शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

श्राद्ध का करावे?

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य चार प्रकारचे ऋण आपल्या माथ्यावर घेऊन येत असतो. देव ऋण, ऋषि ऋण, पितृ ऋण आणि मनुष्य (समाज) ऋण. यालाच ऋणचतुष्टय असे म्हणतात. देव ऋण अंशत:  फेडण्यासाठी यज्ञ करावेत. (यज्ञ म्हणजे केवळ हविर्द्रव्य अर्पण करणे नव्हे. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत) ऋषि ऋण अंशत: फेडण्यासाठी स्वाध्याय, अभ्यास आणि संशोधन करावे. पितृऋण अंशत: फेडण्यासाठी श्राद्ध व तर्पण करावे. मनुष्यऋण किंवा समाजऋण फेडण्यासाठी आपल्या ज्ञानाचे, अनुभवांचे समाजापर्यंत पोहोचवणे, सामाजिक कार्य करणे (नाव, कीर्ती, राजकारणात जाण्याची पहिली पायरी म्हणून नव्हे).

चारही आश्रमांपैकी गृहस्थाश्रम प्रमुख आहे.  आपण गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्यावर हयात असलेल्या तीन पिढ्यांची व हयात नसलेल्या तीन पिढ्यांची जबाबदारी असते. वसू, रुद्र आणि आदित्य स्वरूपात असलेल्या मागील तीन पिढ्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी श्राद्धात दानाच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. ब्राह्मणाला दान द्यायचे नसल्यास देऊ नका. अगदी  आपण नास्तिक असलो, कर्मकांड वगैरे मानत नसलो तरीही आपापल्या योग्यतेप्रमाणे या पद्धतींचा अवलंब  करावा. पूर्वी ओझे ठेवण्यासाठी खांब बांधले जात, तळी, जलाशय, पाणपोयी उभारली जात, तोही यातलाच प्रकार आहे. आईवडिलांचे जे स्वप्न अपूर्ण राहिले; भले ते शिक्षण, उपक्रम, विचार किंवा अन्य काही असेल ते पुढे न्यावे. एखाद्या मुलास शिक्षणात मदत करावी(आपल्या नावाचा जयजयकार न करता). सर्वांना हे करणे शक्य होईलच असे नाही. त्यांनी विधीयुक्त श्राद्ध, तर्पण तरी करावे. अजिबातच शक्य नसेल त्यांनी किमान, ब्राह्मणाला शिधा तरी त्याच तिथीस द्यावा. मात्र, काहीच केल्याशिवाय राहू नये. 

सूक्ष्म देहाने स्थूल देह सोडणे म्हणजे मृत्यू. सूक्ष्म देहाला स्थूल देहाच्या आकाराची काही काळ का असेना सवय होते. (म्हणूनच आपल्याकडे पार्थिव शरीर पुरण्याऐवजी जाळण्याचा विचार ऋषींनी दिला तो योग्यच आहे. ख्रिश्चनिटी व इस्लाममध्ये पार्थिव शरीर पुरले जाते व जजमेंट डे किंवा कयामत का दिन या दिवशी देव निर्णय करेपर्यंत तसे ठेवावे लागते. म्हणूनच ते ‘रेस्ट इन पीस’ म्हणतात.) सूक्ष्म देहाला जाणीव असते, पण व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे स्थूल देह त्याच्याकडे नसतो. सूक्ष्म देहाने हा देह सोडून पुढच्या प्रवासास लागावे म्हणूनच तो जाळला जातो. यासाठी जे या विचारांनी जगले त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना श्रद्धांजली देताना ‘रेस्ट इन पीस’ म्हणू नये. एका बाजूने पार्थिव देह जाळायचा आणि दुसऱ्या बाजून त्याच पार्थिवाला ‘शांततेत विश्रांती घे’ म्हणायचे ही माणसाची मेल्यानंतर केलेली अक्षम्य आणि क्रूर थट्टा आहे. शांततेने विश्रांती घेण्यासाठी (रेस्ट इन पीस) स्थूल देह किंवा पार्थिव शरीर आहे कुठे? ते तर जाळले गेले आहे. स्थूल देह जाळल्यानंतर, सूक्ष्म देहाचा पुढे प्रवास होणे अपेक्षित आहे. त्याने तिथेच गुरफटून राहणे अपेक्षित नाही.

कोणत्याच कर्मफलाचे बंधन नसल्यास सूक्ष्म देह सत्, चित्, आनंद या अवस्थेस जातो. आपल्याकडील सर्व संत याच अवस्थेतून पुन्हा स्थूल देह धारण करतात व परत त्याच अवस्थेत परततात. पुन्हा स्थूल देह प्राप्त होईपर्यंत किंवा शुद्ध चैतन्य होईपर्यंत सूक्ष्म देहाचा प्रवास सुरूच राहतो. तो वसू, रुद्र, आदित्य या स्वरूपात राहतो. त्याला पुढे गती मिळावी म्हणून जशी त्याची कर्मे साहाय्यक होतात, तशीच आपण जाणीवपूर्वक आणि श्रद्धेने केलेली कर्मेही साहाय्यभूत होतात. स्थूल देह धारण केला तरीही आपण त्यांच्यासाठी केलेली कर्मे त्या जन्मात ‘काहीही स्वार्थ, संबंध नसताना मदत मिळणे’, वगैरे अशा पद्धतीने साहाय्यभूत होतात. आपण आपल्या पूर्वजांचे देणे लागतो, जो देह धारण केला आहे तो त्यांच्यामुळे आहे, एवढे तरी किमान लक्षात ठेवून आणि आपली जबाबदारी म्हणून जाणीवपूर्वक व श्रद्धेने श्राद्ध करावे. 

माणूस मेल्यावर ‘आत्म्याला सद्गती लाभो’, ‘आत्म्याला शांती लाभो’, असे आपण म्हणतो ते एका अर्थाने चुकीचे आहे. आत्मा (शुद्ध चैतन्य किंवा जाणीव) शांतच असतो व त्याला कुठेही जायचे नसते. ज्याला कर्माच्या बंधनातून सुटेपर्यंत एका स्थूल देहातून दुसऱ्या स्थूल देहात प्रवास करायचा असतो, तो सूक्ष्मदेह असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मी आपल्याला चारही प्रकारचे ऋण अंशत: फेडण्यासाठी जाणीवपूर्वक आणि श्रद्धेने कर्म करणे आवश्यक आहे. तो आपला धर्म आहे. त्याचे पालन करावे; थट्टा करू नये.

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

बोलून घालवलेत ते मुलाखती देऊन मिळेल?

दामोदर मावजो यांनी आता कितीही सारवासारव केली तरी त्यांनी जाणीवपूर्वक केलेली खेळी अपेक्षित परिणाम दाखवून गेली. दोन भाषा असलेले एकाच संस्कृतीचे लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. भाषा एकच, परंतु लिपी व संस्कृती भिन्न असलेले सध्या शांत आहेत. २०२७ उजाडता उजाडता ते कमालीचे सक्रिय होतील यात अजिबात शंका नाही. साहित्य व संस्कृती यांतील लोकांत उलथापालथ झाली तरी राजकारणी वारे पाहून सूप धरतील. या सगळ्या वादात भाषा म्हणून कोकणीचा व मराठीचा काय लाभ झाला, याचा विचार केल्यास उत्तर शून्य असेच येते.  

देश म्हणजे काय याची आजची राजकीय व्याख्या दामटून प्रचलित केली जात असली तरी भारत हा प्राचीन काळापासून ‘सांस्कृतिक राष्ट्र’ म्हणून एकच होता. आजकाल ‘विविधतेत एकते’चा ढोल पिटताना, ती एकता संस्कृतीमुळे होती हे अजिबात सांगितले जात नाही. उलट त्या विविधतेत ‘संस्कृती’लाही गोवले जाते. भाषा, प्रांत वेगवेगळे असूनही एकत्र बांधून ठेवणारी संस्कृती व बिटिशांविरुद्ध सुरू असलेले स्वातंत्र्याचे आंदोलन चिरडण्यासाठी ‘भाषा’ हे  प्रभावी शस्त्र असल्याचे बंगालच्या फाळणीचा विषय हाताळताना ब्रिटिशांच्या लक्षात आले. वरवर जरी ‘प्रशासकीय सुलभता’ हे कारण पुढे केले असले तरी बंगालची फाळणी करताना भाषावार प्रांतरचना हेच सूत्र अवलंबले गेले. गोऱ्या साहेबांना सत्ता टिकवण्यासाठी जे शस्त्र सापडले तेच शस्त्र घेऊन काळ्या साहेबांनी राज्य चालवले. त्याला विरोध होता तो बाबासाहेब आंबेडकरांचा. 

‘भाषावार प्रांतरचनेमुळे स्थानिक अस्मिता टोकास जातील, स्थानिक लोकांमध्ये स्वत:चे अस्तित्व आहे, ते जोपासण्यासाठी चढाओढ लागेल व त्यामुळे भारताच्या स्थैर्याला आणि विकासाला खीळ बसेल. त्याचबरोबर भाषिक वैविध्य असूनही आपण सर्व भारतीय एक आहोत, अशी एकतेची भावना आपल्यामध्ये निर्माण होणार नाही’ (संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सायमन कमिशनसमोरील साक्ष, १९२८). आंबेडकरांनी तेव्हा व्यक्त केलेली भीती आज सार्थ ठरत आहे. 

भाषावार प्रांतरचना करताना भाषा व संस्कृती हे दोन मानक ठरवले गेले. त्याकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले गेल्याने त्याचा विस्तार केला नाही. एकाच प्रांतात एकच संस्कृती व दोन भाषा असतील तर त्याची विभागणी कशी करावी, याचे स्पष्ट निकष ठरले नाहीत. त्यातही,  भाषा ही मुखत्वे दोन प्रकारे व्यक्त होते; बोली व लिखित, याचाही विचार झाला नाही. प्रत्येक भाषेचे ‘बोली’ व ‘प्रमाण’ असे स्वरूप असते. गोव्यात कोकणी ही बोलायची भाषा व मराठी ही लिहायची भाषा म्हणून फार पूर्वीपासून आजपर्यंत प्रचलित आहे. कोकणी ही मराठीची बोली नाही. कोकणी ही गोव्यात राहणाऱ्यांची व गोव्यातून इतरत्र जाऊन राहिलेल्यांनी तिथे नेलेली ‘बोली’ भाषा आहे. भूभाग व समाज याप्रमाणे बोली कोकणीत फरक पडतो. गोव्याच्या इतर भागांत आकारी असलेली कोकणी काणकोण, सावर्डे या भागांत ‘अकारी’ होते. सारस्वत, गावडे, कुणबी, वेळीप, धनगर, ब्राह्मण यांची कोकणी बोली समाज, जात यानुसार बदलत जाते. हाच प्रकार मराठीसह सर्व भारतीय भाषांमध्ये आहे. 

लिखित भाषा (प्रमाण) म्हणून कोकणीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. वर्तमानपत्रात काम करणारे कोकणीतले र्‍हस्व, दीर्घ मराठीवरून ठरवतात(हा त्यांचा वैयक्तिक अज्ञपणा असेल, पण वस्तुस्थिती हीच आहे). मराठीत र्‍हस्व तर कोकणीत दीर्घ करायचे आणि दीर्घ असेल तर कोकणीत र्‍हस्व करायचे. एखादा शब्द ‘मराठी’ दिसू नये याविषयी पराकोटीचा आग्रह धरला जातो. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘शिखर बसका’ असे म्हणण्याऐवजी ‘तेंगशेवयली बसका’ असे लिहिले जाते. दहशतवादी मराठी वाटते म्हणून ‘आकांतवादी’ लिहिले जाते. हे प्रमाणिकरण नव्हे. आजही कोकणीतले अनेक प्रस्थापित साहित्यिक स्वत:च्या बोलीलाच प्रमाण कोकणी मानतात व इतरांनीही तसेच मानावे असा आग्रह धरतात. अनेकजण लिहिल्या जाणाऱ्या (प्रमाण) कोकणीचा संबंध सारस्वतांशी व प्रमाण मराठीचा संबंध ब्राह्मणांशी जोडतात. जशी कोकणी लिहिली जाते तशीच ती सारस्वतांमध्ये बोलली जात नाही. मराठी जशी लिहिली जाते तशी ब्राह्मणांच्यात बोलली जात नाही. भाषेच्या प्रमाणिकरणाचा संबंध जातीशी नसून व्याकरणाशी आहे. एका भागातल्या बोलीत लिहिले तर ते त्या भागापुरते मर्यादित राहू शकते. पण लिहिलेले सर्वांना कळावे यासाठी त्या भाषेचे प्रमाणिकरण गरजेचे असते. असे केल्याने बोली भाषांवर अन्याय होतो, हे धादांत खोटे आहे. बोलणारे-ऐकणारे आहेत तोवर बोली संपणार नाही आणि लिहिणारे-वाचणारे आहेत, तोवर प्रमाण भाषा संपणार नाही. 

‘बोलली जाणारी’ व ‘लिहिली जाणारी’ हा भाषेचा पैलू राजभाषा करताना लक्षांत घेण्यात आला नाही. सर्वाधिक बोलली जाणारी कोकणी सर्वाधिक लिहिली व वाचली जाते का, याचा विचार झाला नाही. गोमंतकीय माणूस बोलतो कोकणीत व लिहितो आणि वाचतो मराठीत. दोन्ही भाषा वेगवेगळ्या स्वरूपात वापरल्या जात असल्या तरीही त्या एकाच संस्कृतीच्या वाहक आहेत, याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. म्हणूनच मराठी व कोकणी या दोन्ही गोव्याच्या राजभाषा न होता कोकणी हीच राजभाषा झाली व मराठीला शासकीय कामकाजापुरती मान्यता मिळाली. तीही मावजोंना नकोशी झाली आहे आणि याला द्वेष म्हणायचे नाही, असा त्यांचा आग्रह आहे. दोन्ही भाषांचे सांस्कृतिक साम्य त्यांच्या लक्षांत येत नाही इतकेच नव्हे, तर भाषिक आत्मीयता आणि दुराग्रह यातील फरकही त्यांच्या लक्षात येत नाही.

आता जेव्हा दामोदर मावजो यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे, तेव्हा त्यातील बाजू घेणाऱ्यांचे वर्गीकरण ‘गोंयकार’-‘भायले’, गोवा-महाराष्ट्र, हिंदू-ख्रिश्चन, सारस्वत/ब्राह्मण-बहुजन, असे केले जात आहे. कोकणी आई असेल तर मराठी मावशी; मग मावशीला आमच्या घरात स्थान व अधिकार का द्यायचे, असा प्रश्न विचारले जात आहेत. गोवा हे मराठी व कोकणीचे माहेर आहे; माहेरी आईला व मावशीला समान अधिकार व स्थान असते, हे लक्षांतच घेतले जात नाही. आई-मावशीच्या या वादात भलत्याच ‘मॅडम’ने माहेर व्यापून टाकले आहे, हेही लक्षांत घेतले जात नाही. 

राजभाषा ही व्यवहारासाठी, त्यातही प्रामुख्याने लिखित व्यवहारासाठी आहे. राज्याच्या शासकीय, न्यायालयीन कामकाजात कोकणी व मराठी कुठे व किती आहे, याचा ठोकताळा घेतला तर भाषा म्हणून लाभ इंग्रजीचाच झाला आहे. हे सर्व दामोदर मावजोंना माहीत नाही का?  निश्चितच माहीत आहे. पण, भाषा आंदोलनावेळी साथ दिलेल्या ख्रिस्तींनी रोमी कोकणीला राजभाषा करण्याचा सुरू केलेला आग्रह मोडून काढण्यासाठी मावजोंनी केलेले राजकीय वक्तव्य, दोन्ही भाषांचे व साहित्याचे किती नुकसान करेल याचे आकलन त्यांना अद्याप झाले नाही. त्यांनी ते गृहीत धरलेले असले तरी या भाषिक कसरती करून २०२७मध्ये गोव्यातील राजकारणावर सारस्वतांचा प्रभाव पूर्वीप्रमाणे प्रस्थापित होईल, याचीही काही खात्री नाही. ख्रिस्ती आमदारांचा पूर्वेतिहास पाहता, ते रोमी कोकणीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यास रोमन लिपीतील कोकणी ही गोव्याची राजभाषा झाल्यास नवल नाही. 

मावजो यांचे विधान व विचार यात अंतर्विरोध आहे. मराठी राजभाषेतून काढून टाकावी, असेही ते म्हणतात आणि  मराठीचा द्वेष करत नाही, असेही तेच म्हणतात.  ‘पत्रकारांनी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला’, असे म्हणत त्याचे खापर पत्रकारांच्या माथी फोडता येणार नाही. मावजोंनी थेंबभर बोलून जे घालवले आहे, ते कितीही घडाभर मुलाखती दिल्या म्हणून परत येणार नाही.