सोमवार, २१ मार्च, २०२२

यह सुबह-सुबह की बात है...

यश अपयश या नंतर होणारे राजकीय पक्षांचे चिंतन हा आताशा थट्टेचा विषय होत चालला आहे. पराभव कनिष्ठ नेतृत्वावर ढकलणे आणि विजयाचे श्रेय शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांना देणे सर्वमान्य होत चालले आहे. केवळ राजकीय पक्षांनीच नव्हे, तर राजकीय विश्लेषकांनीही याचा विचार करणे आवश्यक आहे.












पाचही राज्यांच्या निवडणुकांनंतर मिळालेल्या अपयशाचे यथार्थ चिंतन जसे काँग्रेसला करणे आवश्यक आहे, तसेच किंवा त्याहीपेक्षा जास्त चिंतन मिळालेल्या यशाबद्दल भाजप आणि आम आदमी पक्षाला करणे आवश्यक आहे. यावर केवळ ‘जबाबदारी निश्चित करणे’ या एकाच दृष्टिकोनातून न पाहता सखोल, यथार्थ विचार करणे प्रत्येक पक्षाला लाभदायक ठरेल. तसा विचार न झाल्यास कधी कधी अपयशापेक्षाही यश जास्त अपयशी करून जाते. यशाची धुंदी कधीही रात्र संपूच देत नाही. पहाट उगवतच नाही, सकाळ होतच नाही.

उत्तर प्रदेशात भाजप बहुमत मिळाले आहे. पण, त्याचबरोबर २०१७ साली ३१२, २०१९साली २७५ आणि २०२२मध्ये २५५ जागा मिळाल्या आहेत. भाजपची ही जागांवरील घसरण का झाली याचा विचार होणे आवश्यक आहे. या निवडणुकीत, ‘नोयडामध्ये गेलेला मुख्यमंत्री पुन्हा निवडून येत नाही’ यासह  अनेक राजकीय अंधश्रद्धा निकाली निघाल्या. यासह अनेक वर्षे जुना असलेला, ‘विरोधी मतांच्या विभाजना’चा राजकीय सिद्धांत चुकीचा ठरला आहे. ज्या जागांवर तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली आहे, तिथे सपाने जागा जिंकल्या आहेत आणि जिथे सपा विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली आहे, तिथे भाजप ७०% जागांवर जिंकला आहे. राजकीय विश्लेषक मांडत असलेला ‘यादव-मुस्लीम’ किंवा जातीय राजकारणाच्या गणितांनाही या निवडणुकीत छेद गेला आहे. अमुक एका जातीची मते विशिष्ट पक्षाची मक्तेदारी आहे, असे मत मांडणे चुकीचे ठरले आहे. जाटव जातीची मते बसपाची मक्तेदारी मानणारे राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ ती मते भाजपला मिळाली याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. मुस्लीमबहुल भागातून हिंदू निवडून येणे या राजकीय विश्लेषकांच्या पचनी पडत नाही. अनेक नकारात्मक गोष्टी, मुद्दे असतानाही भाजपला कसे बहुमत मिळते याचा विचार अनेक तज्ज्ञ लोकांना त्रास देत आहे. 

भाजप राज्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांना, समर्थकांना हा मोदींचा व योगींचा करिष्मा वाटत आहे. काही प्रमाणात ते खरे असले, तरीही पूर्णपणे तेच खरे आहे, असे मुळीच नाही. मोदींनी लागू केलेल्या अनेक योजनांची टिंगल टवाळी करण्याव्यतिरिक्त वेगळा अभ्यास दुर्दैवाने झाला नाही. मोदींच्या अनेक योजनांनी पूर्वापार चालत आलेली जातीय समीकरणे मोडीत काढली. विशेषत: ग्रामीण भागात याचा प्रभाव फार पाहायला मिळाला. बहुतांश योजनांच्या केंद्रस्थानी महिलावर्ग ठेवण्यात आला. उदाहरणच द्यायचे झाले तर गृहकर्ज योजनेत सूट मिळवण्यासाठी महिलेच्या नावावर घर असणे अनिवार्य करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात, कुटुंबातील स्थानात यामुळे खूप मोठा फरक पडला. या योजना पक्ष, जात, समाज न पाहता लागू करणे व ते अधोरेखित करणे यात योगी आदित्यनाथ यशस्वी ठरले. विविध योजनांचा लाभ मिळवलेला हा जो नवीन वर्ग आहे, तो आपल्याकडे वळवण्यात उत्तर प्रदेशात भाजपला आलेले यश, अनेक नकारात्मक बाबींना मागे टाकून गेले. महिलावर्गाचा मतदानातील सहभाग का वाढला, याचेही हे एक कारण आहे. केवळ मतांची बेगमी करणे यापेक्षाही, योजना सुरू करण्यामागे जातीपातीचे राजकारण मोडून काढणे, हा मोदींचा उद्देश होता. मोदींचा हा उद्देश योगी आदित्यनाथांनी योग्य पद्धतीने लागू केला आणि मतांमध्ये त्याचे परिवर्तनही केले. हाच प्रयोग आसामसारख्या पूर्वोत्तर राज्यांमध्येही यशस्वी ठरत आहे. 

लाभ मिळालेल्यांचा गट भाजपकडे ओढण्यात गोव्यात मात्र अपयश आले आहे. याचे महत्त्वाचे कारण कार्यकर्ते आणि लोकांची मानसिकता हे आहे. संडास बांधण्याची साधी योजनाही त्या घरासाठी देण्यात आली, जिथे पूर्वीच तीन चार संडास आहेत. केवळ यासाठी की, ते घर भाजपला मतदान करते. पक्ष, जात व समाजविरहित असलेला नवीन मतदारवर्ग निर्माण करून तो भाजपशी जोडण्याचे कार्य गोव्यात झाले नाही. बरं, मतदारही ‘आमी इतली वर्सां भाजपाक मत्तां माल्ली आनी कामां कांग्रेशीच्या लोकांची करता?’, असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारू लागले. भाजपचे परंपरागत मतदार टिकवून ठेवून लाभ मिळालेल्यांचा नवा वर्ग निर्माण होणे आवश्यक होते. जे उत्तर प्रदेशमध्ये झाले ते गोव्यातही होणे आवश्यक होते. 

‘निवडून येण्यासाठी पैसे वाटणे गरजेचे आहे‘ हा सिद्धांत गोव्यातील ग्रामीण भागांत खोटा ठरला. पैसे वाटणार्‍या अनेक पक्षांकडून लोकांनी पैसे घेतले, पण मत मात्र आपल्याला हवे त्यालाच मारले. मुळात पैसे व यासारखी इतर आमिषे दाखवून फार फार तर दहा टक्के मते वळवता येतात. आपने दिलेल्या मोफत वीज, पाण्याच्या आश्वासनांना गोमंतकीयांनी स्थान दिले नाही. ‘भंडारी मुख्यमंत्री, ख्रिश्चन उपमुख्यमंत्री’ याचाही प्रभाव पडला नाही. 

गोव्यात हे चित्र असले तरीही आपच्या आश्वासनांचा प्रभाव पंजाबमध्ये दिसून आला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाचे निर्विवाद कौतुक केलेच पाहिजे. त्यासाठी खलिस्तानवाद्यांचा पैसा वगैरे गालबोट लावण्याची आवश्यकता नाही. आपला पंजाबमध्ये मिळालेल्या यशाने ‘कुणीच सर्वकाळ अपराजित राहू शकत नाही’,  यासारख्या अनेक गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. बादल परिवाराला हरवणारे कुणी धनाढ्य, प्रस्थापित राजकारणी नाहीत. ही सामान्य माणसेच आहेत. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना काँग्रेस, अकाली दलातून फुटून बाहेर पडलेलेही आहेत. पण, त्यांच्यासकट इतरांना मिळालेले यश काँग्रेसबद्दल किती चीड होती याचेच द्योतक आहे. क्रिप्टो ख्रिश्चनांची वाढती संख्या, शिखांचे वाढते ख्रिस्तीकरण, बेरोजगारी, उत्पन्नाची अपुरी साधने, पांथिक अपमान या गोष्टी आपसाठी लाभदायक ठरल्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट पंजाबी लोकांच्या मानसिकतेची आहे. नवीन काही तरी करून बघण्याकडे पंजाबी लोकांचा कल असतो. त्यामुळे, आपला मिळालेल्या यशापेक्षाही त्यामुळे त्यांच्यावर आलेली जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे. 

पाचही राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचे चिंतन अपेक्षेप्रमाणे आणि पूर्वीप्रमाणेच झाले. गांधी परिवाराव्यतिरिक्त कुणीही अध्यक्ष निवडल्याने ही समस्या सुटेल, असे नाही. संघटना म्हणून काँग्रेस पक्ष संपल्यात जमा आहे. जे निवडून येत आहेत, ते स्वबळावर निवडून येत आहेत. किसान आंदोलन, महागाई, पेट्रोल दरवाढ यासारखे अनेक मुद्दे काँग्रेसला पद्धतशीरपणे हाताळता आले नाहीत. 

राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांनी पीच तयार केली होती. काँग्रेसला व्यवस्थित बॅटिंग करता आली नाही. याचा फायदा जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असणार्‍या आम आदमी पक्षाने उचलला. संपूर्ण देशात काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेली पोकळी आम आदमी पक्षाने भरून काढली तर नवल वाटायला नको.

यशस्वी पक्षाच्या सत्तास्थापनेनंतर, त्याच पक्षांतर्गत एक निराळी समांतर सत्ता व्यवस्था उभी राहते. ज्याचा फटका उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बसला व जागा कमी झाल्या आहेत. हीच कीड पूर्वी काँग्रेसला लागली होती व हळूहळू आम आदमी पक्षालाही लागेल. हीच कीड यशस्वी होण्याला अपयशापेक्षाही जास्त अपयशी करते. 

पाच राज्यांत पराभवानंतर काँग्रेसची बैठक  झाली. पराभव मान्य करून सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी यांनी पदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली. परंतु, इतर सदस्यांनी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला. पाचही प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागवण्यात आले. यावर गोविंद प्रसाद यांच्या ‘यह तीसरा पहर था’ या कवितासंग्रहातील कविता आठवली; 


राजा बोला- ‘रात है’ मंत्री बोला-‘रात है’ 

एक-एक कर फिर सभासदों की बारी आई 

उबासी किसी ने, किसी ने ली अँगड़ाई 

इसने, उसने-देखा-देखी फिर सबने बोला - ‘रात है...’ 


यह सुबह-सुबह की बात है...


यशानंतर आणि पराभवानंतर अशा प्रकारे त्याचे चिंतन होत असेल तर कुठल्याच पक्षाची घसरण थांबणार नाही. जी अवस्था आज काँग्रेसची आहे, तीच उद्या भाजपची, तर परवा आपची होऊ शकते. भ्रम आणि धुंदीत रात्र संपणारच नाही, पहाट उगवणार नाही, सकाळही होणार नाही.


७ टिप्पण्या:

  1. नेहमीच सखोल,व्यापक विचारांनी लिहिलेले आपले लेख वाचनीय असतात। चिंतनशील लेखनाचा हा वारसा वडिलांकडून आला असेल. लिहित राहा, किती वाचतात याचा करू नये।

    उत्तर द्याहटवा
  2. लेख उत्तम चिंतन करणारा..सखोल अभ्यास करून लेखन झालं आहे प्रसन्न जी

    उत्तर द्याहटवा
  3. आपले विचार योग्य पद्धतीने मांडले आहेत . थोड्याफार प्रमाणात जनताही विचार करू लागली आहे तरी पुढील काळात लोकप्रतिनिधी जनतेशी किती बांधील राहील यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
    प्रसाद जोशी

    उत्तर द्याहटवा
  4. कालाय तस्मै नमः।
    तुमचा लेख वास्तव आहे. अनेक समिकरणे या निवडणुकिने बदली. विशेषत: पैसा व जात याच्या उपयोगाने विजयी होऊ शकत नाही हे राजकिय पक्षांना व उमेदवारांना समजले हे समर्थ भारतासाठी आशादायी चित्र आहे.
    अभिनंदन व शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  5. अभ्यासपूर्ण लेख. वास्तव चित्र उभे केले आहे. मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे हे स्पष्ट झाले आहे. लेखात सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही चिंतन करावे लागेल हे अगदी बरोबर आणि खरे आहे. असाच लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  6. लेख छान विचारीक आहे .कारण लोकांना पैशाचं आमिष जरी दाखवलं तरी ते फक्त निवडणूकीपूरत असत .मग हे आमदार जनतेला विसरतात .हे जाणून जनता कौल देते .

    उत्तर द्याहटवा