गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

जनता जनार्दनाची भाषा बदलत चालली आहे का?








मलपती कुप्पुस्वामी जनार्दनम यांची प्रभारी कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी सर्वत्र कशी छापून येते याविषयी मला प्रचंड कुतूहल होते. चुका काढणे याऐवजी असे कुतूहल असण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या भाषा आणि त्यात होत असलेले बदल.

अपेक्षेप्रमाणे अनेक ठिकाणी जनार्थनम असे छापून आले, तर काही ठिकाणी ते जनार्दनम. एके ठिकाणी मलापती असेही छापून आले आहे. त्यांचे खरे नाव काय हे विचारण्यासाठी गोवा विद्यापीठातील जवळपास ८ ते १० लोकांशी संपर्क साधला,  गोवा विद्यापीठाचे संकेतस्थळही तपासून पाहिले. संकेतस्थळावर त्यांचे नाव मलपती के जनार्थनाम असे मराठीत आहे. खुद्द त्यांना फोन केला होता पण, तो बंद होता. शेवटी प्राध्यापक कृष्णन यांनी फोन केला व ते नाव उच्चारी जनार्दनम आहे, असा खुलासा केला. 

जसे आपण इंग्रजी, फ्रेंच या नावांच्याबाबतीत ती अचूक लिहिली जावीत याबाबत आग्रही असतो, तसे आपल्याच भारतीय नावांच्याबाबतीत आपण असत नाही. काय बरोबर आहे, हे सांगितले तरीही ते स्वीकारले जात नाही. प्राकृतिक अस्मिता इतक्या पराकोटीला पोहोचली आहे की, जे बरोबर आहे तेही स्वीकारले जात नाही. अहिल्या, अनुसया या शब्दांना काहीच अर्थ नाही. वास्तविक ते अहल्या (न ढळणारी) व अनसूया (जिला असूया नाही) असा होतो. रवि हे व्यक्तीचे नावसुद्धा आपण रवी असे लिहितो. र्‍हस्व दीर्घ असा व्याकरणाचा भाग त्यात नाही. रवि म्हणजे सूर्य आणि रवी म्हणजे ताक घुसळायचे साधन. आपण कुठल्याही व्यक्तीचे नाव ठेवताना त्यातला अर्थ त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. गमतीचा भाग म्हणून एक विचार मांडतो. आईवडिलांनी ठेवलेले पाळण्यातले नाव आणि इतर लोकांनी ‘ठेवलेले’ नाव, यात लोकांनी ठेवलेले नाव जास्त समर्पक असते. असो!

आमच्या गोवन वार्तामध्ये घडलेला एक प्रसंग आठवला. आमच्या इंग्रजी गोवनच्या छायापत्रकाराने टेबलवर होते ते पुस्तक उचलले आणि त्याचे  नाव त्याने वाचले. ते ऐकून मी तीनताड उडालो. तो म्हणाला, ‘बायकुला टू बँकॉक’. त्यातही तो ‘बाय’उच्चारून सेकंदभर थांबला आणि मग पुढले शब्द बोलला होता. न राहवून मी त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि घोळ माझ्या लक्षात आला. भायखळा ते बँकॉक या नावाचे हुसैन झैदी या लेखकाचे ते पुस्तक होते. रोमनमध्ये लिहिताना ‘Byculla to Bangkok’  असे लिहिल्यामुळे त्याने जसेच्या तसे वाचले. 

अशी अनेक नावे आहेत जी चुकीची लिहिली किंवा उच्चारली जातात. त्यामागे अनेक कारणे आहेत. स्थान, बोलीभाषा, लिप्यंतर, अन्य भाषिकांच्या संपर्कात आल्याने त्या भाषांचा आपल्या भाषेवर, उच्चारांवर होणारा परिणाम वगैरे. सर्वांत त्रासदायक कारण कुठले असेल तर आपण आपलीच भाषा इंग्रजीतून शिकणे. आपण आजकाल मराठीतून मराठी किंवा कोकणीतून कोकणी न बोलता इंग्रजीतून मराठी व इंग्रजीतून कोकणी बोलत आहोत. अनेक ठिकाणी रोमन लिपीत लिहिलेली आपल्याच गावांची नावे आपण भलतीच उच्चारू लागलो आहोत. माशेलचे ‘मार्सेला’ होऊ लागले आहे. केळशी या गावाचे नाव कुवालेशीम किंवा तत्सम काहीतरी भलतेच होत आहे. 

 कृती हे नाव असेल तर ते क्रिती, कृष्णाचा क्रिश्ण, ऋचाचे रिचा, ऋतूचे रितू ही सर्रास आढळणारी बाब आहे. हे असे होते याला कारण म्हणजे हे शब्द रोमन लिपीत लिहिले जातात व नंतर त्यांचे देशी भाषांत रूपांतर केले जाते. मराठी वृत्तवहिन्यांवर बातम्या देणारे, सूत्रसंचालक प्रेक्षकांसाठी ‘दर्शक’ असा शब्द वापरतात. वास्तविक दर्शक म्हणजे दाखवणारा! हा सरळ सरळ बिनडोकपणे स्वीकारलेला, हिंदीचा मराठीवरील प्रभाव आहे.  

गोव्यामध्ये  Jose हा शब्द जुझे असा उच्चारला जातो, तर महाराष्ट्रात जोस असा उच्चारला जातो. पंजाबी लोकांना जोडाक्षरे उच्चारण्यात बहुधा अनेक समस्या येत असाव्यात. ते इंद्राचे इंदर करतात. बंगाली लोक ‘भ’  साठी ‘व्ही’ हे रोमन अक्षर वापरतात. आपणही सौरभचे सौरव करतो. त्यांनाच टेकून असणारे आणि काही बंगालीसुद्धा ‘व’ या अक्षरासाठी ‘बी’ हे रोमन लिपीतील अक्षर वापरतात. त्यामुळे देवचे देब होते आणि विप्लवचे बिप्लब होते. इंग्रजांनी आपल्या भाषेतील नावांचे, आडनावांचे उच्चार आपण आजवरही इमानेइतबारे, आग्रहाने वापरतो. रवींद्रनाथांच्या ठाकूर आडनावाचे टागोर झालेले आपण आजही ठाकूर करत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. आपण आपल्याच नावांचे इंग्रजीकरण करून पुन्हा देशीकरण करतो आणि इंग्रजांनी केलेल्या आपल्या देशी नावांचे केलेले इंग्रजीकरण अगदी निष्ठेने, निरतिशय आग्रहाने सांभाळतो. 

दाक्षिणात्य लोकांना क, च, ट, त,प च्या वर्गांमधल्या अनुनासिक वगळता उरलेल्या चार व्यंजनांमधला भेद  कळत नाही किंवा तो भेद असूनही गौण मानला जातो. तीच गत दंत्य आणि मूर्धन्य अक्षरांची होते. ढोबळमानाने ‘ग’ या अक्षरासाठी ते रोमन लिपीतील ’के’ अक्षर वापरतात. ‘त’ अक्षरासाठी इंग्रजीतील ‘टी’ व ‘एच्’ ही अक्षरे जोडून वापरतात. जेव्हा ते ‘टी’ अक्षर ‘एच्’शिवाय वापरतात तेव्हा त्याचा मराठीतील उच्चार ’ट’ असा असतो. त्यामुळे, त्यांनी ज्योतीचे रोमन लिपीत लिहिलेले मराठी उच्चारण ज्योथी, कामतचे कामथ, आरोग्यचे आरोक्य असे विचित्र व चुकीचे होते. अनेक ठिकाणी ‘थिरुवनंथपुरम’ असे छापून येते. याशिवाय नावे रोमन लिपीत लिहिताना दाक्षिणात्य माणसे अनेक घोळ करून ठेवतात. ‘द’ हे अक्षरसुद्धा ‘टीएच्’ अशा रोमन अक्षरांत लिहिले जाते. 

त्यामुळे, अनेकदा गोंधळ होतो. उच्चारण त्यांचे योग्य असते. पण, जेव्हा इंग्रजी भाषेत लिहिण्यासाठी लिप्यंतर (दाक्षिणात्य ते रोमन) करतात तेव्हा घोळ  घालतात. आपण तेच रोमन लिपीत लिहिलेले नाव आपल्या भाषेत उच्चारतो, लिहितो तेव्हा या घोळाची परमावधी होते. दु:ख नेमके इथे आहे. जनता जनार्दनाची भाषा बदलत चालली आहे, आपल्याच संस्कृतीशी असलेली नाळ तोडत चालली आहे याचे अतीव दु:ख होते.  

‘जनार्दन’ हे भगवान विष्णूंचे एक नाव. ते आपल्याला नवीन अजिबात नाही. वास्तविक जनार्दन या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर प्रभारी कुलगुरूंचे नाव जनार्थनम असणार नाही, ते जनार्दनम किंवा जनार्थनाम असणे शक्य आहे, हे लक्षात येते. जन म्हणजे लोक आणि अर्दन याचा अर्थ संहार करणे, मारणे असा आहे. अधर्माने वागणार्‍या जनांना मारणारा म्हणून जनार्दन.

ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन ।जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥ ४ ॥

(ज्याच्या योगे दुष्ट जनांचा संहार होतो, ज्याच्या योगे लिंगदेहाचा नाश होतो, जो जीवाला जिवानेच ठार मारतो, तो जनार्दन कृपाळू होणार कसा?)  एकनाथी भागवत - २५.४

‘जीवो जीवस्य जीवनम्’ (एक जीव दुसर्‍या जिवावर जगतो) याच्या विपरीत ‘जिवाला जिवानेच ठार करणे’ हे किती विस्मयचकित करणारे यावर विवेचन करण्याचा मोह आवरता घेत लेखनसीमा अधोरेखित करतो. 


१५ टिप्पण्या:

  1. अरे वा!!!!
    मस्त झालाय लेख. खरंय तुमचं, भारतीय भाषांमधील नावे शुद्ध लिहिण्याबद्दल आपण आग्रही असलंच पाहिजे.
    अदिती

    उत्तर द्याहटवा
  2. सर, अभ्यासपूर्ण लेख. वाचून चिंतन करण्यास भाग पाडणारा.

    उत्तर द्याहटवा
  3. प्रसन्न, अप्रतिम झाला आहे लेख. व्यक्तींच्या, गावांच्या आणि इतर काही बाबतींतही अर्थ आणि/किंवा मूळ उच्चार लक्षात न घेतल्यामुळे चुकीचे लिहिले जाते. बऱ्याचदा दुर्दैवाने चुकीचे लिहिलेलेच पुढे चालू राहते.

    उत्तर द्याहटवा
  4. लेख अगदी सुंदर आहे.आपल्या भाषे च्या बरोबर उच्चारण आणि लेखन यासाठी आग्रही राहण्याची गरज आहे

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान, अभ्यासपूर्ण विवेचन. जसे नावांच्या बाबतीत होते, तसेच शुद्धलेखनाबाबतीतही होत आहे. मराठी शब्दातील उकार, वेलांटी कोणती द्यायची हे तो शब्द इंग्रजीत कसा लिहिला जातो, (ee असेल तर दीर्घ वेलांटी) यावरून ठरवली जात असल्याचे दृष्टीस पडते. 'शुद्ध भाषेचा आग्रह नको' म्हणत आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. उद्या व्याकरणच नको म्हटले नाही म्हणजे मिळवले. विनोद नाही, खरच ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. मराठी भाषा ही शुद्धच बोलली पाहिजे व लिहीली तर पाहिजेच. नुसते विचार समोरच्या व्यक्ती पर्यंत पोचवणे हा एवढाच भाषेचा हेतू असत नाही. मराठी भाषेच्या लिखाणावरुन त्याचा अर्थ बदलतो.
    खूप छान लेख . अभ्यासपूर्ण

    उत्तर द्याहटवा
  7. सर तुमचा लेख मराठीत लिहीताना होणार्या चुकांवर बरोबर भाष्य करणारा आहे.चुकीच्या शब्दाने अर्थ बदलतो.

    उत्तर द्याहटवा
  8. लेख खूप छान.. त्या त्या भाषेतील शब्दांचे उच्चार हे त्या त्या भाषेत स्पष्ट आणि शुद्ध असावेत. प्रत्येक भाषेला आपला असा एक ठसा आहे त्यामुळे शब्दाचे उच्चार योग्य व्हावे.

    उत्तर द्याहटवा
  9. भाषेच्या शुद्धतेचा असा आग्रह असेल तर मराठी नक्कीच सुखावेल। खूप छान लेखन। लहानपणी, सहल कांदियापारला जाणार असे घरी सांगितले, त्यावेळी सर्वांना कोडे पडले. सहलीहून परतल्यावर खांडेपारला गेलो होतो, हे स्पष्ट झाले.

    उत्तर द्याहटवा
  10. मराठी शुध्द बोलणारे क्वचित आढळतात मातृभाषा मराठी असून सुध्दा मराठी लेखन आणि बोलणे कमीपणाचे वाटते. याला जबाबदार आपण दिलेले इंग्रजी भाषेला दिलेले अवास्तव महत्व. इतर गोष्टीत मराठीबाणा बाळगणारे स्वत: मात्र मुलांना मिशनरी शाळेत पाठवतात. त्यामूळे त्यांची भाषेची जवळीक तेवढी रहात नाही.

    उत्तर द्याहटवा
  11. भाषा ही नेहमीच व्याकरणशुद्ध असावी. त्यातील र्ह्स्व दीर्घ तर विचारपूर्वकच लिहिले गेले पाहिजे. नपेक्षा तिचाअर्थ बदलून विपर्यस्त निरर्थक वाटू लागते.

    उत्तर द्याहटवा
  12. अभ्यासपूर्ण आणि प्रत्येकाने विचार करावा, असे लिखाण. तुझे वडीलही असेच लिखाण करायचे. त्यांचा वारसा चालवत आहेस.

    उत्तर द्याहटवा
  13. अगदी नेमकेपणाने आणि अभ्यासपूर्ण भाषेच्या शुद्धतेबाबतचा विचार मांडला आहे सर.

    उत्तर द्याहटवा