बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

माध्यमांनी हा गाढवपणा आधी बंद करावा...

एका वृत्तवाहिनीवर बाइट घेणार्‍या मुलीने संभाजी भिडेंना मंत्रालयात येण्यावरून प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी आधी ‘आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. प्रत्येक स्त्री ही आम्हाला भारतमातेसमान आहे आणि भारतमाता विधवा नाही.’ या घटनेचे टीव्हीवर झळकणारे मथळे फार मनोरंजक होते. ‘संभाजी भिडेंकडून महिला पत्रकाराचा अपमान’, ‘म्हणे टिकली लावा तरच बोलतो’, ‘संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान’, ‘लावली नाही टिकली, तुमची का सटकली?’ त्याही पुढची गंमत म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘समाजात अशा काही विकृत मनोवृत्तीची लोकं आहेत जी सातत्याने महिलांचा आत्मविश्वास ढासळावा, त्यांना दुय्यम लेखावं, अशा पद्धतीची विधानं करताहेत आणि निश्चितपणानं राज्य महिला आयोगाच्या वतीने त्यांना आजच नोटीस जाईल. ज्याचा त्यांनी खुलासा करावा.’

‘प्रत्येक महिला ही भारतमातेसमान आहे’, यात महिलांचा अपमान कसा आहे आणि हे वादग्रस्त विधान कसे आहे, हे एकदा या माध्यमांतील बहाद्दरांनी सांगावेच. प्रश्न विचारणार्‍या महिलेने कुंकू लावण्याची अपेक्षा ठेवणे, हे स्त्रीला दुय्यम लेखण्याच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण कसे ठरते, हेही सांगावे. 

भिडेंनी प्रतिक्रिया नाकारण्यासाठी दिलेले कारण व नकार रास्त आहे का, असा प्रश्न विचारला असता, तर एकवेळ समजून घेता आले असते. पण, काहीही करून ओढून ताणून त्याचा संबंध महिलांच्या अपमानाशी व दुय्यम लेखण्याशी लावणे, कितपत योग्य आहे, याचा विचारही झालाच पाहिजे.

जसा पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तसाच कुणाला उत्तर द्यावे, कोणत्या कारणासाठी द्यावे, हे निवडण्याचा अधिकार भिडेंना नसावा का? महिला पत्रकाराला जसा कुंकू न लावण्याचा अधिकार आहे, तसाच कुंकू न लावणार्‍या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न देण्याचा अधिकार भिडेंना असू नये का?

महाराष्ट्र सरकार व राज्य महिला आयोगाने आपली शब्दयोजना सुधारणेही अत्यंत गरजेचे आहे. ‘विधवा प्रथा बंदी’ म्हणजे नेमके काय? विधवा ही प्रथा आहे का? दुर्दैवाने एखाद्या महिलेला वैधव्य प्राप्त होते की, प्रथेमुळे होते? वास्तविक ‘विधवा महिलांना दिल्या जाणार्‍या हीन वागणुकीविरुद्ध जनजागृती करा’ असा आदेश हवा. सती जाणे हा अपवादात्मक प्रकार असतानाही त्याला हिंदू धर्मातील ‘प्रथा’ ठरवून व क्रमिक पुस्तकातून शिकवून आपण मोकळे झाले आहोत. प्रथा म्हणजे अनिवार्य रीत जी पिढ्यानपिढ्या पाळलीच जाते. पाळणे हा नियम आणि न पाळणे हा अपवाद. सती या अपवादाला आपण नियम कसे ठरवले?  तेच तर्कट विधवांच्या बाबतीत लावले जात आहे. 

ज्या ज्या गोष्टींविषयी आस्था, श्रद्धा आणि आदर आहे, त्या त्या गोष्टींना चुकीचे, वाईट, घातक ठरवणे हा उद्देश आहे. एखाद्या गोष्टीला वाईट ठरवता आले नाही की, समाजात असलेले त्या गोष्टीचे स्थान, आदर यांना हळूहळू धक्का पोहोचवला जातो. त्यांच्याविषयी नकारात्मक भावना रुजवली जाते. अशा प्रकारच्या बातम्या व घटनांचे वृत्त करणे हे त्याचेच एक रूप आहे. जाणूनबुजून केला जाणारा हा गाढवपणा आहे. 


७ टिप्पण्या:

  1. प्रश्न अगदी बरोबर उपस्थित केले आहेत. उत्तम विश्लेषण

    उत्तर द्याहटवा
  2. भिडे गुरुजी योग्य तेच बोलले

    उत्तर द्याहटवा
  3. सगळे मुद्दे पटण्याजोगे मांडलेयत.
    मीरा प्रभूवेर्लेकर

    उत्तर द्याहटवा
  4. एकदा सांगतात विधवा नी कुंकू लावून नये खर तर ते त्याच्या जन्मापासून माथी मारलेले आहेच ते त्या नी कधी लावावे आणि कधी लावू नये एवढी पण श्वास घेण्याएवढीमोकळीक महिलांना असू नये का? हे भारतमातेचे दुर्दैव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्वास घेण्याएवढी सुद्धा स्त्रियांना मोकळीक नाही हा दावाच मुळात चुकीचा आहे,
      हिंदू समाज हा खूप प्रगतशील आहे,विधवांनी कुंकू लावू नये असा पूर्वी पासूनच एक संकेत आहे, त्याची कारणं आपण शोधायचा प्रयत्न कधी केलेला नाही,
      परंतु गेल्या काही वर्षापासून विधवा स्त्रिया कुंकुही लावतात, मंगळसूत्र वापरणं सुद्धा कायम ठेवतात आणि आपला समाज तेही स्वीकारतो आहे,
      आता इथे एक विषय असाही होतोय की विधवा स्त्रिया कुंकू लावतात आणि आमच्या विवाहित स्त्रिया कुंकू लव म्हणून सांगितलं तर यांना एकदम स्त्री स्वातंत्र्यावर अतिक्रमण झाल्यासारखं वाटतंय

      हटवा
  5. छान.

    भीडे गुरूजींच्या सत्कार्याची, तळमळीची काहींना घ्रुणा आहे म्हणून हि चिडचीड.

    उत्तर द्याहटवा
  6. भिडे गुरुजी योग्यच बोलले, त्यात काहीही चुकीचे नाही

    उत्तर द्याहटवा