लूट, लुटालूट म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय पैसे, मालमत्ता बळजबरीने काढून घेणे. दान दिलेल्या पैशांचा, जमिनीचा अपहार, गैरवापर किंवा दिलेल्या हेतूशिवाय अन्य गोष्टींसाठी वापर होणे याला फसवणूक म्हणतात. लूट, लुटालूट नाही. स्वखुशीने दिलेल्या दानाचा गैरवापर झाला तर त्याला लुटणे म्हणता येत नाही. मंदिर, मठ लुटालूट करतात का? तर ‘नाही’ हे त्याला स्पष्ट व रोखठोक उत्तर आहे. मग फसवणूक, लुबाडणूक कोण करतात? याचे उत्तर मंदिर, मठ समिती असे द्यावे लागेल.
देव वेगळा व देवस्थान वेगळे. लोक देवासाठी श्रद्धेने पैसे देतात व देवळे, मठ लुटतात. त्याच तर्काने जायचे तर देवस्थान, मठ वेगळे व त्यांच्या समित्या वेगळ्या. लोक देवस्थान, मठ यांना देणग्या देतात ते त्यांवर असलेल्या श्रद्धेमुळे देतात. लोक मठ, मंदिराला श्रद्धास्थान मानतात. त्या देवस्थान किंवा मठाच्या समित्यांना लोक श्रद्धास्थान मानत नाहीत. देवस्थान जागृत आहे, असे म्हटले जाते; देवस्थान समिती जागृत आहे, असे म्हटले जात नाही. समित्यांनी भ्रष्टाचार, अपहार केला, असे म्हटल्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण त्यांना लक्ष्य करण्याऐवजी जाणूनबुजून श्रद्धास्थानाला लुटारू, हीन ठरवले जाते. कुठल्याही डॉक्टरने लुबाडणूक, फसवणूक केली तर आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो; वैद्यकशास्त्राला नाही. त्याप्रमाणेच मंदिर, मठ समितीने भ्रष्टाचार केल्यास समितीला दोषी धरले पाहिजे, मंदिर किंवा मठाला नाही. धर्माच्या, मंदिराच्या, मठाच्या नावे गैरव्यवहार केला जातो, असा तर्क मांडायचा तर तोच तर्क विज्ञानाचा, वैद्यकशास्त्राचा वापर करून फसवणार्या डॉक्टरलाही लागू होतो. विज्ञान, वैद्यकशास्त्र दोषी नसते; धर्म, मंदिर, मठ असतात असे कसे?
अनेक देवस्थानांना बाजारू रूप आले आहे, ते समित्यांमुळे आले आहे. देवस्थानांचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम समित्यांनी केले आहे. देवस्थानाच्या जमिनी परस्पर विक्रीस काढणे, पैशांचे गैरव्यवहार आदी हीन प्रकार इतके चालतात की लिहितानाही कठीण वाटते. अनेक लहान लहान देवळांच्या जत्रा पटकार प्रायोजित करतात. काही ठिकाणी ‘देवाची’ आणि ‘पटकारांची’ अशा दोन दोन जत्रा भरतात. जत्रेला दूर कोपर्यात दारूची दुकाने सुरू असतात. देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि पुजारी यांचे वाद अनेक देवळांत होतात. हाणामारीची भांडणे होतात. ज्या देवासाठी देवस्थान आहे, त्याची मूर्तीच उपटून काढण्यापर्यंत मजल जाते. या सगळ्यांना जे जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई झालीच पाहिजे. एका गावातल्या मंदिरात समिती नेमण्यासाठी माणसे ओढून आणावी लागायची, त्या गावात एक कंपनी आल्याबरोबर आणि तिने पैसा ओतायला सुरुवात केल्याबरोबर देवस्थान समितीवर वर्णी लागण्यासाठी अक्षरश: घराघरांत वाद होऊ लागले. सत्ता, संपत्ती यांच्या नादात बरबटलेल्या देवस्थान समित्यांनी व सदस्यांनी देवस्थानांचे सांस्कृतिक महत्त्व कमी केले आणि अक्षरश: बाजार मांडला. उलट काही देवस्थान, मठ समित्यांनी केलेले सामाजिक, सांस्कृतिक कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. अनेक लहानलहान मंदिरे लहानमोठे उपक्रम चालवत आहेत. शेगाव, पावस यांचे कार्य याबाबत अभ्यासण्यासारखे आहे. जे वाईट आहे ते वाईट आणि जे चांगले आहे ते चांगले, या न्यायाने ज्याचे माप त्याच्या पदरी घालणे म्हणूनच फार महत्त्वाचे ठरते.
लुटालूट हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. लूट करणारा लुटारू असतो. त्यामुळे, विचारवंत देवळे, मठ यांनाही लुटारू ठरवतात. वास्तविक त्यासाठी समित्यांना जबाबदार धरले पाहिजे. पण, तसे न करता विचारवंतांनी मंदिर व मठ यांना लुटारूंच्या श्रेणीत ढकलले. विचारवंतांची त्यामागची भूमिका, हेतू वेगळे आहेत हे ठळकपणे जाणवत असले तरीही देवस्थान समित्या आणि विश्वस्त सोवळे ठरत नाहीत. विचारवंत आणि विश्वस्त यांच्या चुकीच्या भूमिकांचे दूरगामी परिणाम म्हणजे धर्म, संस्कृती याविषयी नकारात्मक, त्याज्य, हीन भावनेत वाढ होते. समाजकारण, राजकारण यात सांस्कृतिक मानबिंदूंचा खेळ मांडणे कुणाच्याच हिताचे नाही. त्याचप्रमाणे देवस्थानच्या नावाला बट्टा लागेल, अधर्म होईल असे कोणतेही कृत्य न करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी मठ, मंदिर समित्यांवर आणि विश्वस्त असलेल्या लोकांवर आहे. विचारवंत आणि विश्वस्त यांनी संस्कृतीच्या मानबिंदूंना धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

