सोमवार, ८ जानेवारी, २०१८

भीमा - कोरेगाव लढाई : विजय कुणाचा?

भीमा - कोरेगावनजीक सणसवाडी दगडफेक आणि त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक हा घटनाक्रम होत असताना, वर्तमानपत्रातून, फेसबूक, व्हॉट्‌सअपसारख्या सोशल मीडियामधून अनेक गोष्टी मांडल्या गेल्या. अशावेळी त्याचे ऐतिहासिक संदर्भ समोर येणे आवश्यक असते.

भीमा - कोरेगाव लढाई झाल्याला दोनशे वर्ष होऊन गेली. सहा दिवसांपूर्वीची घटना घडली त्यावेळच्या बातम्यांचे मथळे, बातम्यांचे स्वरूप, चर्चा(भांडणे) यातून एकसारखे भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक असाच उल्लेख येत होता. वास्तविक दगडफेक, दंगल सणसवाडी येथे झाली होती. त्याला पार्श्‍वभूमी होती ती वढू येथे पंचायतीची परवानगी न घेता लावलेल्या फ्लेक्समुळे झालेल्या वादाची. जर, अत्याधुनिक संसाधने उपस्थित असताना स्थानाचा आणि घटनेचा चुकीचा उल्लेख होत असेल, तर दोनशे वर्षापूर्वी घडलेल्या घटनेबद्दल बोलायलाच नको.


-भीमा - कोरेगावची लढाई’ महार विरुद्ध पेशवा अशी होती.-
ही लढाई इंग्रज विरुद्ध मराठा साम्राज्य अशी होती. या लढाईची सुरुवात खूप आधीपासून झाली होती, पण ०५ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवडा आणि खडकी येथे झालेली लढाई ही अंत होण्याची सुरुवात होती. तेव्हापासून मराठा सैनिक स्मिथला हुलकावणी देत, फसवत रानोमाळ गनिमी कावा करत फसवत होते. या लढाईचा अंत दि. ०३ जून १८१८ रोजी पेशव्यांनी पत्करलेल्या शरणागतीने झाला. ही लढाई महार विरुद्ध पेशवा/ब्राह्मण, महार विरुद्ध मराठा(जात) अशी अजिबात नव्हती. त्यामुळे असे मत मांडणे चुकीचे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कुणीही महार सैनिकांचे शौर्य आणि देशभक्ती याविषयी शंका घेणे चुकीचे आहे. ‘महार सैनिक मराठा साम्राज्याच्याविरुद्ध इंग्रजांच्या बाजूने लढले.’ असं म्हणण्याला जो जातीय देशद्रोहाचा वास येतो तो अत्यंत चुकीचा व समाजासाठी घातक आहे. ते ब्रिटिश सैन्यातील तुकडीत होते व त्यांना आज्ञा झाल्याबरोबर युद्धावर जाणे भाग होते. त्यामुळेच महार सैनिकांचे युद्ध पेशवाई संपवण्यासाठी होते व त्या कारणामुळे पेशवाई संपली, असल्या निष्कर्षांनी केवळ नकारात्मक व जातीय द्वेष वाढवणाऱ्या अस्मिता जागृत होण्यापलीकडे काहीच साध्य झाले नाही.

-२५ - २८ हजार पेशव्यांना ५०० महार सैनिकांनी कापून काढले.-

त्यावेळी मराठा साम्राज्याचा पेशवा एक होता. २५ ते २८ हजार पेशवे नव्हते. आता पेशवे म्हणजे ब्राह्मण या अर्थी जरी घ्यायचे तरी ते चुकीचे व दिशाभूल करणारे ठरते. मराठा साम्राज्याच्या सैन्यात मराठा, अरब आणि इतर मिश्र जातींचे सैनिक होते. लढणारे सर्वच्या सर्व ब्राह्मण नव्हते. भीमा नदीच्या पल्याड असलेले मराठा सैन्य आणि बाजीराव पेशवा दि. १ जानेवारी रोजी दक्षिणेला निघाले. कर्नल बरच्या साहाय्याला आलेल्या कॅप्टन स्टॉंटनच्या सैनिकांना कोरेगावातच गुंगवत ठेवण्यासाठी *(१) बापू गोखले, आप्पा देसाई आणि त्र्यंबकजी डेंगळे यांच्या आधिपत्याखाली अरब, गोसावी आणि इतर मिश्र अशा ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या पाठवल्या. *(२) यांनी स्टॉंटनच्या तुकडीला रात्री ९ वाजेपर्यंत पाणी आणि रसद मिळू दिली नाही. कॅप्टन चिशोम आणि कॅप्टन विंगेट यांना ठार केले. स्टॉंटनही जखमी झाला. मराठा सैन्य कुठल्या दिशेने जात आहे, हे कळू नये आणि ते आपल्या मागावर येऊ नये म्हणून इंग्रजांना कोरेगावातच थोपवून धरण्याची कामगिरी यशस्वी झाली होती. ज्या लढाईत इंग्रजांची नामुष्की झाली त्याच लढाईचा ’विजयस्तंभ’ उभारून त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. *(३) या विजयस्तंभावर लिहिलेल्या इंग्रजी आणि मराठी मजकुरातील फरक लक्षात घेण्यासारखा आहे. ८३४ कंपनी सैनिकांपैकी ५०० सैनिक बाँबे नेटिव्ह इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटमधील दुसऱ्या बटालिअनमधील होते. यामध्ये बहुसंख्य शूर लढवय्ये महार सैनिक होते. पण, पूर्णच्या पूर्ण सैनिक महार नव्हते. दुर्दैवाने आज त्या सर्व शूरवीरांची नावे उपलब्ध नाहीत. पण, मृत झालेल्या ४९ सैनिकांच्या यादीत २७ महार सैनिक होते. याचाच अर्थ पूर्णच्या पूर्ण ५०० सैनिक महार नव्हते. त्यामुळे, ‘५०० महारांनी पेशवाई बुडवली’, अशा पद्धतीने जे सांगितले जाते त्याने समाजात जातीय द्वेष भडकवण्यापलीकडे आजतागायत काही केले नाही.



-महारांनी पेशव्यांच्याविरुद्ध लढण्याला ’प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे.’ या पेशवाईतल्या आदेश आणि वागणूक जबाबदार-

मुळात ही लढाई पेशव्यांनी महारांना दिलेल्या हीन वागणुकीची परिणती आहे असे म्हटले जाते. जर महार सैनिकांनी पेशव्यांच्यावर स्वतंत्र हल्ला चढवला असता किंवा बंड पुकारलं असतं तर असं म्हणायला निश्‍चितच जागा होती. महारांची मोठी लढवय्यी पलटण पेशव्यांच्या सैन्यात होती. फक्त पेशव्यांच्या सैन्यातच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या काळापासून जातीने महार असलेल्या शूरवीरांचा मोठा देदीप्यमान इतिहास आहे. अनेकांनी विशेष पराक्रम गाजवला होता व त्यांना त्यानिमित्त अनेक गावेही ईनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे पेशव्यांना स्वत:जवळ असलेल्या लढवय्या महार सैनिकांना दुखावणे अजिबात परवडणारे नव्हते. असा हीन दर्जाचा आदेश काढणे ही, पेशव्यांच्यासाठी हाराकिरी ठरली असती. उत्तर पेशवाईतही असे कुठलेच संदर्भ सापडत नाहीत.

या विधानाला एका वादाचा संदर्भ आहे. न. चिं. केळकर यांचे पुत्र,  इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९३६साली केसरीमध्ये वाद बराच गाजला होता. दि. ५ जून १९३६ च्या केसरीमध्ये केळकरांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ‘पेशवाईत प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात अथवा मनगटावर काळा गंडा आपल्या अस्पृश्यतेची निशाणी दर्शविण्याकरीता लावलाच पाहिजे असही सक्ती होती, शिवाय प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे असा कायदा होता’ या आरोपांना पुरावे देण्याबद्दल विचारले.

                                                                                               













 

 
                                                                                           
                              

( दि. ५ जून १९३६ च्या केसरीमध्ये केळकरांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले पत्र.)                                                                                       

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच केळकरांच्या पत्राला उत्तर देताना, ही वयोवृद्ध लोकांकडून ऐकलेली ऐकीव गोष्ट असून लिखित पुरावा नसल्याचे मान्य केले.
                                                                                                                                                                       
 



(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच केळकरांच्या पत्राला दिलेले उत्तर.)


पेशवे दफ्तरात आजवर हजारोंच्या संख्येने कागदपत्रे प्रसिद्ध झाली असून एकाही कागदात अशा हीन दर्जाच्या आरोपांना पुरावे सापडले नाहीत. तर्कदृष्ट्या अलिखित नियम होता, असं धरून चालल्यास या माणुसकीशून्य नियमामुळे होत असलेला अन्याय छत्रपतींच्याही लक्षात आला नाही, असा अर्थ निघतो.

इंग्रजांनी तत्कालीन विचारवंतांना, समाजधुरिणांना हाताशी धरून ’फूट पाडा आणि राज्य करा’ या नीतीअंतर्गत अनेक गैरसमज पसरवले. आर्यन इन्व्हेजन ते जातीच्या उतरंडीमुळे प्रत्येक जातीतले मतभेद आणखी कसे वाढतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यासाठी विचारवंतांना असलेल्या अनेक  त्यानंतर पिढ्यानपिढ्या याच गैरसमजुतींना खरे मानू लागल्या. ब्रिटिशांनतरच्या राजकारण्यांनाही त्याच गैरसमजुतींना पोसले आणि वाढवले. कारण, त्यामुळेच त्यांची सत्तेत येण्याची आणि टिकून राहण्याची शक्यता त्यांना दिसत होती.
दलित, उच्च-नीच हे शब्द वापरणेच मुळात चुकीचे आहे. पण, नेमके तेच शब्द समाजधुरिणांकडून सातत्याने वापरले जातात. ज्यांना सवर्ण म्हटले जाते (असे म्हणणेही चुकीचे आहे), त्यांच्याकडूनही ज्यांना दलित म्हटले जाते, त्यांना माणुसकीशून्य वागणूक मिळाली हे सत्यच आहे. तिथे कुठेही दुमत नाही. आपल्याच समाजाचा भाग असलेल्यांना आपणच वाळीत टाकलं, एवढंच नव्हे तर माणुसकीलाही लाजवेल, अशा पद्धतीने वागणूक दिली. ज्याची भरपाई कशानेही जगाच्या अंतापर्यंत होणे शक्य नाही.

जेव्हा भारतीय राज्यघटना उपलब्ध आहे, शिक्षणाची समान संधी उपलब्ध आहे, तेव्हाही आपण इतिहासातला कोळसा वर्तमानात उगाळत बसलो, तर भविष्यकाळ कसा असेल, याची कल्पनाही न करणे चांगले.
एका समाजाला ’तुमच्यावर अन्याय झाला होता’, ’तुम्ही दलित होता’, ’तुम्ही मागास आहात’ असं सातत्याने बिंबवले जात असेल तर त्या समाजाचा विकास कधीच होणार नाही. त्याऐवजी आपल्या समाजामध्ये कोण कोणत्या व्यक्तींनी शौर्य गाजवले, कुणी शिक्षणात अग्रेसर राहिले, कोण शास्त्रज्ञ झाले, कोणी व्यवसाय उभारले, कुणी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, कोणी रणांगणावर शौर्य गाजवले या गोष्टी सातत्याने बिंबवल्या गेल्या पाहिजेत.

दलित, मागास अशी लेबलं लावून इतर समाजाविषयी द्वेष पसरवून केवळ राजकारण करता येतं. राजकारण करणार्‍यांनी दुसर्‍या समाजाविषयी द्वेष पसरवून, स्वत:च्याच समाजाला सातत्याने पीडित, मागास मानसिकतेत ढकलून समाजाचा फक्त वापर करून घेतला. कधीकाळी शूरवीर असलेल्या जमातीला हीनदीन आणि मागास करून टाकलं. आपल्यावर सतत कुणीतरी अन्याय करत आहे, ही पराभूत मानसिकता तयार केली. या पराभूत मानसिकतेचे परिणाम पिढ्यानपिढ्या राहतात. होणार्‍या दंगलीतून, जाळपोळीतून राजकारणी स्वत:ची पोळी व्यवस्थित भाजून घेतील. समाज जाईल चुलीत आणि आपण आपलीच डोकी फोडत बसू. ज्या संभाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा, ‘त्यांच्या प्रेताला अग्नी कुणी दिला?’ या वर नकारात्मक जातीय अस्मिता जागृत केली जात असेल, हीच जातीय नकारात्मक अस्मिता पोसत बसणार असू, तर आपण संभाजी महाराजांच्या बलिदानातून काहीच शिकलो नाही हेच समोर येते. औरंगजेबाने त्यांचा फक्त देहच छिन्नविच्छिन केला, आपण त्यांच्या देहाचे तुकडे कुणी गोळा केले, कुणी शिवले, यावरून जातीजातीत भांडू लागलो. आपल्यापेक्षा हीन जगात कुणी आहे? बाह्य आक्रमकांना आपला संपूर्ण पराभव करणे कधीच शक्य झाले नाही. आम्ही आमच्याचकडून पराजित झालो.

या लढाईत कोण जिंकलं? अजिबात स्तुत्य नसलं तरी सत्य आहे, भीमा कोरेगावच्या लढाईत दोनशे वर्षांनंतर ब्रिटिश जिंकले.



-संदर्भ-१ . आज लढाई करून मार्ग काढावा.’ ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले (गोखल्यांची कैफियत - रियासतकार गो. स. सरदेसाईंनी पेशवे दफ्तर खंड ४१)
२.  अ. वेलिंगटन्स केंपेन्स इन इंडिया पृष्ठ १६४-१६५ ब. गॅझेटिअर ऑफ द बॉंबे प्रेसिडेन्सी १८८५ पृष्ठ २४४-२४७
      क. अ हिस्ट्री ऑफ मराठाज व्हॉल्यूम ३ - ग्रँड डफ (पृष्ठ ४३२-४३५)

 ३. ’ब्रिटिश सैन्य इतक्या धाडधडीत रीतिने येथे नामोहरम झाले असताना देखिल अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्लिशांकडून जयस्तंभ उभारीले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनविण्यात आले आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे.’  (शिवराम परांजपे - ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’)

६ टिप्पण्या:

  1. खूप छान अभ्यासपूर्ण लेख, बरे झाले पार्श्वभूमी कळली!👍👍

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान अभ्यासपूर्ण लेख, बरे झाले पार्श्वभूमी कळली!👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. अभिनिवेशरहीत वास्तववादी रचना केली आहे आपण. कौतुकास्पद!

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच सुंदर अभ्यासपूर्ण लेख. 🙏🙏

    उत्तर द्याहटवा