रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?

प्रत्येकाला हवी असलेली आणि तरीही ती नेमकी काय आहे याची माहिती नसलेली संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा केलेला ऊहापोह...


लहानपणात कळायला लागल्यापासून खटकत आलेले वाक्य  म्हणजे ‘दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.’ शाळेत शिकवलेही तसेच जायचे. ‘सर, आम्ही स्वातंत्र्य मिळवले की, मिळाले?’ असा प्रश्न आठवीत असताना शिक्षकांना विचारला होता. तेव्हा, ‘काय फरक पडतो? जास्त शहाणपणा करू नकोस.’, असा प्रेमळ सल्ला मिळाला. 

‘स्वातंत्र्य आम्ही मिळवलं’, असं का शिकवलं जात नाही असा प्रश्न नंतर अनेकदा पडला. या प्रश्नाला, ‘राजकीय सत्ताहस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य?’ या व अशा अनेक प्रश्नांची जोड मिळत गेली आणि त्या प्रश्नांच्या शृंखलेने जखडून टाकलं. त्यातून सुटण्याची धडपड आजतागायत सुरू आहे. अजूनही स्वतंत्र झालो नाही. कदाचित, होणारही नाही.

स्वत:च्या मर्जीने, तंत्राने बंधनांशिवाय हवे तसे वागण्याची, बोलण्याची मुभा म्हणजे स्वातंत्र्य, अशी त्याची ढोबळमानाने व्याख्या केली जाते. स्वतंत्र असणे याचा अर्थ स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे सामर्थ्य असणे, स्वत:चे रक्षण स्वत: करण्याची क्षमता असणे म्हणजे स्वातंत्र्य असा स्वातंत्र्य या संकल्पनेचा अनेक अंगांनी विचार करता येऊ शकतो. पण, तरीही त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही. स्वातंत्र्य हा शब्द अनेक ठिकाणी जोडला जातो. प्रत्येक ठिकाणी त्याची व्याप्ती आणि मर्यादा बदलत जातात. व्यक्ती, विचार, वर्ग, राष्ट्र, समाज, समुदाय, पंथ, संस्कृती अशा अनेक ठिकाणी स्वातंत्र्य हा शब्द जोडला जातो. या संकल्पनेच्या गळ्यात समता आणि पायात समानता अडकवली जाते. अस्मितेची भरजरी वस्त्रे नेसवली जातात. या सगळ्या अभिनिवेशात स्वातंत्र्य या संकल्पनेचीच गळचेपी होऊन ती परावलंबित्व, परवशता आणि पारतंत्र्य यात पुरती अडकते. यातून निर्माण होतो तो फक्त संघर्ष आणि संघर्ष, बाकी काहीच नाही.

व्यक्तिस्वातंत्र्य हा तर या संघर्षाचे मूलभूत स्वरूप आहे. आपण वाट्टेल ते वाट्टेल तसे बोलणे, वागणे म्हणजे स्वातंत्र्य असे अत्यंत प्रामाणिकपणे समजतो. अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या तीन वाजेपर्यंत समुद्रकिनार्‍यावर मित्रमैत्रिणींसोबत बागडणे हे तिचे व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे, असा विचार हिरिरीने मांडला जातो. तिच्या सुरक्षेची जबाबदारी अधोरेखित करणारा मुख्यमंत्री स्त्री-पुरुष समानतेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा  आणि त्याहीपुढे जाऊन स्त्रीस्वातंत्र्याचा विरोधक ठरतो. 

आपण घरात काय घालावे, काय बोलावे, कसे वागावे याचे आणि समाजात वावरताना काय घालावे, काय बोलावे, कसे वागावे याचे सर्वमान्य रूढ संकेत असतात. हे संकेत पाळण्याचा आग्रह धरणे म्हणजे स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही. वस्त्राचा उपयोग प्रामुख्याने सहसा उघड्यावर पडू नयेत असे अवयव झाकणे, हा आहे. घरात आणि चारचौघांत याचे संदर्भ बदलतात. घरात आपण काय घालतो किंवा घालत नाही, याचे कुणालाही काहीही पडलेले नसते. पण, जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा त्याचे संकेत बदलतात. ‘माझं शरीर आहे, ते किती झाकायचं आणि किती दाखवायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मला आहे.’ हे एखादी स्त्री म्हणू लागते तेव्हा अनवस्था प्रसंग ओढवतो. त्या अवस्थेतल्या तशा स्त्रीकडे पाहण्याचे किंवा पाहत राहण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला नसते. 

जी अवस्था व्यक्ती स्वातंत्र्याची तीच अवस्था विचार स्वातंत्र्याचीही आपण करून ठेवली आहे. माझे विचार आहेत, मी वाट्टेल तसे, वाट्टेल तिथे वापरणे म्हणजे स्वातंत्र्य असा विचार आपण रुजवला आहे. पंडित नेहरूंचे व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याच्या हव्यासापोटी आपण आपल्याच राष्ट्राच्या पंतप्रधानांचे चारित्र्यहनन सार्वजनिकपणे करतो हे लक्षातच येत नाही. मोदींना जाहीरपणे ‘नीच’, ‘मौत का सौदागर’ म्हणतानाही आपण हे भान विसरतो. व्यक्तिगत पातळीवर एकवेळ चालेल अशी टीका टिप्पणी आपण जाहीर माध्यमातून करणे, याला विचारस्वातंत्र्य म्हणत असू तर ते आपल्याच वैचारिक दळभद्रीपणाचे लक्षण ठरते. 

अशाच पद्धतीने आपण वर्ग, राष्ट्र, समाज, पंथ यांच्या स्वातंत्र्याकडे पाहतो. व्यक्ती आणि विचार या पातळीपेक्षाही यांच्या ‘स्वातंत्र्य’ संकल्पना अधिक घातक ठरतात. वर्गसंघर्षाला स्वातंत्र्य संकल्पनेची फोडणी दिली की, त्याचे कायम पेटत राहणे निश्चित होते. वर्ग स्वातंत्र्याला अस्मितेची जोड तर त्याहून अधिक प्रभावशाली ठरते. जेसिंतो बेटावर तिरंगा फडकवण्याचे स्वातंत्र्य कुणाला आहे, नुस्तेकारांना आहे की, नौदलाला आहे यावरून अस्मितेचे निखारे पेटवले की, वर्गसंघर्ष होतो आणि स्वातंत्र्य चुलीत जाते. नुस्तेकारही आपलेच आणि नौदलही आपलेच हा वर्गसमन्वय साधणे ही वैचारिक अडचण ठरते. 

कोणाचे स्वातंत्र्य मोठे किंवा महत्त्वाचे हा तर वर्गसंघर्षाचा पाया आहे. याचे वारे सर्वांत जास्त पंथस्वातंत्र्याला लागते. हेच स्वातंत्र्य शरियाचे नियम लागू करण्यास भाग पाडते आणि शरियातील दंड नको म्हणते. हेच पांथिक स्वातंत्र्य रस्त्यावर नमाज पठणाला, दूर्गापूजा करायला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला घटनेने दिलेला अधिकार ठरवते. हेच पांथिक स्वातंत्र्य कोकणे विरुद्ध किरिस्तांव, हिंदू विरुद्ध मुसलमान असा उभा दावा निर्माण करते. 

हे सगळे पाहिल्यानंतर, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? ’ हा प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला चौर्‍याहत्तर वर्षे झाली तरीही निरागसपणे उभा राहतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण स्वातंत्र्य ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जोडून कधी पाहिलीच नाही. तिला स्वच्छ आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणूनच स्वातंत्र्य आपण आपला अधिकार मानला. त्याआधी ती आपली जबाबदारी आहे, हे सोयीस्करपणे विसरलो.  स्वातंत्र्यातून मिळणारे लाभ उपभोगणारे आपण, त्याच्या परिणामांची जबाबदारी मात्र समाज, संस्कृती, सरकार आणि आपल्याशिवाय इतर प्रत्येक गोष्टीवर ढकलू लागलो. जबाबदारीशिवाय अधिकार आणि स्वातंत्र्य कायम संघर्षच उभा करतात हे आपण संसदेपासून आपल्या घरापर्यंत सर्वत्र दररोज अनुभवत आहोत. 

सर्वांना सामावून घेणार्‍या संस्कृतीला नावाने संबोधण्याचे धाडस आणि स्वातंत्र्य आपल्याजवळ नाही. उलट तिला नावे ठेवण्याला आपण स्वातंत्र्य समजत आहोत. समता, समानता, अधिकार, हक्क या गोष्टींशी स्वातंत्र्य ही संकल्पना न जोडता तिला संस्कृतीशी जोडले असते तर आपल्याला स्वातंत्र्य ‘मिळणे’ आणि ‘मिळवणे’ यातला फरक निश्चितच कळला असता. 


1 टिप्पणी:

  1. सुंदर लेख सर.... मुळात स्वतःचं अस्तित्व आहे हे उमजनं म्हणजे खरं तर स्वतंत्र किंवा स्वातंत्र्य म्हणावे लागेल. पण आज किती देशवायसीयांना ही जाणीव आहे हा संशोधनाचा भाग आहे ...

    अस्तित्वफार दूरची बाब राहिली पण आज आपण त्याच अस्तित्वाच्या दांभिकतेचा पडदा मात्र मुखभर पसरवून घेतलाय. यात विचारांचं स्वातंत्र म्हणणे नेमकं काय हे कळायला बहुतेक आणखी पंचाहत्तर वर्षे जातील की काय ही भीती वाटते...

    एकीकडे देशातील एक वर्ग देशासाठी अक्षरशः धडपडतोय तर त्याच वेळी टुकडे टुकडे गॅंग मात्र देशाच्या अखंडतेला खंडित करण्याचा हरेक प्रयत्न करतोय....

    लेख स्वातंत्र्यावर विचार करण्यास प्रवृत्त करतो तो यामुळेच.... छान लेख☺️💐💐💐

    उत्तर द्याहटवा