गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

श्रद्धाची हत्या आणि विचार करावे असे काही...

श्रद्धा हत्येनंतर अनेक प्रश्न, अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत.  त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकलकोंडेपणा व कमालीचा अलिप्तपणा. आपण आपल्याच माणसांपासून दूर जाणे, कुणाच्याही संपर्कात न राहणे खूपच चिंताजनक आहे. आपण खरोखरच ‘सोशल’ आहोत का?

वेळग्यात आमच्या शेजारी राहणारे स्व. बाबा सहस्रबुद्धे फोंड्यात फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. काही काळानंतर ते पुन्हा वेळग्यातला त्यांच्या घरी राहायला आले. त्यांनी व्यक्त केलेली एक खंत येथे सांगावीशी वाटते. फोंड्यात गेल्यापासून आठ दहा दिवस झाले तरी शेजारीपाजारी कोण आहेत याची कल्पना नाही, सगळ्यांचे दरवाजे कायम बंद, येणेजाणे नाही, बोलणे नाही. याची त्यांना अजिबात सवय नव्हती. वेळग्यात सहस्रबुद्ध्यांच्या घराचा दरवाजा सकाळी उघडला की, रात्रीच बंद होई. दिवसभर कुणाचा ना कुणाचा तरी कायम येत जात असे. अर्थात बाबा सहस्रबुद्धे ही व्यक्तीही तशीच होती. पण, ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती आठ दिवस कुणाला दिसली नाही तर चौकशी, विचारपूस झाली नाही, असे होत नाही. एवढेच कशाला संध्याकाळची दिवेलागणी आठ वाजेपर्यंत न झाल्यास लगेच शेजारी विचारपूस करतात, ‘काय बरं आहे ना?’

हीच बाब शहरात घडतेच असे नाही. उलट अशा विचारपूस करण्याला नाक खुपसणे, बॅड मॅनर्स म्हटले जाते. त्याहीपुढे जाऊन व्यक्तिगत स्पेसवरचे ते अतिक्रमण समजले जाते. नवरा-बायकोंचे एकमेकांना जाब विचारणेही व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचा घाला समजू लागलो आहोत, ‘प्रायव्हेट स्पेसवरील अतिक्रमण’ समजू लागलो आहोत. 

श्रद्धा नामक परिचयातील व्यक्ती सहा महिने दिसलीच नाही तर निदान व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज, फोन वगैरे कुणी तिच्या मैत्रिणींनी, मित्रांनी केलाच नाही? केलेले तुकडे सहा महिने आफताब नेऊन जंगलात टाकत होता, ते कुणालाच दिसलं नाही? कुटुंबीयांनी विचारलंच नाही? त्याच्या ‘कॉमन’ मित्रांनाही विचारावसं वाटलं नाही? आपण खरोखरच समाज म्हणून जगतोय की, प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्याच कोशात वावरतोय?

अजित, अंतू, धीरज, अमर, निगम यांसारख्या असंख्य मित्रांचा फोन वेळेत उचलला नाही तर ही महाबिलंदर माणसे किती खेचतात त्याला तोड नाही. सकाळी फोन केला आणि त्यांना दुपारपर्यंत प्रतिसाद दिला नाही दिला तर यातला एकटा तरी संध्याकाळपर्यंत घरी टपकतो. दार उघडल्याबरोबर प्रेमाने विचारलेला पहिला प्रश्न असतो, ‘आहेस ना जिवंत?’ 

श्रद्धा आणि आफताब हे दोघे आपल्या मित्रांपासून इतके फटकून वागत होते की, कुणीही त्यांची कसलीच चौकशी केली नाही? बरे हे घडत होते ते दूर जंगलात कुठे तरी घडत होते का? तर नाही. ते शहरी भागात, भर वस्तीत होते. तरीही असे का घडले, हा खरा चिंतेचा विषय आहे. 

आजकाल आपण इंटरनेट, मोबाइलच्या जंजाळात अडकून इतके ‘सोशल’ झालो आहोत की, प्रत्यक्ष भेट होतच नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्यातरी अजब, विचित्र दुनियेत स्वत:ला गुरफटवत आहोत. मित्र, सहकारी, नातलग यांचा अधिकारच आहे आपली काळजी करण्याचा. कुणाला कितपत आत येऊ द्यायचे, हे निवडण्याचा आपला अधिकार निश्चितच आहे आणि तसे केलेही पाहिजे. पण, त्याचबरोबर अजिबात कुणी दखल देऊ नये, हे योग्य नाही, याचाही विचार केला पाहिजे. खास करून मुलींनी, कायम आपल्या पालकांच्या, मैत्रिणींच्या, मित्रांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आईवडिलांशी कितीही भांडण झाले तरी त्यांना आपली काळजी असते, हे अजिबात विसरू नये. अगदी त्यांच्याशी बोलतच नाही, असे असले तरीही त्यांची व आपली ख्यालीखुशाली एकमेकांना समजेल अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. कुठलाही बाप मुलीशी भांडेल, बोलल्याशिवाय राहील, पण तिचे तुकडे तुकडे करून केलेली विल्हेवाट सहन नाही करू शकणार. 

कौटुंबिक मतभेद इतकेही ताणू नयेत की, आपण एकदमच अलिप्त, असुरक्षित होऊन जाऊ. आठवड्यातून किमान एकदा तरी ग्रुपवर, फेसबुकवर, ब्लॉगवर काही ना काहीतरी लिहा, शेअर करा. आपल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून का असेना, पण ठेवा. किमान महिन्यातून एकदा तरी एका मित्राला, मैत्रिणीला, नातलगांना प्रत्यक्ष भेटा. तेवढा वेळ निश्चितच असतो आपल्याकडे. कुणी बर्‍याच दिवसांत दिसले नाही तर, किमान फोन तरी करा. चौकशी करा. यात गैर काहीच नाही. फार तर ती व्यक्ती रागावेल. रागावू दे. पण, ख्यालीखुशाली घ्या. आपण माणूस म्हणून वागलो नाही, तर असे अमानुष कृत्य पाहण्याची, सहन करण्याची पाळी आपल्यावरही येऊ शकते.


चित्रस्रोत : आंतरजाल

७ टिप्पण्या:

  1. लेख तर चांगलाच आहे पण हे असे होऊ न देणे यासाठी सर्वानी विचार करायला पाहिजे हे त्या श्रद्धा चे 35 तुकडे म्हणजे आपल्या कुटुंब आणि समाज व्यवस्थेचे तुकडे झाल्या
    सारखे आहे याचा खेद वाटतो

    उत्तर द्याहटवा
  2. खरोखरच विचार करण्यासारखा लेख आहे. गावात फार छान आहे अजून. एकमेकांच्या स्पेस मध्ये जाऊन खुशाली तरी विचारता येते. इथे शहरात मात्र वर्ष भर ही कळत नाही शेजारी कोण आहेत हे.

    उत्तर द्याहटवा
  3. शहर आणि गाव! शहरात माणसं गर्दीत राहूनही अलिप्त झालेली आहेत.आणि गावात विरळता असूनही माणसं भावनेने एकमेकांशी जोडली गेलेली आहेत.

    उत्तर द्याहटवा