हिंसाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिंसाचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

कोकणी राजभाषा का झाली?

गोव्याच्या राजभाषा दोनच; एक रोमन लिपीतील इंग्रजी व देवनागरीतील कोकणी. मराठी ना राजभाषा आहे, ना सह-राजभाषा. आजही जेव्हा ‘मराठीला राजभाषा करायचे असेल तर रोमी कोकणीसही राजभाषा करा’, असे म्हटले जाते व ‘गोंयची अस्मिताय’चे सूर आळवले जातात तेव्हा मराठीप्रेमी आणि ख्रिस्ती समाजास जाळलेली घरे, दुकाने व गोळीबारात गमावलेली माणसे आठवतात. ते निखारे आजही विझले नाहीत. त्यावर आपली भाकरी भाजणार्‍यांची पोटे आजही त्याच ढेकरा देत आहेत.

कोकणी ही स्वत:च्या गुणवत्तेवर गोव्याची राजभाषा झालेली नाही. राजभाषेचा संबंध लिखाणाशी येतो, बोलण्याशी नाही. त्यावेळेस कोकणी भाषेत एवढी समृद्ध शब्दसंपदा, शासकीय परिभाषा व प्रमाणीकरण नव्हते(तसे ते आजही नाही). राजभाषा होण्यासाठी लिखित मराठीत हे सर्व होते. तरीही कोकणी राजभाषा झाली, ती एकगठ्ठा ख्रिस्ती समाज व चर्चमुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पराकोटीच्या हिंसाचारामुळे!

मराठी बोलणार्‍या हिंदूंचा विरोध करणारा ख्रिस्ती समाज, कोकणी बोलणार्‍या हिंदूंचे समर्थन कसे काय करत होता, हा प्रश्‍न अनेकांना पडला होता. पण, कोकणी राजभाषा झाल्यानंतर ख्रिस्ती साहित्यिकांचा व तियात्रकारांचा जो उद्रेक झाला, त्यात याची उत्तरे सापडतात. तत्कालीन कोकणी समर्थकांनी कोकणीसोबत रोमी कोकणीसही राजभाषा करू असे आश्‍वासन ‘कोकणी प्रजेचो आवाज’ला दिले होते. मराठी राजभाषा झाल्यास गोवा महाराष्ट्रात विलीन होईल, ही सार्वत्रिक भीती कोकणी समर्थकांनी घातली होतीच. पण, तेवढ्यावर राजकीय व सामाजिक संख्याबळ या जोरावर कोकणी राजभाषा झाली नसती. यासाठी जॅक सिकेरा यांच्या युनाइटेड गोवन्स पार्टीसोबत कोकणी समर्थकांनी ‘गोमंतकीय अस्मिता’ जपण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. 

गोव्यातील कॅथलिक चर्चने केवळ पांथिकच नव्हे, तर सामाजिक पातळीवर कोकणी चळवळीला मोठी ताकद दिली. चर्चच्या अंतर्गत येणार्‍या संस्था, पाद्री आणि चर्चचे ’वावराड्यांचो इश्ट’सारखी रोमी कोकणी वृत्तपत्रे यांनी गावागावांत कोकणी भाषेचा प्रचार केला. चर्चने लोकांना ‘गोमंतकीय अस्मिते’साठी एकत्र येण्याचे आवाहन केले, ज्यामुळे आंदोलनाला प्रचंड लोकबळ मिळाले. मराठी बोलणारे हिंदू ‘भायले’ हे समीकरण ख्रिस्तीबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजवण्यात आले. तरीही आंदोलनाचा म्हणावा तसा प्रभाव व दबाव सरकारवर पडत नव्हता. त्यासाठी ‘हिंसाचारा’चे शस्त्र उगारण्यात आले.

कलकत्ता व नौखालीतील हिंदू नरसंहारामुळे पाकिस्तानच्या निर्मितीस होकार मिळाला होता. संघटित हिंसाचारापुढे सरकार नमते, हा तेव्हापासूनचा सिद्ध आणि प्रसिद्ध ‘फॉर्म्युला’ होता. ख्रिस्तीबहुल भागांतील मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांची घरे, दुकाने, आस्थापने अक्षरश: वेचून वेचून जाळण्यात आली. मराठीप्रेमी व मराठी पेपरविक्रेतेही यातून सुटले नाहीत. १८ डिसेंबर आणि त्यानंतरच्या दिवसांत झालेली जाळपोळ ही केवळ उथळ दंगल नव्हती. गोव्यातील अनेक भागांत, विशेषतः ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये, मराठी भाषेचे समर्थन करणार्‍या किंवा मगोपशी संबंधित असलेल्या हिंदूंची घरे, दुकाने आणि कारखाने पद्धतशीरपणे ओळखून त्यांना लक्ष्य करण्यात आले. 

२० डिसेंबर १९८६ रोजी घोगळ येथे ख्रिस्ती जमाव मोठ्या संख्येने दगडफेक व जाळपोळ करीत सुटला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २३ वर्षीय फ्लोरिआनो वाझ हा हुतात्मा ठरला. २१ डिसेंबर १९८६ रोजी आगशी आणि नेवरा या ख्रिस्तीबहुल भागांत जाळपोळ सुरू झाली. हा भाग राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि मोक्याचा भाग होता. उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात जाणार्‍या गाड्या आणि पोलीस ताफे रोखण्यासाठी स्थानिक ख्रिस्ती तरुणांनी तिथे मोठी नाकाबंदी केली होती. पोलिसांना हे प्रकरण आटोपणार नाही, म्हणून गुजरात राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले होते. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतर्गत भाषिक वाद शमवण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. सीआरपीएफ आणि लष्कराच्या तुकड्या रस्त्यावर उतरूनही हिंसाचार आटोक्यात येत नव्हता. ही परिस्थिती गृहयुद्धासारखी बनत चालली होती. जमावाचा हिंसाचार एवढ्या शिगेला पोहोचला होता की गोळीबार करावा लागला. त्यात, ऑगस्टीन डायस, कार्मिनो डायस यांच्यासह अन्य चार जण हुतात्मा झाले.  

या अभूतपूर्व हिंसक कोंडीमुळे सरकार हादरले. १९८६-८७च्या आंदोलनात हिंसेचा वाटा अत्यंत निर्णायक आणि ‘गेम-चेंजर’ ठरला. जर आंदोलनाने ते तीव्र आणि हिंसक रूप धारण केले नसते, तर तत्कालीन प्रतापसिंग राणे सरकार आणि केंद्र सरकारने ’अधिकृत भाषा कायदा’ एवढ्या घाईघाईने मंजूर केला नसता.

यानंतर ख्रिस्ती समाजाचा खरा भ्रमनिरास झाला. ज्या गोमंतकीय अस्मितेची भाषा करीत रोमी कोकणीला राजभाषा करण्याचे आश्‍वासन कोकणीवाद्यांनी दिले होते ते पाळलेच नाही. सात ते आठ हुतात्मा झाले होते ते सर्व ख्रिस्ती समाजाचे होते. त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मिळाले;  न्याय मिळालाच नाही. ज्या मराठीप्रेमी व मगो समर्थक हिंदूंची घरे, दुकाने, हॉटेल, आस्थापने जाळण्यात आली होती, ज्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते त्यांना छदामही नुकसान भरपाई म्हणून मिळाला नाही. ‘सामाजिक सलोखा’ राखण्यासाठी केलेल्या राजकीय तडजोडीपोटी तक्रारीही दाखल केल्या नाहीत, सरकारने नुकसान किती झाले याचा अभ्यास करण्यासाठी समितीही नेमली नाही आणि कसली श्‍वेतपत्रिकाही काढली नाही. नुकसान सामान्या मराठीप्रेमींचे आणि ख्रिस्ती समुदायचे झाले. 

सह-राजभाषा हा प्रकारच नाही. रोमी कोकणीसारखीच ते तोंडाला पाने पुसणे आहे. गोव्याच्या राजभाषा दोनच; एक रोमन लिपीतील इंग्रजी व देवनागरीतील कोकणी. मराठी ना राजभाषा आहे, ना सह-राजभाषा. आजही जेव्हा ‘मराठीला राजभाषा करायचे असेल तर रोमी कोकणीसही राजभाषा करा’, असे म्हटले जाते व ‘गोंयची अस्मिताय’चे सूर आळवले जातात तेव्हा मराठीप्रेमी आणि ख्रिस्ती समाजास जाळलेली घरे, दुकाने व गोळीबारात गमावलेली माणसे आठवतात. ते निखारे आजही विझले नाहीत. त्यावर आपली भाकरी भाजणार्‍यांची पोटे आजही त्याच ढेकरा देत आहेत. 


बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

आपल्या सामाजिक प्रतिक्रिया हिंसकच का?

घटनांचे पडसाद उमटणे ही स्वाभाविक गोष्ट मानली जात असली तरीही, पडसाद उमटवण्यासाठी घटना रचल्या जात असतील, तर ते देशासाठी घातकच आहे. बांग्लादेशमधील घटनेचे पडसाद त्रिपुरात, त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात हा घटनाक्रम दुखावणार्‍या पांथिक, सामाजिक भावनांवर पुन्हा विचार करायला लावतो आणि आपल्याच हिंसक प्रतिक्रियेचे विश्लेषण करायला भाग पाडतो.



एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया ही कुठे ना कुठे तरी उमटतेच. पण, प्रतिक्रिया कशी उमटते यावर आपली संस्कृती ठरत असते. जे बांग्लादेशात घडले, त्रिपुरात घडले, महाराष्ट्रात घडले आणि मडगाव येथे घडता घडता घडले नाही त्याचा विचार करणे म्हणूनच अगत्याचे ठरते.

या सर्व घटनाक्रमाची सुरुवात बांग्लादेशमधून झाली. तीही आता नव्हे तर, नवरात्रांत झाली. दि. १३ ऑक्टोबर रोजी कुणीतरी दुर्गा मंडपामधील हनुमंताच्या पायावर कुराणाची प्रत ठेवली. त्यावरून दुर्गा मंडप जाळण्यात आले. नंतर सीसीटीव्ही फूटेजवरून हे लक्षात आले की, असे करणारी व्यक्ती एक मुस्लीमच होती. कोमिलातील सुजानगर येथे राहणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन. त्याची आई अमिना बेगम यांच्या म्हणण्यानुसार तो एक ड्रग अ‍ॅडिक्ट होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. पोलिसांच्या माहितीनुसार तो अनेक वर्षांपासून बेकार होता. आता इथे काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. खरोखरच तो अमली पदार्थांचे सेवन करत होता, गतिमंद होता, बेकार होता असे असेल तर निश्चितच त्याचा वापर कुणीतरी करून घेतला आहे. एखादा मुस्लीम हनुमंताच्या पायावर कुराण ठेवून कुराणाचाच अपमान करणार नाही. त्यामुळे, त्याच्या व्यसनांचा किंवा आर्थिक स्थितीचा वापर हे त्याच्याकडून करवून घेण्यात झाला असावा. त्यामुळेच, त्याला पकडून प्रश्न सुटणार नाही. त्याला असे करायला लावणारे कोण होते, हे समोर येणे जास्त आवश्यक आहे. 

ज्यांनी याचे नियोजन केले त्यांचा हेतू त्याचा आधार घेऊन हिंदूंची घरे पेटवणे, दुर्गा मंडप जाळणे, मंदिरे तोडणे हाच होता. त्यासाठी त्यांना एखादे निमित्त हवे होते. त्यासाठी, मुसलमानांनी  कुरणाचाच अपमान करून हे निमित्त तयार केले. त्यांना वाटले होते, ‘हे कुणी हिंदूनेच केले आहे’ या आवईखाली सगळे खपून जाईल. पण, सीसीटीव्ही फूटेजने सर्व उघड केले. हिंदूंना संपवण्यासाठी मुस्लिमांनी त्यांच्यासाठी सर्वोच्च, पवित्र असलेल्या कुराणाचाच अपमान केला. कुठून येते ही आपल्या आस्थेशिवाय इतर आस्था मानणार्‍यांविषयी नकारात्मक, द्वेषाची भावना? वाट्टेल तसे हिंसेने त्यांना संपवण्याची संकल्पना कुठून येते? याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. 

उत्तर त्रिपुराच्या धर्मनगर या जिल्ह्यातील चमतिला या गावी विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या निषेध यात्रेत मशिदीवर दगडफेक आणि मुस्लिमांच्या दुकानांची तोडफोड झाली. या घटनेनंतर ट्विटरच्या ६८, फेसबुकच्या ३१ आणि यूट्यूबच्या २ पोस्टमधून मशीद जाळल्याचे, मुस्लिमांची दुकाने, घरे जाळल्याचे आणि मुसलमानांचे हत्याकांड केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दंगल पेटली.  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मशिदीवर दगडफेक होणे निषेधार्हच आहे. यात दुमत असण्याचे कारण निश्चितच नाही. 

पण, जे बांग्लादेशात मुद्दाम घडवण्यात आले आणि त्रिपुरातही मुद्दामच घडवण्यात आले त्याबद्दल काय म्हणायचे? त्याला स्वाभाविक, साहजिक प्रतिक्रिया कसे म्हणता येईल? ‘मुस्लीम समाज आपल्या पंथाविषयी खूपच संवेदनशील आणि हळवा आहे’, हे जाळपोळीचे, मंदिर तोडण्याचे, हत्या करण्याचे आणि दंगल पेटवण्याचे समर्थक कारण कसे होऊ शकते? तसाच विचार केल्यास मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंची हजारो देवळे तोडली आणि त्यावर मशिदी बांधल्या, गोव्यात ख्रिस्ती प्रचारकांनी देवळे तोडली, त्यावर चर्च उभारली. त्याची प्रतिक्रिया याच पद्धतीने उमटली असती तर एक तरी मशीद आणि एक तरी चर्च शिल्लक राहिले असते का, याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रतिक्रिया कशी उमटते व का उमटते या बरोबरच ती कुठे उमटते हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

भौगोलिक परिस्थिती पाहिली तर त्रिपुराचा बहुतांश भाग बांग्लादेशच्या सीमांलगत आहे. कोमिला ते धर्मनगर हे अंतरही १०० किलोमीटरच्या आत आहे. त्यामुळे, कोमिलात जे काही घडले त्याचे पडसाद धर्मनगर येथे उमटणे स्वाभाविकच आहे. पण, त्रिपुरात घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांत न उमटता, चक्क महाराष्ट्रात उमटतात. त्याही अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये. जिथे हिंदू मुस्लीम दंगे होण्याचा इतिहास आहे, अशा राज्यांमध्ये न होता महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात. खरे तर घडवल्या जातात.

अपेक्षेप्रमाणे त्रिपुरात आणि महाराष्ट्रात याचे राजकीय भांडवल झाले. शिवसेनेने भाजपला यासाठी जबाबदार धरले आणि भाजपने राष्ट्रवादीला. खरे तर चुकीच्या ठिकाणी होत असलेला मुस्लिमांचा राजकीय-अनुनय याला जबाबदार आहे. महाराष्ट्रात मविआ सत्तेत आल्यानंतर शरद पवार म्हणाले होते की, अल्पसंख्याकांमुळेच आम्ही सत्तेत आलो, काँग्रेसचे अशोक चव्हाण म्हणाले की, आम्ही मुस्लिमांची परवानगी घेऊन मगच शिवसेनेशी युती केली. हे दोघे कुणाबद्दल बोलत आहेत? मुस्लिमांबद्दल की, रझा अकादमीसारख्या संघटनांबद्दल बोलत आहेत? मुस्लीम समाज या राजकारण्यांनाअभिप्रेत नाही. भिवंडी, मुंबई आणि आता अमरावती, नांदेड पेटवणार्‍या रझा अकादमीशी व त्यांच्या एका हाकेवर एकत्र येणार्‍या मुस्लिमांच्या संख्येशी या राजकारण्यांचे देणेघेणे आहे. 

यातील समान सूत्रे आणि त्यामागची मूळ संकल्पना लक्षात घेणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा, असे दंगे आणि घटना वारंवार घडतच राहतील. त्रिपुरामध्ये दंगे भडकण्यामागे मशीद जळण्याचे फोटोशॉप केलेले फोटो पसरवण्यात आले. तीच पद्धत महाराष्ट्रातही अवलंबली गेली. त्यानंतर येणार्‍या राजकीय आणि माध्यमावरील विचारवंतांच्या प्रतिक्रिया ‘बहुसंख्य अल्पसंख्याकांवर बाय डिफॉल्ट अन्याय करतात’ या नॅरेटिव्हबरहुकूम होत्या. त्यानंतर मग आरोप-प्रत्यारोप, इतिहासातील दाखले देणे, चिखलफेक, झुंडशाही हे सर्व षोडशोपचार झाले. यातून दर खेपेला असे का घडते हा मुद्दा, त्यावरील विचारमंथन आणि त्यानुरूप उपाययोजना करणे बाजूलाच पडले किंवा मुद्दाम पाडले गेले. 

मुस्लीम समाजाच्या जगभरातील प्रतिक्रिया हिंसक का असतात, याबद्दल विवेचन करताना वफा सुल्तान ‘अ गॉड हू हेट्स’ या पुस्तकात म्हणतात की, इस्लाम हा फक्त एक पंथ नसून ती एक राजकीय विचारसरणी आहे जी हिंसेचा प्रचार करते आणि आपले म्हणणे सक्तीने लागू करते. इस्लाममुळे जगात निर्माण झालेल्या समस्यांचे मूळ इस्लामच्या शिकवणीतच आहे, असेही त्या म्हणतात. एकेश्वरवाद आपल्याकडेही आहे. पण, त्यासाठी इतर देवांवर विश्वास ठेवणार्‍यांविषयी घृणा, द्वेष किंवा नकारात्मक विचारसरणी नाही. 

हिंदू संघटना, विचारसरणी इस्लामसारखीच होत आहे का, हा मुद्दाही आता त्यासोबत पडताळणे आवश्यक आहे. सर्वसमावेशकता हा हिंदूंचा गुण हिंदूंसाठीच मारक ठरत आहे, या निष्कर्षाप्रत हिंदू समाज येऊन पोहोचला आहे. या गुणाचे श्रेयही मिळत नाही आणि उलटपक्षी कायम मारच खात राहणे पदरी पडते हा अनुभव आहे. अगदी विसाव्या शतकापासून जरी याची सुरुवात केली तरी मोपला हिंसाचार, डायरेक्ट अ‍ॅक्शन, फाळणी, बांग्लादेशची निर्मिती, काश्मिरी हिंदूंचे पलायन या सर्व घटनांबद्दल हिंदूंनी एकांगी मार खाल्ला आहे. जिथे प्रतिकार केला किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा त्यांना ‘हिंदू-मुस्लीम दंगे’ किंवा ‘हिंदूंची असहिष्णुता’ असे लेबल लावले गेले आहे.

याचा परिणाम असा होतो की, हिंदू एक तर या विषयावर बोलणेच टाळतो किंवा हिंदूवरच झालेल्या अत्याचारांविरुद्ध सामाजिक शांतता बिघडेल म्हणून गप्प बसतो. ‘हिंदू’ हा शब्द ऐकला रे ऐकला की पाल अंगावर पडल्यासारखे वाटते. स्वत:च्या समाजाविषयी इतकी नकारात्मक आणि घृणास्पद भावना हिंदूमध्येच प्रकर्षाने जाणवते. त्याविरुद्ध आणखी एक प्रतिक्रिया म्हणजे हिंदू हिंसेला हिंसेनेच प्रतिउत्तर देतो. ‘हे योग्य आहे का?’, निश्चितच नाही. पण, असे विचारणार्‍यांनी मुळात सामाजिक हिंसेचा इतिहास तपासून ज्याचे माप त्याच्या पदरी टाकले पाहिजे.  असे केल्यानंतरच सामाजिक हिंसाचाराच्या आणि प्रतिक्रियात्मक हिंसाचाराच्या समस्येवर तोडगा निघणे शक्य आहे. 

मुस्लिमांना हिंसाचारास प्रवृत्त करणार्‍या त्यांच्या पांथिक शिकवणीपासून दूर करून निर्गुण निराकाराच्या आध्यात्मिक शिकवणीकडे वळवले पाहिजे आणि हिंदूंना अध्यात्माच्या पायावर आधारलेल्या सर्वसमावेशक धर्माकडे वळवले पाहिजे. त्यानंतर कदाचित आपल्या पांथिक, सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. आपल्या प्रतिक्रिया हिंस्र पद्धतीने उमटणार नाहीत.