झुंडशाही आणि गळे कापणे या दोन्ही गोष्टी निंदनीयच. त्यांचे समर्थन कुठल्याही पद्धतीने करणे शक्यच नाही. माझाही तसा हेतू अजिबात नाही. पण, जे दिसते ते समोर ठेवणे क्रमप्राप्त आहे.
एखाद्याचा विचार पटला नाही की आक्रमक होऊन जाब विचारणे ही झुंडशाही. असा आक्रस्ताळेपणा न करता केली जाणारी कृती म्हणजे गळे कापणे. झुंडशाही केल्याने ज्याच्यामुळे ही झुंडशाही केली जाते त्याला सहानुभूती मिळते. उदाहरण : बजरंग दल आणि उदय भेंब्रे. इथे विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा, अशी भूमिका घेतली जाते. रात्री जाब विचारायले गेले म्हणून चुकीचे ठरतात. सहानुभूती भेंब्रेंना मिळते. हेच तुम्ही काही वर्षांपूर्वी म्हणाला होतात व ते सचिन मदगे यांनी सप्रमाण खोडून काढले होते, मग पुन्हा का तेच म्हणालात, असे कुणीही भ्रेंब्रेंना विचारत नाही. चुकीचे सिद्ध करूनही तुम्ही वारंवार तेच का रेटत आहात, असेही कुणी विचारत नाही. मागे घेतलेले ‘ब्रह्मास्त्र’ आता पुन्हा बाहेर काढण्यावर कुणी शंकाही घेत नाही.
गळे कापल्याने ज्याच्यामुळे गळे कापले गेले तो दोषी धरला जातो, कापणारा नाही. उदाहरण : कन्हय्यालाल शिंप्याचा गळा कापला तेव्हा न्यायाधीश म्हणाले यासाठी नुपूर शर्मा कारणीभूत. इथे विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा, अशी भूमिका घेतली जात नाही. गळे कापणार्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल, असे म्हटले जाते. सरकार कुणाचे आहे, याची खात्री करून कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे की, नाही हे ठरवले जाते.
यासोबतच तिसरा एक प्रकार घडतो तो म्हणजे अंत:प्रवाह (अंडरकरंट). झुंडशाही करून कुणी रस्त्यावरही उतरत नाहीत किंवा गळेही कापत फिरत नाहीत. अंत:प्रवाह असा प्रवाहित केला जातो (कळ अशी फिरवली जाते) की, जो बोलतो तो आपणहून स्वत:च, कुणीही न सांगता स्वत:चे म्हणणे मागे घेतो. उदाहरण गिरीश कुबेर यांनी ‘असंतांचे संत’ संपूर्ण अग्रलेख दुसर्याच दिवशी मागे घेतला, तोही पहिल्या पानावर बिनशर्त माफी मागून. एरव्ही ‘भावना दुखावल्या गेल्या असल्यास’ असे शब्द असतात माफीत. पण, असंतांचे संत अग्रलेख मागे घेताना मागितलेल्या माफीत ‘भावना दुखावल्यामुळे’ , अशी थेट माफी होती. कुठून चावी, कळ फिरली होती, वेगळे सांगायला नको.
भावना दुखावल्यावरचे व्यक्त होण्याचे तीन प्रकार आणि त्याकडे कसे पाहिले जाते ते वरील उदाहरणांवरून समजेल. हे सगळे नवीन नाही, हे विचारवंतांना पूर्णपणे माहीत आहे. म्हणून ते झुंडीने विरोध झाला तर त्याला आपल्या विचारांचा विजय मानतात. अंत:प्रवाह जाणवला तर कुठेही कसलीही वाच्यता न करता माघार घेतात. गळा कापला जाण्याची खात्री असेल तिथे गळाच काढत नाहीत.
