लिबिया लोबो यांनी ‘विव्हा पोर्तुगाल’ किंवा ‘लाँग लिव्ह पोर्तुगाल’ म्हणण्यात गैर काय, असा प्रश्न विचारला त्यात काही चुकीचे नाही. त्या स्वातंत्र्यसैनिक आहेत, त्यांनी पोर्तुगिजांविरुद्ध दिलेला लढा, देशप्रेम, गोवाप्रेम याविषयी शंका घेण्याचेही काहीच कारण नाही. उलट तसे करणे चुकीचेच ठरेल. मग, आक्षेपाचा मुद्दा कुठला व का? त्यांनी ‘पोर्तुगालविरुद्ध नाही लढलो, हुकूमशाहीविरुद्ध लढलो’ असे म्हणणे चुकीचे व तर्कदुष्ट आहे. त्या असे म्हणाल्या? त्यामागे सांस्कृतिक विस्तारवादाची मोठी पार्श्वभूमी व कार्यपद्धती आहे, ती समजून घेतली पाहिजे.
अब्रह्मिक पंथातील ख्रिश्चनिटी व इस्लामचा सांस्कृतिक विस्तार तलवारीच्या व राजसत्तेच्या जोरावर झाला. जिथे सत्तेने विस्तार करणे शक्य नव्हते तिथे तो ‘सेवा’ व ‘शांतता’ या लेबलखाली पसरवला गेला. जगभरात ज्या ज्या मूर्तिपूजक संस्कृती ख्रिश्चनिटीने संपवल्या त्या त्या सगळ्या याच मार्गाने संपवल्या आहेत. नंतरच्या काळात जेव्हा त्याचा इतिहास लिहिला गेला तेव्हा मूर्ती, देवळे फोडण्याचे व संस्कृती नष्ट करण्याचे खापर सत्तेवर, वसाहतवादी देशावर फोडण्यात आले; ते पाप कधीच चर्चने आपल्या माथी घेतले नाही. मिशनर्यांनी स्थानिक संस्कृतीतील प्रथांना ’अंधश्रद्धा’ किंवा ’सैतानी’ ठरवून त्या बंद पाडल्या. त्या दुष्कर्मांचे, छळवणूकीचे व नरसंहाराचे पाप चर्चने कधीच आपल्या माथी घेतले नाही; ते कायम सत्तेच्या व वसाहती करणार्या देशांच्या माथी मारले. ख्रिश्चनिटी व चर्च कायम ‘पवित्र’ राहिली व ‘मध्ययुगात तसेच सर्वत्र घडत होते’ असे सांगून राजा, देश व सरकारेही काही प्रमाणात पवित्र करण्यात आली. पवित्र करण्याचीच पुढची पायरी म्हणजे देशावरचे खापर हुकूमशाहीवर फोडण्यास सुरुवात केली. त्याचा दुहेरी फायदा होता; एक म्हणजे (गोव्याच्याच उदाहरणावरून सांगायचे तर) पोर्तुगाल सत्तेने केलेले अन्याय पातळ झाले आणि आता जे आपल्या विचारधारेविरुद्धचे लोक सत्तेत आहेत, त्यांना ‘हुकूमशहा’ ठरवून त्यांच्याविरुद्ध दंड थोपटण्याचे पवित्र कार्यही सोपे झाले. एकदा लढाई हुकूमशाहीविरुद्ध आहे, असे म्हटले की मग पारतंत्र्यात अत्याचार करणारा सालाझार काय आणि स्वतंत्र भारतात लोकांनी निवडून दिलेले मोदी काय, दोघेही सारखेच. ‘स्वातंत्र्यसैनिक’ असण्याचे कवच असल्याने दोघांविरुद्धचा लढा समर्थनीय ठरतो.
जिथे ख्रिश्चनिटी पसरली व पूर्णपणे किंवा ख्रिश्चनबहुल झाले, ते देश त्यांची संस्कृती संपवणार्या देशांच्याच पाठीशी उभे राहिले. जिथे पूर्णपणे यश मिळाले ते देश आज जरी लोकशाही, पुरोगामी असले तरी ख्रिश्चन संस्कृतीच भिनलेली आहे. तेथील कायद्यांतही ख्रिश्चन संस्कृतीची मूल्येच आढळतात. इतकेच नव्हे तर त्यांची सांस्कृतिक नाळ त्या वसाहतवादी देशांशीच कायम राहिली. इतकी, की ते स्वत:ची संस्कृती संपवण्यासाठी केलेले नृशंस अत्याचार, नरसंहार पूर्णपणे विसरून गेले. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा, सण सगळे सोडून देऊन ख्रिश्चन संस्कृतीतले सगळे सण, उत्सव साजरे करू लागले. वसाहतवादी देशांचे गुणगान करणे व त्यांच्या चिरायू होण्याची कामना करणे हे ‘पवित्र’ कार्य झाले. भारतात थोडी परिस्थिती वेगळी झाली. भारत पूर्णपणे ख्रिश्चन किंवा इस्लाम झाला नाही. पण, जे ख्रिश्चन झाले त्यांचा कल, आपुलकी वसाहतवादी देशांकडे राहिली. ‘हिस्पॅनिकां’प्रमाणे गोव्यातील बहुतांश ख्रिश्चन हे ‘ल्युसोफोनिक’ आहेत. त्यांचे तसे असण्याचे समर्थन करणारे थोर थोर विचारवंत ‘पोर्तुगिजांनी आम्हांला काय काय दिले’, अशी भूमिका मांडतात. त्यांनी आमच्यावर अत्याचार करूनही त्यांच्याकडे जे चांगले होते ते आम्ही स्वीकारले, हा आमचा मोठेपणा आहे, असे म्हणत नाहीत. हेच विचारवंत भारत हा सांस्कृतिक व आध्यात्मिकदृष्ट्या एकच देश होता, याकडे काणाडोळा करत आहेत किंवा देश असण्याच्या आधुनिक व्याखेनुसार ‘भारत हा देश नव्हताच’ असे म्हणणे रेटत आहेत.
’जेसुइट्स’, ’फ्रान्सिस्कन्स’ किंवा ’डोमिनिकन्स’ दिसायला वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी कॅथलिक चर्चच्या चौकटीतच येतात. त्यामुळे, त्यांना भौगोलिक मर्यादा नाहीत. ‘भारताची राज्यघटना आणि कुराण यांच्यात निवड करायची झाली, तर आम्ही कुराणचीच करू’, असे मुसलमान थेट म्हणतात, ख्रिश्चन म्हणत नाहीत, एवढाच काय तो फरक. म्हणूनच पोर्तुगाल असला काय किंवा भारत असला काय, तसा फारसा फरक पडत नाही. पूर्वजांवर झालेले माणुसकीशून्य अत्याचारही त्यांना ‘पवित्र’ करण्यासाठी व ‘येशूच्या मार्गावर आणण्यासाठी’ झालेले पुण्यकर्म वाटते.
आपल्या पूर्वजांवर अमानवीय अत्याचार झाले होते, याची जाणीव असलेल्या ख्रिश्चनांची बहुधा ही शेवटची पिढी असावी. आपली मूळ ओळख माहीत असलेल्यांची व किमान वर्षातून एकदा तरी ग्रामदेवतेला नारळ वाढवणार्या ख्रिश्चनांचीही ही कदाचित शेवटची पिढी असावी. त्यामुळे, लोबो जे म्हणाल्या त्यात गैर काहीच नाही. ते स्वाभाविक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा