सरकारे रोजगार दिल्याचा दावा करत असतात. त्यात तथ्य किती, हे पैसे देऊनही नोकरी न मिळालेल्यांना विचारा. त्यामुळे, सरकार नोकरी, व्यवसाय देईल या भ्रमात राहणे युवकांनी सोडून दिले पाहिजे. नवनवे व्यवसाय शोधले पाहिजेत. गेली कित्येक दशके सुरू असलेल्या एका उद्योगाकडे तरुणांचे अजिबात लक्ष नाही. त्यांनी तो गांभीर्याने घेतलेलाच नाही. ‘आंदोलन’ हा तो उद्योग आहे. पण, आंदोलनापेक्षाही आंदोलक होणे जास्त लाभदायक आहे. तुम्हांला जर ‘आंदोलक’ व्हायचे असेल तर त्यासाठीच हा लेखप्रपंच आहे.
आंदोलनाला फार मोठा इतिहास आहे. पण, आधुनिक काळात आंदोलने व आंदोलक यांना भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी आंदोलनांचा अभ्यास असणे अजिबात उपयोगाचे नाही. त्याऐवजी आंदोलकांचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. यशस्वी आंदोलक कसे व्हावे, हे कुठल्याही पुस्तकात सहसा आढळणार नाही. त्यासाठी रोजची वर्तमानपत्रे, इन्स्टाग्राम रील्स, वृत्तवाहिन्या पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
आंदोलक होण्यासाठी आंदोलनाची माहिती असणे गरजेचे आहे, ही घोर अंधश्रद्धा आहे. आंदोलन कुठलेही असो, आपण तिथे आंदोलक म्हणून समोर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक होतकरू, पोलीस ‘डिटेन’ करतील म्हणून विनाकारण घाबरतात. पोलिसांनी ‘डिटेन’ करावे हाच आपला शुद्ध व स्वच्छ हेतू असला पाहिजे. त्यासाठी जिथे जमावबंदी आहे तिथेच जाणे, आपल्या अंगावर हात उगारेस्तोवर किमानपक्षी प्रतिउत्तर देईपर्यंत (कॅमेर्यांचा ‘फोकस’ आपल्यावरच असल्याचे नीट पाहिल्यानंतरच) पोलिसांना उचकटवत राहणे ही आंदोलक होण्याची पहिली पायरी आहे. केवळ घोषणा देणे पुरेसे नाही. त्यासाठी भाड्याने लोक मिळतात. हल्ली शिव्या देण्याचा जोडधंदाही सुरू झालाय. पण, त्यामुळे फार फार तर ‘व्ह्यूज’ वाढतात. आपल्याला ‘रीळस्टार’ नव्हे तर ‘आंदोलक’ व्हायचे आहे, हे कायम लक्षांत ठेवावे. आंदोलन झाले आणि आपला फोटो कुठेच छापून आला नाही, एखादे रीळही गाजले नाही तर समजावे आपण पहिल्या परीक्षेतच नापास झालो.
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आपला चेहरा समाजमाध्यमांवर गाजणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या मित्रपरिवारातले कॅमेराधारी मित्र सोबतीस असणे ही जमेची बाजू आहे. सभोवताली कॅमेरा घेऊन असलेल्यांची संख्या जास्त आहे, हे पाहून पोलिसांशी हुज्जत घालावी. कंटाळून ते ‘डिटेन’(ताब्यात घ्यायला) करायला आलेच तर त्यांच्याशी झगडावे. ही झटापट व्यवस्थित टिपली जातेय याची खात्री करून घ्यावी. त्यानुसार व्यवस्थित ‘पोझेस’ व ‘एक्स्प्रेशन्स’ द्यावेत. पोलीस धरून ओढू लागले की मेल्यासारखे जमिनीवर आडवे पडावे. आडवे पडणे ही फार महत्त्वाची स्टेप आहे. दोन हातांना दोघे व दोन पायांना दोघे असे एकूण चार पोलीस उचलून घेऊन जाऊ लागताच हिसडे मारावे. पण, चेहर्यावर वंचित, पीडित, शोषिततेचे मरणासन्न भाव तसेच ठेवावेत. (होतकरूंसाठी ही डिटेलिंग फार महत्त्वाची आहे. त्यांनी ती लक्षांत घ्यावी) बसमध्ये चढण्यासही विरोध करावा. दारातून आत गेल्याबरोब्बर मेलेपणातून लगेच बाहेर यावे. खिडकीतून डोके बाहेर काढत पोलिसांवर पुन्हा गुरुगुरावे. पोलीस लाठी वगैरे मारतील ही भीती अजिबात बाळगू नये. ते बिचारे पकडून दूर नेतात व काही वेळाने सोडून देतात. पुन्हा तोच आंदोलक होण्याचा धडा सुरू करता येतो.
पुन्हा आंदोलक म्हणून चमकण्यापूर्वी घातलेला टीशर्ट अवश्य बदलावा. त्यावर असलेल्या ‘स्लोगन’ घोषणाही फार काळजीपूर्वक निवडाव्यात. ‘आंदोलक’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व्हायचे असल्यास कपड्यांचा रंग लाल असणे जास्त हितकारक. आंदोलनापूर्वी व आंदोलन संपेपर्यंत आंघोळ वगैरे अजिबात करू नये. एवढे कडक पथ्य पाळावे लागते. चेहरा, केस, कपडे घामाने डबडबणे महत्त्वाचे आहे. उष्णता सहन होत नसेल तर आंदोलक होण्याच्या भानगडीत पडू नये. फार तर कुणी प्राणांतिक उपोषण करणार्यासमोर बसून छोले भटुरे, बिर्याणी यावर यथेच्छ तावर मारत उपोषणात सहभागी व्हावे. यशस्वी आंदोलक व्हायचे असल्यास कुणासही थांगपत्ता न लागता कसे खावे याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. कळू न देता खाण्याचा हा अभ्यास पुढे आमदार, मंत्री या प्रवासात खूप उपयोगी ठरतो. राजकीय वजन वाढते व आयुरारोग्यही वाढते.
आंदोलक होण्यासाठी स्थितप्रज्ञ (त्याला काही लोक कोडगेपणा म्हणतात) असणे अत्यावश्यक आहे. आंदोलन यशस्वी झाले वा अयशस्वी झाले, याच्याशी आपले फारसे देणेघेणे असता कामा नये. यशस्वी झाले तर ते आपल्यामुळेच कसे झाले, हे छातीठोकपणे सांगण्याचे राजकीय धोरण मात्र कायम ठेवावे. अयशस्वी झालेच तर निमुटपणे पुढील आंदोलनाच्या तारखा शोधाव्यात.
अशा प्रथमा, द्वितिया पार करत आपण यशस्वी आंदोलक होतो. पुढे कधी मंत्री वगैरे झालात तरीही स्वत: आंदोलक आहात हे विसरता कामा नये. आपण अगदी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:च्याच सरकारविरुद्ध आंदोलन करता आले पाहिजे.
आंदोलनांनी सत्ता उलथलवली जाऊ शकते. त्यास्तव राजकारणी, सत्ताधीश होण्यापेक्षाही आंदोलक होणे जास्त उपयुक्त आहे. लोकशाहीत आंदोलनांस कमतरता नाही; तस्मात आंदोलक व्हा!

1 टिप्पणी:
वा क्या बात है। छान उपहास
टिप्पणी पोस्ट करा