आज ‘गोमन्तक’वर आलेला रामप्रसाद प्रभुदेसाई यांचा ‘केरळचा फेरफटका : तथ्यांचा फेरफटका’ हा ‘प्रतिवाद’ वाचला; हा लेख वाचून मग दत्ता नायकांचा ११ ऑक्टोबर रोजी आलेला ‘केरळचा फेरफटका’ वाचला. प्रभुदेसाई यांनी फारच सौम्य, हळुवार ‘फटके’ मारले आहेत. वास्तविक, दत्ता नायक यांचा व्यासंग व लिखाण प्रचंड आहे, पण ते मध्ये मध्ये जेव्हा आपले पुरोगामीपण घुसवू पाहतात तेव्हा घोळ होतो.
दत्ता नायकांचे हे असे लिखाण या लेखापुरतेच मर्यादित नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांचे पूर्वग्रहदूषित व अनैतिहासिक दावे खोडून काढले आहेत. या लेखात तर एकूण ७ चुका आहेत. खरे सांगायचे तर ६ धादांत खोट्या गोष्टी व एक अर्धसत्य सांगितले आहे. असे व्यासंगाच्या अभावापेक्षाही पूर्वग्रहामुळे जास्त घडले आहे. आद्य शंकराचार्यांवर असलेला त्यांचा राग पुरोगामी बौद्धप्रेमामुळे असावा. ‘हिंदू धर्माला चुकीचे, हीन ठरवणे’ ही पुरोगामी होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची ठळक अट असावी, अशा पद्धतीने त्यांचे लिखाण असते.
आद्य शंकराचार्यांबाबत यापूर्वीही त्यांनी असेच अत्यंत चुकीचे, अनैतिहासिक लिखाण केले होते, त्याची आठवण हा लेख वाचून झाली. दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचा ‘झाडे’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यात केळीचे झाड भारतात पुढील दारी का लावत नाहीत, याविषयी लिहिताना दत्ता नायक यांनी केळ ही अशुभ मानली जाते, असा तर्क दिला होता. त्यासाठी आद्य शंकराचार्यांची कथाही दिली होती.
‘केळ आपण अशुभ मानतो. माणूस मृत झाल्यावर त्याचे पार्थिव केळीच्या गभ्याचे तीन तुकडे करून त्यावर ठेवतात. मूळ कथा अशी की आद्य शंकराचार्यांची आई निवर्तल्यावर तिचे पार्थिव नेण्यासाठी कोणीच येईना. कारण आद्य शंकराचार्य त्या काळाच्या संदर्भात हिंदू धर्मातले बंडखोर होते. म्हणूनच त्यांना पुढे प्रच्छन्न बुद्ध म्हणू लागले. त्यामुळे आद्य शंकराचार्यांनी आपल्या आईच्या पार्थिवाचे तीन तुकडे केले आणि ते स्मशानात नेले. त्यानंतर ही चाल पडली.’
तिच्या अंतिम काळात आपण उपस्थित राहू, असे वचन आद्य शंकराचार्यांनी आपल्या आईला दिले होते. संन्यासी झाल्यानंतर मृत आईला अग्नी देणे शास्त्राप्रमाणे निषिद्ध मानले जाते. तरीही शंकराचार्यांनी आपल्या मातृऋणापोटी स्वतः आईच्या पार्थिव शरीराला अग्नी दिला आणि त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘मातृपञ्चक’ हे पाच श्लोकांचे अप्रतिम स्तोत्र रचले.
ज्या शंकराचार्यांनी आपल्या आईसाठी हे पाच श्लोकांचे अत्यंत भावूक स्तोत्र रचले, ते आपल्या आईचे तीन तुकडे करतील आणि ते केळीच्या गभ्यावर ठेवतील? त्यानंतरच्या काळात केळीच्या गभ्याचे तीन तुकडे करायचे एवढीच पद्धत रूढ होईल? मेलेल्याचे तीन तुकडे करायची पद्धत रूढ होणार नाही? एकवेळ हेही मान्य केले तर मग अशुभ मानलेल्या केळीचे पान देवाच्या नैवेद्यास तरी कसे चालेल? गभ्याच्या तुकड्यांची आरास तरी कशी चालेल? पण, एकदा हीनत्व आणायचे ठरवले, की तर्कबुद्धी बाजूला ठेवणे ही पुरोगामी असण्याची आणखी एक प्रमुख अट आहे. दत्ता नायक ती पुरेपूर पाळतात.
दत्ता नायक यांच्या लेखातील मुद्दे खोडून काढणे मध्यंतरी बंदच केले होते. त्यांचे म्हणणे कितीही सप्रमाण खोडून काढले, तरी पुढच्या खेपेस लेख लिहिताना ते तेच लिहितात; स्वत:त बदल करत नाहीत. ‘पुरोगामी’ खाज ज्या लेखात त्यांनी खाजवली नाही, असे त्यांचे लेख खरोखरच अप्रतिम व विचार करायला लावणारे असतात. ‘गोमंतकीय खाद्यपदार्थांचे शुभकार्याच्या जेवणावळीत नसणे’ या विषयावर त्यांनी लिहिलेला लेख खरोखरच प्रत्येक गोवेकराने वाचावा व अमलात आणावा असाच आहे.
‘गौतम बुद्धामुळे हिंदू धर्म टिकला, सुधारला’ या आशयाचे लिखाण करणार्या मागील पिढीतील एका लेखक महोदयांनी तर ‘हिंदू आपली देवळे वाचवू शकले नाहीत, हाही दोष हिंदूंचाच आहे, आक्रमकांचा नाही’, अशा आशयाचे विधान करणारा लेख लिहिला होता. हे म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने बलात्कार झालेल्या मुलीसच तिचे शील ती वाचवू शकली नाही, याबद्दल दोषी धरण्यासारखे झाले. दत्ता नायक यांनी केरळचे वर्णन करताना आद्य शंकराचार्यांचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. झाडांवर लिहिलेल्या लेखातही केळीवर लिहिताना शंकराचार्यांचा उल्लेख करणे केवळ अप्रस्तुत होते. स्वत:स पुरोगामी सिद्ध करण्यासाठी वाट्टेल तसे तर्क देण्याचा हा ‘केळे’करी उद्योग डाव्या रंभाफलांनी आता तरी थांबवावा!
पुरोगामी होण्याची, म्हटले जाण्याची ही कीड फार जुनी आहे. पण, ती जपण्यासाठी असत्याचा आधार घेणे अयोग्य आहे. निदान आद्य शंकराचार्यांबाबत धादांत खोटे लिहिताना स्वत:चे नाव ‘दत्त’ आहे एवढे भान ठेवले तरी पुरेसे आहे!

२ टिप्पण्या:
दत्ता नायक डाव्या विचारांचा बिनडोक लेखक आहे. गोमन्तकमधे त्याचे लेख येतात. का छापतात सकाळवाल्यानाच माहित
कशाला आदळआपट करता? कुणी निशेध सुद्धा करणार नाही. विश्व हिंदू परिशदवाले झोपलेत.
टिप्पणी पोस्ट करा