रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

सण, संस्कृती आणि विकृती



लहानपणी आमच्या नातलगांकडे जाण्याचा योग आला होता. दिवस जत्रांचे होते. त्या माउलीने साखरेचं पांढर्‍या रंगाचं खाजं खायला दिलं. बोलता बोलता सहज म्हणाली, ‘अरे खाजं खा. कुत्र्याच्या लेंडीसाराखं दिसतं नाही?’ खाजं पाहिल्यानंतर तिनं खाज्याचा जो संबंध कुत्र्याच्या सुकलेल्या विष्ठेशी जोडला होता, तिच्या मनात असलेला तो संबंध तिने मला, मी ते खाजं खाताना सांगितला. तिचा हेतू वाईट नव्हता, जागा आणि वेळ चुकली होती. तोंडात असलेला तुकडाही मी बाहेर फेकून आलो. त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधी त्याप्रकारचं खाजं खाल्लं नाही.



’पुढील नऊ दिवसच स्त्री पूजनीय असेल, त्यानंतर पुन्हा छेडणीय, रेपणीय आणि अत्याचारणीय असेल.‘, 

‘ज्या देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार सर्वाधिक आहेत, तिथे इथून पुढील नऊ दिवस तिची पूजा केली जाईल.‘

असे व यासारखे अनेक विचार मांडले जातात. वरकरणी या विचारांमध्ये काहीच चुकीचं नसतं. बलात्कार किंवा स्त्रीवर अत्याचार आपल्या देशात होतात, हे सत्य आहे आणि आपल्या देशात शक्तीची पूजाही होते, स्त्रीला देवीच्या रूपात पाहिले जाते, हेसुद्धा सत्यच आहे. त्यामुळे कुठलीच गोष्ट असत्य म्हणता येत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र जोडल्या जातात तेव्हा हेतूवर शंका घेण्यास निश्‍चितच वाव असतो.


स्त्रीवर अत्याचार होऊ नये, असा किंवा हिंदू (भारतीय???) पुरुषांचा दुतोंडीपणा दाखवण्याचा हेतू वरकरणी दिसतो. पण, मग त्याचा संबंध त्या सणाशी कसा आहे, याचा खुलासा केला जात नाही. नवरात्र हा शक्तीच्या जागराचा सण आहे. स्त्रीमधली स्वसंरक्षणाच्या शक्तीचा जागर या निमित्ताने करावा, स्त्री पूजनीय आहे हा विचार प्रकर्षाने मांडावा, असे का केले जात नाही? कारण त्यांना तसं करायचंच नसतं. सणाविषयी असलेली आदराची, अभिमानाची भावना हीन करणे हा त्यामागे हेतू असतो. नवरात्र सणाची संकल्पना आणि त्याला स्त्रीसशक्तीकरणाची भावना जोडल्यास बलात्कार कमी होतील. सामाजिक संदर्भ लावून समाजात बदल घडवण्याचे यशस्वी माध्यम म्हणून या सणांना वापरता येईल. स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी वासनांध दृष्टिकोन बदलण्यासाठी या सणांचा वापर सहज करता येईल.


पण, या विचारवंतांना असं करायचंच नसतं.



आपली हिंदू (भारतीय????) संस्कृती कशी हीन आहे, कशी त्याज्य आहे, हे ठसवायचं असतं. नवरात्रीचं लव्हरात्री करायचं असतं. म्हणून हे सगळे सुटे सुटे विचार प्रसवले जातात. संस्कृती उच्च दर्जाची आहे, याचा अभिमान निर्माण झाला तर विकृतीला आळा बसणार नाही का? संस्कृतीचा कितीही उदोउदो केला म्हणून विकृती पूर्णपणे नष्ट होणार नाही. कुठलाच समाज विकृतीशिवाय असत नाही. पण, त्याची तीव्रता कमी करण्याचा, त्याचे दृश्य परिणाम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून संस्कृतीकडे पाहिले पाहिजे. संस्कृतीला विकृतीसोबत ठेवून आपण संस्कृतीला हीनत्व आणत असतो.


आपल्याला पंचपक्वान्न वाढताना कुणी संडासाचा उल्लेख केला तर जेवणावरची वासना उडते. कितीही चांगलं अन्न जेवा उद्या त्याची विष्ठाच होते, हा विचार दृढ होतो. अन्नापेक्षा विष्ठेवरच निष्ठा जडते. खाल्लेल्या अन्नाची विष्ठा होणं, हा प्रक्रियेचा भाग आहे. पण, तेवढंच होतं का हो? अन्नाचे पचन होऊन ऊर्जा निर्माण होत नाही का? आपला संबंध ऊर्जेशी असावा की, विष्ठेशी. अन्नही सत्य आहे आणि विष्ठाही सत्य आहे. एक सेवनीय आहे, दुसरी त्याज्य आहे. दोन्ही गोष्टींची एकत्र पंगत मांडणे अप्रस्तुत आणि अशोभनीय असते. त्यामुळे विष्ठेविषयी घृणा निर्माण होण्याऐवजी अन्नावरची वासना उडते. शरीराला लागणारी ऊर्जा निर्माण होत नाही. विकृती हे संस्कृतीचे उपफल (बायप्रॉडक्ट) आहे. समाज सदाचाराने चालावा हे संस्कृतीचे फल आहे. आपण कशावर घाला घालतोय, याचा विचार निश्चितच प्रत्येकाने करावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा