श्रद्धा वाळकर आठवतेय का? हो तीच, जिचे तुकडे करून फ्रिजात ठेवले होते व नंतर अनेक ठिकाणी ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून फेकण्यात आले होते. समाजशास्त्रात एमए होऊन भारताचे भविष्य होऊ पाहणार्या आफताब पूनावालावर हे महान कृत्य केल्याचा आरोप आहे. खटला गेली तीन वर्षे सत्र न्यायालयात सुरू आहे.
‘दातांच्या तपासणीसाठी डॉक्टरकडे जायचे आहे’, ‘मानसिक समुपदेशन (साइकिएट्रिक कन्सल्टेशन) घ्यायला जायचे आहे’, ‘एमए विथ सोशिओलॉजीचा पेपर द्यायचा आहे’ या कारणांसाठी सुनावणी पुढे ढकलण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. हे औदार्य साधा चोरीचा आरोप असलेल्या आरोपीबाबत न्यायालय दाखवेल का, हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नसतो. सामान्यांसाठी पाच-सहा वाजता बंद होणारे न्यायालय, ‘असामान्यां’साठी रात्रीच्या तीन वाजता उघडले जाते. न्यायव्यवस्था कधी कठोर होईल व कधी तिची करुणा जागी होईल, हे कुठल्याही लॉ कॉलेजमध्ये शिकवले जात नाही!
हा खटला किती रेंगाळेल, त्याला शिक्षा होईल की नाही हा खूप पुढचा भाग झाला. समजा, त्याला शिक्षा सुनावलीच तरी हे सत्र न्यायालय आहे, पुढे उच्च आणि त्यापुढेही सर्वोच्च न्यायालय आहेच की! एका न्यायालयाने दिलेली शिक्षा, दुसरे न्यायालय कमी करते, काही ठिकाणी तर रद्दही करते. सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणार्यास कनिष्ठ न्यायालय फाशी सुनावते. ‘तो दिवसातून पाचवेळा देवाचे नाव घेतो’ या कारणासाठी तीच फाशीची शिक्षा कमी करून उच्च न्यायालय त्याला जन्मठेप सुनावते.
शेवटी होणारा ‘सत्याचा विजय’ आणि अखेरीस ‘मिळालेला न्याय’ खरोखरच विजय आणि न्याय असतो का? तरीही सत्याच्या विजयावर आणि न्यायावर लोकांची श्रद्धा आहे.
