शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२६

सौ चूहे खा के बिल्ली चली हज को!

ज्यांनी जगभर निसर्गपूजक संस्कृती संपवल्या, निसर्ग संपवला त्यांनी सर्वधर्मीय(?) सभा घेऊन पर्यावरण संरक्षण व संवर्धन याविषयी चर्चा करणे, हा अभ्यासनीय विरोधाभास आहे. वेद आणि उपनिषदे समष्टीचा विचार निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून करतात. मानवाच्या उपभोगासाठी ईश्‍वराने निसर्गाची निर्मिती केली, असा विचार बायबल आणि कुराण ठेवतात. जे आडातच नाही ते पोहर्‍यातही येत नाही. त्यामुळे पर्यावरणाची होणारी सर्वधर्मीय(?) चिंता कुठल्याच प्रकारे पापक्षालन नाही; उलट ते राजकीय विरोधाचे हत्यार आहे!

ज्यांनी जगभर निसर्गपूजक संस्कृती संपवल्या, निसर्ग संपवला त्यांनी सर्वधर्मीय(?) सभा घेऊन पर्यावरण संरक्षण व संवर्धन याविषयी चर्चा करणे, हा अभ्यासनीय विरोधाभास आहे. वेद आणि उपनिषदे समष्टीचा विचार निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून करतात. मानवाच्या उपभोगासाठी ईश्‍वराने निसर्गाची निर्मिती केली, असा विचार बायबल आणि कुराण ठेवतात. जे आडातच नाही ते पोहर्‍यातही येत नाही. त्यामुळे पर्यावरणाची होणारी सर्वधर्मीय(?) चिंता कुठल्याच प्रकारे पापक्षालन नाही; उलट ते राजकीय विरोधाचे हत्यार आहे! 

मानव हा निसर्गातील एक घटक, निसर्गाचा वापर आणि तो करण्याचा मानवाचा अधिकार याविषयी वैदिक साहित्य,  उपनिषदे आणि बायबल व कुराण यांची भूमिका वेगवेगळी आहे. वेद आणि उपनिषदे यांच्या दृष्टिकोनातून मानव हा निसर्गाचा एक घटक आहे; त्याहून श्रेष्ठ किंवा वेगळा नाही. 

बायबल व कुराण निसर्गाला मानवाच्या उपभोगासाठी निर्मिल्याचे सांगतात. ‘सृष्टी सर्व जीवांसाठी आहे; मानव हा निसर्गाचा मालक नसून एक घटक आहे’ हा विचार आणि  ‘सृष्टी मानवाच्या सेवेसाठी आहे आणि मानव हा तिचा मालक आहे’ हा विचार परस्परविरोधी आहेत. 

‘सृष्टी मानवाच्या सेवेसाठी आहे’ या मानव केंद्रीत  दृष्टिकोनात निसर्गाची रचना पिरॅमिडसारखी असते. यात मानव सर्वांत वरच्या स्थानी असतो आणि इतर सजीव त्याच्या खालच्या स्तरावर आहेत. याउलट, ’सृष्टी सर्व जीवांसाठी आहे’ या दृष्टिकोनात निसर्गाची रचना ‘नेटवर्किंग’सारखी असते. मानव हा त्यातला केवळ एक घटक असतो. प्रत्येक घटकाचे स्वतंत्र स्थान व महत्त्व असते. प्रत्येक घटक पूरक व परस्परावलंबी असतो. मानव केंद्रीत दृष्टिकोनात झाडे, नद्या किंवा प्राणी यांचे महत्त्व ते मानवाला किती उपयोगी पडतात यावरून ठरते. निसर्ग केंद्रीत दृष्टिकोनात मानवाचा उपयोग असो वा नसो, प्रत्येक जीवाला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि जगण्याचा अधिकार आहे. अन्य घटकांना अस्तित्व सांभाळणे ही प्रत्येक घटकाची जबाबदारी असते; खास करून मानवाची!

बायबल(जिनेसिस १:२६-२८)च्या वचनांमध्ये ईश्वराने मानवाला पृथ्वीवरील मासे, पक्षी आणि सर्व प्राण्यांवर ‘अधिकार’ गाजवण्यास आणि पृथ्वीला आपल्या ‘ताब्यात’ घेण्यास सांगितले आहे. कुराणमध्ये अनेक ठिकाणी (सूरह अल-जाथिया ४५:१३ किंवा सूरह लुकमान ३१:२०) असे म्हटले आहे की, अल्लाहने आकाश आणि पृथ्वीतील सर्व गोष्टी मानवाच्या ‘अधीन’ किंवा ‘सेवेसाठी’ केल्या आहेत. यातून सृष्टी ही मानवाच्या फायद्यासाठी आणि उपभोगासाठीच निर्माण केली आहे, असा स्पष्ट संदेश जातो. बायबलमधील ’रादाह’ (राज्य करणे) आणि कुराणमधील ’तस्खीर’ (अधीन करणे) हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. याशिवाय बायबलमधील ’डोमिनियन’ (प्रभुत्व, ताबा आणि संपूर्ण नियंत्रण) हा शब्दही विचार करण्यासारखा आहे. 

आधुनिक काळात जेव्हा ‘सृष्टी मानवाच्या सेवेसाठी आहे’ हा  विचार रेटला गेला तेव्हा माणसाने ही जबाबदारीच बाजूला ढकलली व अधिकाराची भाषा करू लागला. त्यातून निसर्गाचे अमर्याद शोषण सुरू झाले. मानवाने स्वतःला निसर्गाचा मालक समजून जंगले तोडली आणि नद्या प्रदूषित केल्या.

आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जाणारे फ्रान्सिस बेकन यांनी बायबलमधील या संदर्भाचा वापर करून सांगितले की, मानवाने विज्ञानाच्या मदतीने निसर्गावर गमावलेले आपले ‘प्रभुत्व’ पुन्हा मिळवले पाहिजे. निसर्गाला मानवाची ‘दासी’ बनवून तिच्याकडून सेवा करून घेतली पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. फ्रेंच तत्त्वज्ञ देकार्त यांनी मानवी मन आणि निसर्ग (भौतिक जग) यांना पूर्णपणे वेगळे मानले. माणसाला ‘निसर्गाचा मालक आणि स्वामी’ बनण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्या संस्कृतींमध्ये निसर्गाला ‘देव’ किंवा ‘माता’ मानले जाते, तिथे झाड तोडताना किंवा नदी अडवताना एक नैतिक भीती किंवा संकोच असतो. मात्र, जेव्हा निसर्ग केवळ ‘मानवोपभोगासाठी बनवलेली निर्जीव वस्तू’ मानला गेला, तेव्हा खाणकाम, जंगलतोड आणि कारखानदारीसाठी निसर्गाचे शोषण करणे सोपे आणि नैतिकदृष्ट्या योग्य वाटू लागले.

अमेरिकन इतिहासकार लिन व्हाईट ज्युनियर यांनी १९६७साली ‘द हिस्टॉरिकल रूट्स ऑफ अवर इकॉलॉजिकल क्रायसिस’ हा शोधनिबंध लिहिला. त्यांनी असा निष्कर्ष काढला, की आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जन्म पाश्चात्त्य ख्रिश्चन विचारांच्या गर्भातून झाला, जिथे निसर्गाला पवित्र न मानता मानवाच्या उपभोगासाठी दिलेली वस्तू मानले गेले. त्यामुळे निसर्गाप्रति असलेला आदर नष्ट होऊन जागतिक पर्यावरण संकटाची बीजे रोवली गेली. ‘पर्यावरणाची चिंता’ वाहणार्‍या चर्चने याची चर्चा केली नाही व स्वत: संपवलेल्या निसर्गपूजक संस्कृतींची माफीही मागितली नाही!

निसर्गाचे शोषण न करता त्याचा गरजेपुरता वापर भारतीय करत होते. ब्रिटिशांनी या जीवनशैलीस ‘अविकसित’ आणि ‘जमिनीचा अपव्यय’ ठरवले. ब्रिटिश अधिकार्‍यांनी या परंपरेला ‘अंधश्रद्धा’ मानले आणि आर्थिक फायद्यासाठी या देवरायांमधील मौल्यवान लाकूडतोड सुरू केली. आजही भारतीय पुरोगामी, पर्यावरणवादी वटपौर्णिमेच्या पूजेमुळे हजारो वर्षे वड व अन्य वनस्पतींचे संरक्षण झाले, हे मान्य करत नाहीत. उलट त्याला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात. आजही भारतीय शालेय अभ्यासक्रमात ‘पृथ्वीसूक्त’ नाही. उलट, वेद व उपनिषदे यांना ‘ब्राह्मणधर्मा’चे ग्रंथ किंवा ‘बहुजनांचे शोषण करण्यासाठी आर्यभटांनी निर्मिलेले थोतांड’ असे म्हणणारा जातीयवादी दृष्टिकोन ‘ह्युमेनिटीज’खाली शिकवला जातो. 

‘पर्यावरण’ हे राजकीय हत्यार म्हणून वापरले जाते. भारतात किमान दोन असे प्रकल्प आहेत, जे केवळ या हत्याराने संपवण्याचा प्रयत्न झाला. पैकी एक प्रकल्प यशस्वी झाला तर दुसरा चक्क बंद पडला. निसर्ग संपवण्याचा इतिहास असलेल्यांनी सर्वधर्मीय(?) सभा घेऊन पर्यावरण संरक्षण व संवर्धन याविषयी चर्चा करणे म्हणूनच विचार करण्यासारखे आहे. ‘सद्भावा’ची ‘कोरी’ पाटी घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या कितीही गप्पा हाणल्या, तरी त्या ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को’ या उक्तीचीच पूर्ती करतात!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: