‘सतलज(सतलूज)’ सिनेमाला प्रमाणपत्र न देणे, निर्मात्यांनी ओटीटीवर तो प्रदर्शित करणे, नंतर सरकारच्या दबावामुळे तो तिथूनही काढून टाकणे या सार्या प्रक्रियेच्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी उमटत आहेत. दोन्ही बाजू खर्या आहेत, त्यामुळे त्याला आपसूक झुंडशाहीचे स्वरूप आले आहे. यात एक महत्त्वाचा प्रश्न विचारणे भाग आहे; दोन्ही बाजू खर्या आहेत, पण त्या योग्य आहेत का? आज ज्या उमटत आहेत, त्यामागची घटना १९९०-९५ या काळातील आहे; पण, त्यामागचा विमर्ष (नॅरेटिव्ह) व विमर्षामागचा विचार खूप आधीचा आहे. त्या विचाराचा विचार केल्याशिवाय आज प्रतिक्रिया व्यक्त करणे खूप घातक आहे.
शीख हा वैदिक/हिंदू परंपरेतलाच आध्यात्मिक पंथ आहे. सिक्ख म्हणजे शिष्य किंवा गुरुकडून शिकणारा. निराकार ब्रह्म (शुद्ध ऊर्जा किंवा जाणीव) ज्याचा साक्षात्कार प्रथम गुरु व संस्थापक गुरु नानक देव जी यांना झाला, ज्याला ते ‘अकाल पुरख’ (पुरुषसूक्तातील पुरुष) असे संबोधतात. गुरु नानक देवजींपासून ते गुरु अर्जुन देवजींपर्यंतच्या काळात शिखांसाठी कोणतीही बाह्य आचारसंहिता शीखांसाठी अनिवार्य नव्हती. ‘कृपाण’चा गुरु ग्रंथसाहिबातला अर्थही बहुतांश वेळा कृपा + आण = दयेची मर्यादा किंवा ’ज्ञानाची तलवार’ या आध्यात्मिक अर्थाने अधिक वापरण्यात आला आहे. पहिल्या पाच गुरूंनी शस्त्र उचलले नाही. पाचवे गुरु , गुरु अर्जुन देव जी यांची जहांगीरने अमानुष छळ करून नृशंस हत्या केली. त्यानंतर सहावे गुरु, गुरु हरगोविंद जी यांनी ‘मिरी’ व ‘पिरी’ या दोन तलवारी धारण केल्या व ‘अकाल’ ही सशस्त्र सेना उभारली. दहावे गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांनी केस, कंगा, कडा, कच्छा या चार ‘क’कारांसह कृपाण हे शस्त्रही अनिवार्य केले. त्यांनी शीख पंथाअंतर्गत ‘खालसा’ हा लष्करी व सामाजिक पंथ स्थापन केला.
केवळ हिंदू तत्त्वज्ञानाचेच नव्हे तर हिंदूंचेही रक्षण शीख गुरूंनी केले. त्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली.
(त्यांनी हिंदूंचा ’तिलक’ (टिळा) आणि ’जंजू’ (जानवे) वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. त्यांनी कलियुगात हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हे अत्यंत मोठे कार्य केले.)
अमृतसरमधील हरमंदिर साहिब किंवा श्री दरबार साहिब (आताचे सुवर्ण मंदिर) संकुलात प्रभू राम, माता सीता, आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती व चित्रे प्रस्थापित होती.
सामान्य शीख आणि हिंदू बांधव एकत्र येऊन तिथे दर्शन घेत असत. त्यांच्यात ’शीख आणि हिंदू वेगळे आहेत’ अशी कोणतीही भावना नव्हती. पंजाबमधील हिंदू कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राला शीख बनवण्याची प्रथा होती.
१८६९साली ब्रिटिश सरकारने डॉ. अर्नेस्ट ट्रम्प नावाच्या एका ख्रिश्चन मिशनरिला (इतिहासाच्या पुस्तकांत याचा उल्लेख प्राच्यविद्या पंडित, भाषाशास्त्रज्ञ असा केला जातो), शीखांचे तत्त्वज्ञान हिंदूंच्या वेद आणि उपनिषदांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, हे ग्रंथ साहिबच्या आधारे सिद्ध करण्यासाठी पाठवले.
परंतु, ट्रम्पची भाषा अत्यंत अपमानकारक होती आणि त्याचे भाषांतर चुकीचे ठरल्यामुळे शीख विद्वानांनी त्याला नाकारले. त्यानंतर ब्रिटिशांनी याच कामासाठी मॅक्स आर्थर मॅकॉलिफ या एका आयरीश-ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी मॅकॉलिफची नेमणूक केली. त्याने ‘शीख हिंदू नाहीत’ हा विचार अत्यंत पद्धतशीरपणे आणि गोड भाषेत पेरला. मॅकॉलिफने १९०९साली ‘द शीख रिलिजन : इट्स गुरुज, सेक्रेड राइटिंग्ज अँड ऑथर्स’ नावाचा ग्रंथ सहा खंडांमध्ये प्रकाशित केला. या कामात त्याला मदत करणारा शीख विद्वान भाई काहन सिंग नाभा याने १८९८साली ’हम हिंदू नहीं’ हे पुस्तक लिहिले होते. मॅकॉलिफने जे वैचारिक विष पेरले त्याने पंजाबचे आणि हिंदू-शीख संबंधांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले व अनेक विमर्षांना जन्म दिला.
१९०५साली ‘सिंह सभा’ चळवळीदरम्यान तत् खालसा हा लाहोर सिंह सभेचा गट हरिमंदिरातील (सुवर्णमंदिर) मूर्ती हटवण्यासाठी आग्रही झाला. त्यांनी सुवर्ण मंदिर संकुलातून प्रभू रामाच्या आणि इतर हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बाहेर काढल्या. ‘सनातन शीख’ या गटाने विरोध केला. यात गुरु नानक देवजींचे थेट वंशज असलेले बाबा खेम सिंग बेदी, महाराज अवतार सिंग आणि अमृतसर सिंह सभेचे अनेक पारंपरिक विद्वान होते. त्यांचे स्पष्ट म्हणणे होते की, शीख धर्म हा हिंदू सनातन परंपरेचाच एक भाग आहे. पण, असे असूनही मूर्ती हटवल्या गेल्या व शीख हिंदू नाहीत हा विचार कृतीत येऊ लागला.
’तत् खालसा’च्या चळवळीतूनच १९२०च्या दशकात ’शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ आणि ’शिरोमणी अकाली दल’ या संस्थांचा जन्म झाला. पुढे जाऊन १९७३साली अकाली दलाने ’आनंदपूर साहिब ठराव’ मंजूर केला, ज्यामध्ये पंजाबला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करण्यात आली. ८०च्या दशकात याच आनंदपूर साहिब ठरावाचे रूपांतर जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत हिंसक आणि उग्र अशा ’खलिस्तान चळवळीत’ झाले. ’तत् खालसा’ हा पाया होता आणि ’खलिस्तान’ हा त्याचा अतिरेकी परिणाम आहे.
पंजाबमध्ये १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदूंना केवळ ‘हिंदू आहेत’ या एकाच कारणासाठी खालिस्तानी शीख दहशतवादी मारू लागले. हिंदूंचा हा नरसंहार ९०च्या दशकापर्यंत सुरू राहिला. या काळात हजारो हिंदू कुटुंबांना आपली घरेदार सोडून दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात निर्वासित म्हणून आश्रय घ्यावा लागला. खलिस्तानी शीख दहशतवाद्यांनी केवळ हिंदूंनाच नाही, तर शीख हे हिंदू धर्माचाच एक अविभाज्य भाग आहे, असे म्हणणार्या हजारो निरपराध शीखांच्या कत्तली केल्या. याचे वृत्तांकन करणार्या पत्रकारांना आणि दहशतवाद रोखणार्या पोलिसांनाही मारले होते. जोपर्यंत पाकिस्तानसारखा पंजाब हा वेगळा देश होण्याची पाळी आली नाही, तोपर्यंत (सुमारे वीस ते तीस वर्षे) भारत सरकार या नरसंहाराकडे काणाडोळा करत राहिले.
खालिस्तानची मागणी करणार्या भिंद्रनवालेंना ‘संत’ म्हणणारा, ती विचारधारा मानणार्या आणि ‘खालिस्तानी लिबरेशन मूव्हमेंट’ या नावाचे मासिक चालवणार्या जसवंत सिंह खालरा यांना ‘सतलज’ किंवा ‘सतलूज’ या चित्रपटात, केवळ ‘मानवी हक्क कार्यकर्ता’ दाखवण्यात आले आहे. खलिस्तानवादी दहशतवादाचा संपूर्ण बिमोड करणार्या गिल यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. खालरा यांनी केलेले संशोधन कुठल्या पद्धतीने केले हे कधीच जाहीर केले नाही. त्यामुळे, २५ हजार प्रेतांचा आकडा कसा काढला हे अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी यात दहशतवाद्यांसोबत अन्य सामान्य व्यक्तींना मारले नाही, असे म्हणता येत नाही. या चित्रपटावर बंदी आणण्याचा निर्णय चुकीचा होता. सरकारने जरी या चित्रपटावर बंदी आणली असली तरी पंजाबमधील प्रत्येक शीखापर्यंत तो पोहोचवण्याची व्यवस्था आधीच झाली आहे. बंदी आणून अधिक प्रसिद्धी दिल्याने हा चित्रपट खलिस्तानवादी चळवळीस पुन्हा रुजवेल यात शंका नाही. हिंदूंचा द्वेष सहन करणारा शीख समाज हळूहळू ‘हालेलुयिआ’ करीत बाप्तिस्मा घेऊ लागला आहे. शीखांच्या होणार्या या ख्रिस्तीकरणाची चिंता आता अकाल तख्तचे जत्थेदार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती यांना वाटू लागली आहे. हे एक आवर्तन (रोटेशन) पूर्ण होत आहे.
‘शीख हिंदू नाहीत’ हा विचार, त्यावर आधारलेला हिंदू द्वेषाचा विमर्ष आणि हिंदूंच्या कत्तली हा परिणाम; आणि केवळ खलिस्तानी दहशतवाद रुजवण्याचा प्रयत्न करत त्यांची एकांगी बाजू मांडणारा चित्रपट व त्याला मिळणारे समर्थन यांची ही साखळी आहे. घडलेली घटना किती तीव्र आहे व त्याची प्रतिक्रिया कशी उमटते, हे विमर्ष (नॅरेटिव्ह) आणि त्यामागचा विचार यांचा मागोवा घेत गेल्यावर समजते. हा मागोवा एक दोन दिवसांचा नसतो. विचार कृतीत यायला शतकानुशतके लागतात. विचार कृतीत येण्यापूर्वीच त्याविरुद्ध विमर्षाच्या पातळीवरच उपाययोजना केली नाही तर होणारी कृती आणि तिचे समर्थन अटळ असते. खलिस्तानी दहशतवादाचे समर्थन करणार्या चित्रपटांवर बंदी आणली काय आणि नाही आणली काय, त्यामागचा हेतू सिद्ध होतोच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा