आपल्याकडे पूर्वी काही नव्हतेच, हे सांगण्याची पद्धत विचारवंतांमध्ये रूढ झाली आहे. ते होते, असे सांगितले की ‘मागाहून केलेले, सुचलेले संशोधन’ असे त्याला म्हटले जाते. ब्रिटिशांच्या काळापासून विचारवंतांनी पेरलेल्या वाळवीने आपली संस्कृती व ज्ञानपरंपरा कुजवली आहे. त्याच कुजलेल्या भग्नावशेषांवर जिवंत राहण्याचे काम अभिजित दिपकेसारखी बिनडोक झुरळे इमानेइतबारे करत आहेत.
‘‘आंबेडकर आणि नेहरू यांनी यांनी आपल्याला अशा वेळी मतदानाचा अधिकार दिला, जेव्हा अनेक भारतीयांना निवडणुका म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हते.’’, असे अभिजित दिपके मुंबई येथे झालेल्या आंदोलनात म्हणाला. दिपके काय म्हणतो याला महत्त्व देण्याएवढी योग्यता त्या माणसात नाही. पण, जो विचार (त्याला अजिबात कळत नसला तरी) तो पुढे रेटतो, त्याचे खंडन होणे गरजेचे आहे.
लोकशाही, निवडणुका यांचा अधिकार नेहरू व आंबेडकर यांनी पहिल्यांदा भारतीयांना दिला, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार फुले दांपत्याने पहिल्यांदा दिला हे विचार मांडले जातात तेव्हा इतिहासाचे, समाजाचे आकलन झालेले नसते असा त्याचा अर्थ असतो. ते जाणून घेण्याची इच्छाही नसते.
ऋग्वेदात सभा, समिती यांचा उल्लेख आहे. अथर्ववेदात सभासदांचा उल्लेख आहे. ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रांमध्ये सभापति, सभापाल यांची वर्णने आहेत. पाणिनीने गण, संघ नमूद केले आहेत. ‘अंगुत्तर निकाय’मध्ये १६ महाजनपदांचा, ‘महापरिनिब्बान सुत्त’मध्ये सभागृहे व सभांचे उल्लेख आहेत, ‘अवदानशतका’त प्रजासत्तकाचा उल्लेख येतो, ‘विनय पिटक’ यात तर मतदान व निवडणूक अधिकारी यांचे स्पष्ट उल्लेख सापडतात. वैदिक काळापासून बौद्ध काळापर्यंत भारतात औपचारिक मतदानाची विकसित पद्धत चालत आलेली होती.
आजही आपण जी मंत्रपुष्पांजली म्हणतो, त्यातले ‘ॐ स्वस्ति साम्राज्यं...’ हा मंत्र ऐतरेय ब्राह्मणात (८.४.१५) आहे व ‘...सभासद इति’ असे म्हणत शेवट करतो, तो ऐतरेय ब्राह्मणात (८.३९) आहे. वेदकाळापासून आजवर त्याचा उल्लेख व त्याचे स्मरण दररोज होत आले आहे. ते जाणून घेण्याची इच्छाच उरली नाही, हे वास्तव आहे!
‘ब्राह्मणांनी इतरांना त्यापासून वंचित ठेवले’, असा आरोप केला जातो. ब्राह्मणांनी ते लपवून ठेवले नाही, ते सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच होती. जशी ‘र्हाइनोप्लास्टी’ ही प्लास्टिक सर्जरीतील ज्ञानपरंपरा सांभाळण्याची जबाबदारी कुंभारांवर होती. प्रत्येक जातसमूहाची अशी वेगवेगळी जबाबदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तरी ब्राह्मणांनी ज्ञान लपवून ठेवले, याला काही अर्थ उरला नाही. किती लोकांनी ते ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला? किती ब्राह्मणांनी तरी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला? गोत्र, शाखा, प्रवर ही ज्ञानपरंपरेची एक शाखा सांभाळण्याची जबाबदारी आहे, हे किती ब्राह्मणांना माहीत आहे?
ब्रिटिशांनी पाश्चात्त्य धर्तीवरील आधुनिक शिक्षण पद्धती राबवली तेव्हा, ब्राह्मणांसह सर्व ज्ञातीसमूहांकडे असलेली ज्ञानपरंपरा त्या पद्धतीत घेतली नाही. ती घेतली असती, तर युरोपीय महत्त्व कमी झाले असते. संस्थागत शिक्षण पद्धतीत भारतीय ज्ञान किती हीन दर्जाचे, टाकाऊ आहे हेच ठसवले. स्वाभिमान जिवंत राहील, अशी एकही जागा शिल्लक ठेवली नाही. जे शिकवलेच गेले नाही, ‘ते नव्हतेच’ ही भावना दृढ झाली. पायथागोरसच्या जन्माच्या कित्येक शतके आधी ऋषी बौधायन यांनी त्यांच्या ’बौधायन सुलभ सूत्र’ या ग्रंथात आपण ज्याला आज ‘पाथागोरस सिद्धांत’ म्हणतो तो स्पष्टपणे लिहिला होता, हे आम्हांला खरे वाटत नाही. कारण, भारतीय अभ्यासक्रमात ते कधी शिकवलेच गेले नाही.
‘आर्यभटांनी बहुजन समाजास अंधश्रद्ध ठेवण्यासाठी वेद, महाकाव्यासारखी थोतांडे रचली’, हे आजकाल शालेय अभ्यासक्रमात शिकवले जाते. वसाहतींच्या कालखंडात ज्ञानपरंपरेचा अभिमान नाहीसा करणे सुरू झाले. आज त्याच स्वाभिमानशून्यतेस जातीच्या अभिमानाशी जोडण्याचे काम सुरू आहे.
एखाद्या संस्कृतीचा व ज्ञानपरंपरेचा अभिमान मरतो, तेव्हा त्या सडलेल्या अवशेषांवर केवळ झुरळेच जिवंत राहतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा