सहज भरता आली असती, अशा जखमेचे आता गँगरीन झाले आहे. आरोग्यमंत्री आणि डॉक्टर या दोघांनीही याला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवले आहे. वास्तविक दोघांनीही सेवेत, व्यवस्थेत सुधारणा घडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सुट्टीच्या दिवशी, रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ओपीडी बंद असते तेव्हा नियमित उपचार घेण्याची व्यवस्था कुठे करावी? अशा उपलब्ध असलेल्या सेवेची माहिती कशी द्यावी, याकडे लक्ष देणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा अशीच स्थिती उद्भवल्यास काय करावे, याचे उत्तर कुणाचकडे नसेल.
आता ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करा अशी मागणी डॉक्टर करत आहेत. पण, जीएमसीमध्ये ओळख असल्याशिवाय तातडीने काम होत नाही, लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. ओपीडीसमोर रुग्ण रांगेत उभे असताना थेट ‘आत’ घेऊन जाणार्यांना किती डॉक्टर जाब विचारतात? अडलेला, अडवलेला माणूस कुठून तरी ओळख काढून आपले काम करून घेतो, हाही नेहमीचा अनुभव आहे.
जोडरस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वाहन घेताना किंवा थांबलेल्या वाहतुकीत वाहन सर्वांत पुढे नेण्यासाठी जी घाई काही वाहनचालक करतात, ती पुढे मार्गक्रमण करताना किंवा वाहतूक सुरळीत झाल्यावर दिसत नाही. पुढे घाई करणारा वाहन सावकाशच हाकत असतो. अनेकदा नेमका हाच प्रकार ओपीडीबाहेर घडतो. रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती घाई करते, पुढे पुढे जाते आणि तपासून घेऊन बाहेर येते. जरा पुढे गेल्यावर सोबतची व्यक्ती एक वाक्य बोलते, ‘पळयले मरे, फुडे सल्लो म्हणोन बेग्यान जालें. लायनीन, फाटी रावल्लो जाल्यार दनपार जावपाची आमकां’. याच वृत्तीची माणसे खासगी रुग्णालयात जातात तेव्हा तिथल्या बाकड्यांवर शांत बसलेली असतात. जेव्हा सिस्टर किंवा मदतनीस नाव पुकारतात तेव्हाच डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जातात.
असे अनेक पत्रकार, कार्यकर्ते आहेत, ज्यांनी स्वत:ची ओळख वापरून रात्रीच्या दोन तीन वाजता अनेक रुग्णांना मदत केली आहे. मग ते त्यांचे नातलग असतील किंवा नसतील. ओळख वापरणे हा एक भाग झाला, कसलीही ओळख नसताना केवळ माणुसकी म्हणून अपरात्री; एक्स रे काढायला, सिटिस्कॅन करायला रुग्णासोबत त्याला घेऊन जाणारे, रात्रभर थांबणारे पत्रकार, कार्यकर्ते पाहिले आहेत. त्यांना कुणीही कसलेही पदक देत नाही, नंतर ओळखही दाखवीत नाहीत. उलट, ‘तेका खाजा असा रे हें नाका जाल्लें करपाची’ ही स्तुती ऐकायला मिळते. प्रश्न इथे मदत करतात किंवा वजन वापरतात त्याचा नाही; असे करावे लागते याचा आहे. ‘फावोर लावचो पड्टा’ ही स्थिती आणि मानसिकता खरे तर बंद झाली पाहिजे.
फारशी आवश्यकता नसताना, केवळ मोठेपणा, रुबाब दाखवण्यासाठी केलेला व खपवून घेतलेला गैरवापर म्हणजे ‘व्हीआयपी कल्चर’. सर्वांसाठी असलेल्या नियमांना काहींसाठी वाकवणे म्हणजे ‘व्हीआयपी कल्चर’. किती डॉक्टरांनी, अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी त्याला प्रत्यक्षात विरोध केला आहे? प्रश्न नोकरीचा असतो, तेव्हा अपवाद म्हणून का होईना, पण हे खपवून घेतले जाते.
रुग्णसेवा, शिस्तपालन यासाठी खासगी रुग्णालयात मनुष्यबळ वापरले जाते, तसे सार्वजनिक रुग्णालायत वापरले जात नाही. त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न झाले पाहिजेत. सार्वजनिक सेवेबद्दल बहुतांश लोकांची मानसिकता गैरवापर, ओरबाडणे, वाट्टेल तसे वापरणे अशी असते. कमी पैशात किंवा किंमत न मोजता मिळालेल्या सेवेचे मूल्य राहत नाही, देणार्याला व घेणार्यालाही!
चित्रस्रोत : आंतर्जाल
सोमवार, ९ जून, २०२५
‘व्हीयापी कल्चर’ म्हणजे नेमके काय?
रविवार, ८ जून, २०२५
आरोग्यमंत्री, सीएमओ व समस्या
सीएमओ डॉक्टरांचे चुकले की, आरोग्यमंत्र्यांचे चुकले यावर दोन्ही बाजूंनी बोलले जाते. कारण त्या घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा पूर्वग्रह, अनुभव व दृष्टिकोन असतो. पण, त्यामुळे मूळ समस्या जशीच्या तशीच राहते. त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
डॉक्टरांची बाजू प्रत्यक्ष त्यांच्याकडून बहुधा समोर आली नाही किंवा त्यांनी ती मांडली नसावी. जे काही समोर येतेय ते एकांगी येत आहे. आता तो ‘तपासाचा भाग’ म्हणून त्यावर तिथे काम करणारे बोलणार नाहीत. इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या त्या महिलेशी डॉक्टर उद्धटपणेच बोलले हे आरोग्यमंत्र्यांनी पूर्णपणे गृहीत धरले व डॉक्टरांना निलंबित करून मोकळे झाले. त्यांची बाजूही त्यांनी विचारली नाही. ती जर त्यांनी प्रोटोकोलप्रमाणे चौकशीत मांडायची तर मग निलंबनही प्रोटोकॉलप्रमाणे झाले पाहिजे होते.
आरोग्यमंत्र्यांनी आपण ज्या पद्धतीने बोललो ते चुकीचे होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. रागाच्या भरात असे होणेही स्वाभाविक आहे. ते चुकीचे नाही. पण, ज्या पद्धतीने हे घडले, तेही चुकीचेच आहे. कारवाई ज्या पद्धतीने झाली ती पद्धत योग्य म्हणायची झाल्यास अर्ध्यापेक्षा जास्त जीएमसी रिकामी होईल. प्रत्येक दिवशी कुठल्याही ओपीडीच्या बाहेर सेक्युरिटी गार्ड ज्या तर्हेने रुग्णांवर, त्यांच्या नातेवाइकांवर ओरडतात, ते पाहता त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई आरोग्यमंत्र्यांनी केली तर कुणीच तिथे उरणार नाही. पण, ते दारावर उभे असलेले तसे का वागतात, याचाही विचार होणे आवश्यक आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक जी गर्दी करतात, पुढे पुढे जाऊन हुज्जत घालतात, बेशिस्त वागतात, त्याचे काय करायचे? ओरडणे दिसते, पण अनेकवेळा सांगूनही अन्य पर्यायच उरत नाही तेव्हा काय?
कुठली सेवा कुठे दिली जावी, याचे काही ठरावीक ठोकताळे आहेत. कॅज्युअलिटीमध्ये जीवनमरणाचा प्रश्न असतो तेव्हा सेवा दिली जाते. तेच अपेक्षितही आहे. एखाद्या रुग्णाला या विभागात तातडीने सेवा द्यायची की, नाही हे डॉक्टरांनी ठरवायचे आहे. नियमित औषधोपचार घेणारा एखादा रुग्ण आला तर त्याला सेवा द्यायची की नाही? नियमाप्रमाणे नाही. पण, वृद्ध महिलेस इंजेक्शन दिले असते तर असे अनेक रुग्ण ‘तेका दिलें म्हाका कशें ना?’, असे विचारत घुसू लागतील. प्रोटोकॉलप्रमाणे कॅज्युअलिटीमध्ये व्हिडिओ शूटिंगही करता येत नाही. तसे तिथे लिहूनही लावलेले आहे. तरीही आरोग्यमंत्र्यांनी ते होऊ दिले व व्हायरलही होऊ दिले. आता एखादा पत्रकार कुणी तिथे जाऊन व्हिडिओ शूटिंग करू लागला व सेक्युरिटीने अडवले; तर ‘आरोग्यमंत्र्यांचे व्हिडिओ शूटिंग चालते, आमचे चालत नाही?’, असे त्याने विचारले तर?
आता खरी भीती व्यक्त करतो. समजा आता कुठल्याही वृद्ध रुग्णास त्रास झाला, डॉक्टर त्याच्यावर रागावले किंवा त्याला इतरत्र जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला, तर तो थेट आरोग्यमंत्र्यांना कळवेल. थेट निलंबन. आरोग्यमंत्र्यांची ओळख असण्याची भीती घालून रुग्णही गैरफायदा घेऊ लागतील, त्याचे काय? प्रश्न राहतो तो डॉक्टर उद्धटपणे बोलले, वागले की नाही याचा! त्या वृद्ध महिलेच्या व्हिडिओत डॉक्टर उद्धटपणे वागल्याचा, बोलल्याचा उल्लेख नाही. ‘उद्धटपणे बोलल्याने, वागल्याने निलंबन’ हाच निकष असेल तर तो आरोग्यमंत्र्यांना लागू होत नाही का? डॉक्टर चुकले, आरोग्यमंत्री चुकले की, त्या रुग्ण महिलेचे थेट आरोग्यमंत्र्यांशीच संपर्क साधणे चुकले, यापेक्षाही माणसासाठी असलेले नियम पाळताना, त्यावर व्यक्त होताना समतोल व संयम पाळला जात नाही, हे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक व्यवस्थेचे काही नियम असतात. ते नियम कशा पद्धतीने वापरले जातात व त्याला काय, कुठे व कसे अपवाद मान्य आहेत आणि जेव्हा त्या व्यवस्थेचा थेट संबंध दररोज, दर क्षणी माणसांशी येतो तेव्हा त्या नियमांचे काय करायचे यावर विचार झाला पाहिजे. खरी समस्या इथे आहे. त्याकडे तटस्थपणे पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक घटना सुटी सुटी व स्वतंत्रपणे अभ्यासली गेली पाहिजे.

