गोव्यात ‘एसआयआर’विरोधात सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनात ‘हिंदुवाद मुर्दाबाद’ या घोषणा देण्यात आल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सीजेपीच्या झुरळांमागे डाव्यांची शक्ती आहे. डाव्या वाळवीचा ‘मनुवाद’, ‘ब्राह्मणवाद’ आता आपल्या ‘हिंदुवाद’ या त्यांच्या मूळ दुखण्याकडे आलाय.
आंदोलन कुठलेही असो, कशाविरुद्धही असो; ‘आजादी’च्या घोषणा असायच्याच. ‘मनुवाद से आजादी’ हे तर ठरलेलेच. घोषित केलेल्या हेतूपासून आंदोलने भरकटतात, असे अनेकांना वाटते. पण, वास्तविक जिथे ती भरकटतात, तोच त्यांचा मूळ हेतू असतो. ‘आजादी’, ‘स्वातंत्र्य’ वगैरे गोष्टी यांना जिथे सत्ता नसते, तिथेच हव्या असतात. सत्तेत असलेल्यांना ‘हुकूमशहा’, ‘फासिस्ट’ वगैरे म्हणतात. पण, डाव्या विचारधारेची जिथे सत्ता असते, तिथे एखाद्या हुकूमशहा व फासिस्टपेक्षाही जास्त क्रौर्याने वागतात.
‘आंदोलन करण्याचा अधिकार’ हे कायम सांगितले जाते. पण, त्याचबरोबर वाहतूक खोळंबणार नाही व त्याचा लोकांना त्रास होणार नाही याची जबाबदारी त्यांना घ्यायची नसते. आंदोलनाला परवानगी नाकारणे याला दडपशाही म्हटले जाते. काहींचा तर परवानगी मागायलाच विरोध आहे. लोकशाहीत सत्तापरिवर्तन हे मतांमधून घडते. निर्णय संसदेत होतात. या दोन्ही जागा बदलून सर्व काही रस्त्यावर ठरायचे असेल तर मतदान तरी कशाला हवे आणि संसद तरी कशाला हवी?
हेतूशी प्रामाणिक असलेली आंदोलने यशस्वी होतात, हा इतिहास आहे. त्याला लोकाश्रयही मिळतो. नीट घोटाळ्याविरोधातील आंदोलनास अंशत: यश मिळाले. ते राजीनामा घेण्यापुरते मर्यादित राहिले. पण, राजीनामा हे त्या समस्येचे समाधान होते का? प्रधान गेले, जोशी आले; घोटाळे थांबावेत यासाठी काय केले, हा प्रश्न कुणीच विचारत नाही. आताही ज्ञानेशकुमारांचा राजीनामा हे समाधान आहे का? ‘एसआयआर’ प्रक्रियेत सुधारणा करणे व सरकारवर दबाव आणून त्या करवून घेणे, हे समाधान आहे. वास्तविक, त्या पदावरून काढून टाकता येत नाही हे सीजेपीसकट सर्व राजकीय पक्षांना पुरेपूर माहीत आहे. मागणीच अशी करायची, की ती पूर्ण करता येणार नाही. मग, त्याच्या नावे केवळ अराजक माजवता येते. असे अराजक वारंवार माजू लागले, की लोकही त्याला कंटाळतात. आताही तेच झाले आहे. सीजेपीचे हे दिशाहीन आंदोलन डाव्या बाजूने जात वाममार्गाकडे वळले आहे.
‘व्होटचोरी’, नावे गाळली जाणे या प्रक्रियेत नेमका कुठे तसा प्रकार घडला आहे तो मांडणे गरजेचे आहे. तेरा कोटींची वजाबाकी अजिबात पटणारी नाही. त्यावर निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी खोटी पाडणे अत्यावश्यक होते. पुराव्यासह सिद्ध करण्याच्या दिशेने काहीच घडत नाही. होतात ते केवळ राजकीय दावे.
सीजेपी हा नवा राजकीय पक्ष जन्मास येऊन विरोधकांत आणखी एका विरोधकाची भर पडणार आहे. विरोधकांची मतविभागणी, त्यांच्यातील सुंदोपसुंदी वाढली तर त्याचा लाभ सत्ताधीशांनाच होईल. त्याव्यतिरिक्त या आंदोलनांचे काही अन्य फलित दिसत नाही. सीजेपीने केलेल्या राजीनाम्याच्या दोन्ही मागण्या राजकीय आहेत. विद्यार्थ्यांसाठी पुढे आलेले लोक हळूहळू राजकीय पक्ष होण्याच्या दिशेने चालत आहेत. किंबहुना त्यासाठीच त्यांनी विद्यार्थ्यांचा आधार घेतला असण्याची शक्यता अधिक आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापासून निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यापर्यंत लोंबकळलेला हा लोलक, पुढे किती राजकीय लोटांगणे घालतो हे येणारा काळ दाखवेल. पण, तोवर आंदोलनाचे मुद्दे सोडून ‘हिंदूवाद मुर्दाबाद’ करणारी डावी वाळवी झुरळांना खाऊन टाकेल. वाचलेली झुरळे राजकारणाच्या दलदलीवर स्वत:चे पोषण करतील. बाकी, ज्यासाठी आंदोलने होतात ते मुद्दे तसेच राहतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा