अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२६

अंधश्रद्धा, अवैज्ञानिक म्हणा; पण याचाही विचार करा!

अभ्यास, श्रद्धा असो किंवा नसो; परिणाम अटळ असतात. ते भोगावेच लागतात. जे अपघात घडत आहेत ते खरोखर त्यामुळेच घडत आहेत का, याचा विस्ताराने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ ‘अवैज्ञानिक’, ‘अंधश्रद्धा’ म्हणून हेटाळणी करणे योग्य नाही.

पर्वरीचा उड्डाणपूल झाला आणि अपघातांचे सत्र सुरू झाले. याला बांधकामातील तांत्रिक चूक, वाहतूक व्यवस्थेतील चूक व वाहनचालकांच्या हातून घडलेल्या मानवी चुका कारणीभूत आहेत. त्याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञानाच्या परिघात न बसणारी एक चूक असण्याची शक्यता आहे. त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा; पण, त्या गोष्टीचाही विचार होणे अत्यावश्यक आहे. 

हा उड्डाणपूल उभारताना अनेक लहान देवस्थाने, कपेल हटवण्यात आली. त्यांना पर्यायी जागा देऊन त्यांचे स्थानांतरण झाले. त्यावेळेस खाप्रेश्‍वराशी संबंधित वाद बराच गाजला होता. त्यावर लेख लिहावा म्हणून माहिती गोळा करत होतो तेव्हा एक वेगळी माहिती समजली. खाप्रेश्‍वर हा जरी क्षेत्रापुरती रक्षक देवता असली तरी तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मूर्तीत विधिपूर्वक देवत्व आणण्यात आले होते; विसर्जन करतानाही तसेच विधिपूर्वक देवत्व उतरवणेही गरजेचे होते. ते झाले नसल्याची माहिती मिळाली. खरी खोटी देव जाणे! पण, त्यावेळेस माहिती देणारी वयस्क व्यक्ती म्हणाली होती, ‘तो वड आनी खाप्रेश्‍वराक हालयला ही बर्‍याची गजाल न्हू. फुडे किदें जायत कोण जाणा!’ (तो वड आणि खाप्रेश्‍वर तिथून हलवला ही चांगली गोष्ट नाही. पुढे काय होईल कोण जाणे!)

पहिलाच अपघात झाल्याची बातमी आली, तेव्हा त्याचे ते शब्द स्मरले. पण, त्यावर लिहिणे म्हणजे स्वत:वर अंधश्रद्धा, भीती पसरवण्याचा आरोप ओढवून घेण्यासारखे होते. अपघातांची संख्या वाढली तेव्हा त्यावर एक शक्यता म्हणून लिहावे, असे वाटले. 

साकवाळला झुवारी टँक आहेत तिथे खालून पूल व वरच्या बाजूने उन्नत मार्ग (एलेव्हेशन) आहे; त्या ठिकाणी असे जवळपास दररोज अपघात होऊ लागले. चंद्रेश्‍वर भूतनाथाच्या एका निस्सिम भक्ताचा अपघाती मृत्यू झाला. त्या जागेबाबत कौल घेणार्‍या अनेकांना जागेदाराची बाधा दाखवली होती. 

पूर्वी मंगलकार्याला निघतानाही गावाची सीमा ओलांडली, की प्रवेश करणार्‍या गावच्या राखणदाराला नारळ विडा ठेवायची पद्धत होती. यातून त्याचा मान राखला जात असे. गावचा सरपंच कोण आहे, तलाठी-मामलेदार कोण आहे, आमदार, मंत्री कोण आहे याला काहीही महत्त्व नव्हते. 

आपल्या क्षेत्रात संचार करत येणार्‍या जाणार्‍या वाटसरूंचे सीमा ओलांडेपर्यंत रक्षण करण्याचे काम रक्षक, क्षेत्रपाल, राखणदार देवता करतात. संपूर्ण क्षेत्र हेच त्यांचे देवस्थान. त्याला एका जागी बंदिस्त करण्याची कल्पना पूर्वी नव्हती. बोडगिणीच्या झाडांत प्रवेशस्थानाच्या एका विशिष्ट जागी दिवा लावला जायचा व पाया पडून नमस्कार करत रक्षण करण्याची विनंती केली जात असे. जंगलाच्या त्या भागातून जाताना शेवटपर्यंत तो येतो व राखण करतो, अशी लोकश्रद्धा होती. खाप्रेश्‍वर ही फिरती रक्षक देवता आहे. या नैसर्गिक शक्तीला एका जागी प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता खरे तर नव्हती. पण, केलेच तर त्याचे विसर्जनही त्याच पद्धतीने करणे गरजेचे होते. ते तशाच पद्धतीने झाले का, याचा शोध घेतला पाहिजे. 

कोकणात म्हसोबा, बहिरोबा(भैरव), वाघोबा किंवा वाघ्या, चेडोबा किंवा चेडो, खंडोबा किंवा मल्हारी, जाखाई, झोलाई, म्हाराई या क्षेत्रपाल, संरक्षक देवता आहेत. याशिवाय वेशीवर मारुतीराया आहेतच! गोव्यात रवळनाथ, वेताळ, भूतनाथ, क्षेत्रपाल, सातेरी, ब्रह्मा किंवा ब्राह्मण, पुरुष (ग्रामपुरुष किंवा आदिपुरुष) आणि वीर (मूळवीर, वीरगळ) आहेत. याशिवाय राखणदार, देवचार, हापशी, खेचरी(खेत्त्री), नास, म्हारू,  आजोबा, ब्रह्मो असे क्षेत्राशी, वनराईशी निगडित अमूर्त देवता आहेत. 

आपल्याकडे देवतांचे तेहतीस प्रकार आहेत. या तेहतीस प्रकारातील देवता या माणसाच्या मानण्यावर आधारलेल्या नाहीत; त्या निसर्गात असणार्‍या शक्ती आहेत. या काळाच्या ओघात नष्ट न होणार्‍या, उपास्य किंवा अनुपास्य देवता आहेत. त्यांचे स्वरूप व कार्य यावरून त्यांची नावे परंपरेने, अनुभवाने लोकस्मृतीत आहेत. 

रुद्र या प्रकारात येणार्‍या निसर्गातील शक्ती आपले अस्तित्व निश्‍चितच दाखवतात. ही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नाही; हा अनुभवाचा भाग आहे. भले मानवी विकासासाठी का असेना, निसर्गाच्या केलेल्या अत्यल्प हानीचेही परिणाम भोगावे लागतात. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. तोच नियम निसर्गातील शक्तींना लागतो. निसर्गाच्या नियमांना आपल्याकडे ‘ऋत’ म्हटले जाते. आपल्या शालेय अभ्यासक्रमात हे ‘ऋत’ शिकवले जात नाही. एका ओळीत माहिती दिली जाते, तिथेही त्याचा उच्चार ‘रिटा’ असा काही ठिकाणी केला जातो!

अभ्यास, श्रद्धा असो किंवा नसो; परिणाम अटळ असतात. ते भोगावेच लागतात. जे अपघात घडत आहेत ते खरोखर त्यामुळेच घडत आहेत का, याचा विस्ताराने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ ‘अवैज्ञानिक’, ‘अंधश्रद्धा’ म्हणून हेटाळणी करणे योग्य नाही. माझी मुलगी लहान असताना कधी कधी संध्याकाळच्या वेळेस रडायची. आई तिची दृष्ट काढायला सांगत असे. त्यावेळी वडील व मी त्यावर विश्‍वास न ठेवणार्‍यातले होतो. आईपुढे दोघांचेही शहाणपण चालत नसे. शेवटी एकदा नाइलाजाने सोडणावर निखारा व त्यात सुकी मिर्ची आणि मोहरी टाकून मुलीला ओवाळले व घराच्या सीमाबाहेर ठेवले. हातपाय धुवून येईस्तोवर मुलगी रडायची थांबली होती. असे अनेकदा घडले. तेव्हा विचार डोक्यात आला, की ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही हे महत्त्वाचे आहे की कितीही अतार्किक असले तरी मुलगी रडायची थांबते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे?

एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो, यावर ते अवलंबून आहे. एक शक्यता गृहीत धरताना अन्य पर्याय विचारातच घेऊ नयेत का? की, त्यांचाही विचार करावा, हे ज्याचे त्याने ठरवावे!