आपल्या हातून घडलेल्या चुकीची शिक्षा किती द्यावी, हे ठरवण्याचा अधिकार आपण इतरांना देतो का? एक तर आपण आपला अपराध, चूक सहजपणे मान्य करायला तयार नसतो. अगदीच टाळणे, नाकारणे अशक्य होते, तेव्हा मोठ्या मनाने(?) ती मान्य करतो. त्याहीपुढे जाऊन आपल्या चुकीबद्दल शिक्षा काय व किती मिळावी, हेही आपणच ठरवतो.
‘नाही, माझं जरा चुकलंच; पण म्हणून काय त्याने/तिने असं करावं?’, हे परिचित वाक्य अनेकदा कानी पडते. म्हणूनच समोरचा ‘जास्तीत जास्त काय करेल?’ याचा अंदाज घेऊनच तशी मुभा देतो. ‘देवा तुझी इतकी सेवा केली, तरीही हे दिवस दाखवलेस?’ असे आपण सहज बोलून जातो. देव आपले कर्मफल योग्य मापात व वेळेत आपल्यापर्यंत पोहोचवतो. देव हा केवळ पोहोचवता धनी आहे, कर्मफलाचे मालक आपणच असतो!
क्रियेला प्रतिक्रिया काय असावी, हे आपण नाही ठरवू शकत. ती स्वीकारावी लागते किंवा त्याला दुसर्या क्रियेने, प्रतिक्रियेने उत्तर द्यावे लागते. ती प्रतिक्रिया स्वीकारण्यासाठी लागणारे मनोधैर्य आपल्याकडे अभावानेच आढळते.
म्हणूनच ‘तुला योग्य वाटेल ते कर’ म्हणणे खूप धाडसाचे ठरते. आद्य शंकराचार्य जेव्हा आपल्या अपराधांची परंपरा असल्याचा उल्लेख करतात, त्यापुढे आपले अपराध आपण मोजणे सोडून देऊन मिळेल ती शिक्षा निमूटपणे भोगणे एवढेच उरते. आपण ते नाइलाजाने स्वीकारतो, जाणिवेने नाही!
‘आपलं काय चुकलं?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्या विचारांचा विचार केल्याशिवाय सापडत नाही. चूक समजली, स्वीकारली तरीही शिक्षा स्वीकारण्याचे धाडस नसते. ते धाडस केवळ एकाच कारणामुळे येते; ‘माझ्यासाठी जे योग्य असेल तेच देव करेल’ यावर असलेला अढळ विश्वास! जे कर्मफल देव देईल ते कदाचित मला आवडणार नाही, ते चुकीचे आहे असे वाटेल; पण तरीही ते ‘माझ्यासाठी योग्य आहे’ या जाणिवेने स्वीकारणे फार महत्त्वाचे आहे. ती जाणीव झाली की आपणही आद्य शंकराचार्यांप्रमाणे ठामपणे म्हणू,
‘यथा योग्यं तथा कुरु, यथा योग्यं तथा कुरु, यथा योग्यं तथा कुरु...!’
