रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

भाषा, लिपी आणि बरेच काही...

समाज, संस्कृती आणि संवाद यांची प्रवाही वाहक म्हणजे भाषा. भाषेच्या लिखित स्वरूपाला प्रत्यक्षात आणण्याचे साधन म्हणजे लिपी. भाषा वेगळी व लिपी वेगळी हे पूर्णपणे ज्ञात असूनही ‘रोमी कोकणी’ला मराठीसोबत राजभाषेचा अधिकृत दर्जा देण्याची मागणी, विचारवंत का बरे करत असतील?

आपण जे बोलतो ते बोलल्यानंतर फार वेळ राहत नाही. जे जे नाशवंत, नाहीसे होणारे आहे त्याला आपण ‘क्षर’ म्हणतो. त्या मानाने अधिक काळ टिकणारे म्हणून आपण जे लिहितो त्याला ‘अक्षर’ (जे नाशवंत नाही, नाहीसे होत नाही) असे म्हणतात. आपण जे बोलतो, व्यक्त होतो ते टिकावे ही इच्छा जागृत झाल्यापासून माणसाने त्यासाठी विविध पर्याय शोधले. दगडावर कोरणे हा त्यातलाच एक प्रकार. आपण जे बोलतो त्याला चिन्हे, चित्रे या स्वरूपात माणसाने कोरून ठेवायला सुरुवात केली. त्याच्या सामूहिक विकासातून ‘चित्रलिपी’ तयार झाली. लेखनतंत्र व लेखनकला कालानुरूप विकसित होत गेली. आपल्याकडे सिंधूसंस्कृतीतली लिपी, वैदिक, ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, नागरी अशा अनेक लिपी वेळोवेळी तयार होत गेल्या. काही लुप्त झाल्या तर काही परिवर्तित झाल्या. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी अतिप्राचीन काळी बहुलिखित लिपी ब्राह्मी होती. त्यातून पुढे भाषेला जास्तीत जास्त अनुकूल होतील, अशा लिपी विकसित झाल्या. लिपी विकसित होण्याला भाषांप्रमाणेच विविध पंथांतील तंत्रमार्गाचाही महत्त्वाचा वाटा आहे. 

भाषा हे केवळ संवादापुरते मर्यादित माध्यम नाही. संस्कृती, विचार, भूगोल, इतिहास, संस्कार या सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन व्यक्त होत जाणारा प्रवाह म्हणजे भाषा. ज्या भाषेत आपण बोलतो, शिकतो त्यानुसार आपले विचार होत जातात, वागणूक तशी होते आणि संस्कृतीही तशीच घडत जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, पूर्वीच्या काळी जेव्हा इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम झाले नव्हते, तेव्हा चार लोक एकत्र बसून पाचव्या व्यक्तीविषयी बोलत असतील व अचानक ती व्यक्ती आली, तर सहज तोंडातून निघत असे, ‘शंभर वर्षे आयुष्य’ किंवा ‘देवासारखा आलास, तुझ्याच विषयी बोलत होतो’. आता, ‘थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर’, असे वाक्य सहज तोंडात येते. फार दूर जायला नको, आपण गोव्यातील गावांची नावे कशी उच्चारू लागलो आहोत? माशेलला मार्शेल किंवा मार्सेला, केळशीला कुवेलेशीम आणि फोंडाला पोंदा. कोकणीत आडनावांच्या मागे ‘कार’ हा असलेला प्रत्यय मराठीतही जसाच्या तसा घेण्याचा आग्रह धरणारे विचारवंतही, फोंडाचे पोंदा होण्याला आक्षेप घेत नाहीत. ‘इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने तिथे मूळ नावाप्रमाणे उच्चारण्याचा आग्रह धरू नये’, असे म्हणत आंग्लभाषेच्या ‘पोंदा’(खाली) जातात. गोवा सरकारने विशेषत: पर्यटन खात्याने गावांची नावे रोमन लिपीत देताना सोबत देवनागरीतही ती व्यवस्थित लिहावीत. जेणेकरून गोव्याबाहेरील व्यक्ती जिला देवनागरी वाचता येते, ती तरी निदान त्या ग्रामनामाचा योग्य उच्चार करेल.

योग्य उच्चारण करण्यासाठी, शब्दाचा नेमका अर्थ व्यक्त होण्यासाठी प्रत्येक भाषेला स्वतंत्र अशी नैसर्गिक लिपीही विकसित होत गेली. आज बहुतेक संस्कृतोद्भव भाषांसाठी देवनागरी लिपी कमी अधिक फरकाने वापरली जाते. देवनागरी ही मराठी, हिंदी व कोकणी या भाषांसाठी नैसर्गिक व अत्यंत समर्पक लिपी आहे. असे नाही की, रोमन लिपीमध्ये या भाषा लिहिल्याच जाऊ शकत नाहीत. पण, त्यात वाचनार्थ नेमका व नेटका उतरेलच असे नाही. तशी इंग्रजी ही भाषा देवनागरीतही लिहिली जाऊ शकते; पण, ती इंग्रजीची नैसर्गिक लिपी ठरत नाही. अर्थबोध होण्याऐवजी अर्थहानी होणेच अधिक संभवते. 

कोकणी भाषा देवनागरीप्रमाणे रोमन, कन्नड, मल्याळम व अरबी अशा लिप्यांमध्येही लिहिली जाऊ शकते; लिहिली जातेही. पण, म्हणून गोव्यातही ते स्तोम माजू द्यायचे का, हा खरा प्रश्न आहे. कर्नाटकात व अन्य ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या स्थानिक लिपीतून कोकणी लिहावीशी वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. पण, गोव्यात तसा आग्रह धरणे सर्वथैव चुकीचे आहे. गोव्यात कोकणीसाठी रोमन लिपीचा आग्रह ख्रिश्चनांसाठी धरला जात असल्याचे सांगितले जाते. पण, किती ख्रिश्चन रोमन लिपीतील कोकणी भाषा माध्यम म्हणून शिकतात? मग तरीही ‘रोमी कोकणी’ला राजाश्रयाचा आग्रह का धरला जातोय?

‘रोमी कोकणी’ नावाची वेगळी, स्वतंत्र भाषा नाही. आता तिला ‘किरिस्तावांची कोकणी’ आणि ‘कोकण्यांची कोकणी’, असा रंग द्यायचा असेल तर तो भाग वेगळा! काहीही झाले तरी ‘रोमी कोकणी’ नावाची वेगळी भाषा नाही. रोमन लिपीत लिहिल्या जाणाऱ्या कोकणीला राजभाषा करायचे असल्यास, मग अन्य लिप्यांनी काय घोडे मारले आहे? जितक्या लिप्यांतून कोकणी लिहिता येते तितक्या लिप्यांसह कोकणी भाषेला राजभाषा करायचे का? ही अशी वर्गवारी करून कुणाला वर्गसंघर्ष पेटत ठेवायचा आहे? भौगोलिक, पांथिक अस्मिता लिपीच्या माध्यमातून वाढवत नेल्यास पुढील काळात यावरून भांडणे निश्चित होतील. 

कोकणी-मराठीच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पहिले प्यादे मावजोंनी सरकवले. अंतर्विरोध असलेल्या त्यांच्या वक्तव्यातून पुढील चालींची कल्पना आली होती. आता ती प्रत्यक्षात येत आहे. राजभाषेच्या वादात राजलिपीचा वादही घुसडण्यात आला आहे. मराठी राजभाषा करायची असल्यास ‘रोमी कोकणी’लाही तो दर्जा द्या; नाही तर अन्य कुणालाच नको, अशी ही खेळी आहे. सवत रंडकी व्हावी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला मारण्याच्या या उद्योगातून कुठल्याच भाषेचे काहीच भले होणार नाही. फावेल ते फक्त इंग्रजीचे. 


शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

मेअळगन : आपणच आपल्याला भेटण्याचा अनुभव

आपला चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला आहे. केवळ इतर लोकांच्याच नव्हे तर स्वत:चा चांगुलपणाही आपल्याला नकोसा झालाय. वाईट अनुभवानंतर आलेले रितेपण आपण आतमध्ये इतके साठवून ठेवतो की, त्यात आपुलकी, साधेपणा, विश्वास, संस्कार, संस्कृती, माणूसपण, नाती, घरपण, गावपण कशालाही जागाच उरत नाही. जे काही करतो ते तितक्यापुरते असते. करायचे म्हणून केल्यासारखे. पण, याच रितेपणात हे सगळे कुणीतरी अज्ञात माणसाने हे सगळे पुन्हा भरले तर? आपल्याला आपल्याच प्रत्येक गोष्टीशी जोडले तर? आपली भेट पुन्हा आपल्याशीच घालून दिली तर? अनोळखी माणसाने आपलीच ओळख आपल्याला पटवून दिली तर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे  अनुभवण्यासाठी ‘मेअळगन’ हा तमीळ चित्रपट पाहणे खूप आवश्यक आहे. 

प्रत्येक फ्रेम हालत राहिली पाहिजे, प्रत्येक मिनिटाला काही तरी घडत राहिले पाहिजे आणि तेही वेगाने अशी सवय आपल्याला आजकालच्या चित्रपटांनी लावली आहे. त्याला छेद देत हळुवार पुढे सरकणारा हा प्रेमकुमार चंद्रन यांचा ‘मेअळगन’ हा चित्रपट खूपच भावला. ज्यांचा चांगुलपणावरचा, साधेपणावरचा विश्वास उडालाय त्यांनी हा चित्रपट पाहावा. 

घराच्या वाटण्या झाल्यावर सोडावे लागलेले आपले घर, आपला गाव आणि आपली माणसे; ज्यांच्या आयुष्यात आली आहेत त्यांनी हा चित्रपट अवश्य पाहावा. आपण आपल्याच संस्कृतीपासून, संस्कारांपासून, निसर्गापासून किती दूर गेलो आहोत हे जाणण्यासाठी हा चित्रपट पाहावा. चित्रपटाची मांडणी दोन माणसांच्या संवादातून साकारत जाते; विशेषत: चित्रपटाचा उत्तरार्ध. कथा तशी साधी, सरळ व सोपी आहे. त्यातून जे सांगायचे आहे ते खूप चिंतनीय व प्रत्येकाने विचार करावा, असे आहे. 

अरुलला तरुणपणी घर सोडावे लागते. शिक्षक असलेले त्याचे वडील अरिवुडाइ नंबी व आई वल्ली यांच्यासोबत तंजावूर येथील त्यांचे राहते घर व गाव भावबंदकीपायी सोडून निघतात. अरुलची आतेबहीण भुवनेश्वरी ‘भुवना’, तिचे वडील सोकू मामा ही खूप जवळची नातीही दूर सारावी लागतात. ते मद्रासला जाऊन राहतात. वीस वर्षांचा काळ लोटतो. या दरम्यान अरुलचे लग्न हेमाशी होते, त्यांना जान्हवी नावाची मुलगीही होते. अरुल अन्य कुठल्याही नातेवाइकांशी संपर्क ठेवत नाही. भुवना मात्र कायम त्यांच्या संपर्कात राहते. भुवनाचे लग्न ठरते व केवळ तिच्यासाठी म्हणून अरुल रिसेप्शनपुरता तोंड दाखवून येणार म्हणून निघतो. या रिसेप्शनमध्ये त्याची भेट एका अनोळखी व्यक्तीशी होते, जो अरुलला पूर्णपणे ओळखत असतो. अरुल सहज म्हणून बसतो की, तो त्याला त्याची ओळख आहे, तो कोण आहे हे त्याला माहीत आहे. पण, अरुलला त्याचे नावही माहीत नसते. वास्तविक त्याचे वागणे, सतत बोलत राहणे, सतत सोबत राहणे याची अरुलला चीड येत असते. रिसेप्शन झाल्यबरोबर आहे त्या बसने त्याला परत निघायचे असते. पण, ती बस चुकते व त्याला त्या गावात एक रात्र राहावे लागते. त्याला हवे तसे लॉज न मिळाल्याने त्याला त्या अनोळखी व्यक्तीच्या घरी राहावे लागते. गावात राहणारा साधा-सरळ माणूस अरुलल अरुलचीच ओळख पटवत जातो. एकेक गोष्टीशी तो पुन्हा त्याला जोडत जातो. यातला सर्वांत महत्त्वाचा दुवा असतो तो सायकलीचा.

गाव सोडताना ही सायकल अरुलच्या वडिलांनी कुणा गरजवंताला द्या, असे सांगून ठेवलेली असते. ही सायकल तो अनोळखी माणूस जिवापाड जपतो. ही सायकल त्याचे आयुष्यच बदलून टाकते. हळूहळू हे सगळे उलगडत जाते. आपल्याबद्दल इतकी आपुलकी असलेल्या माणसाचे साधे नावही आपल्याला माहीत असू नये, याचे अरुला फार वाईट वाटते. तो त्याला न सांगताच मद्रासला निघून जातो. पण ही गोष्ट त्याला खात राहते. शेवटी अरुल त्या अनोळखी व्यक्तीला सांगतो की, त्याने त्याला ओळखले नाही. तो कोण आहे त्याला माहीत नाही. मग ती अनोळखी व्यक्ती त्याला एकेक खुणा सांगत जाते. शेवटी अरुलला त्याचे नाव लक्षात येते. सिनेमा संपताना आपल्यालाही ते समजते. त्याचे नाव असते मेअळगन. 

संवादातून आशय उलगडताना चित्रपट प्रचारकी, भाषणबाजीने ग्रस्त होतो. अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाला जे सांगायचे असते, ते कुठले तरी पात्र चित्रपटाच्या अखेरीस लांबलचक भाषण देऊन सांगते. चित्रपटात पात्रांपेक्षाही कॅमेरा बोलला पाहिजे. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. हा चित्रपट संवादात्मक असला तरी कॅमेरा बोलतो, हे आपल्याला अनेक प्रसंगातून जाणवते. दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे न बोलताही कॅमेरा पोहोचवतो. सुरुवातीलाच घर सोडून जातानाच्या संपूर्ण सीनमध्ये संवाद जास्त नाहीत. पण, जे कॅमेरा सांगतो ते पात्राच्या संवादातून आले असते तर वाया गेले असते. मागील दार बंद करून अरुलचे वडील एक एक दिवा बंद करत येतात तेव्हा ते रिकामे घर आपल्या काळजावर ठसत जाते. मुख्य दरवाजाला कुलूप लावायला अरुलचे वडील त्याला सांगतात तेव्हा कॅमेरा घराच्या आत आहे. ते रिकामे घर अरुल आपल्या मनात अढी लावून बंद करतो. त्या कटू आठवणींसकट तो कडवटपणा, रितेपण घेऊन तो जगतो. आपल्याच अत्यंत जवळच्या माणसांपासून दूर जातो. अनेक प्रसंगांत कॅमेरा बोलतो. सर्व देवांच्या सोबत असलेला रामस्वामी पेरियर यांचा फोटो, एमजीआर यांचा पुतळा या व अशा अनेक फ्रेममध्ये कॅमेरा न बोलताही खूप काही सांगतो. होत असलेले सांस्कृतिक बदल, आपल्या अभिमानाच्या जागा, आपल्या अस्तित्वाच्या खुणा यावर भाष्य करताना चित्रपट कमीत कमी संवादात खूप काही सांगतो. प्राण्यांचा अधिवास माणसांनी बळकावला हे एखाद्या चित्रपटात लांबलचक प्रचारकी थाटाच्या संवादांनी सांगितले गेले असते. मेअळगन अरुलला त्याच्या जागेत राहत असलेल्या सापाबद्दल बोलताना म्हणतो, ‘तो माझ्या आधीपासून इथे राहतो’. या एका वाक्यात सगळे काही येते. आपण प्राणिप्रेमाआड संस्कृतीला हीन ठरवतो. देवळात हत्ती झुलवल्यावर त्याच्यावर अन्याय होतो म्हणून कायदेशीर बंदी आणणारे बोकड्याचा गळा कापून रक्त संपेपर्यंत तसेच ठेवले जाण्याला प्रथा पाळण्याचा घटनात्मक अधिकार मानतात. संस्कृतीचा भाग असलेले जलिकट्टूसारखे खेळ कायद्याच्या कक्षेत येतात; पण त्यामागे त्या प्राण्यासोबत असलेले नाते येत नाही. हा चित्रपट तेच नाते दाखवतो.

अरुल आणि मेअळगन या दोन जवळपास विरुद्ध स्वभावाच्या, धाटणीच्या व्यक्ती. खरे तर या विचारसरणी आहेत. एक खुलेपणाने जगणारी, चांगुलपणावर प्रचंड विश्वास असलेली, जे आहे ते स्वीकारून पुढे जाणारी, सर्वसमावेशक. दुसरी घट्ट धरून बसणारी, गाळणी लावणारी, काहींनी दिलेल्या दु:खापायी सर्वांना दोष देणारी, त्याच दु:खात स्वत:ला कोंडून घेतलेली विचारसरणी. नातेसंबंधांमध्ये ‘एक घाव दोन तुकडे’, असे करून चालत नाही. कायद्याच्या तराजूत नाती तोलायची नसतात. नात्यातली एक व्यक्ती चुकीची वागली म्हणून सर्व नातलगांशी फटकून वागणे योग्य नसते. इतरांकडून तशी अपेक्षा करणेही योग्य नसते. जे झाले ते त्याचा फार त्रास न करून घेता पुढे जाणे योग्य असते. बसमधला कंडक्टर जग्गू अरुलला हे सांगतो. माणूस सुखापेक्षाही दु:खाला कुरवाळत, सजवत राहण्याने जास्त सुखी होतो. कायम अन्याय झाल्याचा ढोल पिटत राहणार्‍यांना खरे तर न्याय नकोच असतो. अन्यायग्रस्त, मागास राहण्यात फायदा असतो. अशांचा चांगुलपणावरचा विश्वासच उडतो. चांगल्या माणसांपेक्षा वाईट केलेली माणसेच जास्त लक्षात राहतात. अरुलसारखीच परिस्थिती मेअळगनची असते. पण, तो त्यातून मार्ग काढून पुढे जातो. गरीब असल्याने त्याचे नातेवाइक त्याला जवळ करत नाहीत, हीन लेखतात. पण त्याच्या लक्षात मात्र कायम चांगले वागणारे अरुल, अरुलचे आईवडील राहतात. इतरांनी दिलेल्या त्रासाचा त्रास आपल्याला किती करून घ्यायचा, हे कधी तरी ठरवावेच लागते. हा चित्रपट तेच सांगतो. 

सोकूमामाकडून अरुलचा फोन नंबर मेअळगनने न घेणे, अरुलने घरी पोहोचल्यानंतर भुवनाकडेही नावाची चौकशी न करणे, अशा काही नगण्य त्रुटी आहेत. पण त्यामुळे चित्रपटाच्या परिणामात फरक पडत नाही. अरविंद स्वामी व कार्ती यांच्यासह प्रत्येकाचा अभिनय लाजवाब आहे. अनेक प्रसंगांत आपले डोळे आपल्याही नकळत पाणावतात. हा केवळ चित्रपट नाही. हे आपले स्वत:लाच भेटणे आहे. माणसे चांगली आहेत, आपण चांगले आहोत, हे स्वत:लाच पटवणे आहे. जे घरपण, गावपण यांपासून आपण दुरावत चाललो आहोत, त्यांना जवळ करणे आहे.