बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

स्वातंत्र्य, संकेत आणि गृहीतकांचा शंकासूर

अमर्याद स्वातंत्र्य, संकेतांना झुगारण्यातला विद्रोह आणि याचा पेरलेल्या गृहीतकांनी घेतलेला फायदा आपल्या समाजाला खोल गर्तेत घेऊन जात आहे. एखादा संकेत नाकारताना, तो संकेत नेमका कशासाठी रूढ झाला याचा विचार होत नाही. आपल्या डोक्यातून कुठल्याही गोष्टीचे हे तयार नॅरेटिव्ह काढून  टाकून प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे.



-------------

अमर्याद स्वातंत्र्य, संकेतांना झुगारण्यातला विद्रोह आणि याचा पेरलेल्या गृहीतकांनी घेतलेला फायदा आपल्या समाजाला खोल गर्तेत घेऊन जात आहे. एखादा संकेत नाकारताना, तो संकेत नेमका कशासाठी रूढ झाला याचा विचार होत नाही. आपल्या डोक्यातून कुठल्याही गोष्टीचे हे तयार नॅरेटिव्ह काढून  टाकून प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे.

-------------


आपल्या समाजामध्ये अनेक गृहीतके किंवा नॅरेटिव्ह मुद्दाम पेरून ठेवण्यात आली आहेत. घडणार्‍या कुठल्याही घटनेला कुठल्यातरी एका गृहीतकाच्या सदरात कोंबायचं आणि त्या घटनेच्या बातमीची लांबी रुंदीही त्याच गृहीतकाच्या फूटपट्टीत मोजायची, हा खेळ अविरत चालू आहे. 

पुरुष कायम स्त्रीवर अन्याय करतात, स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो, बहुसंख्य कायम अल्पसंख्याकांवर अत्याचार करतात, विज्ञान मानत असाल देव मानणे चुकीचे, माझे स्वातंत्र्य हा माझा अनिर्बंध अधिकार आहे, अशी अनेक गृहीतके आहेत. या शिवाय समता, समानता, स्वातंत्र्य, पुरुषप्रधान संस्कृती, घटनात्मक अधिकार ही गृहीतके आहेतच. बरे ही असण्याबद्दलही काही नाही, त्यांचा वापर नकारात्मक गोष्टीतच आपण बहुतांशी करतो. याचा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही.

स्वातंत्र्य, समता आणि समानता यांचा वापर पारतंत्र्य, विषमता आणि असमानता अधिकाधिक दृढ करण्यासाठी करतो. तोंडात कायम समतेच्या गप्पा मारणार्‍यांच्या घरात पाहुण्यांसाठी चहाचे कपही जात, समाज यांच्या वर्गवारीप्रमाणे असतात. आपल्याला नोकरी आरक्षणातून मिळाली, आपला सामाजिक व आर्थिक स्तर सुधारला, आपल्या मुलांनी उत्तम दर्जाचे शिक्षण, उच्च शिक्षण घेतले की, मग त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळवून दिला जातो. मुलाला, मुलीला, जावयाला आणि येणार्‍या सुनेलाही याच आरक्षणातून नोकरी दिली की, सामाजिक विषमता कशी खोल रुतली आहे, अजूनही आमच्या समाजावर कसा अन्याय केला जात आहे याविषयी चर्चा करायला ‘क्रीमी लेयरम’धील माणसे हिरिरीने पुढे सरसावतात. ज्याला खरोखरच मदतीची आवश्यकता आहे, अशी माणसे वंचितच राहतात. एक विशिष्ट सामाजिक आर्थिक स्तर प्राप्त झाल्यानंतर आपण घेतलेला लाभ आपल्याप्रमाणेच इतर वंचितांना मिळावा यासाठी सुविधा व लाभ यांचा त्याग केला जात नाही. 

त्रास सहन करून, प्रचंड अभ्यास करून जनरल कॅटगरीमधून अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुलीवर एकाने  आमच्याकडे लेख लिहिला होता. त्या मुलीने उच्च शिक्षणासाठी प्रवेशही आपल्या गुणांच्या आधारेच मिळवला होता. आरक्षणाच्या नावाखाली गुणवत्तेत दिली जाणारी सवलत तिने घेतली नव्हती. ही गोष्ट लेखकाने तिच्याविषयीची माहिती देताना सांगितली. या महत्त्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख लेखात का नाही, असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, पुढे तिला तिच्या समाजाच्या संघटनेचा रोष पत्करावा लागेल, आणखी समस्या निर्माण होईल, म्हणून मुद्दाम नाही केला. 

समानतेच्या गृहीतकाने तर प्रचंड गोंधळ माजवला आहे. समानतेचा वापर हत्यारासारखा केला जात आहे. समानता असावी की नसावी हा वेगळा मुद्दा. पण, प्रत्येक गोष्टीत समानतेला पुढे करू लागलो तर आपण असमानतेलाच खतपाणी घातल्यासारखे होते. शबरीमलाच्या अय्यप्पाच्या देवळात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य असणे यामागे स्त्री-पुरुष समानतेची पायमल्ली किंवा मासिक पाळीमुळे स्त्रीला अपवित्र समजणे हे कारण नव्हतेच. अय्यप्पाच्या अनेक मंदिरांपैकी शबरीमलाच्या एका देवस्थानात नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत केले जाते. त्यासाठी स्त्रियांना तिथे प्रवेश निषिद्ध आहे. अशी अनेक देवळे आहेत, जिथे पुरुषांना प्रवेश वर्ज्य आहे. म्हणजे त्या देवळात पुरुष अपवित्र समजले जातात की, तिथल्या देवस्थानांना समानतेची पायमल्ली करायची असते? देवळात देवासाठी जायचे की, स्त्रीपुरुष समानतेच्या रक्षणासाठी जायचे? स्त्री पुरुष असा भेदभाव, अयप्पाच्या झाडून सर्व देवस्थानांमध्ये केला जात असता, तर निश्चितच त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक होते.

आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार ज्येष्ठ पुत्राला आपल्याकडील शास्त्राने दिला आहे. मुलींच्यासाठी तो निषिद्ध (करू नये असे) नाही. मग, मुलींनी अंत्यसंस्कार करू नये असा संकेत का रूढ झाला असावा? सामान्यत: स्त्री पुरुषापेक्षा अधिक हळवी, भावनाप्रधान, नात्याला महत्त्व देणारी असते. कुटुंबातील व्यक्ती जाण्याचा जेवढा परिणाम पुरुषावर होतो त्यापेक्षा कैक पटीने अधिक आघात स्त्रीवर होतो. आपल्याही परिचयाच्या घरात एखादी व्यक्ती गेल्यास, अनेकदा घरातील महिलेसाठी डॉक्टरांना पाचारण करावे लागते. आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, पुत्र, कन्या या रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांतील व्यक्तीत स्त्री गुरफटलेली असते. एखाद्या व्यक्तीत आपण जेवढे जास्त गुंतलेलो असतो, तेवढीच जास्त आपली सालपटं त्या व्यक्तीपासून दुरावताना निघतात. मला माझ्या आईला अग्नी देताना आणि तिच्या अस्थी गोळा करताना, जे काही झालं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. पण, तसा त्रास मला वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी झाला नाही. स्त्रीला अंत्यसंस्कार करायला न देण्यामागे तिला हा त्रास होऊ नये हा विचार आहे की, तिला दुय्यम लेखण्याचा विचार आहे? हा स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार डावलण्याचा प्रकार आहे का? उलट एका घरात मुलगा व मुलगी यामध्ये मुलगा हळवा असेल आणि गेलेल्या व्यक्तीत जास्त गुंतलेला असेल, तर मुलाऐवजी मुलीने अंत्यसंस्कार करणेच अधिक योग्य होईल. एक दोन दिवसांच्या फरकाने ‘कपाळमोक्ष’ करण्याचा विचित्र योगायोग जुळवून आणणार्‍या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत एका मुलीने आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले आणि दुसर्‍या घटनेत मालमत्तेच्या भांडणातून एका मुलीने आपल्या वडिलांच्या डोक्यात रॉड घालून त्यांचा खून केला (तसा संशय व आरोप आहे). स्त्री पुरुष समानतेच्या कोंदणात काय काय बसवायचे?

मुलगा दारू पितो, ड्रग्ज घेतो, रात्रीच्या पार्ट्या करतो, मग मुलीने काय घोडे मारले आहे? त्याला अडवले जात नाही, मग मुलीलाच का अडवले जाते, हा घातक विचार तर या स्त्री-पुरुष समानतेच्या आणि स्त्रीला दुय्यम लेखले जाते या गृहीतकांना यत्र, तत्र, सर्वत्र लावल्याने निर्माण झालेली समस्या आहे. व्यसन मुलानेही करू नये आणि मुलीनेही करू नये. पण, स्त्रीपुरुष समानतेच्या आडोशाने व्यसनाचे समर्थन कसे करता येईल? तसेही स्त्री पुरुष समानता हा स्त्री आणि पुरुषांनी जपण्याचा प्रकार नाही. व्यवस्थेने, कायद्याने, कुटुंबातील कर्ता किंवा कर्ती यांनी लिंगनिरपेक्ष राहणे अपेक्षित आहे. स्त्री-पुरुष समानतेला आपण कुटुंबातही आणून बसवल्यामुळे आजकाल आईबाप ‘मुलीलाही मुलाप्रमाणे वाढवतात’. म्हणजे नक्की काय करतात त्यांनाच माहीत. पण, या गृहीतकाच्या अट्टहासापायी स्त्री म्हणून तिच्या सहज, सुलभ, नैसर्गिक भावना, तिचे विचार, तिचं स्त्रीत्व यापासून आपण तिची फारकत करत आहोत. या गृहीतकापायी स्त्री पुरुषाशी आणि पुरुष स्त्रीशी स्पर्धा व संघर्ष करत आहे. वास्तविक या दोघांनी एकमेकांना पूरक असणे अपेक्षित आहे. पण, दोघेही स्वतंत्र आणि एकमेकांच्या विरुद्ध.

स्वातंत्र्य हा तर फारच बोकाळलेला आणि चिघळलेला विषय आहे. आपण आपल्या घरात कसे वागावे, काय खावे, कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला निश्चितच आहे. पण, समाजामध्ये वावरताना कपड्यांविषयी असलेल्या सामाजिक संकेतांचे पालन केले पाहिजे. किमान जे झाकायचे ते तरी झाकले पाहिजे. हिजाब घालण्याच्या स्वातंत्र्यासाठी बुर्का, नकाब घालून आंदोलने करणे, दगडफेक करणे आणि हत्या करणे हा स्वातंत्र्याचा अतिरेकच झाला. गणवेष हा संकेत आहे. तो पाळलाच पाहिजे. आम्ही कुठल्याही नियमांचे पालन करणार नाही, संकेत पाळणार नाही, हे स्वातंत्र्य नव्हे. स्वतंत्र देशात स्वातंत्र्याची मागणी करणे हे स्वातंत्र्य नव्हे. ही स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार यांच्या नावाखाली केलेली पारतंत्र्याची बेगमी आहे. स्वातंत्र्य हा अधिकार नाही, ती जबाबदारी आहे! 

स्त्री आणि पुरुष हे असमानच आहेत, हे सत्य असल्यानंतर त्यांच्या समन्वयासाठी प्रयत्न करायचा की, समानतेसाठी? कर्त्या पुरुषाच्या दबावाखाली फक्त स्त्रीच भरडली जाते, त्या कुटुंबातला अन्य पुरुष भरडला जात नाही? पुरुषप्रधान ही व्यवस्था आहे, संस्कृती नव्हे. आपली संस्कृती मूल्यप्रधान संस्कृती आहे.

आपल्याकडे अभ्यास कसा करावा, याचे उत्तम मार्गदर्शन पूर्वी केले जायचे. निरुक्त  किंवा निर्वचन (निश्चय, पूर्ण विचार करून सांगणे) येथे पोहोचण्याआधी विषय, शंका, पूर्वपक्ष, पूर्वपक्षाचे खंडन करणे आवश्यक होते. आता फक्त गृहीतके (नॅरेटिव्ह) समोर ठेवली जातात. संबंध असो किंवा नसो, प्रत्येक गोष्ट त्या नॅरेटिव्हला जोडली जाते. प्रत्येक गोष्ट सुटी, वेगळी करून स्वतंत्रपणे त्याचा विचार होत नाही. त्याऐवजी तयार गृहीतक (नॅरेटिव्ह‌) वापरले जाते. त्यामुळे, एका बाजूने कुठलेही काम हलके (दुय्यम) नसते असे म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूने त्याच कामाच्या विभागणीतून स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो म्हणून ओरडही करायची. एखादी स्त्री घर सांभाळत असेल तर तिचा दर्जा दुय्यम कसा? एकाच पद्धतीने भारतातही आंदोलन होते आणि कॅनडातही होते. पण, नॅरेटिव्ह अशा पद्धतीने राबवला जातो की, भारत सरकार दोषी आणि कॅनडा सरकारचा निर्णय योग्य. 

प्रत्येक संकेत झुगारून देत संघर्ष करत राहणे हा गृहीतके पेरण्यामागचा मूळ उद्देश आहे. जिथे समन्वय आवश्यक आहे तिथे आपण संघर्ष करत आहोत. एक संपला की, दुसरा संघर्ष. कायम प्रश्न, कायम संघर्ष. संघर्षाचा मुद्दा सोडवणे सरकारला अपरिहार्य असते. आता तर या संघर्षातून झालेले सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सरकार वसूलही करू शकत नाही. सांस्कृतिक, ऐतिहासिक मुद्द्यांना उत्तरे दिली की, नवे प्रश्न तयार केले जातात. आधी उपस्थित केलेला प्रश्न किंवा मुद्दा चुकीचा होता हे मान्य करण्याचे सौजन्यही दाखवले जात नाही. गृहीतक पसरवणार्‍यांना उत्तरे नकोच असतात, फक्त प्रश्न उपस्थित करत राहणे, हेच जीवितकार्य असते. कायम उत्तरे देत बसा किंवा गृहीतक मान्य करा हे दोनच पर्याय गृहीतकांचा शंकासूर समोर ठेवतो. कायम संघर्ष, समन्वय नाही व नकोच.  गृहीतकांच्या या शंकासुराने तेच दिले आहे, ज्याविरुद्ध ही गृहीतके उभी असल्याचे नाटक करत आहेत. तीही संकेत, संस्कृती नष्ट करून! 

३ टिप्पण्या:

  1. स्वतंत्र देशात स्वातंत्र्याची मागणी करणे हे स्वातंत्र्य नव्हे.हे शंभर टक्के सत्य आणि कटू वास्तव आहे.केवळ विरोधासाठी विरोध करणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे.स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीची जाणीव ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून सारासार विचाराअंती समन्वय साधणे होय. असे झाल्यास देशातील बऱ्याच समस्या चुटकीसरशी
    सुटतील आणि देश प्रगतीचे शिखर सहज गाठू शकेल.
    लेख उत्तम, वाचनीय , एकांगी दृष्टिकोनातून भरकटत चाललेल्या समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेवणारा आहे

    उत्तर द्याहटवा
  2. आपले विचार चिंतनीय आहेत, मुद्देसूद आहेत, पण असा व्यापक व सखोल विचार केला जात नसल्यामुळे गुंता निर्माण होतो, ही वस्तुस्थिती आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. आपली कुठलाही विचार मांडण्याची पद्धत उत्कृष्ट आहे, आणि नेरेटीव बद्दल सांगायच झाल तर ही खोलवर झालेली पेरणी मुळासकट हुमटून काढायला अजुन वेळ लागेल

    उत्तर द्याहटवा