सोमवार, ८ जानेवारी, २०१८

भरकटलेली तरुणाई




------------------
 तरुणांमधली शक्ती विधायक कार्यासाठीही वापरता येते आणि विध्वंसक कार्यासाठीही वापरता येते. पण, जेव्हा हीच शक्ती राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनते तेव्हा ती स्वत:बरोबर समाजाचाही विध्वंस करत असते. शक्तीचा वापर कसा करावा हे समाजधुरिणांनी ठरवावं लागतं.
-------------


प्रत्येक मोर्चानंतर आणि दंगलीनंतर उडालेला धुरळा, राजकीय फायदे तोटे यांची पूर्तता झाली की, मग कदाचित फुटलेली डोकी आणि फोडणारी डोकी विचार करू लागतात, ‘आम्ही हे नक्की कशासाठी केलं? आणि यातून काय मिळवलं?’     


ब्रिटिशांनी योजलेली कूटनीती स्वातंत्र्यानंतर आजतागायत सक्रिय राहिली. प्रांतीय, जातीय अस्मिता नको तेवढ्या पेटत्या ठेवण्याचे कौशल्य गोऱ्यांकडून स्वकीय राजकारण्यांनी उचलले. आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि असलेली सत्ता उलथवण्यासाठी या अभिमानांचा, अस्मितांचा व्यवस्थित वापर होऊ लागला. कुठलाही मुद्दा पेटत ठेवायचा आणि तो राजकीय सोयीनुसार कसा भडकवायचा याचे बाळकडू राजकारण्यांना व्यवस्थित प्राप्त झाले आहे. समाज अधिकाधिक परावलंबी कसा होईल, त्याला आपल्याला हवे तसे कसे नाचवता येईल, याकडे राजकारण्यांचे पुरेपूर लक्ष असते.   


समस्या ही नाही की, राजकारण गलिच्छ झालं आहे आणि निरंतर होत आहे. समस्या ही आहे की, तरुण आपला स्वत:चा विकास करायचा सोडून या राजकारण्यांच्या तालावर नाचत आहेत. त्याही पुढची चिंतेची बाब ही की, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार व त्याला वाचा कुठल्या मार्गाने फोडायची हे ठरवण्याचे सामर्थ्यही तरुण पिढी गमावून बसली आहे. आपण करीत असलेला हिंसाचार, तोडफोड याचे समर्थन स्वत:च्या जातीवर झालेल्या अन्यायाने केले जात आहे. स्वत:च्या जातीमध्ये किती माणसं संशोधन क्षेत्रात पुढे आली, किती माणसांनी व्यवसाय सुरू केला, किती माणसे स्वकर्तृत्वाने पुढे आली यावर कुणीही विचार करताना दिसत नाहीत.     


आपल्या पूर्वजांवर अन्याय झाला, हे सांगताना त्या अन्यायाचे परिमार्जन करण्याकरता आपण विधायक कार्य काय केले, याचे उत्तर अनेकांजवळ असत नाही. ज्यांनी शिक्षण घेतले, स्वकष्टाने व्यवसाय उभारले, नोकरी केली, प्रगतीची कास धरली, ती माणसे अन्याय करणाऱ्या माणसांपेक्षा खूप पुढे जाऊन पोहोचली आहेत. अशांना विध्वंसक कार्यासाठी वेळ नसतो आणि इच्छाही नसते. त्यांच्या हातून जे होईल ते विधायक कार्य करण्यात त्यांना आनंद प्राप्त होतो.     


फळ्यावरची एखादी रेघ मोठी करायची असल्यास दोन मार्ग असतात. पहिला मार्ग रेघ मोठी करणे आणि दुसरा मार्ग त्याच्या बाजूची रेघ पुसून कमी करणे. बाजूची रेघ पुसल्याने ती कमी होते यात शंका नाही. पण, जी रेघ मोठी व्हावी यासाठी दुसरी रेघ पुसली, ती रेघ तेवढीच राहते. स्वत:चा व्यक्तिगत विकास साधल्याने आपल्यासोबत आपल्या समाजाचाही विकास होतो, हे तरुणांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.     


अन्याय करणारे आणि ज्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय झाला ते आज नाहीत. ‘अन्याय झाला होता’ हे उगाळत बसल्याने आज आपली प्रगती होणार आहे का? माथी भडकवल्यामुळे तरुणांचे होणारे नुकसान आणि समाजाचे होणारे नुकसान, त्याहीपेक्षा जास्त अन्याय्य नाही का? जेव्हा आपल्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन  स्वत: न्याय करून, प्रगत होऊन करता येणे शक्य आहे, अशावेळेस आपला अमूल्य वेळ आणि शक्ती विध्वंसक कार्यात खर्च करण्यात काय अर्थ आहे?

   
अन्यायाला उत्तर त्याहीपेक्षा मोठा अन्याय करून द्यायचं की, न्याय करून द्यायचं हे आजच्या तरुणाईने थंड डोक्याने ठरवले पाहिजे.


वर्तमानात विध्वंस करण्यासाठी आपल्याकडे ऐतिहासिक कारणांची अजिबात कमतरता नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण आजतागायत त्या कारणांना हाताशी धरून विध्वंसक कार्य करतच आलो आहोत. कुठेतरी हे थांबायला नको? यातून जय कुणाचा होतो पराजय कुणाचा होतो, याला काहीच अर्थ उरत नाही, जेव्हा आपणच आपली डोकी फोडतो, तेव्हा विजय मात्र नेहमी आपल्याला पारतंत्र्यात ढकलणाऱ्यांचाच होतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा