शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

कोकणी राजभाषा का झाली?

गोव्याच्या राजभाषा दोनच; एक रोमन लिपीतील इंग्रजी व देवनागरीतील कोकणी. मराठी ना राजभाषा आहे, ना सह-राजभाषा. आजही जेव्हा ‘मराठीला राजभाषा करायचे असेल तर रोमी कोकणीसही राजभाषा करा’, असे म्हटले जाते व ‘गोंयची अस्मिताय’चे सूर आळवले जातात तेव्हा मराठीप्रेमी आणि ख्रिस्ती समाजास जाळलेली घरे, दुकाने व गोळीबारात गमावलेली माणसे आठवतात. ते निखारे आजही विझले नाहीत. त्यावर आपली भाकरी भाजणार्‍यांची पोटे आजही त्याच ढेकरा देत आहेत.

कोकणी ही स्वत:च्या गुणवत्तेवर गोव्याची राजभाषा झालेली नाही. राजभाषेचा संबंध लिखाणाशी येतो, बोलण्याशी नाही. त्यावेळेस कोकणी भाषेत एवढी समृद्ध शब्दसंपदा, शासकीय परिभाषा व प्रमाणीकरण नव्हते(तसे ते आजही नाही). राजभाषा होण्यासाठी लिखित मराठीत हे सर्व होते. तरीही कोकणी राजभाषा झाली, ती एकगठ्ठा ख्रिस्ती समाज व चर्चमुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पराकोटीच्या हिंसाचारामुळे!

मराठी बोलणार्‍या हिंदूंचा विरोध करणारा ख्रिस्ती समाज, कोकणी बोलणार्‍या हिंदूंचे समर्थन कसे काय करत होता, हा प्रश्‍न अनेकांना पडला होता. पण, कोकणी राजभाषा झाल्यानंतर ख्रिस्ती साहित्यिकांचा व तियात्रकारांचा जो उद्रेक झाला, त्यात याची उत्तरे सापडतात. तत्कालीन कोकणी समर्थकांनी कोकणीसोबत रोमी कोकणीसही राजभाषा करू असे आश्‍वासन ‘कोकणी प्रजेचो आवाज’ला दिले होते. मराठी राजभाषा झाल्यास गोवा महाराष्ट्रात विलीन होईल, ही सार्वत्रिक भीती कोकणी समर्थकांनी घातली होतीच. पण, तेवढ्यावर राजकीय व सामाजिक संख्याबळ या जोरावर कोकणी राजभाषा झाली नसती. यासाठी जॅक सिकेरा यांच्या युनाइटेड गोवन्स पार्टीसोबत कोकणी समर्थकांनी ‘गोमंतकीय अस्मिता’ जपण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. 

गोव्यातील कॅथलिक चर्चने केवळ पांथिकच नव्हे, तर सामाजिक पातळीवर कोकणी चळवळीला मोठी ताकद दिली. चर्चच्या अंतर्गत येणार्‍या संस्था, पाद्री आणि चर्चचे ’वावराड्यांचो इश्ट’सारखी रोमी कोकणी वृत्तपत्रे यांनी गावागावांत कोकणी भाषेचा प्रचार केला. चर्चने लोकांना ‘गोमंतकीय अस्मिते’साठी एकत्र येण्याचे आवाहन केले, ज्यामुळे आंदोलनाला प्रचंड लोकबळ मिळाले. मराठी बोलणारे हिंदू ‘भायले’ हे समीकरण ख्रिस्तीबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजवण्यात आले. तरीही आंदोलनाचा म्हणावा तसा प्रभाव व दबाव सरकारवर पडत नव्हता. त्यासाठी ‘हिंसाचारा’चे शस्त्र उगारण्यात आले.

कलकत्ता व नौखालीतील हिंदू नरसंहारामुळे पाकिस्तानच्या निर्मितीस होकार मिळाला होता. संघटित हिंसाचारापुढे सरकार नमते, हा तेव्हापासूनचा सिद्ध आणि प्रसिद्ध ‘फॉर्म्युला’ होता. ख्रिस्तीबहुल भागांतील मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांची घरे, दुकाने, आस्थापने अक्षरश: वेचून वेचून जाळण्यात आली. मराठीप्रेमी व मराठी पेपरविक्रेतेही यातून सुटले नाहीत. १८ डिसेंबर आणि त्यानंतरच्या दिवसांत झालेली जाळपोळ ही केवळ उथळ दंगल नव्हती. गोव्यातील अनेक भागांत, विशेषतः ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये, मराठी भाषेचे समर्थन करणार्‍या किंवा मगोपशी संबंधित असलेल्या हिंदूंची घरे, दुकाने आणि कारखाने पद्धतशीरपणे ओळखून त्यांना लक्ष्य करण्यात आले. 

२० डिसेंबर १९८६ रोजी घोगळ येथे ख्रिस्ती जमाव मोठ्या संख्येने दगडफेक व जाळपोळ करीत सुटला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २३ वर्षीय फ्लोरिआनो वाझ हा हुतात्मा ठरला. २१ डिसेंबर १९८६ रोजी आगशी आणि नेवरा या ख्रिस्तीबहुल भागांत जाळपोळ सुरू झाली. हा भाग राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि मोक्याचा भाग होता. उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात जाणार्‍या गाड्या आणि पोलीस ताफे रोखण्यासाठी स्थानिक ख्रिस्ती तरुणांनी तिथे मोठी नाकाबंदी केली होती. पोलिसांना हे प्रकरण आटोपणार नाही, म्हणून गुजरात राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले होते. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतर्गत भाषिक वाद शमवण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. सीआरपीएफ आणि लष्कराच्या तुकड्या रस्त्यावर उतरूनही हिंसाचार आटोक्यात येत नव्हता. ही परिस्थिती गृहयुद्धासारखी बनत चालली होती. जमावाचा हिंसाचार एवढ्या शिगेला पोहोचला होता की गोळीबार करावा लागला. त्यात, ऑगस्टीन डायस, कार्मिनो डायस यांच्यासह अन्य चार जण हुतात्मा झाले.  

या अभूतपूर्व हिंसक कोंडीमुळे सरकार हादरले. १९८६-८७च्या आंदोलनात हिंसेचा वाटा अत्यंत निर्णायक आणि ‘गेम-चेंजर’ ठरला. जर आंदोलनाने ते तीव्र आणि हिंसक रूप धारण केले नसते, तर तत्कालीन प्रतापसिंग राणे सरकार आणि केंद्र सरकारने ’अधिकृत भाषा कायदा’ एवढ्या घाईघाईने मंजूर केला नसता.

यानंतर ख्रिस्ती समाजाचा खरा भ्रमनिरास झाला. ज्या गोमंतकीय अस्मितेची भाषा करीत रोमी कोकणीला राजभाषा करण्याचे आश्‍वासन कोकणीवाद्यांनी दिले होते ते पाळलेच नाही. सात ते आठ हुतात्मा झाले होते ते सर्व ख्रिस्ती समाजाचे होते. त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मिळाले;  न्याय मिळालाच नाही. ज्या मराठीप्रेमी व मगो समर्थक हिंदूंची घरे, दुकाने, हॉटेल, आस्थापने जाळण्यात आली होती, ज्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते त्यांना छदामही नुकसान भरपाई म्हणून मिळाला नाही. ‘सामाजिक सलोखा’ राखण्यासाठी केलेल्या राजकीय तडजोडीपोटी तक्रारीही दाखल केल्या नाहीत, सरकारने नुकसान किती झाले याचा अभ्यास करण्यासाठी समितीही नेमली नाही आणि कसली श्‍वेतपत्रिकाही काढली नाही. नुकसान सामान्या मराठीप्रेमींचे आणि ख्रिस्ती समुदायचे झाले. 

सह-राजभाषा हा प्रकारच नाही. रोमी कोकणीसारखीच ते तोंडाला पाने पुसणे आहे. गोव्याच्या राजभाषा दोनच; एक रोमन लिपीतील इंग्रजी व देवनागरीतील कोकणी. मराठी ना राजभाषा आहे, ना सह-राजभाषा. आजही जेव्हा ‘मराठीला राजभाषा करायचे असेल तर रोमी कोकणीसही राजभाषा करा’, असे म्हटले जाते व ‘गोंयची अस्मिताय’चे सूर आळवले जातात तेव्हा मराठीप्रेमी आणि ख्रिस्ती समाजास जाळलेली घरे, दुकाने व गोळीबारात गमावलेली माणसे आठवतात. ते निखारे आजही विझले नाहीत. त्यावर आपली भाकरी भाजणार्‍यांची पोटे आजही त्याच ढेकरा देत आहेत. 


अन्याय करण्यालाच ‘सामजिक न्याय’ हे गोंडस नाव!

जातीभेद संपवून समानता आणण्याच्या गप्पा हाणणारी राज्यघटना व त्यानुसार सरकारने बनवलेले कायदे जाती अधिक घट्ट करणारे आहेत. ‘सामाजिक न्याय’ हे बिरुद लावून अन्याय करण्याचे कायदेशीर स्वातंत्र्य आहे. यातून खरोखरच ज्यांच्यावर जातिगत अन्याय होतोय त्यांच्यासाठी असलेली ही आर्थिक मदत त्यांनाच पोहोचते का, हे तपासण्याची तसदी कुठलेच सरकार कधीच घेत नाही. ती घेणे म्हणजे मतांची वजाबाकी ठरते, हे त्यामागचे कारण. ‘आम्ही मुसलमानांचे व सेक्युलरिझमचे तारणहार’ हे सिद्ध करण्याचा प्रयत्न जसा कॉंग्रेसने स्वातंत्र्याच्या आधीपासूनच केला, ओबीसीत मुसलमानांना प्रवेश दिल्यानंतर तोच प्रयत्न आता भाजप एससीएसटींबाबत करत आहे.

भारताचा कायदाच जनरल व ओबीसीतील व्यक्तींना साधी तपासणी होण्याआधीच दोषी मानतो, हे वाचून थोडे आश्‍चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. केवळ युजीसीच्या ‘इक्वलिटी’ कायद्यातच नव्हे, तर ’अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९’ हा कायदा त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याअंतर्गत आर्थिक मदत देण्याची तरतूद १९९५साली आणि गुन्हे व मदतवाढ २०१६साली करण्यात आली. बलात्कार झालेल्या दिवशी येणार्‍या बातमीचा मथळाच जर दलित असल्याने महिलेवर बलात्कार असे ध्वनित करत असेल, तो केवळ पत्रकारितेचा दोष मानणे चुकीचे आहे. 

सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात एफआयआर व प्राथमिक वैद्यकीय तपासणी झाल्यावर लगेचच ५०% रक्कम महिलेच्या खात्यावर जमा होते. यात एक महत्त्वाचा फरक लक्षांत घेणे आवश्यक आहे. वीर्य, रक्त व डीएनएचा अहवालात आरोपीने बलात्कार केला हे सिद्ध होण्याची अजिबात आवश्यकता नाही; केवळ बलात्कार झालाय हे सिद्ध झाले तरी पुरेसे आहे. कुणी बलात्कार केला हे प्राथमिक तपासणीत समोर येण्याआधीच ५० टक्के रक्कम दिली जाते. हीच मदत एससीएसटी व्यक्तींनीच एससीएसटी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यास मिळत नाही. याचा अर्थ जी मदत दिली जाते, त्यात तो जातिगत अत्याचारच आहे, हे गृहीत धरले जाते. बलात्कार कुणी केला याची साधी प्राथमिक तपासणीही होत नाही आणि त्यामागच्या एससीएसटी असल्यामुळे जातिगत द्वेषामुळे केला आहे, या कारणाचीही तपासणी करण्याची अजिबातच आवश्यकता वाटत नाही. 

उत्तर प्रदेशमधील एका महिलेचे व तिच्या परिवाराचे उदाहरण यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्या महिलेने २०१० ते २०२५ या कालावधीत साधारण १६ खोट्या तक्रारी दाखल करून अंदाजे ४६ लाख रुपये उकळल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत खटला दाखल करण्याआधी तपासाच्या तपासाच्या पातळीवरच खोटी ठरलेली (फायनल रिपोर्ट फॉल्स) प्रकरणांची टक्केवारी १२.२३% एवढी आहे. त्यात २५% ही किमान पातळी जरी धरली तरी किती रक्कम देण्यात आली होती व किती वसूल करण्यात आली, याची कुठलीही आकडेवारी सरकार प्रसिद्ध करत नाही. किती मदत केली याची साद्यंत माहिती सरकार देते, उकळले किती व वसूल किती केले याची कोणतीही आकडेवारी सरकार देत नाही. इतकेच कशाला, याच कायद्याअंतर्गत फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने २०२३साली वसूलीचा आदेश दिला होता. अलाहबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात ४.५० लाख रुपये लाटणार्‍या तीन महिलांकडून वसुलीचा आदेश दिला होता. आजवर एकही पैसा वसूल झालेला नाही. किमान सरकारी आकडेवारीत तरी तो दिसत नाही. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वसुलीची कोणतीही तरतूदच या कायद्यात नाही. याचाच अर्थ कुणीही खोटी तक्रार करणार नाही व झालेला अत्याचार हा जातिमुळेच झाला आहे, असे हा कायदा मुळातच मान्य करतो. 

जातीभेद संपवून समानता आणण्याच्या गप्पा हाणणारी राज्यघटना व त्यानुसार सरकारने बनवलेले कायदे जाती अधिक घट्ट करणारे आहेत. ‘सामाजिक न्याय’ हे बिरुद लावून अन्याय करण्याचे कायदेशीर स्वातंत्र्य आहे. यातून खरोखरच ज्यांच्यावर जातिगत अन्याय होतोय त्यांच्यासाठी असलेली ही आर्थिक मदत त्यांनाच पोहोचते का, हे तपासण्याची तसदी कुठलेच सरकार कधीच घेत नाही. ती घेणे म्हणजे मतांची वजाबाकी ठरते, हे त्यामागचे कारण. ‘आम्ही मुसलमानांचे व सेक्युलरिझमचे तारणहार’ हे सिद्ध करण्याचा प्रयत्न जसा कॉंग्रेसने स्वातंत्र्याच्या आधीपासूनच केला, ओबीसीत मुसलमानांना प्रवेश दिल्यानंतर तोच प्रयत्न आता भाजप एससीएसटींबाबत करत आहे. 

अन्याय करण्यालाच ‘सामजिक न्याय’ असे गोंडस नाव दिल्याने स्वार्थी, संधिसाधू लोकांचे कल्याण होत आहे; वंचित अधिक वंचित होत आहेत!


गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

आता जौहरही ‘प्रथा’ होईल...

१४३०च्या दशकात राणा मोकलच्या हत्येनंतर त्याचा पुत्र राव रिणमल याने चित्तोडला वेढा घातला. पुढे त्याने सिसोदिया स्त्रियांना पकडून जबरदस्तीने त्यांच्याशी विवाह केल्याचे वर्णन इतिहासात आहे. इथेही किल्ला पडणार, रसद संपली व पराभव निश्‍चित आहे; अशीच स्थिती होती. तरीही राजस्थानी स्त्रियांनी जौहर केला नाही. इथेच प्रश्‍न येतो; जर ‘प्रथा’ होती तर मग का केला नाही? जौहर केल्याची जेवढी उदाहरणे इतिहासात आहेत - ७१२ ते १६३४पर्यंत - ती  सर्वच्या सर्व मुघल आक्रमकांविरुद्धच्या युद्धातील आहेत. असे का?

‘विधवा प्रथा’च्या अपूर्व यशानंतर आता त्याच वाटेवरून जौहरचेही मार्गक्रमण सुरू झाले आहे. जौहरचे अभिमानाचे स्थान ढळवण्यास सुरुवात आहे. याचे परिणाम आणखी पन्नास वर्षांनी पाठ्यपुस्तकांतून दिसू लागतील. 

जौहरच्या संदर्भात समकालीन लेखन पाहिले तर एक गोष्ट लक्षांत येते की ती ‘प्रथा’ नव्हती; तो आपद्धर्म होता! किल्ल्याला वेढा पढला आहे, रसद संपली आहे, जिवंत वाचण्याचे कोणतेही कारण शिल्लक नाही, अशा वेळेस राजपूत योद्धे ‘साका’ किंवा ‘केसरिया’ (पराभव व मृत्यू निश्‍चित आहे, हे माहीत असूनही रणांगणात अंतिम लढाईसाठी उतरणे) करत असत. त्याच वेळेस राजपूत स्त्रिया ‘जोहर’ करून स्वत:चे आत्मदहन करत असत. हा निश्‍चितच प्रसंगाप्रमाणे निवडलेला पर्याय होता, प्रथा नव्हती. 

१४३०च्या दशकात राणा मोकलच्या हत्येनंतर त्याचा पुत्र राव रिणमल याने चित्तोडला वेढा घातला. पुढे त्याने सिसोदिया स्त्रियांना पकडून जबरदस्तीने त्यांच्याशी विवाह केल्याचे वर्णन इतिहासात आहे. इथेही किल्ला पडणार, रसद संपली व पराभव निश्‍चित आहे; अशीच स्थिती होती. तरीही राजस्थानी स्त्रियांनी जौहर केला नाही. इथेच प्रश्‍न येतो; जर ‘प्रथा’ होती तर मग का केला नाही? जौहर केल्याची जेवढी उदाहरणे इतिहासात आहेत - ७१२ ते १६३४पर्यंत - ती  सर्वच्या सर्व मुघल आक्रमकांविरुद्धच्या युद्धातील आहेत. असे का? 

याला महत्त्वाचे कारण आहे. भारतीय युद्धशास्त्रात युद्धबंदी स्त्रियांवर बलात्कार किंवा ‘वाटून घेणे’ याचा आदेश नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर असे कुणीही केल्यास त्याची जबर शिक्षा सांगितली आहे. या उलट अगदी मुहम्मद पैगंबर यांच्या काळापासून बलात्कार किंवा वाटून घेणे ही प्रथा आहे. कुराणात त्याचे उल्लेख सापडतात. बांग्लादेश युद्धात पाकिस्तानी सैन्याला दिलेला आदेश, हे आधुनिक काळातील उदाहरण. अशी स्थिती स्वत:वर येऊ नये, म्हणून राजपूत स्त्रिया आपले प्रेतही सापडू नये या उद्देशाने जौहर करत असत. 

एनसीईआरटीच्या जुन्या मध्ययुगीन इतिहासाच्या पुस्तकात चित्तोडच्या संदर्भात जौहरचा उल्लेख अत्यंत संक्षिप्त आहे. नव्या पुस्तकांतही ‘बलात्कार’ व ‘वाटून घेणे’ हा संदर्भ नाही. तो देण्याचे धाडसही होणार नाही. 

‘बलात्काराच्या भीतीने जौहर करणे याला सन्मानाची गोष्ट ठरवणे म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही जिवंत असलेली स्त्री भित्री आहे असे समजणे.’, या आशयाचा विचार स्वरा भास्कर हिने मांडला. तिचा या विषयातील अभ्यास, पात्रता याविषयी न बोललेलेच बरे. अभिमानाशी किंवा संस्कृतीशी निगडीत कुठल्याही परंपरेला वाईट ठरवायचे असले, की त्याची सुरुवात मुख्य प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या डाव्या विचारांच्या व्यक्तीकडून लहानसा विचार पेरून केली जाते. ही ‘लिटमस टेस्ट’ असते. ज्याला कोणताही वैचारिक, ऐतिहासिक आधार नसतो असा विचार पेरून तसाच सोडून दिला जातो. त्या विचाराचा वापर आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, राजकीय किंवा सामाजिक लाभासाठी करून घेणारे असतातच. त्यांना ‘विद्रोही’ वगैरे ठरवून मोठे केले जाते. विचार हळूहळू रुजत जातो, फोफावतो. त्या विचाराला सामाजिक अस्मितेची, स्त्री-पुरुष समानतेची, शोषक-शोषित असण्याची कुठलीही चौकट चालते.  

‘हिंदू समाजात ‘जौहर’ नावाची स्त्रियांना जाळून मारण्याची प्रथा होती’, हे वाक्य जवळपास पन्नास वर्षांनी इतिहासाच्या पुस्तकांत आल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात ‘होळी हा बहुजन स्त्रियांना जिवंत जाळण्याचा सण आहे’, हा विचार पेरून दोन तीन वर्षांपूर्वी झाली आहे. ‘सती’ जाण्याच्या अपवादासही ‘प्रथा’ करून तिचे वाट्टोळे करण्यात आले. ज्या सती पुजल्या जात होत्या, त्यांचे पुढे काय होईल, हे सांगण्यासाठी कुणी भविष्यवेत्ता नको. अतिशय बिनडोक असले ‘विधवा होणे’ ही प्रथा तरी कागदोपत्री झालीच आहे. त्याच मार्गावरून आता ‘जौहर’चाही प्रवास सुरू झाला आहे.