रविवार, २९ मार्च, २०२६

घटनेची बातमी होते तेव्हा...

घटनेची बातमी करताना ती खळबळजनक बनवण्याच्या नादात आपण जे करतोय, त्याचे परिणाम काय होतील याचे भान वृत्तपत्रांना उरले नाही. आपल्याच गुरू, आध्यात्म  परंपरेची आपण नकारात्मक प्रतिमा उभी करतोय, हे लक्षांतच येत नाही. कदाचित, तेच करण्यासाठी तर मुद्दाम हे केले जात नसावे ना?

सध्या दोन प्रकरणे गाजत आहेत. दोन्ही बलात्कार व लैंगिक अत्याचार या प्रकारात मोडणारी आहेत. त्या घटना खऱ्या आहेत, असेच गृहीत धरून जरी बातम्या केल्या तरी त्याचे मथळे व बातम्या कशा पद्धतीने ठसवल्या जातात, यावरून त्यांचा हेतू ठरतो. ‘वादग्रस्त विधान’ हे लिहिण्यासाठी कुणीतरी विधान करणे पुरेसे असते, ते वादग्रस्त असलेच पाहिजे असे नाही. विशेषणे कोणती द्यायची, मथळ्यांची शब्दयोजना कशी असावी, यासकट बातमी आधीच ठरलेली असते; त्यात बसणाऱ्या घटनेचा शोध फक्त घेतला जातो.

अशोक खरात हा स्वत:स अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी म्हणवून घेत होता व तांत्रिक विधी करत होता, हे उघड आहे. तो स्वत:स कुठेही ‘बाबा’ म्हणवून घेत नव्हता. त्याचा पेहराव किंवा काम करण्याची पद्धती ‘बाबा’सारखी नव्हती. सामान्यत: ज्यांना ‘बाबा’ म्हटले जाते, तसा तो अजिबातच नव्हता. साधारणपणे भगवे वस्त्र, प्रवचन सांगणे, संप्रदाय असणे, भक्तांना प्रवचने देणे वगैरे असल्या गोष्टी हे ‘बाबा’ लोक करतात. तसे कोणतेही कृत्य न करणारा अशोक खरात वास्तविक ज्योतिषी, हात पाहून भविष्य सांगणारा, तंत्रमार्गी विधी करणारा आहे. त्याला ‘बाबा’, ‘अघोरी’ ही बिरुदावली लावणे चुकीचे आहे. अनेक पंथांमध्ये तंत्रमार्गी लोक असतात; पण सर्वांनाच अघोरी म्हटले जात नाही. अघोरी हे प्रामुख्याने कापालिक परंपरेतील असतात. असे असूनही त्याला ‘अंकशास्त्रज्ञ’, ‘ज्योतिषी’, असे न म्हणता ‘बाबा’, असे का म्हटले जाते?

हृषिकेश वैद्य या व्यक्तीस ‘धर्मगुरू’, ‘आध्यात्मिक गुरू’ अशा बिरुदावल्या लावल्या गेल्या. यापैकी एकही पदवी त्याने स्वत:च स्वत:स लावलेली नाही. ज्ञानेश्‍वरीवर, आध्यात्मावर बोलला म्हणजे फार तर तो प्रवचनकार, कथावाचक, अभ्यासक असू शकतो; पण ‘धर्मगुरू’, ‘आध्यात्मिक गुरू’ नसतो. त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर तो स्वतःचे वर्णन ’सामाजिक कार्यकर्ता’ किंवा ’संस्थापक - आमची वसई’ असे करतो. तरीही ‘सामाजिक कार्यकर्ता’ किंवा ‘संस्थापक’ असे कुठेही न म्हणता बातम्यांत त्याला ‘धर्मगुरू’, ‘आध्यात्मिक गुरू’ असे का संबोधण्यात येते?

अनेकदा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये केलेल्या आरोपांचे थेट विधानात रूपांतर केले जाते. 

१. मी महादेवाचा अवतार, तू माझी पार्वती नाशिकपाठोपाठ मुंबईतही भोंदू बाबाचा अघोरी खेळ

२. ‘मी महादेवाचा अवतार आहे’ सांगून महिलेवर बलात्कार; वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा

३. स्वत:ला ’महादेव’ म्हणत अत्याचार, ऋषिकेश वैद्य अखेर सापडला 

आरोपाची थेट विधाने करणारे हे काही बातम्यांचे मथळे. हे अशा प्रकारचे मथळे वाचकांना आकर्षित करण्यासाठी व ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी केले जात असले, तरी त्यामुळे होणारी हानी मोठी आहे. अनेकदा केवळ मथळे व फार तर पहिला परिच्छेद वाचून लोक पुढील बातमीकडे वळतात. यात जे ठसवले जाते, तेच ठसते. खरातच्या ’५ रिकाम्या पुंगळ्या’ सापडल्या, त्यावर ’५ नरबळींचा संशय’ असा मथळा येतो, तेव्हा पोलिसांना प्राथमिक तपासणीत सापडलेल्या वस्तूंवरून थेट निष्कर्ष काढलेला असतो. अनेकदा असे निष्कर्ष आधीच तयार असतात, रिकाम्या पुंगळ्या सापडणे बाकी असते. उसगावच्या पूजा अल्हाट प्रकरणातही ‘अपत्यप्राप्तीसाठी नरबळी’ असे थेट मथळे देऊन टाकले होते. ‘अंधश्रद्धा’, ‘नरबळी’ ठसवायचे होते व त्यासाठी लहान मुलीचा पुरलेला मृतदेह पुरेसा होता! 

घटनेची बातमी करताना ती खळबळजनक बनवण्याच्या नादात आपण जे करतोय, त्याचे परिणाम काय होतील याचे भान वृत्तपत्रांना उरले नाही. आपल्याच गुरू, आध्यात्म  परंपरेची आपण नकारात्मक प्रतिमा उभी करतोय, हे लक्षांतच येत नाही. कदाचित, तेच करण्यासाठी तर मुद्दाम हे केले जात नसावे ना? 

घटनेची बातमी होताना ती घटनेशी प्रामाणिक असावी, अशी अपेक्षा असते. पण, बातमी करताना त्यात हेतू, ‘अजेंडा’ आणि विमर्श(नॅरेटिव्ह) मिसळले, की घटना आणि बातमी यांचा संबंध तुटतो. घडलेले वेगळेच असते आणि सांगितले वेगळेच जाते!