साखळी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेत काही लोकांनी ‘आम्हांला आमचे पैसे परत मिळवून द्या’, असे साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी ‘पोलिसस्थानकात पूजा नाईकच्या विरोधात पुराव्यासह तक्रार नोंदवा’, असा सल्ला दिला. वरवर पाहता ही साधी घटना वाटते, पण विचार केल्यास समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्न पडतो.
पूजा नाईक प्रकरण सर्वांना ज्ञात झाले आहे. सरकारी नोकरी हवी म्हणून अनेकांनी पूजा नाईक या महिलेस कोट्यवधी रुपये दिले. जवळपास ६१३ अर्ज होते व एकूण १७ कोटीच्या आसपास लाच घेतली व ती तिने ‘वर’पर्यंत पोहोचवली. यात नोकरीची हमी देणारे दोन अधिकारी व एक मंत्री असल्याचे पूजाचे म्हणणे आहे. पूजा नाईक ही काही एकच अशी व्यक्ती नाही, असे अनेक जण आहेत, जे पैसे घेऊन नोकरी लावतात. नोकरीतील पद, पगार, स्थान व ‘वरकमाई’ यानुसार त्या पदासाठी ‘रेट’ ठरवले जातात. दिले जातात व घेतले जातात. अपवाद म्हणून हा भ्रष्टाचार होणे स्वाभाविक आहे. ‘सरकारी नोकरीसाठी पैसे द्यावे लागतात’, हा नियम म्हणून समाजाने स्वीकारला आहे, ही घातक गोष्ट आहे. ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही’ व तसे ते न देणारा अव्यावहारिक, मूर्ख हे आता जवळपास सर्वमान्य होत चालले आहे. ही मानसिकता स्वत:ची असते तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडण्याची, हळहळण्याची, अमक्याने-तमक्याने ‘पैसे खाल्ले’ म्हणून तक्रार करण्याचा तरी आपल्याला काय अधिकार उरतो?
मुख्यमंत्र्यांनी ‘जनता दरबारा’त अशी मागणी करणाऱ्यांना त्याच वेळेस आत टाकायला हवे होते. पण, तसे करणे राजकीयदृष्ट्या मारक ठरले असते; म्हणून कदाचित स्वत: आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुंठीवाचून खोकला जावा यासाठी पोलिसांत ‘पुराव्यासह’ तक्रार करण्याचा सल्ला दिला. पुराव्यासह तक्रार करणे याचाच अर्थ आपण लाच दिल्याचा पुरावा स्वत:च पोलिसांना देण्यासारखे झाले. वर्तमानपत्रांनी बातमी देताना ‘फसवणूक झालेले’, ‘फसलेले’, ‘पीडित’ अशी विशेषणे या सरकारी नोकरीसाठी पैसे दिलेल्या लोकांना वापरली आहेत. हे भ्रष्टाचाराचे सामान्यीकरण(नॉर्मलायझेशन) आहे. एका बाजूने ‘भ्रष्टाचार, भ्रष्टाचार’ म्हणून ओरडायचे आणि दुसऱ्या बाजूने अशी विशेषणे लावत त्याचेच समर्थनही करायचे.
सरकारी नोकरीकडे ‘गुंतवणूक’ म्हणून पाहिले जाते; केवळ नोकरी म्हणून नाही. अमुक एका पदासाठी किती पैसे देणे रास्त आहे, याचे हिशेबही लोक करतात. असे पैसे देऊन नोकरी लागली, की त्या दिलेल्या पैशांची वसुली सुरू होते. लोक जेव्हा आपले काम होत नाही, म्हणून सरकारी अधिकाऱ्यांस व प्रशासनास दोष देतात, तेव्हा ही आपणच रोवलेल्या व खतपाणी घालून वाढवलेल्या रोपाला आलेली फळे आहेत, हे लक्षांत घेत नाहीत. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, ही मानसिकताच नष्ट झाली पाहिजे. काम करण्यासाठी ‘टेबलावरून’ घेतलेला मोबदला म्हणजे पगार आणि तेच काम करण्यासाठी ‘टेबलाखालून’ घेतलेला मोबदला म्हणजे लाच, हे रूढ झाले आहे. ते स्वीकारायचे का, आणि कुठवर हे एकदा ठरवावे लागेल. ती दिशा देण्याचे काम करणारी वर्तमानपत्रे लाच देणाऱ्या लोकांस ‘शोषित’ ठरवू लागली आहेत, हेच दुर्दैव आहे.
वास्तविक, सामान्य लोक, एजंट, अधिकारी, राजकारणी, वृत्तपत्र माध्यमे यांना भ्रष्टाचार झालेलाच हवा. कुणालाही तो संपावा असे वाटत नाही. म्हणूनच तो संपवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यातून आपली राजकीय, सामाजिक, वैयक्तिक ‘सेटलमेंट’ करण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे, भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र कधी थांबतच नाही; त्यावर अनेकांचे रथ चालतात. भ्रष्टाचार कायम राहतो, फक्त माणसे आणि नावे बदलतात. एवढेच कशाला, काळाच्या ओघात भ्रष्टाचाराची व्याख्याही आम्ही लोकांनी बदलून टाकली आहे.
पैसे घेऊन काम करणे हा ‘शिष्टाचार’; तर पैसे घेऊनही काम न करणे हा ‘भ्रष्टाचार’ अशी व्याख्या रुजली आहे.

perfect analysis
उत्तर द्याहटवाकुथाचे चोचले पुरवले जात आहे कळत नाही. शोषित कुणाला म्हणावं, लांचखोर कोण सगळा झमेला आहे. छान लेख
उत्तर द्याहटवा