--------------------------------------------------
॥देव्यपराधक्षमापनस्तोत्र॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य-श्रीमच्छंकराचार्य- विरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्॥
-------------------
ना मंत्र ना यंत्र. इतकेच काय पण तुझी स्तुतीही मला माहीत नाही. ना आवाहन ना ध्यान. मला तुझ्या स्तवनपर कथाही माहीत नाहीत. तुझ्या मुद्रा माहीत नाहीत. तुझ्यापुढे व्याकूळ कसे व्हावे, हेही मला समजत नाही. पण आई! सर्व क्लेशांचा नाश होण्यासाठी तुझ्याकडे हट्ट कसा करावा हे मात्र मला चांगले कळते. ॥१॥
पूजाविधीचे अज्ञान, द्रव्याचा अभाव आणि अंगातील आळस यामुळे माझ्याकडून विधिपूर्वक पूजन शक्य नसल्यामुळे तुझ्या चरणसेवेत जो खंड पडतो त्याबद्दल तू मला क्षमा करावीस. कारण आई! सकलांचा उद्धार करणार्या हे शिवे! एक वेळ कुपुत्र या संसारी असू शकतील, पण कुमाता मात्र कधीच असू शकत नाही. ॥२॥
आई ! या पृथ्वीतलावर तुझे कितीतरी पुत्र असून ते सरळमार्गी आहेत. पण त्यांपैकी मी मात्र एक नाठाळ पुत्र आहे. हे शिवे! माझा त्याग करणे हे मात्र तुला शोभत नाही. कारण एक वेळ कुपुत्र या संसारी असू शकतील, पण कुमाता मात्र कधीच असू शकत नाही. ॥३॥
हे जगज्जननी आई! मी तुझी चरणसेवा तर कधीच केली नाही. हे देवी! मी तुला भरभरून धनही देऊ शकलो नाही. तरीही तुझी माझ्यावर अनुपम प्रीती आहे. कारण एक वेळ कुपुत्र या संसारी असू शकतील, पण कुमाता मात्र कधीच असू शकत नाही. ॥४॥
अनेक प्रकारची प्रापंचिक कामे करावी लागत असल्यामुळे मी अन्य देवांनाही सोडून दिले आहे. आता तर माझ्या वयाची पन्नाशी उलटली आहे. आई! आता तुझी माझ्यावर कृपा झाली नाही, तर हे गणेशजननी ! या पामराने कोणास बरे शरण जावे? ॥५॥
अगदी अडाणी चांडाळदेखील उत्तम वक्ता होतो, भणंग कंगालदेखील कोट्यवधी सुवर्णमुद्रा घेऊन विहार करतो. हे मनुवर्णे, अपर्णे! या गोष्टी केवळ तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानात शिरले तरी घडून येतात. मग हे आई! संपूर्ण मंत्राच्या जपविधीचे कोणते फळ मिळेल हे कोणास ठाऊक? ॥६॥
सर्वांगास भस्म फासणारा, सर्पगरल गटागटा पिणारा, सदैव वस्त्रहीन अवस्थेत राहणारा, जटा वाढवलेला, गळ्यात सर्पाधिपतीचा हार घालून मिरवणारा पशूंचा पालक, हातात नरकपाळ बाळगणारा असा तो भूतगणांचा म्होरक्या असलेला तो शिव, ‘जगदीश’ हे बिरुद मिरवतो. हे भवानी! ही केवळ तुझ्याशी पाणिग्रहण, लग्न केल्याचे फळ आहे! ॥७॥
मला ना मोक्षाची आकांक्षा, ना वैभवाची वांछा ना विज्ञानाची अपेक्षा आहे. हे शशिवदने! मला सुखाचीदेखील इच्छा नाही. आई! माझी तुझ्याकडे एकच विनवणी आहे की, माझा जन्म मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी’ असा जप करत व्यतीत व्हावा. ॥८॥
विविध उपचारयुक्त विधींनी मी ना कधी तुझी आराधना केली. रूक्षचिंतनयुक्त वाणीने मी कोणते बरे अपराध केले नाहीत? हे श्यामलवर्णे! तरीदेखील अशा या अनाथ बालकावर तुझी कृपा असावी आई! खरेच हे फक्त तुलाच शोभून दिसते. ॥९॥
हे करुणासिंधु दुर्गे! अगदी संकटात सापडलो तरच मी तुझी आठवण काढतो. हे शिवे! ही माझी लबाडी आहे, असे मुळीच समजू नकोस. कारण तहानभुकेने कासावीस झाल्यावरच तान्ही बाळे आपल्या आईची आठवण काढतात ना गं? ॥१०॥
जगदंबे ! माझ्यावर तुझी पुरेपूर कृपा आहे यात आश्चर्य वाटण्याजोगे असे ते काय? कारण अपराधावर अपराध करूनदेखील माता आपल्या मुलाची कधीच आबाळ करत नाही. ॥११॥
माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापनाशिनी कोणी नाही. हे जाणून हे महादेवी! तुला जे योग्य वाटेल ते कर.॥१२॥
---------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा