांवर चालून पाहण्याचे धाडस करू इच्छित नाही. त्यांच्या प्रतिमेला हार घालणे, त्यांच्या चरणांशी बसणे एवढेच करतो. स्वत:ला त्यांच्या चरणात आणतो, त्यांना आपल्या आचरणात आणत नाही. त्यांचा एखादा विचार, एखादे कार्य आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वत: तो तपासून पाहिला पाहिजे. तेव्हा कुठे त्यांचे मोठेपणा किती मोठा व कठीण आहे, हे आपल्याला समजेल.

३ टिप्पण्या: