शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

चुका, मुद्राराक्षस आणि राक्षसाची मुद्रा

घटनेचे वृत्त होताना तिला अनेक प्रक्रियेतून जावे लागते. पत्रकार, वार्ताहर, उपसंपादक, प्रूफरीडर वगैरे अनेकांचे संस्कार त्यावर होत असतात. त्यातूनही वृत्तपत्राची भूमिका, व्याप्ती, मर्यादा, उपलब्ध वेळ यासकट अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. तपासून पाहणे प्रत्येकवेळी शक्य असतेच असे नाही. त्यामुळे छापील मजकुरात चुका राहून जाणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. तरीही ही सबब आहे का आणि बाजू घेणे आहे का, हे दोन महत्त्वाचे प्रश्न शिल्लक राहतात. ज्याची उत्तरे प्रत्येक संबंधिताने शोधणे आवश्यक आहे.

शब्द बदलताना वाक्य रचनेकडे लक्ष न दिल्यामुळे होणारा अनर्थ, चुकीचे शब्द वापरल्यामुळे घटनेचा अर्थच बातमीतून चुकीचा सांगितला जातो, तेव्हा ते एका टप्प्यापर्यंत क्षम्य आहे. फोटोला चुकीचे कॅप्शन देणे, एका बातमीचा फोटो दुसर्‍या बातमीला लावणे, मेलेल्या म्हातारीचा फोटो अनेक वर्षे छापणे हे उद्योग होतात. चुकीचे शब्द वापरणे, चुकीची भाषा, भाषांतराच्या चुका वगैरे गोष्टी घडतच असतात. यात संबंधित उपसंपादक मुद्राराक्षसाच्या भूमिकेत गेल्यामुळे चुका घडतात आणि त्यातून विनोदनिर्मिती होते. 

मुद्दाम जाणूनबुजून केल्या जाणार्‍या चुका क्षम्य कशा म्हणता येतील? उदाहरणच द्यायचे झाल्यास; ‘दिवाळीचा प्रदूषणकारी सण’ हा मथळा आणि ‘हर्षोल्हास साजरा करणारी बकरी-ईद’ हा मथळा, असे दोन्ही मथळे एकाच वर्तमानपत्रात छापून येत असतील तर? थोडं आणखी स्पष्ट करून सांगतो. काही अलिखित नियम मथळा देताना अनेक वर्तमानपत्रांत पाळले जातात. 

१. अत्याचार करणारा हिंदू असेल आणि पीडित मुलगी दलित असेल तरच ‘दलित मुलीवर बलात्कार’ असा ठळक उल्लेख मथळ्यात करायचा. तेच अत्याचार करणारा मुस्लीम असेल आणि पीडित मुलगी दलित असेल तर पीडितेच्या जातीचा, समाजाचा उल्लेख करायचा नाही आणि अत्याचार करणार्‍याच्या समाजाचाही उल्लेख करायचा नाही.

२. ज्याच्यावर अत्याचार झाले आहेत, तो मुस्लीम असेल तर त्याचा उल्लेख ‘मुस्लीम युवक/युवतीवर अत्याचार’, असा मथळ्यात ठळकपणे करायचा. 

३.अत्याचार करणारा मुस्लीम असल्यास तो गरीब आहे, अशिक्षित आहे, तो ड्रग अ‍ॅडिक्ट आहे असे मथळ्यात ठळकपणे नमूद करायचे, पण मुस्लीम आहे, हे अजिबात नमूद करायचे नाही. इस्लामी तंत्रविद्या वापरणारा असेल तरीही त्याचा उल्लेख ‘तांत्रिक’, ‘बाबा’ असा करायचा. रेखाचित्रही जटाजूट, रुद्राक्षांच्या माळा घातलेल्याचे रेखाटायचे.  चुकूनही इस्लामिक, ख्रिस्ती प्रतीक द्यायचे नाही.

४. दहशतवादाला कधीच इस्लामिक दहशतवाद म्हणायचे नाही. कट्टरपंथी, अलगाववादी, फुटीरतावादी असे शब्द वापरायचे आणि अगदीच नाइलाज झाल्यास दहशतवादी म्हणायचे. 

५. यातले काहीच देण्यासारखे नसल्यास, मोर्चा राज्यात सरकार कुणाचे आहे, तिकडे वळवायचा. ‘सुरक्षा व्यवस्था ढासळली.’ किंवा ‘राज्यात महिला असुरक्षित’ असा मथळा करायचा. 

या कुठल्याही प्रकारात चूक सहज झालेली नसते. उलट मुद्दाम तसे केले जाते. यामागे अनेक नॅरेटिव्ह कार्यरत असतात. पहिला म्हणजे ‘बहुसंख्य अल्पसंख्याकांवर नेहमीच अत्याचार करतात.’ दुसरा म्हणजे ‘बहुजनांवर कायमच अत्याचार होतो.’ ‘दलित महिलेवर अत्याचार’, असा मथळा देण्यामागे महिलेवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणे हा हेतू अजिबात नसतो. उलट, ‘ती दलित आहे, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला.’ हा नॅरेटिव्ह चालवायचा असतो. याशिवाय पक्षीय भूमिका, आर्थिक गणिते वगैरे अनेक मुद्दे आहेत, जे अशा प्रकारच्या बातम्यांना प्रवृत्त करतात. 

‘वार्ताहरांनी, उपसंपादकांनी, संपादकांनी एखादी बाजू घ्यावी की, घेऊ नये?’ हा एक यक्षप्रश्न वृत्तपत्र क्षेत्रात विचारला जातो. त्याचे उत्तरही सोयीनुसार दिले जाते. बाजू घ्यायची म्हटली तर कुठली, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ‘सत्याची’, ‘घटनेतील कोणतीही एक’ आणि ‘कुठलीच नाही’, यापैकी कोणती बाजू घ्यावी, याची निवड करणे कर्मकठीण असते. आपल्याला जे माहीत आहे, तेच सत्य आहे, याबद्दल खात्री नसते. कोणतीही एक बाजू घ्यावी, तर बातमी एकांगी होण्याची भीती असते. कुठलीच बाजू न घेतल्याने घटना आणि बातमी दोन्हींवर अन्याय होण्याची शक्यता असते. त्यामुळे, करावे काय, हा यक्षप्रश्न उभा ठाकतो. या सर्व गदारोळातून वाट काढण्यासाठी ‘सोयी’ची बाजू घेतली जाते. म्हणूनच घटनेची बातमी झाल्यावर ती घटनेशी अजिबात प्रामाणिक राहत नाही. 

‘घटना जशी आहे, तशी तिची बातमी करावी. आपली मते त्यात घुसडू नयेत.’ हे पत्रकारितेत सांगितले जाते. फक्त सांगितले जाते, पाळले जात नाही. यामुळे, पत्रकारिता एक प्रकारच्या झुंडशाहीची बळी ठरत आहे. ‘आपल्या बाजूचा आहे ना, मग तो चूक असला तरी त्याला बरोबर म्हण.’ आणि ‘आपल्या बाजूचा नाही ना, मग बरोबर असला तरी चूक ठरव.’, अशी आग्रही मागणी केली जाते. झुंडशाहीत टिकून राहायचे असेल तर ही मागणी निमूटपणे मान्य करावी लागते. ही झुंडशाही राजकीय, वैचारिक किंवा अन्य कुठलीही असू शकते. 

‘प्रस्थापित सत्तेच्या विरुद्ध वृत्तांकन केले तरच ती निर्भीड व खरी पत्रकारिता’, असा एक विचित्र निकष लावला जातो. ‘प्रत्येक घटनेला, ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशा दृष्टिकोनातून पाहावे.’ हा दुसरा एक दंडक आहे. त्यामुळे, जे ‘जसे आहे’, तसे ते कधीच सांगितले जात नाही; ‘जसे हवे’, तसे सांगितले जाते. अशावेळी सबब आणि बाजू घेणे यापेक्षाही काही तरी वेगळे घडत असते. घटनेची बातमी होताना उमटलेली चूक हा मुद्राराक्षसाचा विनोद नसतो, तर ती राक्षसाने उमटवलेली मुद्रा असते!


३ टिप्पण्या:

  1. सुंदर लेख लिहिला आहे.
    असाच एक प्रकार आहे जेथे सातत्याने प्रयत्न असतो आपला फोटो paper माध्यमातून येण्यासाठी खटपट अगदी देव दर्शन असो अथवा कुठल्याही कार्यक्रम असो सतत फेसबुक तसेच ईतर माध्यमातून प्रचंड प्रमाणात प्रचार. जाहिरात न करता वापर करत आलेले PR .अशाने प्रसिद्धी मिळत असेल पण अपचन होते त्यामुळे like कमी होतात.परिपक्व विचार दुर्लक्षित होतात. बघा पटतंय का ? लिहिण्यात तुमच पेन थांबू शकत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. आमच्या हातात पडणार्‍या वर्तमानपत्राची पूर्वतयारी आणि बांधणी कशी होत असते , त्यांचे अंतर्गत ताणतणाव, राजकारण ह्याबद्दल आम्ही वाचक अनभिज्ञ असतो. या ब्लॉगमधून खूप गोष्टी कळल्या. वर्तमानपत्रात छापून येणारी बातमी, 'जशी घडली तशी' नव्हे तर ' जशी हवी तशी' प्रकाशित होते, हे ही लक्षात आले. अतिशय माहितीपूर्ण ब्लॉग.

    उत्तर द्याहटवा
  3. तंतोतंत लागू पडते आणि म्हणूनच लोकांचा माध्यमांवरील विश्वास उडाला आहे. खरंतर पत्रकारिता ही नि: पक्षपाती असायला हवी पण तसं होत नाही .ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने सर्व काही चालतं त्यामुळे लोकही बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत , म्हणूनचं निर्भिड पत्रकारिता उरलेली नाही.

    उत्तर द्याहटवा